इंग्लंडनं पास काय दिला नाही, साळवेंनी तिथला वर्ल्डकप टूर्नामेंटच भारतात ओढून आणला.
२०२४ ते २०३१ दरम्यान दोन वर्ल्डकप आणि चार टी २० वर्ल्डकप खेळवले जाणार आहेत. आता हे वर्ल्डकप आपल्या देशात खेळवले जावेत म्हणून जगातल्या १७ क्रिकेटींग देशांनी यासाठी होस्ट करण्याची ऑफर दिली आहे. खरं तर १९८७ च्या आधी असं होस्ट करण्याची परवानगी मागणं, आणि ते पण ICC ला, अगदी ना के बराबर होतं.
पण राजीव गांधींच्या एका मंत्र्यानं इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला यात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आणि भारतात वर्ल्डकप मॅच खेळवली. आणि हे घडलं होतं फक्त एक पास न दिल्यामुळं.
चला आता यासाठी थोड रिवाइंडच बटन दाबायला लागतंय. १९८३ चा प्रूडेंशियल वर्ल्ड कप.
इंग्लंडच्या धरतीवर वेस्ट इंडीजसमवेत भारत वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पोहोचला. भारत अंतिम सामन्यात पोहोचलेला म्हणून इंग्लंडची जाम जळलेली. त्यांनी विचार केला असेल की, साला आम्ही यांच्यावर ९० वर्ष राज्य केलं आणि हा भारत आपल्यावरच भारी पडला.
बरं, आता आपला भारत फायनल मध्ये पोचलाय म्हणल्यावर, भारतातल्या बर्याच लोकांना लॉर्ड्स मैदानावर फायनल पाहण्यासाठीच निमंत्रण मिळालं. या बर्याच लोकांपैकी एक होते नरेंद्र कुमार साळवे.
त्यावेळी एन. के. पी. साळवे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजे बीसीसीआयचे अध्यक्ष, आयसीसीचे सदस्य आणि भारत सरकारचे केंद्रीय मंत्री होते. आता भारताची फायनल आणि त्यात आपला मराठी माणूस ICC चा मेंबर, म्हंटल्यावर लोकांनी थोडे पास आणि तिकीट साळवेंकडं मागितली.
बीसीसीआयच्या काही सदस्यांनी पण साळवेंकडं तिकिट-पास मागितले. आता साळवे पण म्हंटले, बरं देऊयात की, इतकं काय तेव्हा. त्यांनी क्रिकेट बोर्डाकडून आणखी काही तिकिटांची मागणी केली. पण इंग्लंड क्रिकेट बोर्डानं साळवेंना जादा तिकीट देण्यास स्पष्ट नकार दिला.
हे जे काही घडलं त्यामुळं साळवेंना थोडं वाईट वाटलं. ते आपले शांत बसून मॅच बघत राहिले पण त्यांच्या मनात तणाव होता. त्याच्या मनात काहीतरी तरी चालू होतं.
लंच टेबलवरच वर्ल्डकपचं नियोजन
तो ८३ चा वर्ल्ड कप तर भारताने जिंकला. कपिल देवनं लॉर्ड्स मध्ये तो ऐतिहासिक करंडक उचलला. यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष आणि साळवेंचे मेहुणे यांनी दुपारचे जेवण ठेवले. आमंत्रणात भारतीय क्रिकेट संघ, बीसीसीआयचे अधिकारी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख एअर मार्शल नूर खान यांना बोलवण्यात आलं होतं. त्या पार्टीतला प्रत्येकजण निवांत जेवत होता. पण या आनंदी क्षणामध्ये ही साळवेंच्या मनाला एक गोष्ट टोचत होती.
‘आखिर क्यों अंग्रेज़ों ने मुझे फाइनल मैच के पास देने से इन्कार कर दिया.’
दुपारच्या जेवणाच्या टेबलावर साळवे PCB च्या प्रमुखांशी बोलू लागले. आणि नूर खान यांना म्हणाले,
‘काश भारत में भी वर्ल्ड कप जैसे बड़े टूर्नामेंट होते.’
साळवे यांच म्हणणे ऐकून नूर खान यांना समजल की साळवेंना ECB ने केलेला माज सहन झाला नाहीये. त्यांनीही साळवे यांच्या प्रश्नाला अशा थाटात उत्तर दिलं की, जणू त्यांना इम्रान खानला स्वत:च्या देशात वर्ल्डकप खेळताना पाहायचं होतं. यावर नूर खान म्हणाले,
‘हम वर्ल्ड कप अपने देश में क्यों नहीं खेल सकते?’
साळवेंना समजलं होतं की जरी फाळणी झाली असली तरी, या जेवणाच्या टेबलावर एकत्र बसल्याप्रमाणं क्रिकेटमध्येही एकत्र येऊन आपण जगाला आपल्या क्रिकेटची ताकद दाखवू शकतो. साळवेंनी तातडीनं नूर खान यांना ऑफर दिली. ते म्हणाले,
“भारत और पाकिस्तान मिलकर अगर वर्ल्ड कप आयोजन करें तो कैसा रहेगा?”
