नाशिक जवळ तरसाचं पिल्लू सापडलं होतं… त्याचं पुढं काय झालं…?

आपल्याकडे शहरांत कधी साप वगैरे सापडला तर पहिली गोष्ट केली जाते ती म्हणजे त्याला मारून टाकणं. अधिकांश प्रकरणांमध्ये हेच होतं. काही वेळा फक्त नको ती हिंमत न दाखवत सर्पमित्रांना बोलावून त्यांच्याकडे सापाला सोपवण्यात येतं, जिवंत परत त्याच्या मूळ ठिकाणी पोहोचवण्यासाठी. मात्र साप तर ठीक आहे,

जर याहीपेक्षा जंगली प्राणी मानवी वस्ती जवळ सापडला तर?

२०२१ चं ते साल होतं आणि महिना होता मार्चचा. शहर, महाराष्ट्रातील नाशिक. 

नाशिकमध्ये मानवी वस्तीच्या अगदी जवळ एक तरसाचं पिल्लू आढळून आलं. सुदैवाने ते सापडलं होतं नाशिकच्या वन विभागाला आणि इको-इको फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेला. मात्र असं असलं तर या पिल्लाकडे दोनच पर्याय होते.  

एक तर त्याला प्राणिसंग्रहालयात पाठवणं जिथे आयुष्यभर त्याला कैद केलं जाईल किंवा मग या सगळ्यातून मुक्त करणं म्हणजे आहे अस जंगलात सोडून येणं अर्थात मृत्यू.. 

हे दोनच पर्याय असण्याचं कारण म्हणजे वन विभागाने आणि एनजीओने त्याच्या आईचा शोध घेऊन परत त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो फोल ठरला होता. म्हणून आता हेच दोन पर्याय होते. 

ते ‘मादी’ पिल्लू इतकं लहान होतं की, त्या स्थितीत कोणतंही प्राणिसंग्रहालय त्याला घेऊन जाण्यासाठी तयार नव्हतं. 

अशात या दोन्ही संस्थांनी निवडला पर्याय क्रमांक तीन

त्याला तसच रानटीपणानं मोठ्ठं करुन परत जंगलात सोडण्याचा…

मात्र हे इतकं सोपं नव्हतं. कारण ते पिल्लू इतकं लहान होतं की ते कोणत्याही आधाराशिवाय त्या स्थितीत जंगलात जगूच शकलं नसतं. चार्ल्स डार्विनने सिद्धांत मांडलाय बघा… ‘सर्व्हाइवल ऑफ द फिटेस्ट’. हा रुलच मुळात जंगलातून आलेला. जंगलात सक्षम आणि ताकतवान प्राणीच जगू शकतात नाही तर इतर बलवान प्राण्यांचे भक्षक होतात. 

WhatsApp Image 2022 04 27 at 2.20.02 PM

हे तरसाचं पिल्लू कमजोर होतं, म्हणून लगेच ‘जंगल’ हा पर्याय नव्हता. मात्र त्याला जिवंत तर ठेवायचं होतं तेही त्याच्या स्वातंत्र्यासहित. तेव्हा या संस्थांनी एक निर्णय घेतला…

त्या पिल्लाचं भविष्य हे जंगल ठरवण्यात आलं होतं. तेव्हा त्याला ‘रानटी बनण्यासाठी वाढवणं’ हे ध्येय ठेवलं गेलं आणि मार्गक्रमण सुरु झालं.

इको-इको फाउंडेशनच्या सदस्य पोहोचले आरईएसक्यू चॅरिटेबल ट्रस्टकडे. पुण्यातील हे वन्यजीव केंद्र तरसाच्या मादी पिल्लाला प्रवेश देऊन तिला ‘जंगलात जगण्याची दुसरी संधी मिळावी’, या उद्देशाने तिचे संगोपन करणार का, हे त्यांना पाहायचे होते. 

