पंतप्रधान पुण्यात आले की आठवड्याभरात मुख्यमंत्रीपद जातं..पहिला पण अस झालय..

१४ जून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले. त्यानंतर २० जूनला विधानपरिषदेची निवडणूक झाली आणि बरोबर सात दिवसात म्हणजे २१ तारखेला सरकारला सुरूंग लागला. शिंदे गटाचे आमदार सुरत मार्गे गुवाहाटीला गेले. त्यानंतरच्या घडामोडी बहुमत चाचणीपर्यन्त आल्या, आणि मुख्यमंत्र्यांनी अखेर राजीनामा दिला..

आत्ता यातली एक गोष्ट अशी की मोदी पुण्यात आल्यानंतर आठवड्यानंतरच महाविकास आघाडीचा कार्यक्रम होण्यास सुरवात झाली. 

अशीच एक गोष्ट इतिहासात देखील झाली होती, 

ती म्हणजे पंतप्रधान पुण्यात आले आणि मुख्यमंत्रीपद गेलं…

झालेलं अस की पंडित भीमसेन जोशी यांनी आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ सवाई गंधर्व स्मारक उभारलं होतं. या स्मारकाच्या उद्धाटनासाठी अटलबिहारी वाजपेयी आले होते.

हा कार्यक्रम पार पडला, २००३ च्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात..

कार्यक्रमस्थळी मोठी जंगी सभा झाली. प्रोटोकॉलप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख सुद्धा या कार्यक्रमासाठी हजर होते. वाजपेयी भाषणाला उभे राहिले. नेहमीप्रमाणे आपल्या स्टाईलने त्यांनी सुरवात केली,

संगीत में लोगोंको जोडने की ताकद है, इसमें भाषा का कोई बंधन नहीं !”

भाषणाच्या सुरवातीलाच त्यांनी सहा महिन्यापुर्वीची भीमसेन जोशी यांची भेट आणि तो प्रसंग सांगितला. आजकालचे युती व आघाड्यांचे राजकारण यामुळे उद्या काय होईल कधी आपलीखुर्ची मोकळी करावी लागेल याचा काहीच अंदाज सांगता येत नाही असं ते म्हणाले. त्यानंतर काही क्षण थांबले, आपला भाषणातला वर्ल्ड फेमस पॉज घेतला आणि मागे  वळून विलासराव देशमुखांच्या कडे वळून पाहिलं, खट्याळ हसत म्हणाले,

“क्यूँ विलासराव ?”

विलासराव देशमुख आधी अवाक झाले. काही क्षणात सावरून हसत हसत मान डोलावली. सगळं सभागृह हास्याच्या स्फोटाने गाजून गेलं. वाजपेयींनी राजकारणातली संदिग्धता, महाराष्ट्रातदेखील विलास रावांना राष्ट्रवादी बरोबर आघाडी चे सरकार चालवण्यासाठी करावी लागत असलेली कसरत यावर गंमतीदार टिप्पणी केली.

विलासरावांनी देखील खिलाडू वृत्तीने ती स्वीकारली.

खरा धक्का तर काहीच दिवसात बसला. वाजपेयींचा तो कार्यक्रम होऊन आठवडाही झाला नसेल मात्र तेवढ्यातच दिल्लीहून बातमी आली की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना सोनिया गांधी यांनी राजीनामा द्यायला लावला आहे.

खरं तर विलासराव देशमुख यांचं सरकार चांगलं चालू होतं. दोन पक्षांचे सरकार असल्यावर नेहमीच्या कुरबुरी चालणारच तश्या चालू होत्या. पण मुख्यमंत्र्यानी राजीनामा द्यावा अशी कोणतीही मोठी घटना घडली नव्हती.

नाही म्हणायला काँग्रेसच्याच इतर अनेक नेत्यांच्या महत्वाकांक्षा त्यातून रचलेल्या खेळ्या यात विलासराव देशमुखांची खुर्ची सापडली होती.

दिल्लीच्या काँग्रेस नेत्यांनी विलासराव देशमुख यांची मुख्यमंत्री म्हणून कामगिरी समाधानकारक नाही असं कारण देत राजीनामा द्यायला लावला. पुढे बऱ्याच उलाढाली झाल्या आणि विलासराव देशमुखांचे खास मित्र सुशीलकुमार शिंदे यांची मुख्यमंत्री पदी निवड झाली.

दिलदार विलासरावांनी मोठ्या मनाने त्यांच्या हातात मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सोपवली. मात्र ते करत असताना त्यांना अटलजींचे भाषण आठवत राहिले.

असाच योगायोग परत आला, पंतप्रधान पुण्यात येवून गेले आणि अवघ्या १५ दिवसातच मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.