देशात बॉयकॉटचा ट्रेंड येऊनही, लाल सिंग चड्ढानं काश्मीर फाईल्सपेक्षा जास्त पैसे कमवलेत…

यावर्षी भारताच्या बॉक्स ऑफिसवर अनेक पिक्चर आले, लॉकडाऊनमुळं फोनवर पिक्चर बघायची एवढी सवय लागलेली की लोकं थेटरात जाऊन पिक्चर बघणार की नाही यावर शंका उपस्थित होत होती. पण थेटरचा फील वेगळा असतोय, कारण पुष्पा, आरआरआर, पावनखिंड, काश्मीर फाईल्स, भुलभुलैय्या-२ या पिक्चरला थेटरात चांगलीच गर्दी झाली.

मग आला आमिर खानचा लाल सिंग चड्ढा.

हा पिक्चर येण्याआधीच सोशल मीडियावर बॉयकॉटचा जोरदार ट्रेंड आला, रिलीझ झाल्यावरही चित्रपट आपटल्याची चर्चा सुरू झाली. पार बॉलिवूड संपलंय का ? इथपर्यंत चर्चा गेल्या.

 तेवढ्यात बातमी आली, यावर्षी आलेल्या बॉलिवूडच्या पिक्चर्सपैकी परदेशात सगळ्यात जास्त कमाई लाल सिंग चड्ढानं केलीये.

आता इकडं लोकं पिक्चर बॉयकॉट करा म्हणतायत, पिक्चरला फारशी गर्दी पण नाहीये, मग पिक्चर परदेशात कसा काय हिट झाला ? हिट झाला म्हणजे नेमके किती पैसे कमवले ? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॉलिवूडचं परदेशातलं मार्केट नेमकं कसंय ? याच प्रश्नांची उत्तरं या निमित्तानं जाणून घेऊयात.

लाल सिंग चड्ढानं नेमकी कमाई केली तरी किती ? 

रिलीझ होऊन दोन आठवडे झालेत, त्यानुसारचं गणित बघता या पिक्चरनं आतापर्यंत जगभरातून १२६.४२ कोटी रुपयांची कमाई केलीये. यात भारतातलं कलेक्शन आहे ६६.७० कोटी रुपये, तर परदेशातलं कलेक्शन आहे ५९.७२ कोटी रुपये. आता हे गणित लावलं तर पिक्चरच्या १८० कोटी रुपयांच्या बजेटपर्यंतची कमाई अजून तरी करता आलेली नाही.

भारतात लाल सिंग चड्ढाला प्रचंड विरोध झाला, नुसते आमिर आणि करीनाच नाही तर या पिक्चरचं कौतुक करणाऱ्या अभिनेत्यांनाही बॉयकॉटच्या ट्रेंडला सामोरं जावं लागलं. पहिल्याच दिवशी ११.७० कोटी कमावणारा लाल सिंग चड्ढा पुढच्या दोन आठवड्यात मात्र मोठी मजल मारु शकला नाही.

विशेष म्हणजे या पिक्चरनं भारतात सर्वाधिक ९.१० कोटींची कमाई दिल्ली-उत्तर प्रदेश या सर्किटमधून केलीये. तर त्या खालोखाल मुंबई सर्किटमध्ये ७.६५ कोटी कमावलेत.

पहिल्या विकेंडला ३७.९६ कोटी कमावणारा लाल सिंग चड्ढा दुसऱ्या विकेंडला मात्र फक्त ४.५५ कोटीच कमावू शकलाय. थोडक्यात बॉयकॉटच्या ट्रेंडनं म्हणा किंवा लोकांना न आवडल्यानं म्हणा, लाल सिंग चड्ढा काय लय चालला नाही.

पण भारतात चालला नसला, तर परदेशी मार्केटनं मात्र लाल सिंग चड्ढाला उचलून धरलं.

बॉलिवूडचे पिक्चर काय फक्त भारतातच रिलीझ होत नाही. कित्येक मोठ्या पिक्चरचा वर्ल्डवाईड रिलीझ असतो, तर काही पिक्चर भारतातला रिस्पॉन्स बघून मग परदेशी भाषांमध्ये डब होतात. त्यात पिक्चरच्या ओव्हरसीज राईट्समधूनही डिस्ट्रिब्युटर लोकं खतरनाक पैसे छापतात. परदेशात भारतीय सुपरस्टार्सची मोठी फॅन फॉलोईंग आहे, टिपिकल बॉलिवूड मसाला, मेलोड्रामा फिल्म्स तिकडं भारी चालतात, आपल्याकडं आपटलेला एखादा पिक्चर जगात हवा करुन जातो, मग तो राज कपूरचा मेरा नाम जोकर असेल किंवा आयुषमानचा अंधाधुन.

 लाल सिंग चड्ढाबद्दल बोलायचं झालं तर या पिक्चरनं परदेशात एकूण ५९.७२ कोटींची कमाई केली आहे. हा पिक्चर फॉरेनला कुठंकुठं रिलीझ झाला, तर अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, मलेशिया, जर्मनी, न्यूझीलंड, सिंगापूर, साऊथ आफ्रिका, स्पेन, तुर्की आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये. 

बॉलिवूडचं मार्केट या देशांमध्ये तर आहेच, पण सोबतच चीन, तैवान, पाकिस्तान, रशिया इथंही बॉलिवूडची हवा आहे.