नूर खान विचारात पडले. कारण हे जितकं वाटतं तितकं सोप्प नव्हतं. पहिले तर, आयसीसीने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला व्हेटो पॉवर दिली होती. त्या परिस्थितीत इंग्लंडमधनं वर्ल्डकप बाहेर खेळवला जाणं केवळ अशक्य होतं. पण साळवे देखील हट्टाला पेटलेले. भारतात वर्ल्डकप खेळवला जावा म्हणून ते कुठल्याही टोकाला जायला तयार होते.
आता वर्ल्डकपसाठी तयारी सुरु झाली..
साळवेंनी पहिल्यांदा वर्ल्डकपसाठी धोरण आखलं. प्रथम त्यांनी भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाची संयुक्त समिती स्थापन केली. त्याचे अध्यक्ष म्हणून साळवे निवडले गेले. जगमोहन दालमिया त्यावेळी बीसीसीआयचे खजिनदार होते.
आयसीसीला आपल्या बाजूने वळवण्याचा त्यांना एक चांगला मार्ग सापडला. आयसीसीचे एकूण सदस्य देश २८ आहेत. त्यापैकी केवळ ७ देश कसोटी क्रिकेट खेळतात, तर २१ देशांना कसोटी खेळण्याचा दर्जा मिळाला नव्हता ही माहिती जगमोहन दालमिया यांनी शोधून काढली.
बस्स्स, साळवे आणि बीसीसीआयने या कसोट्या न खेळणार्या देशांना त्यांच्या बाजूने वळवायची तयारी सुरु केली. कसोटी खेळणार्या आणि कसोटी न खेळणाऱ्या देशांना इंग्लंडपेक्षा जास्त रक्कम देण्याची योजना तयार करण्यात आली.
बीसीसीआयनं ठरवलं की जे लोक कसोटी खेळतात त्यांना इंग्लंडपेक्षा चारपट अधिक रक्कम दिली जाईल, तर जे देश टेस्ट खेळत नाहीत त्यांना पाचपट जास्त पैसे दिले जातील.
हे ऐकताच ICC विचारात पडली. BCCI च्या या ऑफरमुळे त्यांना जरा आश्चर्यच वाटलं. त्यावेळी आयसीसीच नव्हे तर बीसीसीआयसमोर सर्वात मोठा प्रश्न होता, एवढा पैसा येणार कुठून ?
साळवे यांचे नियोजन व धीरूभाईंची मदत
त्यावेळी भारत क्रिकेटमध्ये काही सुपर पॉवर नव्हता. तशात फक्त BCCI च्या जोरावर वर्ल्डकप आयोजित करण्यासाठी इतके पैसे पण नव्हते. अशा परिस्थितीत बीसीसीआयने अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांशी बोलण्यास सुरवात केली. यामध्ये हिंदुजा ग्रुप, कोका-कोला, जिलेट, मित्सुबिशी या कंपन्यांचा समावेश होता. जवळपास ३७ लाखांची बोली होती. पण हे पैसे पण पुरेसे नव्हते, कारण बीसीसीआयला सुमारे चार कोटींची गरज होती.
आता यात एंट्री मारली धीरूभाई अंबानींनी. त्यांच्या टेक्सटाइल कंपनी रिलायन्सने बीसीसीआयला मदत केली. रिलायन्सच्या वतीने धीरूभाईंचा लहान मुलगा अनिल अंबानीने या प्रोजेक्टचं लीड केलं. पण अट ठेवली,
अगर भारत में विश्वकप होता है तो रिलायंस उसे स्पॉन्सर करेगा.
बीसीसीआयने ही अट मान्य केली आणि अनिल अंबानीने BCCI ला २.१८ दशलक्ष पौंड दिले. यानंतर BCCI आणि PCB ने एकत्र येऊन वर्ल्डकप आयोजित करण्यासाठीचा प्रस्ताव ICC कडे सादर केला. आणि वर्ल्डकपच्या मतदानात १६-१२ असा विजय मिळविला.
वर्ल्डकपच्या स्पर्धेची भारतात एंट्री निश्चित झाली होती. जसा का या वर्ल्डकपचा गाजावाजा होऊ लागला तसे बरेच स्पॉन्सर्स बीसीसीआयला अप्रोच करू लागले. पण त्यावेळी साळवेंनी इतर सर्व स्पॉन्सर्सना रफा दफा केलं. ते म्हंटले
‘जब हमें ज़रूरत थी तो रिलायंस ने हमारी मदद की, अब रिलायंस के अलावा हम किसी को स्पॉन्सरशिप नहीं देंगे.’
झालं..मग काय १९८७ मध्ये खेळलेल्या या वर्ल्डकपचा इतका गाजावाजा झाला की, त्यानंतर जगभरातील सर्वच खंडांमध्ये वर्ल्डकप खेळवला जाण्याची शक्यता वाढली. पण हे सगळं घडवून आणलं होतं एन. के. पी. साळवे यांनी.
शेवटी काय तर मराठी माणसांना नडला की, मराठी माणूस इगोवर घेऊन समोरच्याची दाबून ठासतो..
हे ही वाच भिडू
- एकदा तर क्रिकेट मॅचच्या तिकीटामुळं महाराष्ट्राच्या विधानसभेत खडाजंगी झाली होती
- भारतीय महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकल्या ते कराडच्या प्रेमलाकाकी चव्हाण यांच्यामुळं ..
- आता काश्मीरमध्ये पाकिस्तान क्रिकेटमधून राजकारण करायचा प्रयत्न करतंय..