या ट्रस्टने पूर्वी रस्टी स्पॉटेड कॅट आणि इतर अनेक सस्तन प्राणी आणि पक्ष्यांना वाचवणं, त्यांचे पुनर्वसन करणं, अशी कामं  केलेली होती. मात्र तरसाचं पिल्लू ही पहिलीच केस होती. एका अनाथ पिल्लाला  काळजीपूर्वक वाढवणे, त्याचे पुनर्वसन करणे आणि जंगलात पुन्हा आणणे, हे एक मोठे काम होतं.

शिवाय, या संपूर्ण प्रक्रियेचं महत्व देखील तेवढंच मोठं होतं, ते रिस्की होतं.

का?

१. या पट्टेदार तरसाच्या प्रजातीची लोकसंख्या जागतिक पातळीवर १०,००० पेक्षा कमी असल्याचे इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर (आययूसीएन) या संस्थेनं सांगितलंय.

२. या प्रजातीला युगानुयुगे छळाचा सामना करावा लागला आहे. लोकप्रिय समजुतींमधून निर्माण झालेल्या सूडबुद्धीने त्यांची नेहमीच हत्या झाली आहे. पौराणिक कथा आणि लोककथांमध्ये तरसाला विश्वासघात आणि  मूर्खपणाचे प्रतीक मानलं गेलंय. त्यातच मुलांना शिकार केल्याच्या कथांमुळे ते अजूनच मोठ्या प्रमाणात गैरसमज झाले आहेत. ज्यामुळे त्यांना मारण्याचं प्रमाण वाढलंय ज्यामुळे लोकसंख्येला मोठा फटका बसला आहे.  

त्यातही ते मानवासाठी फारच धोकादायक असल्याचा समज आहे. मात्र सत्य वेगळंच आहे… 

वास्तविकतेत, भारतीय पट्टेदार तरस बऱ्यापैकी लाजाळू असतात. 

३. जरी आपण त्या पिल्लाला इथे मोठं केलं आणि नंतर कधी जंगलात सोडले. तर ते जगण्याचे किती चान्सेस आहेत. कारण त्यांना शेवटी कैद करून इथे वाढवलं जाणार. अशात ते मानवात वाढल्यानंतर लागलाय गेल्यावर तिथल्या परिस्थितीशी किती जुळवून घेऊ शकतील, यात शंका आहे. त्यात जर लहान असताना प्राण्यांवर काही मानसिक आघात झाला किंवा खराब संगोपनाच्या परिस्थितीत ते वाढले तर अजूनच अशक्य होतं. 

अशा सगळ्या रिस्क समोर होत्या. तेव्हा आरईएसक्यू ट्रस्टच्या कार्यकर्त्यांच्या मनात एकच विचार आला… 

“जर आपण एखाद्या प्राण्याला जंगलात जगायला शिकवू शकतो, हे शक्य होऊ शकतं, तर का नको ट्राय करायला. जर यशस्वी झालो, तर हे पिल्लू इतर इतर अनेकांसाठी प्रेरणा बनेल ज्यांना संधी न देता आयुष्यभराच्या कैदेची शिक्षा सुनावली जाते”

बस्स!

ट्रस्टने मादी पिल्लाला दुसरं आयुष्य जगण्याची संधी देण्याचं ठरवलं आणि विडा उचलला. 

नाशिक वनविभागाने तिला पुण्याच्या आरईएसक्यू इथे आणले आणि पिल्लाच्या प्रवासाला सुरुवात झाली…

त्यांना पहिल्या दिवसापासूनच ध्येय माहीत होतं. त्यानुसार त्यांनी तिला रानटी ठेवण्याची तयारी सुरु केली. मात्र सध्या पिल्लू फार लहान होतं. तसंच तिची भरभराट होण्यासाठी आणि एकटेपणाने कोणता ट्रॉमा होऊ नये म्हणून तिला जोडीदार असणं गरजेचं होतं. मात्र त्यांच्याकडे दुसरं पिल्लू नसल्याने त्यांनी सुरुवातीच्या काळात तिला वेगवेगळ्या परिस्थितीला तोंड देण्यास मदत करण्यासाठी एक व्यक्ती नेमण्यात आला. 

