हार्दिक पंड्या हे एकच कारण नाही तर या गोष्टींमुळे भारताला पाकिस्तानला हरवता आलं…

शेवटच्या ४ बॉलमध्ये जिंकायला ६ रन्स हवे होते, स्ट्राईकवर हार्दिक पंड्या होता. समोर स्पिनर असल्यामुळं लोड नव्हता, पण पंड्यानं मस्ती मस्तीत चान्स घालवला असता तर आपला बल्ल्या फिक्स होता. त्यात बॉल डॉट गेल्यावर टेन्शन आणखी वाढलं, पण पंड्यानं खणखणीत छकडा मारला आणि भारतानं पाकिस्तानला हरवलं. २०२१ च्या टी२० वर्ल्डकपला याच ग्राऊंडवर भारत पाकिस्तानकडून हरला होता, त्यामुळं पार कमेंटेटर्सपासून चाहत्यांपर्यंत सगळेच जण या विजयाला बदला म्हणत होते.

ही भारत पाकिस्तान मॅच झाली, एशिया कपमध्ये. पहिला एशिया कप १९८४ मध्ये युएईत खेळवण्यात आला होता. तेव्हा भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका अशा तीनच टीम एशिया कपमध्ये होत्या, ज्यात भारतानं या दोन्ही टीमला हरवून फायनल न खेळताच बाजी मारली होती. 

एशियातल्या देशांमधले संबंध क्रिकेटच्या माध्यमातून सुधारावेत यासाठी दर २ वर्षांनी एशिया कपचं आयोजन करण्यात येतं. आधी या कपमध्ये फक्त वनडे मॅचेस व्हायच्या. मात्र नंतर पुढची मोठी टूर्नामेंट कुठली आहे, हे बघून एशिया कपचा फॉरमॅट चेंज होतो. 

आता टी २० वर्ल्डकप तोंडावर आहे म्हणून यंदाचा एशिया कप टी२० फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येतोय. भारतानं आतापर्यंत सगळ्यात जास्त ७ एशिया कप जिंकलेत. भारत पाकिस्तान एशिया कपमध्ये आतापर्यंत १५ वेळा आमने सामने आले, ५ पाकिस्ताननं जिंकल्या, एकदा रिझल्ट लागला नाही आणि उरलेल्या ९ वेळा भारतानं सुट्टी दिली नाही. 

रविवारी झालेली मॅच ही सुट्टी न देण्याची नववी वेळ.

भारताच्या बाजूनं पहिला निर्णय लागला तो म्हणजे टॉस. रविवारची मॅच झाली दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये. आता या ग्राऊंडमध्ये गेल्या १० टी२० मॅचेसपैकी फक्त एकच मॅच पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या टीमनं जिंकलीये. ग्राऊंडवर पडणारं दव हा इथं गेमचेंजिंग फॅक्टर ठरतो. कारण दवामुळं बॉलची ग्रिप पकडता येत नाही. त्यामुळं भारताला टॉस जिंकून बॉलिंग करणं फायद्याचं ठरलं.

 पिचबद्दल बोलायचं झालं, तर रविवारचं पिच प्रचंड ड्राय होतं. त्यामुळं बॉल चांगला वळत होता. हे पिच एवढं ड्राय राहण्याचं कारण म्हणजे, आदल्याच दिवशी इथं श्रीलंका-अफगाणिस्तान मॅच झाली होती. त्यामुळं क्युरेटरला पिचवर फारसं काम करता आलं नाही.

पाकिस्तानचा कार्यक्रम गंडायला सुरुवात झाली, ती कॅप्टन बाबर आझमच्या विकेटमुळे. 

त्यांच्याकडचा विराट कोहली म्हणून ज्याला ओळखतात तो बाबर फक्त १० रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर पाकिस्तानचा डाव काय लवकर सावरला नाही. मोहम्मद रिझवाननं तेवढे ४३ रन्स केले. पण त्यालाही काय मोठी इनिंग रचता आली नाही. भारताची बॉलिंग एकदम परफेक्ट सुरू होती. स्विंग किंग भुवनेश्वर कुमारनं कडकमध्ये ४ विकेट्स काढल्या, पण पाकिस्तानचं कंबरडं मात्र हार्दिक पंड्यानंच मोडलं. महत्त्वाच्या ३ विकेट खोलत पंड्यानं एक नंबर बॉलिंग टाकली. 

भारतीय बॉलर्सनं शॉर्ट बॉलवर बराच भर दिला. रिझवान आणि बाबरची विकेटही अशाच शॉर्ट बॉलवर आली होती. शेवटच्या टप्प्यात मात्र भारताकडून थोड्या चुका झाल्या, एकतर नव्या नियमानुसार वेळेत ओव्हर्स पूर्ण न करता आल्यानं शेवटच्या ३ ओव्हर्समध्ये भारताला ३० यार्ड्सच्या सर्कलमध्ये एक फिल्डर जास्त ठेवावा लागला. 

