आयपीएलमध्ये दहाच्या दहा टीम्सला फँटसी ॲप्सनं स्पॉन्सर केलंय…

आता दोन महिने मार्केटमध्ये फक्त एकाच विषयाची चर्चा असणार… इंडियन प्रीमिअर लीग. अर्थात आयपीएल. २००८ मध्ये जेव्हा बीसीसीआयनं पहिल्यांदा आयपीएलची घोषणा केली, तेव्हा लय लोकांनी तोंडं मुरडली होती. खेळाडूंचा लिलाव, भारताच्याच वेगवेगळ्या टीम्स, चिअरलीडर्स… टीका करण्याचे लय पॉईंट होते.

पण १५ वर्ष झाली आयपीएलची घौडदौड सुरूच आहे, त्यामागची कारणं आहेत… जबरदस्त खेळ आणि अमाप पैसा.

आयपीएलच्या काळात प्लेअर्स, मालक आणि प्रेक्षक खुश असतात. तशीच आणखी एक जनता खुश असते, ती म्हणजे फँटसी गेम्स खेळणारी गॅंग. वर्षभर क्रिकेट न बघणारी, हातात बॅट न घेणारी ही जनता आयपीएल आली, की फुलस्केप वही, पेन आणि मोबाईलमध्ये क्रिकेटच्या बातम्या-बितम्या घेऊन अभ्यासाला बसणार. अभ्यासाचं कारण असतं, ड्रीम इलेव्हन, माय इलेव्हन सर्कल, विंझो स्पोर्ट्स, गेमझी, बल्लेबाझी, हाऊझॅट असे फँटसी ॲप्स.

त्यात सध्या या फँटसी ॲप्सच्या जाहिराती मोठमोठ्या प्लेअर्सपासून, प्रत्येक टीमच्या टीशर्टवरही दिसत आहे. थोडक्यात काय, तर सगळं मार्केट आता फँटसी ॲप्सचं आहे. 

आता हे फँटसी ॲप्स असतात काय?

जशी मैदानावर मॅच सुरू असते, तशीच या ॲप्समध्येही. आता समजा मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स मॅच सुरू असेल, तर दोन्ही टीम्समधले काही प्लेअर निवडून तुम्ही एक टीम तयार करायची. तुमचे प्लेअर्स प्रत्यक्ष मॅचमध्ये जसं खेळतात, तसे तुम्हाला इकडे पॉईंट्स मिळतात. आपल्या खिशातले पैसे लाऊन ॲपमध्ये असणाऱ्या स्पर्धांमध्ये उतरायचं. ज्याचे पॉईंट्स जास्त तो बनणार त्या दिवसाचा इमरान हाश्मी. काही काही फँटसी ॲप्सवर खेळायची ट्रिक वेगळी असली, तरी कन्सेप्ट मात्र बऱ्यापैकी अशीच असते. 

हे फँटसी ॲप्स कायदेशीर असतात का? 

तर सगळ्यात हिट ॲप असलेल्या ड्रीम इलेव्हन विरोधात मॅटर कोर्टात गेला होता. तेव्हा ड्रीम इलेव्हनवाल्यांनी दाखवलं की आमचं ॲप वापरण्यासाठी कौशल्याची गरज आहे.

 क्रिकेटचं ज्ञान असेल, तरच तुम्ही हा खेळ खेळू शकताय. या युक्तिवादांनंतर ड्रीम इलेव्हनला गॅम्बलिंग ॲक्टमधून वगळण्यात आलं. 

साहजिकच ड्रीम इलेव्हन आणि या धर्तीवरचे इतर ॲप्स बेकायदेशीर ठरले नाहीत.

या फँटसी ॲप्सचा टर्नओव्हर असतो किती?

काही रिपोर्ट्सनुसार २०२०-२१ या आर्थिक वर्षात फँटसी स्पोर्ट्स इंडस्ट्रीनं ५ हजार २०० करोडचा रेव्हेन्यू गोळा केला होता. त्यामागच्या दोन वर्षांमध्ये हेच आकडे अनुक्रमे ९२० आणि २ हजार ४०० करोड होते. थोडक्यात दरवर्षी हा आकडा जवळपास दुपटीनं वाढत गेलाय.

आयपीएलमध्ये हे ॲप्स एवढ्या जाहिराती करतात यामागे कारणही तसंच आहे.

