WWE स्क्रिप्टेड असायचं हे माहीत असेलही, पण ही स्क्रिप्ट कशी लिहिली जायची हे बघून घ्या…
आपल्या देशातल्या कुठल्याही रस्त्यानं कितीही धावपळीच्या वेळेस किंवा सणाच्या वेळेस जा, जर एखाद्या ठिकाणी किरकोळ मारामारी सुरू असली, तरी लोकं हातातले कामधंदे सोडून भांडणं बघायला थांबणार म्हणजे थांबणार.
आता या बघणाऱ्यांच्या गर्दीत भांडणं सोडवणारी जनता लई कमी असते. ही भांडणं आणि मारामाऱ्या बघण्याची सवय आपल्याला एकाच गोष्टीनं लावली, ती म्हणजे WWE.
आता कुणी WWE म्हणायचं तर कुणी WWF. शाळा म्हणून नका किंवा गल्लीतले कट्टे सगळीकडे आदल्या दिवशीच्या मॅचची चर्चा रंगलेली असायची. अफवांचं म्हणाल तर अंडरटेकर सातवेळा मरुन जिवंत झालाय, हे सांगताना शपथा खाणारी पोरंही आपणच आहोत. चॉकस्लॅम असेल, स्टोनकोल्ड स्टनर असेल या गोष्टी ट्राय करण्यासाठी घरातले लहान भाऊ, तब्येतीनं बारीक मित्र हे आपलं हक्काचं गिऱ्हाईक होतं.
पुढं जसजशी अक्कल यायला लागली, तेव्हा समजलं की हा WWE चा विषय पूर्णपणे फेक आहे. यातली मारामारी स्क्रिप्टेड असते. (ज्यांना हे आत्ता समजलं असेल, त्यांनी वाईट वाटून घेऊ नका. अज्ञानातलं सुख तुम्ही इतरांपेक्षा जास्त अनुभवलंय.) आपण जे मन लाऊन बघत होतो, ते सगळं कुणीतरी आधीच लिहून ठेवलेलं असायचं, हे पचवायला थोडं जड गेलं आणि मग प्रश्न पडला, लिहीत असेल तर कोण लिहीत असेल, कसं लिहीत असेल आणि नेमकं काय लिहीत असेल..?
सगळं हुडकायला घेतलं, तेव्हा तर आश्चर्याचे बरेच धक्के बसले
स्क्रिप्ट लिहितात म्हणजे नेमकं काय करतात? तर एक स्टोरी लिहितात. आता समजा RAW हा शो आहे आणि एखाद्या बेल्टसाठी फायटिंग घडवून आणायचीये, तर सगळ्यात आधी हे डिसाईड होतं की हा बेल्ट जिंकणार कोण.
लोकांमध्ये जर जॉन सीना लोकप्रिय असेल आणि त्या सिझनला त्याला जिंकवणं जास्त प्रॉफिट मिळवून देणार असेल तर जॉन सीना जिंकणार हे आधीच ठरलेलं असायचं.
आजवर जितक्या पैजा लावलेल्या त्या सगळ्या पाण्यात.
स्क्रिप्टमधली स्टोरी, कुणाची मॅच कुणाशी होणार, यात कोण जिंकणार आणि मग पुढं कोण जाणार हे सगळं ठरवायची.
पण समजा, तुम्ही WWE बघताय कार्यकर्ते त्या फायटिंग रिंगमध्ये आलेत आणि डायरेक्ट हाणामारी सुरू केलीये… तर बघायला कसलं बोअर होईल.
हाणामारीच्या आधी आणि नंतर पाहिजे मसाला. म्हणजे कसं म्युझिक पाहिजे, डायलॉगबाजी पाहिजे, एकाच माणसावर तीन वेळा येऊन थांबणार कॅमेराचा शॉट पाहिजे… तर माहोल बनतोय.
WWE च्या स्क्रिप्टमध्ये हे सुद्धा असायचं. जर दोघांमध्ये फाईट लावायची असेल, तर त्या आधी भलत्याच दोघांची बडबड दाखवली जाणार. मग त्याच्यात तिसऱ्या गड्याचा उदाहरणार्थ अंडरटेकरचा उल्लेख झाला की लाईट बंद व्हायची, धूर यायचा, घंटा वाजल्याचा आवाज व्हायचा आणि पांढरेफट्टक डोळे घेऊन म्युझिकच्या आवाजात अंडरटेकर मैदानात यायचा.
आधीच्या दोघांमध्ये काय बोलणं होणार? कुठलं वाक्य झालं की अंडरटेकर येणार? हे सुद्धा लिहून ठेवलेलं असायचं.
