नोकरी डॉट कॉम ही आयड्या त्यांना पद्मश्री पुरस्कार देवून गेली..

एप्रिल महिन्यानंतर दोन टेन्शन असतात एक म्हणजे शेवटच्या वर्षात किती टक्के मिळणार आणि दुसरं म्हणजे ग्रॅज्युएशननंतर नोकरी कुठं मिळेल, ती कशी शोधायची? बरं ती मिळाली नाही, तर येणारं टेन्शन वेगळंच. या सगळ्या अवघड काळात कित्येकांना साथ दिली ती नोकरी डॉट कॉमनं.

बीए पास वाल्यांपासून ते डॉक्टरपर्यंत अशा सगळ्यांचं हक्काचं ठिकाण म्हणजे नोकरी डॉट कॉम. 

१० वर्षांपूर्वी नोकरीच्या जाहिरातीसाठी फक्त पेपरवर डिपेंड राहावं लागायचं. नोकरी मिळवण्यासाठी एकतर ओळख पाहिजे किंवा मग घरी पेपर तरी आला पाहिजे. मात्र, १९९७ मध्ये नोकरी डॉट कॉम सुरु झालं आणि अनेक बेरोजगारांची वाट सोपी झाली.

नोकरी डॉट कॉम ही संजीव बिखचंदानी यांच्या सुपीक डोक्यातील आयडिया.

बिखचंदानी मूळचे दिल्लीचे. त्यांचा जन्म झाला १९६३ मध्ये. त्यांचे वडील डॉक्टर होते. त्यामुळे संजीव यांच्या घरच्यांना वाटायचं की, त्यांनी डॉक्टर व्हावं. लहानपणापासुन हुशार असणाऱ्या संजीव यांचं स्वप्न मात्र वेगळं होतं. 

त्यांचं म्हणणं होतं की, आपल्या घरात कोणीच व्यावसायिक नाही आणि ती जागा आपण भरून काढायला हवी. 

सगळ्यांना धक्का देत त्यांनी १२ वी नंतर बीएला ऍडमिशन घेतलं आणि इकॉनॉमिक्स विषय घेऊन पदवी पूर्ण केली. संजीव यांना पहिला जॉब १९८४ मध्ये लिंटस कंपनीत अकाउंटंट म्हणून लागला. या कंपनीत तीन वर्ष काम केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. 

व्यवसाय करायचा म्हणून संजीव बिखचंदानी यांनी नोकरी सोडली. मात्र म्हणावा तसा कॉन्फिडन्स नसल्याने त्यांनी व्यवसाय करण्याऐवजी एमबीएला ऍडमिशन घेतलं. एमबीएनंतर संजीव यांना हिंदुस्थान मिल्क फूड मॅनिफॅक्चर कंपनीत नोकरी लागली. याच वेळी आयआयएममध्ये शिकणाऱ्या सुरभी यांच्या सोबत त्यांचं लग्न झालं. 

लग्नाच्या एका वर्षानंतर त्यांनी हिंदुस्थान मिल्कमधला जॉब सोडला. 

मधल्या काळात इतर उद्योग करून संजीव यांच्या हातात काहीच लागलं नाही. १९९० मध्ये कॉलेजमधल्या एका मित्राला सोबत घेऊन एन्डमार्क आणि इन्फोएज नावाच्या दोन कंपन्या स्थापन केल्या. 

या दोन्ही कंपन्यांचं ऑफिस हे त्यांच्या घरातल्या एका खोलीत सुरू झालं होतं. 

या दोन्ही कंपन्यांचं काम म्हणावं तसं होत नव्हतं. त्यामुळं १९९३ ला संजीव आणि त्यांचे मित्र वेगळे झाले. इन्फो एज ही कंपनी संजीव यांच्या हिस्स्याला आली. या कंपनीतून कुठलाही आर्थिक फायदा होत नसल्याने संजीव बिखचंदानी लहान-मोठ्या कंपनीत काम करू लागले. 

नशीब कसं बदलेल हे सांगत येत नाही.

झालं असं की, १९९६ मध्ये दिल्लीत आयटी आशिया एक्झिबिशन भरली होती. संजीव यांना या एक्झिबिशनमध्ये एक वेगळा स्टॉल दिसला. त्यावर www असं लिहलं होतं. उत्सुकता म्हणून त्यांनी या स्टॉलला भेट दिली. 

याच एक्झिबिशनमधून नोकरी डॉट कॉमची आयडिया संजीव यांना मिळाली.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एखादी वेबसाईट सुरु करावी अशी आयडिया संजीव यांना  सुचली. इथं बातम्यांऐवजी केवळ नोकऱ्यांच्या संदर्भातली माहितीच उपलब्ध करून देण्यात येणार होती. या काळात एखादी वेबसाईट तयार करणं आणि ती होस्ट करणं सोपं काम नव्हतं. यात त्यांची बरीच वर्ष गेली. 

अथक परिश्रामानंतर मार्च १९९७ मध्ये १ हजार जाहिरातींसह नोकरी डॉट कॉम ही वेबसाईट सुरु झाली. यावेळी इंटरनेट ही संकल्पना नवीन होती. संकल्पना नवीन असल्यानं अनेकांनी ही वेगळी गोष्ट लावून धरली. यामुळे नोकरी डॉट कॉम या वेबसाईटवरचे युझर्स लवकर वाढले. 

यामुळे पहिल्या वर्षी कंपनीला अडीच लाखांचा फायदा झाला. संजीव यांची आयडिया  आवडल्यानं यात अनेकांनी इन्व्हेसमेंट केली.   

२००६ मध्ये बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्ट होणारी नोकरी डॉट कॉम ही भारतातील पहिली इंटरनेट कंपनी होती.

घरातल्या एका खोलीतून सुरु झालेली ही कंपनी आता देशातल्या लाखो लोकांना नोकरी मिळवून देणारी वेबसाईट बनली आहे. संजीव बिखचंदानी यांनी एकट्याने ही वेबसाईट सुरु केली होती, आता हजारो लोक या कंपनीत काम करत आहेत. देशभरातून नोकरी डॉट कॉम या वेबसाईट वर दररोज नोकरीसाठी १५ हजार रिज्युम अपलोड करण्यात येतात. 

या कामाचा गौरव म्हणून त्यांना भारत सरकारतर्फे २०२० मध्ये पद्मश्री देऊन सम्मानित करण्यात आलं. संजीव बिखचंदानी हे नोकरी डॉट कॉम बरोबरच शिक्षा डॉट कॉम, जीवनसाथी डॉट कॉम आणि ९९ एकर्स डॉट कॉम या वेबसाईट्सचेही संस्थापक आहेत.

 हे ही वाच भिडू  

Leave A Reply

Your email address will not be published.