आयपीएल ही जगातली सगळ्यात मोठी फ्रँचाईज लीग मानली जाते. याला साहजिकच लोकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. जी लोकं इतरवेळी क्रिकेट बघत नाहीत, ती सुद्धा आयपीएलच्या वेळी टीव्ही किंवा मोबाईलसमोर बसत असतात. हेच ओळखून जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी फँटसी ॲप्स आयपीएलमध्ये जास्तीत जास्त जाहिरात करतात.

यावर्षी आयपीएलमध्ये दोन नव्या टीम्स आल्यात. फँटसी ॲप्सच्या सध्याच्या युझरबेसमध्ये गुजरात आणि लखनौचा मोठा वाटा आहेच. त्यात या दोन शहरांच्या टीम्स आयपीएलमध्ये आल्या असल्यानं युझर्स आणखी वाढतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

फँटसी ॲप्सच्या अंदाजानुसार यंदा जवळपास १०० टक्क्यांनी युझर्स वाढतील. कारण दोन वर्षांनी संपूर्ण आयपीएल भारतात होतीये. प्रेक्षकांचीही उपस्थिती असणार आहे. 

इतर वर्षी आयपीएल दरम्यान क्टिव्ह युझर्सची संख्या इतर महिन्यांपेक्षा दुपटीनं वाढते. 

तर दुसऱ्या बाजूला पहिल्यांदाच फँटसी ॲप्स वापरणाऱ्यांची संख्या चारपटीनं वाढते.

सध्याच्या आयपीएलमध्ये जाहिरातीचं चित्र काय आहे?

कोलकाता नाईट रायडर्सचे टायटल स्पॉन्सर्स आहेत विंझो स्पोर्ट्स, तर लखनौ सुपर जायंट्सचे टायटल स्पॉन्सर्स आहेत, माय इलेव्हन सर्कल. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे असोसिएट पार्टनर आहेत एमपीएल (हीच एमपीएल कंपनी भारतीय संघाचीही स्पॉन्सर आहे.) या तीन टीम सोडल्या, तर उरलेल्या सातही टीमला ड्रीम इलेव्हननं ऑफिशिअल स्पॉन्सर्स, ऑफिशिअल पार्टनर्स, असोसिएट पार्टनर्स अशा वेगवेगळ्या रुपात स्पॉन्सरशिप दिली आहे.

बरं गोष्ट इथंच थांबत नाही, बीसीसीआयचा अध्यक्ष असणारा भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली, क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकर, माजी कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी, सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला विराट कोहली या दिग्गजांपासून नवख्या ऋतुराज गायकवाडपर्यंत सगळे जण सोशल मीडिया, टीव्ही, पेपर यांच्या माध्यमातून या फँटसी ॲप्सची जाहिरात करत आहेत.

म्हणजेच, गोष्ट लय डीप गेलीये.

आता प्रत्यक्ष बेटिंग नसलं, तरी प्लेअर निवडण्यात, टीम लावण्यात आणि आपले पैसे घालवण्यात रिस्क आहेच. या रिस्कचं मार्केट आता इतकं वाढलंय, की अनेक जण म्हणतायत,

उगं फांद्या तोडण्यापेक्षा, डायरेक्ट खोडावर घाव घाला. 

सरळ बेटिंगच कायदेशीर करा…

भारतात बेटिंग कायदेशीर होऊ शकतं का?

फेब्रुवारी २०२१ मध्ये एका कार्यक्रमात बोलताना, केंद्रीय मंत्री आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर म्हणाले होते, ‘भारतात बेटिंग कायदेशीर करण्याच्या दृष्टीनं विचार सुरू आहे. यामुळं मॅच फिक्सिंग सारख्या गलिच्छ कृतींना आळा घालता येईल आणि सोबतच टॅक्स चुकवून देशाबाहेर जाणारा पैसाही देशातच राहील.’ भारताच्या लॉ कमिशननंही बेटिंग कायदेशीर करण्याबाबतचा सल्ला दिला होता. त्यामुळं बेटिंग कायदेशीर झालं, तर त्याचे नियम काय असणार आणि फँटसी प्सला आत्तासारखा प्रतिसाद मिळणार का हे पाहावं लागेल.

बाकी तुम्ही फँटसी ॲप्सवर खेळत असलात, तर जरा निवांत घ्या. या गेम्सचा नाद लागू शकतो हे जाहिरातीत अगदी स्पीडमध्ये सांगत असले, तरी आपल्याला ऐकायला येत असतंय. त्याकडे दुर्लक्ष करु नका. इमरान हाश्मी बनायच्या नादात हेराफेरीवाले राजू बनणार नाय, हे तेवढं डोक्यात ठेवा.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.