IPL मधून BCCI कोटीत पैसे छापतं पण टॅक्स भरतं ‘शून्य रुपये’ कारण आहे हा नियम..

यंदाच्या आयपीएलमध्ये दोन नव्या टीम्स आल्या, गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स. त्यांनी किती मॅचेस जिंकल्या, प्लेऑफला जाणार का हा विषय सोडा, पण जेव्हा या टीम्सची आयपीएलच्या मार्केटमध्ये एंट्री झाली, तेव्हाच आपल्या फ्युजा उडाल्या होत्या.

कारण फक्त दोन टीम्सच्या जोरावर बीसीसीआयला पैसे किती मिळाले माहितीये का? १२ हजार कोटी. म्हणजे आयपीएलमधल्या फक्त दोन टीम्सच्या बदल्यात बीसीसीआयनं १२ हजार कोटी कमावले.

२०२१ च्या आयपीएलचा रेव्हेन्यू किती होता माहितीये का? १००० कोटी पेक्षा जास्त. हजार कोटीत किती शून्य येतात, हे मोजायला कॅल्क्युलेटर घेऊन बसावं लागेल.

प्लेअर्सला लिलावात मिळणारे आकडे कोटींमध्ये, मीडिया राईट्सचे हक्क हजार कोटीत, स्पॉन्सरशिपचे आकडे हजार कोटीत… आपल्याला नोटांमुळं रूम भरेल एवढा पैसा इमॅजिन होतो. कारण तेवढे पैसे बीसीसीआय फक्त आयपीएलच्या जोरावर किरकोळीत कमावते.

पण खरी गोम अशीये की, या एवढ्या पैशांवर बीसीसीआयला एकाही रुपयाचा टॅक्स भरावा लागत नाही.

तुम्ही म्हणाल ‘कायतर गॉटमॅट असेल,’ ‘काळा पैसा पुरवत असतील,’ ‘हे झोल करतायत आयपीएलला बॅन करुन टाका,’ पण भावांनो आणि बहिणींनो बीसीसीआय टॅक्स भरत नाही, म्हणून त्यांच्यावर सरकारची कारवाई होणं तर सोडा, पण शिवाजी द बॉस मधला रजनीकांतही काही करू शकत नाही.

क्यों हिला डाला ना..?

एवढं इनकम असूनही, टॅक्स न भरावं लागण्याचं कारण म्हणजे नियम. बीसीसीआयनं फक्त एक स्कीम टाकली ज्याच्या आधारे त्यांचं कोटींचं इनकम टॅक्स फ्री झालं.

विस्कटून सांगतो…

आता आयपीएलमध्ये पैसा तर आहेच, सोबतच मनोरंजनाचा तडका आहे. पण तरीही टॅक्स बसत नाही, कारण आयपीएल खेळाला प्रोत्साहन देते, आयपीएलमधून कमावलेला पैसा पुन्हा क्रिकेटच्या प्रसारासाठीच वापरते, त्या सगळ्यामुळं देशाच्या कानाकोपऱ्यात क्रिकेटची लोकप्रियता पोहोचते… याच्या आधारेच इनकम टॅक्स डिपार्टमेंटनं स्वतःच आयपीएलमधून मिळणाऱ्या कमाईवर टॅक्स भरण्यातून बीसीसीआयला सुट दिली आहे.

अगदीच नियमांच्या भाषेत सांगायचं झालं, तर इनकम टॅक्स अपीलेट ट्रिब्युनल (आयटीएटी) नं ‘Income Tax Act 1961’ च्या आधारे दिलेल्या आदेशानुसार, ‘या कायद्याच्या कलम १२ एए अनुसार बीसीसीआय कर सवलतीस पात्र आहे. आयपीएलमधून होणार फायदा हा क्रिकेटच्या प्रगतीसाठीच वापरला जातो आणि हा आर्थिक फायदा प्रासंगिक आहे, हा बीसीसीआयनं केलेला दावा योग्य आहे.’ असंही या आदेशात म्हणलं होतं.

२०२१ च्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या या सुनावणीमुळं बीसीसीआयला दिलासा मिळाला होता. कारण आयपीएलमधून होणाऱ्या फायद्यावर टॅक्स घेण्याबाबत बीसीसीआयला रेव्हेन्यू डिपार्टमेंट कडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

या सुनावणी दरम्यान रवीश सूद आणि प्रमोद कुमार यांच्या खंडपीठानं आणखी एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं होतं. “एखाद्या स्पर्धेत जास्त लोकप्रियता मिळावी म्हणून नियमांत बदल केले असतील, त्यामुळं त्यांना चांगली स्पॉन्सरशिप मिळत असेल, तरीही खेळाला आणखी लोकप्रिय करण्याचं मूळ उद्दिष्ट बदलत नाही.”

त्यामुळं जोवर आयपीएलमुळं क्रिकेट लोकप्रिय होणं थांबत नाही, तोवर टॅक्स काय भरावा लागत नसतोय. एकवेळ अनिल कपूर म्हातारा दिसेल, पण आयपीएल आणि लोकप्रियता यांचं गणित सूर्यवंशम आणि सेट मॅक्स इतकं घट्ट आहे.

आयपीएलच्या कमाईतुन बीसीसीआय टॅक्स का भरत नाही, याचं उत्तर तर समजलं. पण आणखीन एक प्रश्न पडतो, तो म्हणजे भले तीनदा शून्यावर आऊट झाला असला, तरी कोहलीला १५ कोटी तर मिळणारच. हीच गोष्ट ईशान किशनची आणि हीच डीजे ब्राव्होची.

थोडक्यात काय तर प्लेअर्सही खोऱ्यानं पैसे ओढतात. मग त्यांना या पैशांवर टॅक्स भरावा लागतोय का?

तर उत्तर आहे हो, सामान्य माणूस जसा टॅक्स भरतोय तसा भरतोय प्लेअर्सनाही भरावा लागतो. फॉरेनचे प्लेअर्स इकडं येऊन क्रिकेट खेळतात आणि सोबतच जाहिरातींमध्येही काम करतात. या जाहिरातींमधून त्यांना जे पैसे मिळतात, त्यावर त्यांना टॅक्स भरावा लागतो.

आयपीएलला टॅक्स भरावा लागत नाही, पण मग इतर खेळांचं गणित कसं असतंय..?

कलम १० (३९) अनुसार जर एखादी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भारतात खेळवण्यात आली, त्याच्यात दोन पेक्षा जास्त देशांचा सहभाग असेल, त्या खेळाच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संस्थेनं स्पर्धेला परवानगी दिली असेल आणि भारत सरकारनं तशा सूचना दिल्या असतील, तर स्पर्धेला टॅक्स लागत नाही.

थोडक्यात काय, तर आयपीएलमधून बीसीसीआयला भरघोस फायदा मिळतो, म्हणून तर चक्र फिरत राहतं. लिलावातले आकडे वाढतात, मीडिया राईट्सचे आकडे वाढतात आणि क्रिकेटला मनोरंजनाचा तडका मिळालेलं हे चक्र सुरूच राहतं.. तेही वाढत्या गतीनं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.