बॉलिवूड हंगामा या वेबसाईटनं प्रदर्शित केलेल्या आकडेवारीनुसार लाल सिंग चड्ढानं सर्वाधिक २२ कोटी ८२ लाखांची कमाई अमेरिकेत केली आहे. त्या खालोखाल नंबर लागतो, ६ कोटी ६४ लाख मिळवून देणाऱ्या युनायटेड किंगडमचा, तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया, जिथं ग्रॉस कलेक्शन आहे ६ कोटी ४८ लाख तर संयुक्त अरब अमिरातीत पिक्चरनं ६ कोटी ३९ लाख रुपयांचा बिझनेस केलाय. 

लाल सिंग चड्ढामधलं मेन कॅरॅक्टर पंजाबी आहे, त्यामुळं हा पिक्चर कॅनडामध्ये चालला नसता, तर आश्चर्य होतं. कॅनडामध्ये दोन आठवड्यात या पिक्चरनं जवळपास ५ कोटी ९९ लाखांचा बिझनेस केलाय. न्यूझीलंडमध्येही पिक्चरनं १ कोटीच्या पलीकडे झेप घेतली आहे.

यात लक्षात घेण्यासारखा आणखी एक आकडा आहे, तो म्हणजे पिक्चरनं टर्कीमध्ये केलेल्या कमाईचा.

 लाल सिंग चड्ढाविरुद्ध बॉयकॉटचा ट्रेंड चालण्यामागचं एक कारण होतं, आमिर खाननं टर्कीच्या फर्स्ट लेडीची घेतलेली भेट. या भेटीवरुन देशातलं वातावरण चांगलंच तापलं होतं. याच टर्कीमध्ये २०४ स्क्रीन्सवर रिलीझ झालेल्या लाल सिंग चड्ढानं २३ लाख ७६ हजारांचा बिझनेस केला आहे, याचं मुख्य कारण म्हणजे टर्कीमध्ये फक्त बॉलिवूडच नाही, तर भारतातल्या सास-बहूच्या सिरियल्सही प्रचंड लोकप्रिय आहेत. 

मलेशियामध्येही हिंदीभाषिक लोकं मोठ्या संख्येनं आहे. इतर देशांमध्ये दुसऱ्या आठवड्यात लाल सिंग चड्ढाला मिळणाऱ्या स्क्रीन्समध्ये मोठ्या प्रमाणावर घट होत असताना, मलेशियात मात्र पहिल्या आठवड्यात ६८ आणि दुसऱ्या आठवड्यात ६६ स्क्रीन्सला लागलेल्या लाल सिंग चड्ढानं ५६ लाख ७९ हजारांचा बिझनेस केलाय. 

या सगळ्या देशांमधल्या बिझनेसमुळं लाल सिंग चड्ढाला ५९.७२ कोटींपर्यंत मजल मारता आली आहे.

लाल सिंग चड्ढाला अजून मोठ्या कमाईची अपेक्षा आहे, ती चीनमधून. भारताबाहेर बॉलिवूडचं सगळ्यात मोठं मार्केट चीनमध्ये असल्याचं कायम सांगण्यात येतं. 

पार राज कपूरच्या आवारापासून तिथं बॉलिवूडचे पिक्चर हिट होतायत. पण त्यातल्या त्यातही तिथं सगळ्यात जास्त हवा आहे मिशू या टोपणनावानं ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानची. आमिर खानच्या सिक्रेट सुपरस्टारनं भारतात कमावले होते ६३ कोटी, पण चीनमधल्या कमाईचा आकडा होता ८१० कोटी रुपये. दंगलनं तर चीनमध्ये धुव्वा केला होता, इतर सगळ्या पिक्चरला चीतपट करुन दंगलनं चीनमध्ये १३०० कोटी कमावले होते. आजही २०२४ कोटी कमावणारा दंगल भारतातला सर्वाधिक पैसे कमवणारा पिक्चर म्हणून ओळखला जातो.

लक्षात घेण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे यानंतर बाहुबली-२ आणि आरआरआर या दाक्षिणात्य पिक्चर्सचा नंबर लागतोय. 

थ्री इडियट्स, पिके, धूम-३ या अमीरच्या पिक्चर्सलाही चीनमध्ये खतरनाक रिस्पॉन्स आला होता. त्यामुळं भारतात कितीही आपटला, तरी चीनमध्ये लाल सिंग चड्ढा आमिर खानला पुन्हा मार्केटमध्ये आणू शकतो.

यावर्षी रिलीझ झालेल्या बॉलिवूडच्या पिक्चर्सपुरता विचार केला, तर परदेशात काश्मीर फाईल्सनं ४३.३९ कोटी, भुलभुलैय्या-२ नं ४५.५५ कोटी, तर गंगुबाई काठियावाडीनं ५६.०८ कोटींचा व्यवसाय केलाय. त्यामुळं बॉयकॉटचा जोरदार ट्रेंड येऊनही लाल सिंग चड्ढानं परदेशातल्या कमाईच्या आकड्यांमध्ये टॉप मारलंय. 

सोबतच आणखी एक गोष्ट दाखवून दिलीये, ती म्हणजे भारतात जरी पिक्चर आपटला किंवा बॉयकॉटचा ट्रेंड आला, तरी परदेशी मार्केटमध्ये मात्र मसाला, सस्पेन्स आणि मेलोड्रामा असलेल्या बॉलिवूडची जादू काही कमी झालेली नाही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.