अन् अशाप्रकारे शिवसेनेला धनुष्यबाणाचं चिन्ह मिळालं..!!!

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सतत विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, धनुष्यबाण हे चिन्ह कुठल्या गटाकडे जाणार ? आणि शिवसेना कुणाची ? या सगळ्या सत्तानाट्यावर सुप्रीम कोर्टात तोडगा निघेल असा अनेकांचा अंदाज होता.

मात्र सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला चिन्हाबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले आणि अंधेरीच्या पोटनिवडणुका तोंडावर आलेल्या असताना निवडणूक आयोगानं आपला निर्णय जाहीर केला आहे.

आयोगानं दिलेल्या आदेशानुसार शिवसेना हे नाव दोन्ही गटांना वापरण्यात येणार नाही आणि शिवसेनेची ओळख असणारं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे.         

आजवर शिवसेनेची ओळख म्हणून डोळ्यांसमोर येणाऱ्या धनुष्यबाणाचा इतिहास काय आहे ?

शिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ रोजी झाली. 

या दरम्यान शिवसेना फक्त एक संघटना होती, तेंव्हा सेनेची नोंद राजकीय पक्ष म्हणून नव्हतीच. सेनेची सुरुवात समाजकारणामुळे झाली. समाजकारणाला गती मिळाली आणि १९६७ मध्ये सेना राजकारणात उतरली.

मात्र जेव्हा १९८८ मध्ये निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांची नोंदणी करून घ्यायचं ठरवलं तेव्हा आयोगाने सर्व पक्षांचे तसे प्रस्ताव मागवून घेतले.

त्यात शिवसेना संघटनेचा देखील प्रस्ताव होता. सोबतच सेनेनं स्वतःची घटना तयार केली आणि त्या प्रस्तावासोबत ती घटना जोडली. सेनेच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी झाली आणि निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या घटनेला मान्यता दिली आणि सोबतच सेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली.

आणि अशाप्रकारे १९८९ साली शिवसेनेची राजकीय पक्ष म्हणून नोंदणी झाली. 

परंतु निवडणूक आयोगाकडून चिन्ह मिळवण्यासाठी सेनेकडे मतदानाची टक्केवारी नसल्यामुळे पक्षाला चिन्ह मिळालं नसल्याची माहिती मिळते.

मात्र त्याच्या काहीच महिन्यांनंतर म्हणजेच १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती झाली. निवडणूक लढवली. सेनेचे ४ खासदार निवडून आले आणि सेनेने चिन्हासाठी लागणारी आवश्यक मतांची टक्केवारी पूर्ण केली.

पुन्हा निवडणूक आयोगाकडे सेनेने चिन्ह देण्याचा प्रस्ताव टाकला. सेनेने आवश्यक मतांचा कोटा पूर्ण केल्यामुळे आयोगाने त्यांना निवडणूक चिन्ह बहाल केलं. 

ते चिन्ह म्हणजे धनुष्यबाण !

धनुष्यबाण म्हणजे म्हणजे प्रभू रामाचं शस्त्र. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांनी सुद्धा ते चिन्ह मोठ्या आनंदाने स्वीकारलं. त्यानंतर आजतागायत सेनेने प्रत्येक निवडणुकांमध्ये हेच चिन्ह वापरलं.   

धनुष्य-बाण सेनेच्या केशरी रंगाच्या ध्वजावर वापरला जातो. केशरी रंग हिंदू धर्माचे प्रतीक म्हणून समोर येते. हा रंग पक्षाच्या मजबूत हिंदू राष्ट्रवादी भावनांचंही संकेत देतो. 

१९८९ च्या आधी शिवसेनेकडे निवडणूक चिन्हच नव्हतं का ?

तर होतं. सेनेला धनुष्यबाण हे चिन्ह १९८९ मध्ये मिळालं त्याआधीच्या सर्व निवडणूका सेनेने वेगवेगळ्या चिन्हांवर लढवल्या. प्रत्येक निवडणुकीत कधी उगवता सूर्य, झाड, कप-बशी, ढाल-तलवार, कोणाला नारळ तर कधी रेल्वे इंजिन अशा चिन्हावर सेनेचे उमेदवार निवडणूक लढवत असायचे. त्यात मनोहर जोशी, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर आणि गणेश नाईक अशी नावं होती. यातील रेल्वे इंजिन हे चिन्ह तर सेनेने १९७८ च्या फेब्रुवारी–मार्च महिन्यात विधानसभा निवडणुकीत वापरलं होतं. मात्र या निवडणुकीत सेनेला पराभव स्वीकारावा लागलेला.

त्याही आधी १९८४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने २ जागा लढवल्या होत्या. एक वामनराव महाडिक आणि दुसरे मनोहर जोशी. मात्र शिवसेनेकडे त्यावेळी स्वतःचे अधिकृत असे निवडणूक चिन्ह नव्हते त्यामुळे हे दोन्ही उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर रिंगणात उतरले होते. हे दोन्ही उमेदवार पराभूत झाले होते. 

याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी बोल भिडूने माजी खासदार व शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याशी संपर्क साधला.

चंद्रकांत खैरे असा दावा करतात कि, १९६८ ला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सेनेला धनुष्यबाण मिळाला होता. त्याच चिन्हावर सेनेने महानगपालिका निवडणूक लढवली होती. 

खैरे पुढं सांगतात, “शिवसेना प्रमुखांनी धनुष्यबाण या निशाणीवर १९६८ च्या मुंबई महानगपालिका निवडणुकीत १२० पैकी ४२ नगरसेवक निवडून आणले होते, त्याच निवडणुकीत सर्वांना धनुष्यबाण ही निशाणी मिळाली होती. मात्र जेव्हा १९७८ च्या विधानसभा आणि १९७९ च्या लोकसभेच्या निवडणूका आल्या तेव्हा राजकीय पक्ष म्हणून आम्हाला निवडणूक चिन्ह मिळालं नव्हतं”. 

“मात्र १९७८ साला नंतरच्या सर्व निवडणूका धनुष्यबाण चिन्हांवर लढवल्या आहेत. १९८८ च्या संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत आम्ही २८ जण नगरसेवक म्हणून निवडून आलो होते तेही धनुष्यबाण चिन्हावर”. 

खैरे सांगतात, १९९० ला जेव्हा मी आमदार झालो तेव्हा सुद्धा मी धनुष्यबाण हेच चिन्ह वापरलं होतं. 

उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यात देखील शिवसेना निवडणूक धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत असते. याला फक्त झारखंड राज्य आहे कारण तिथे शिबू सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ आहे. तिथे शिवसेना वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवत असते. 

आता निवडणूक आयोगानं चिन्ह गोठवलं असलं तरी हा निर्णय फक्त अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीसाठीच आहे. त्यामुळं हे चिन्ह नेमकं कोणाला मिळणार याचा अंतिम निर्णय आयोगासमोरची सुनावणी पूर्ण झाल्यावरच होईल,

त्यामुळं अंधेरीच्या पोट निवडणूकांमध्ये ना शिवसेना हे नाव असेल आणि ना धनुष्यबाण हे चिन्ह. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.