विराट कोहलीच्या आधीही ऑस्ट्रेलियाला नडणारा एक बादशहा होऊन गेलाय…

विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला, तेव्हा त्याचे वर आलेले गाल, थोडं जाडसर शरीर पाहून कुणालाही वाटत नव्हतं की, हा क्रिकेटमध्ये मोठा खेळाडू बनेल. त्यात २०१४ च्या इंग्लंड सिरीजमध्ये कोहलीला दणक्यात अपयश आलं आणि तो टेस्ट क्रिकेट खेळण्याच्या लायकीचाच नाही असं बोललं जाऊ लागलं. पण त्याचवर्षी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिरीजमध्ये कोहलीनं खुंखार कांगारु बॉलर्सची अक्षरश: पिसं काढली. त्याची फटकेबाजी बघून बोललं जाऊ लागलं, याच्यासारखा किंग हाच.

आता सात वर्ष झाली, तरी ऑस्ट्रेलियात कोहलीची जबरदस्त हवा आहे. तिथले बॉलर त्याला टरकून असतात, त्यांचा कोच लँगर म्हणतो, कोहली जगातला बेस्ट प्लेअर आहे. त्यांचा पेस बॉलर मॅक्ग्रा म्हणतो, कोहली देव आहे. कोहली मैदानात ऑस्ट्रेलियाला जितका फोडतो, तसाच तो त्यांच्या चाहत्यांना, खेळाडूंना त्यांच्याच भाषेत नडायला पुढे मागं बघत नाही. हे असं असूनही ‘किंग कोहली’वर ऑस्ट्रेलियन चाहते लय प्रेम करतात.

हा कोहलीचा अध्याय तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे, ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियावर राज्य करणारा कोहली हा काय एकटाच भारतीय प्लेअर नाही. आपल्या तेंडल्यानंही काही काळ केलं होतंच, पण त्याही आधी एक प्लेअर होता, ज्यानं ऑस्ट्रेलियात कहर केला होता. त्यानं ऑस्ट्रेलियाला धुवूनही ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी त्याच्यावर जीव टाकला. इतका जीव की रिटायरमेंट नंतर हा गडी ऑस्ट्रेलियामध्येच स्थायिक झाला.

तो खेळाडू म्हणजे रुसी सुर्ती. भारतीय क्रिकेट जेव्हा रांगण्याच्या वयात होतं, तेव्हा म्हणजेच १९६० मध्ये सुर्तीनं भारतीय संघाकडून कसोटी पदार्पण केलं. चांगला लेफ्टी बॅटर आणि स्पिन आणि मिडीयम पेस टाकणारा बॉलर म्हणून सुर्ती फेमस होता. त्याच्या बॅटिंगमध्ये बिनधास्तपणा होता, फटकेबाजी करण्यात त्याचा हात अजिबात आखडायचा नाही.

आपल्या दुसऱ्याच कसोटी सामन्यात त्यानं शानदार फिफ्टी झळकावली, पण त्यानंतर त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. पुढे वेस्ट इंडिजच्या दौऱ्यातही त्यानं चमक दाखवली. हेल्मेट, चेस्ट गार्ड असलं काहीही नसताना सुर्ती  विंडीज तोफखान्याला भिडला. कॅप्टन नरी कॉन्ट्रॅक्टरचं करिअर बाऊन्सरचा आघात होऊन संपलं, तेव्हा सुर्ती नॉन स्ट्राईकला होता. मात्र तरीही तो डगमगला नाही.

सुर्तीचं नाव क्रिकेटविश्वात गाजलं ते ऑस्ट्रेलिया दौऱ्यामुळं. ऑस्ट्रेलियन फास्ट पिचेसवर भलेभले गंडतात, तिथं सुर्तीनं आपली कमाल दाखवून दिली. त्यानं १९६७-६८ च्या दौऱ्यात ४ मॅचेसमध्ये ३६७ रन्स चोपले. बॉलिंगमध्येही आपलं कौशल्य दाखवत त्यानं १५ विकेट्सही घेतल्या. पुढं न्यूझीलंडमध्ये गेल्यावर त्यानं ४ मॅचेसमध्ये ३२१ रन्स ठोकले, हा परफॉर्मन्स बघून सगळ्या जगानं सुर्तीची दाखल घेतली.

त्या काळातल्या टीमचा तो रवींद्र जडेजा होता. तेव्हा बाकीचे प्लेअर्स फिल्डिंगला एवढं महत्त्व द्यायचे नाहीत, सुर्ती मात्र जीव ओतून फिल्डिंग करायचा. ऑस्ट्रेलियन चाहते तर आपल्याच खेळाडूंना डिवचायचे की, दम असेल तर सुर्तीच्या जवळून बॉल मारुन दाखवा. बॉलिंगमध्ये विकेट्स काढून देणारा, जबरदस्त फिल्डिंग करणारा आणि बॅटिंगच्या बाबतीत नाद असणारा सुर्ती आपल्या छोट्याश्या कारकिर्दीत प्रचंड लोकप्रिय ठरला.

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यानं राजस्थान आणि गुजरातकडून रणजी क्रिकेट खेळताना आपली चमक दाखवलीच, पण सोबतच तो ऑस्ट्रेलियाच्या प्रतिष्ठीत शेफील्ड शिल्डमध्येही खेळला. शेफील्डमध्ये खेळणारा तो पहिला भारतीय कसोटी खेळाडू ठरला. रिटायरमेंटनंतर तो ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला. क्वीन्सलँड संघानं त्याला करारबद्धही केलं.

१३ जानेवारी २०१३ रोजी त्याचं निधन झालं. पण सगळ्या क्रिकेट विश्वानं त्याला दोन नावांमुळे लक्षात ठेवलं, बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये असलेल्या ताकदीमुळं भारताचा गॅरी सोबर्स आणि न घाबरता फास्ट बॉलर्सला चोपण्यामुळं ‘जिगरबाज क्रिकेटर.’

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.