म्हैसूरचं वृंदावन गार्डन जगभर फेमस करण्यात मराठमोळ्या व्ही शांतारामांचा मोठा वाटा होता

समाजाचे प्रतिबिंब सिनेमात पडते असे म्हणतात ते खरं देखील आहे; पण कधी कधी सिनेमातील चांगल्या गोष्टी बघून समाजात देखील त्याचे अनुकरण केले जाते. पन्नासच्या दशकात एका हिंदी सिनेमातील एक गाणे ज्या पद्धतीने चित्रित केले ते पाहून तत्कालीन म्हैसूर स्टेट सरकारने त्यांच्या एका गार्डनला जपानी तंत्रज्ञानाच्या मदतीने आणखी सुंदर करून ते जगप्रसिद्ध केले! हा किस्सा मोठा रंजक आहे.

आज कर्नाटक मधील वृंदावन गार्डन हे जगभरातल्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र झाले आहे. पण त्यातील सौंदर्य वाढवण्यासाठी एका हिंदी गाण्याचे कॉन्ट्रीब्युशन फार मोठे आहे. १९२८ साली  मैसूर स्टेट मधील कावेरी नदीवर बांधले गेलेल्या कृष्णाराजा सागर डॅमच्या बॅक वॉटर वर वृंदावन गार्डन बनवण्याचे ठरवले.

भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेसराय्या यांचे या डॅम आणि गार्डन मध्ये मोठे योगदान होते.

सलग चार वर्ष हे काम चालले आणि १९३२ पासून हे गार्डन पर्यटकांसाठी खुले झाले. हे वृन्दाबन गार्डन आणखी सुंदर होण्यासाठी एक घटना घडली ज्या मुळे या गार्डन चा कम्प्लीट मेक ओव्हर झाला. आणि याला कारणीभूत ठरले एका हिंदी सिनेमातील गाणे! काय होता हा किस्सा?

पन्नासच्या दशकामध्ये चित्रपती व्ही शांताराम आपल्या ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटाची तयारी करत होते. संपूर्णपणे नृत्य संगीतावर आधारित हा चित्रपट टेक्नीकलर होता. शांताराम बापूंनी यावर भरपूर खर्च केला होता. संध्या आणि गोपीकृष्ण हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेमध्ये होते.

अभिजात पारंपारिक नृत्यकला आणि लोकप्रिय नृत्यकला यातील संघर्ष पूर्वी पासून चालू असतो. परंपरा रूढी प्रिय सनातनी समाजाला सुधारणांचे वावडे असते यातून जो संघर्ष होतो त्याचे चांगले प्रतिबिंब या सिनेमात दाखवले गेले होते. 

अर्थात सिनेमाच्या या आशयाशी आपल्या किस्सा सोबत काही संबंध नाही. या चित्रपटातील एक गाणे बापूंना वृंदावन गार्डनमध्ये चित्रित करायचे होते. त्यासाठी त्यांनी त्यांचे कॅमेरामन जी बालाकृष्ण यांना म्हैसूरला पाठवले. शांताराम बापूंना या गार्डन मधील पाण्याच्या कारंजा चे मोठे आकर्षण होते. त्यावेळी हे कारंजे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हवेत झेप घेत असत. प्रत्येक कारंजाचा फवाऱ्याचा वेग आणि वेळ हा वेगवेगळा होता. 

शांताराम बापूंनी आपल्या कॅमेरामनला प्रत्येक कारंजाच्या वेग आणि वेळे बद्दल माहिती घ्यायला सांगितली.

सर्व माहिती हाताशी आल्यानंतर शांताराम बापूंचे सगळे युनिट म्हैसूरला वृंदावन गार्डनमध्ये पोहोचले आणि सलग आठ दिवस त्यांनी ‘नैन सो नैन नाही मिलाओ….’ या गाण्याचे चित्रीकरण केले. त्यावेळी वृंदावन गार्डनला आजच्यासारखी गर्दी नसायची. त्यामुळे शांताराम बापूंना मनासारखे चित्रीकरण करता आले. 

निगेटिव्ह प्रोसेसिंग होऊन ज्यावेळेला समोर आल्या त्यावेळेला त्यातील दृश्य पाहून सगळेजण खूप भारावून गेले. कारण अतिशय सुंदर असे याचे चित्रीकरण झालं होतं. सर्वांना हे चित्रीकरण खूपच आवडले.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या या सिनेमावर आणि या गाण्यावर अक्षरशः उड्या पडल्या आणि या गाण्यावर प्रेक्षक जाम फिदा झाले. कर्नाटकात तर या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले. या सिनेमाला वसंत देसाई यांचे संगीत होते. यातील हरेक गाणे लोकप्रिय ठरले. 

बापूंचा हा अतिशय लाडका सिनेमा होता. मुंबईच्या दादर स्थित व्ही शांताराम यांच्या मालकीच्या ‘प्लाझा’ या अलिशान चित्रपट गृहात हा सिनेमा पुढे अनेक वर्षे रिपीट रन ला प्रदर्शित होत असे. ऐंशीच्या दशकात बापूंनी तंत्राच्या सहाय्याने (साऊंड क्वालिटी) या सिनेमाला पुन्हा न्यू लूक देत सिनेमा रिलीज केला पुन्हा एकदा या सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक यश मिळविले.

या यशाची वार्ता प्रशासनाच्या वतीने म्हैसूर स्टेट सरकारकडे गेली आणि त्यांनी याच लोकप्रियतेला कॅश करायचे ठरवले. 

जपान मधील एका कंपनी तील  तंत्रज्ञांना बोलवून या कारंजांना म्युझिकल बनवले. आता म्युझिकच्या तालावर  आणि कारंजे थुई थुई नाचू लागले. संगीत आणि तंत्रज्ञान या दोघांचं समन्वयातून नयनरम्य असे दृश्य वृंदावन गार्डन मध्ये पाहायला मिळू लागले. आता भारतासोबतच जगभरातील पर्यटक देखील या वृंदावन गार्डनला आवर्जून भेट देऊ लागले. 

या गार्डनची लोकप्रियता वाढवायला शांताराम बापूंच्या ‘त्या’ गाण्याचा मोठा हात होता हे निश्चित!

– भिडू धनंजय कुलकर्णी  

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.