गांगुलीचा वारसदार समजला जाणारा खेळाडू चॅपलच्या नादी लागला आणि संघातून बाहेर पडला..

2005 हे वर्ष भारतीय क्रिकेट संघाची नव्याने बांधणी करणारं वर्ष होतं. नवीन खेळाडूंचा भरणा होत होता, मॅच फिक्सिंगच्या सावटातून भारत सावरत होता. जॉन राईटचा कार्यकाळ संपून ग्रॅग चॅपलच्या रुपात नवा कोच भारताला लाभला होता. राहुल द्रविड भारताचा नवा कर्णधार झाला कारण गांगुलीला ड्रॉप करण्यात आलं होतं. चॅपल आणि द्रविड यांच्या काळात अनेक नवीन खेळाडूंची भरती होत होती.

याच नव्याने भरती होणाऱ्या खेळाडूंमध्ये एक असा खेळाडू होता ज्याच्याबद्दल असं बोललं जातं होतं की तो भारतीय संघात सौरव गांगुलीची जागा घेऊ शकतो आणि त्याचा वारसदार ठरू शकतो तो खेळाडू होता वेणूगोपाल राव.

26 फेब्रुवारी 1982 ला विशाखापट्टणम मध्ये एका गरीब कुटुंबात झाला. वेणूगोपाल राव लहानपणापासूनच क्रिकेटर बनायचं स्वप्न बाळगून होता.

स्वतःच्या खेळावर भरपूर मेहनत घेऊन आणि फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून वेणूगोपाल राव 2005 साली श्रीलंकेविरुद्धच्या एका वनडे सामन्यासाठी सिलेक्ट झाला. याच मॅचमध्ये वेणूगोपाल रावसोबत अजून एका खेळाडूने डेब्यु केला होता आणि तो खेळाडू होता सुरेश रैना. ग्रेग चॅपलचा वेणूगोपाल राव हा आवडता खेळाडू होता.

पण वेणूगोपाल रावला भारताकडून फक्त 16 चं वनडे मॅचेस खेळता आल्या आणि 218 धावा केल्या होत्या. अबुधाबीमध्ये पाकिस्तानविरुद्ध 61 धावांची खेळी ही वेणूगोपाल रावच्या करिअर मधली सर्वोत्तम खेळी ठरली. एका इंग्लडविरुद्धच्या फर्स्ट क्लासमॅचमध्ये 228 धावा एकट्या वेणूगोपाल रावने तडकावल्या होत्या पण सिलेक्टर्स लोकांकडून त्याची लवकर दखल घेण्यात आली नाही. वर्षभरातच वेणूगोपाल रावंच करिअर संपलं. 2006 साली वेस्ट इंडिज विरुद्ध शेवटची वनडे मॅच तो खेळला आणि नंतर तो परत भारतीय संघात दिसलाच नाही.

वेणूगोपाल राव भारतीय संघात जास्त काळ स्थिरावू शकला नाही याचं कारण हेही सांगण्यात आलं की डोमेस्टिक क्रिकेटमध्ये वेणूगोपाल जास्त काही कमाल करू शकला नाही.

2009 साली आयपीएल मध्ये डेक्कन चार्जर्स संघाने जेतेपद पटकावलं त्या संघाचा वेणूगोपाल राव भाग होता. आयपीएलच्या पहिल्या सिझनला वेणूगोपाल रावने धावांचा पाऊस पाडला होता. डेक्कन चार्जर्स, दिल्ली डेअरडेव्हील्स आणि सनरायझर्स हैदराबाद या तीन संघांकडून वेणूगोपाल राव आयपीएल खेळला. 2014 साल हे त्याचं आयपीएल मधलं शेवटचं ठरलं.

2000 सालच्या अंडर 19 संघाच्या विजेतेपदात वेणूगोपाल रावचा मोठा वाटा होता. वेणूगोपाल राव सांगतो की एक काळ होता जेव्हा आंध्र प्रदेशात कोणी बोलत असे की,

मी भारतीय संघाकडून क्रिकेट खेळणार आहे तेव्हा तिथले लोकं हसायचे पण वेणूगोपाल रावने ते करून दाखवलं.

वेणूगोपाल राव भारतीय संघाबाहेर जाण्याचं एक कारण असंही सांगितलं जातं की कोच ग्रेग चॅपल बरोबर असलेली त्याची सलगी ही चिंतेची बाब होऊ लागली होती. 

खुद्द गांगुली चॅपेल बरोबरच्या वादात संघाबाहेर गेला होता. ग्रेग चॅपलने वेणुगोपाल रावला गांगुलीचा भविष्याचा वारसदार बनवायचं ठरवलं. तशा वलग्ना तेव्हा होऊ लागल्या होत्या.  चॅपल हा मुळात धरसोड वृत्तीचा असल्यामुळे तो भारतीय संघाबरोबर फार काळ टिकला नाही. त्याने टीममध्ये लावलेली भांडणे व त्यामुळे खराब झालेली परिस्थिती त्याच्या पदच्च्युतीला कारणीभूत ठरली. 

चॅपल गेल्यावर गांगुलीच पुनरागमन झालं, पण वेणूगोपाल राव संघाबाहेर फेकला गेला आणि त्याला परत कधीच पुनरागमन करता आलं नाही.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.