भुवी आणि अर्षदीपची लाईनही काही प्रमाणात गंडली आणि पाकिस्तानच्या शेवटच्या जोडीनं आडवे तिडवे शॉट्स खेळत टीमला १५० च्या दारात आणून ठेवलं.

त्यात भारताच्या इनिंगची सुरुवात अशी झाली की रवी शास्त्रीच आठवला. कोहलीचा कॅच सुटला नसता, तर भारताचा बाजार उठला असता. पण नंतर कोहली आणि शेवटी जडेजा-पंड्या या जोडीनं भारताची नौका पार लावली. 

आता भारताच्या या इनिंगमध्ये दोन गोष्टी बघण्यासारख्या होत्या. 

पहिली म्हणजे पाकिस्तानची बॉलिंग. 

केएल राहुलला शून्यावर आऊट करणाऱ्या नसीम शहाचं वय किती आहे का माहिती का ? फक्त १९ वर्ष. नसीम शहा, हॅरिस रॉफ या दोन्ही फास्ट बॉलर्सला क्रॅम्प आले. नसीम तर थेट जमिनीवर कोसळला, तर हॅरिस लंगडत होता.पण या दोघांनीही आपल्या ओव्हर्स पूर्ण केल्या, तेही स्पीड कमी होऊ न देता. ज्या फास्ट बॉलिंगच्या परंपरेसाठी पाकिस्तान ओळखलं जातं, ती परंपरा हे गडी परफेक्ट चालवतायत. शॉर्ट बॉलचाही यांनी चांगला वापर केला. भले विरुद्ध टीममधले असले, तरी सतत १४० -१४४ च्या स्पीडनं टाकणाऱ्या पाकिस्तानच्या बॉलिंगचं कौतुक केलं पाहिजे. सहावा बॉलर न खेळवण्याची चूक मात्र पाकिस्तानला नडली, त्यामुळेच शेवटची ओव्हर स्पिनरला द्यावी लागली आणि हार्दिकनं ठरवून सिक्स मारुन मॅच जिंकवली.

दुसरी म्हणजे भारताची बॅटिंग

भारताच्या बॅटिंगबद्दल बोलायचं झालं, तर कोहली पुन्हा फॉर्ममध्ये आल्यासारखा दिसला, लय दिवसांनी त्यानं पद्धतशीर पुल शॉटही खेळले. जडेजाला वर पाठवलं होतं, तरी कोहलीनं रिस्क घ्यायचं काही कारण नव्हतं. पण कोहली सध्या कधी काय करेल सांगता येत नसतंय. त्याचे ३५ रन्स मात्र भारताच्या विजयात मोलाचे ठरले. 

जड्डूनं पाकिस्तानच्या चुकीचा नेमका फायदा घेतला, वेळेचा दंड पाकिस्तानलाही बसला आणि त्यांचाही बाऊंड्रीलाईन वरचा एक फिल्डर कमी झाला. जड्डूनं त्याच गॅपमध्ये एक फोर आणि सिक्स मारला.

पण मॅचचा खरा हिरो ठरला तो हार्दिक पंड्या.

करण जोहरसोबत कॉफी पिल्यापासून आपल्याकडच्या निम्म्या जनतेला हे पोरगं बाद वाटतं. त्यात एशिया कपमध्येच याला असली घाण इंज्युरी झाली होती की स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर न्यावं लागलं होतं. मात्र त्यानंतर कमबॅक करत, आयपीएल ट्रॉफी, भारताची कॅप्टन्सी आणि आता भारत पाकिस्तान मॅचचा हिरो ठरलेला हार्दिक पंड्या कर के आया है. 

मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये गेली तेव्हा खरं प्रेशर मोहम्मद नवाझवर होतं. भले त्यानं जड्डूची विकेट काढली असली, तरी टार्गेट टप्प्यात होतं. म्हणूनच हार्दिकनं डोकं थंड ठेवलं आणि कडक सिक्स मारत मॅच जिंकली, आता शेवटच्या ओव्हरमध्ये सिक्स मारुन मॅच जिंकल्यावर कुणाची आठवण येते हे वेगळं सांगायला नको.

दुबईच्या ४० डिग्री टेम्परेचरमध्ये दोन्ही टीम भारी खेळल्या. मॅच घासुन झाली त्यामुळं लोकांचे पैसेही वसूल झाले. पाकिस्तानला सहावा बॉलर आणि पेसर्सच्या फिटनेसवर काम करावं लागेल, तर भारताला ओपनर्सच्या फॉर्मवर. 

बरं विषय इथंच संपत नाही ४ सप्टेंबरला पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच होऊ शकते. फटाके संपले असतील तर स्टॉक भरून ठेवा, कारण भारताला मौका आहे…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.