WWE च्या स्क्रिप्टमध्ये आणखी एक गोष्ट लिहिलेली असायची, ती म्हणजे मॅच किती वेळ चालवायची. समजा आठ मिनिटांची वेळ आहे, तर रिंगणातले कार्यकर्ते आठ मिनिट लढणारच. सगळ्यात मेन विषय म्हणजे जिंकणार कोण हे सुद्धा मॅच सुरू व्हायच्या आधीच फायटर लोकांना समजायचं. त्यामुळं रेफ्री लोकांनी कितीही वेळा ३-२-१ करत मूठ आपटली, तरी कधी दम सोडायचा आणि कधी उभं राहायचं हे फायटर कार्यकर्ते ओळखून असायचे.
कोण जिंकणार लिहिलंय, कोण कधी येणार हेही लिहिलंय… मग लिहिलेलंच नाय, असं काय असायचं का? तर एकाच गोष्टीची स्क्रिप्ट नसायची,
ती म्हणजे मॅचची.
समजा अंडरटेकर विरुद्ध जॉन सीना मॅच आहे, तर पहिलं मुस्काड कुणी फोडायचं, रिंगच्या दोरीवरुन पहिली उडी कुणी मारायची, या गोष्टी काय स्क्रिप्ट लिहिणारे भिडू लिहायचे नाहीत. मग मॅचमधली हाणामारी खरी असायची का?
तर मार खरा खरा बसायचा, पण कसं मारायचं हे ठरवलेलं असायचं. म्हणजे काय व्हायचं ज्या दोन कार्यकर्त्यांमध्ये फाईट आहे, ते मॅचच्या आधी भेटायचे. मग आपण कशी मारामारी कशी करायची हे ठरवायचे. समजा काय वाढीव मूव्ह टाकणार असतील, तर त्याची प्रॅक्टिस करायचे. कोण किती मारणार, कोण मार खाणार हे ठरवायचे. याच्यात त्यांना व्हिडीओ प्रोड्युसर कार्यकर्ता मदत करायचा.
लिहिता लिहिता आणखी एक प्रश्न आला, जर एखाद्या भिडूला हरायचं नसेल, तर?
म्हणजे समजा बुगीमॅन आणि खलीची फाईट आहे. बुगीमॅन सारख्या किरकोळ फायटरकडून समजा खलीनं आपला इगो धरुन ठेवला आणि स्क्रिप्टमध्ये खलीनं हरायचं असं ठरलेलं असतानाही तो जिंकला. तर खलीचा बाजार उठणार. कारण त्याच्यामुळं सगळी स्टोरीलाईन फिक्स गंडणार.
बिग कास नावाच्या फायटरनं स्क्रिप्ट विरोधात जाऊन एका बारक्या फायटरला लय हाणला आणि मॅचचा रिझल्ट बदलला, साहजिकच स्टोरीलाईन गंडली. तेव्हा WWE नं बिग कासला डायरेक्ट बादच केलं.
एवढं वाचून तुम्हाला एक प्रश्न फिक्स पडला असेल, की ही स्क्रिप्ट दिसते कशी?
या स्क्रिप्टमध्ये फायटर लोकांचे डायलॉग, बॅकस्टेजला सिन कसा तयार करायचा याचे डायलॉग या गोष्टी अगदी व्यवस्थित लिहिण्यात आल्यात.
पण थांबा एवढंच नाही, तर आठवड्याची स्टोरीलाईन लिहिताना WWE वाले एक चेकलिस्टही बनवायचे.
यात कोण कुणाशी भिडणार? कुठल्या सिरीजमध्ये कोण पुढं येणार? हे तर आहेच. पण एखादी सरप्राईज मोमेन्ट, एखादी १८ प्लस मोमेन्ट अशा गोष्टी आहेत का? हे सुद्धा चेक केलं जायचं. कुणाची मैत्री दाखवायची, कुणाचं प्रेम दाखवायचं हे सुद्धा लिहिलेलं असायचं.
क्रिएटिव्ह लोकांची सगळी टीम मिळून ही स्क्रिप्ट तयार करायचे आणि यानुसार मग फायटिंग व्हायची. जिथं कोण मार खाणार आणि कोण जिंकणार हे सुद्धा ठरलेलं असायचं, आपण तेवढं येड्यागत पैजा लाऊन मारामारी बघत बसायचो….
हे ही वाच भिडू:
- लोकांना जागतिक प्रश्न पडतात, पण मला प्रश्न पडलाय बुगीमॅन खरंच अळ्या खायचा का?
- सात वेळा मरून जिवंत झालेला अंडरटेकर रिटायर होतोय यावर आपला तरी विश्वास बसत नाही
- एका हिरव्या पडद्यावर जाऊ नका, बिअर ग्रिल्स आपल्याला लय आधीपासून गंडवतोय