गोविंद निहलानीनं शूट केलेल्या स्क्रिप्ट बाहेरच्या क्लायमॅक्समुळे ‘अर्ध सत्य’ हिट ठरला…

ऐंशीच्या दशकात जेव्हा देशांमध्ये अराजकता, हिंसाचार, माफिया राज आणि अतिरेक्यांचाचे हल्ले हा भडीमार चालू होता, त्या काळात रुपेरी पडद्यावर देखील या विषयावरील चित्रपटांची संख्या वाढत होती. याच दशकात देशात पंजाबचा प्रश्न, ऑपरेशन ब्ल्यू स्टार, पंतप्रधानांची हत्या या घटना घडल्या होत्या.

दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी १९८३ साली ‘अर्धसत्य’ नावाचा एक चित्रपट दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट समांतर सिनेमा आणि व्यावसायिक सिनेमा यांचा सुवर्णमध्य काढणारा चित्रपट होता. सिनेमा जरी हिंदी असला तरी यातील बव्हंशी पात्र आणि वातावरण मराठी होते. या चित्रपटाचा नायक अनंत वेलणकर हा पोलीस ऑफिसर असतो आणि भ्रष्ट व्यवस्थे विरुध्द एकट्याने लढत असतो.

राजकारण आणि गुन्हेगारी यांच्या संगनमतातून निर्माण झालेला माफियाराज विरुद्धचा त्याचा लढा या सिनेमात अतिशय समर्थपणे दिग्दर्शकांनी मांडला आहे.

मुख्य नायकाची भूमिका सशक्त अभिनेता ओम पुरी यांनी केली होती. तर ज्योत्स्ना गोखले ही प्राध्यापिकेची भूमिका स्मिता पाटीलने रंगवली होती. ‘रामा शेट्टी’ या खलनायकाच्या भूमिकेत सदाशिव अमरापुरकर होते. (गोविंद निहलानी यांनी त्याचे ‘हॅण्डस अप’ हे भक्ती बर्वे सोबतचे नाटक पाहून हि भूमिका दिली.) 

सिनेमा खूपच वास्तव वादी होता.राजकारण आणि गुंड यांची मैत्री आणि त्यातून प्रामाणिक पोलीस अधिकार्‍याचा होणारा कोंडमारा,अन्यायाकडे मुकाटपणे पहात रहाण्याची हतबलता, गुंडानाच द्यावे लागणारे पोलीस संरक्षण, यातून आलेले नैराश्य आणि शेवटी या सर्व साचलेल्या संतापाचा, अस्वस्थतेचा, हतबलतेचा झालेला स्फोट या सर्वातून इथल्या सडलेल्या समाजव्यवस्थेचे डोळ्यात अंजन घातले जाईल असे प्रत्ययकारी चित्रण होते.

या चित्रपटाची कथा श्री दा पानवलकर यांच्या ‘सूर्य’ या कथेवर आधारित होती. याची बंदिस्त पटकथा विजय तेंडुलकर यांनी लिहिली होती तर वैशिष्ट्यपूर्ण संवाद वसंत देव यांनी लिहिले होते. या सिनेमात दिलीप चित्रे यांची एक भावगर्भ कविता सिनेमाच्या पार्श्वभूमीवर दाखवली आहे जी यातील क्षोभनाट्याला आणखी उंचीवर नेते.

चक्रव्यूह में घुसने से पहले कौन था मै और कैसा था ये मुझे याद ही ना रहेगा चक्रव्यूह में घुसने के बाद मेरे और चक्रव्यूह के बीच सिर्फ़ एक जानलेवा निकटता थी इसका मुझे पता ही ना चलेगा…

गोविंद निहलानी हे स्वतः छायाचित्रकार असल्याने, त्यांच्या नजरेतून आणि कॅमेऱ्यातून ते प्रेक्षकांना सिनेमा दाखवत असतात. या चित्रपटाच्या आधीचा ‘आक्रोश’(१९८०) नावाचा सिनेमा देखील अशाच प्रकारच्या क्षोभनाट्याला रुपेरी पडद्यावर मांडणारा होता. दोन्ही सिनेमांमध्ये ओम पुरी आणि स्मिता पाटील यांच्या भूमिका होत्या.

सिनेमाचा क्लायमॅक्स शूट करताना गोविंद निहलानी यांनी विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या स्क्रिप्टनुसारच क्लायमॅक्स शूट केला. 

पण त्याच वेळी त्यांच्या डोक्यात वेगळा विचार आला. ओरिजनल स्क्रिप्टनुसार चित्रपटाचा नायक हा भ्रष्ट व्यवस्थेसोबत लढता लढता थकून जातो. निलंबित होतो आणि शेवटी तो शस्त्र टाकून, आहे त्या व्यवस्थेशी जुळवून घेतो. गोविंद निहलानी यांना हा शेवट थोडासा निराशावादी वाटला यातून समाजाकडे जाणारा मेसेज हा चुकीचा जाईल असे त्यांना वाटले.

त्यामुळे त्यांनी या सिनेमाचा दुसरा क्लायमॅक्स शूट केला.

ज्या मध्ये चित्रपटाचा नायक खलनायकाच्या घरी जाऊन त्याचा जीव घेतो आणि पोलीस स्टेशनमध्ये हजर होतो! आता गोविंद निहलानीना प्रश्न पडला यातील कुठला क्लायमॅक्स चित्रपटात ठेवावा? म्हणून पुन्हा ते दोन्ही क्लायमॅक्स घेऊन विजय तेंडुलकर यांच्याकडे गेले. विजय तेंडुलकर यांनी दोन्ही क्लायमॅक्स बारकाईने बघितले आणि गोविंद निहलानी यांना बोलून, “तू शूट केलेला ‘दुसरा’ क्लायमॅक्स हा जास्त समर्पक आहे!” असे सांगितले.

तेंडूलकरांनी ग्रीन सिग्नल दिल्यावर  गोविंद निहलांनी यांनी शूट केलेला ‘दुसरा’ क्लायमॅक्सच सिनेमात कायम राहिला!

‘अर्धसत्य’ या सिनेमाला चांगले व्यावसायिक यश मिळाले आणि त्याचबरोबर सिने इतिहासातील तो एक माइल स्टोन असा चित्रपट ठरला. या चित्रपटावर पुरस्कारांची बरसात झाली. 

अभिनेता ओम पुरी याला त्यावर्षीच्या ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्या’च्या  राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे कार्लोवी व्हेरी येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देखील ओम पुरीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याची पारितोषिक मिळाले. त्याचप्रमाणे फिल्मफेअर चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे नामांकन  ओम पुरी यांना मिळाले. (पारितोषिक मात्र नसिरुद्दीन शाह ला ‘मासूम’साठी मिळाले.)

गोविंद निहलानी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सदाशिव अमरापुरकर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता,  श्री दा पानवलकर यांना सर्वोत्कृष्ट कथा आणि विजय तेंडुलकर यांना सर्वोत्कृष्ट पटकथा हे फिल्मफेअरचे पुरस्कार देखील मिळाले.

आज इतक्या वर्षानंतर आपण जेव्हा हा चित्रपट पाहतो त्यावेळेला त्यातील आशय,मांडणी आजही मनाला भावून जाते. आवर्जून पहावा असा हा ‘अर्धसत्य’ चित्रपट आहे. नवीन पिढीने हा चित्रपट जरूर पहावा.

  • भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.