WhatsApp Image 2022 04 27 at 2.50.25 PM

नर्सरीत एकटीच सोडल्यावर तिच्यावर दिवसरात्र थेट कॅमेऱ्यांच्या माध्यमातून बारकाईने लक्ष ठेवले जात असे. पूर्ण वातावरण जंगलासारखं करण्यात आलं होतं. ती आल्यापासून २१ दिवसांनी तिने स्वत: खायला सुरुवात केली. तेव्हा ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी तिला सर्व मानवी संपर्कांपासून दूर करण्याची प्रक्रिया सुरू केली. 

तिने कुणावरही विश्वास ठेवू ‘नये’ हा जंगलात टिकून राहण्यासाठीचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म तिला शिकवायचा होता.

ती हळूहळू मोठी होत होती. तसतसा तिच्या राहण्याच्या जागेचा आकार आणि परिस्थिती बदलावी लागत होती. त्यामुळे किशोरवयीन तरसाला तिच्या जंगली अंतःप्रेरणेची जोपासना करण्याची संधी उपलब्ध झाली. प्रत्येक वेळी जेव्हा तिला हलविण्यात आले तेव्हा ती आपल्या प्रदेशावर खूण करत असे आणि दिवसा सुरक्षित जागा मिळावी म्हणून स्वत: ला एक गुहा खोदत असे. 

अन्न आणि पाणी यांचे वेगवेगळे गुण आणि वारंवारता यांच्या संपर्कात आल्यामुळे तिला वर्षभरातील टंचाई आणि हवामानाच्या वेगवेगळ्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले. बऱ्याचदा ती तिच्या जेवणाचे काही भाग लपवून ठेवायची आणि काही दिवसांनंतर त्याकडे परत जायची. 

साधारण वर्षभरात ती ४०० ग्रॅमवरून २० किलोग्रॅमपर्यंत वाढली होती. दरम्यान ट्रस्टचे कार्यकर्ते तिची नियमित चाचणी करत असत. ती किती मजबूत झाली आहे, परिपक्व झाली आहे याच मूल्यांकन करण्यासाठी तिच्या हॉर्मोन्सची चाचणी केली जायची. त्यानुसार तिला लवकरच रिलीजसाठी तयार करण्याची वेळ येईल, हे ट्रस्टला समजले.

WhatsApp Image 2022 04 27 at 3.33.07 PM

आता तरसाला पुन्हा जंगलात सोडायचं होतं. इथेच अत्यंत मोठंआव्हान होतं – योग्य रिलीझ साइट्स शोधणं.

अशावेळी वन्यजीवांनी समृद्ध असलेलं आणि आर.एफ.ओ.चव्हाण यांच्या रेंजमध्ये असलेलं ठिकाण त्यांनी निवडलं. हे ठिकाण मानवी वस्तीपासून पुरेसे दूर होतं. शिवाय अधिकृत परवानगी मिळवून तरसाला तिथे सोडणे आणि तिचे निरीक्षण करणे, हे देखील करता येऊ शकत होतं, इतकं सुरक्षित ठिकाण ते होतं.

तिला मुक्त करण्याचं ठरल्यावर काही वन अधिकारी तिला बघण्यासाठी आले होते मात्र त्यांना केवळ तिची एक झलक दिसू शकत होती. कारण तिच्यामध्ये तरसाचे सगळे गुणधर्म आतापर्यंत उतरलेले होते. ज्या लोकांनी तिला बालपणापासून वाढवले होते, त्यांच्यासाठीही ती बाहेर पडायची नाही. ती निरोगी, सक्रिय, सतर्क आणि जंगली दिसत होती.

वयाच्या १२-१४ महिन्यांच्या वयात ती सुटकेसाठी तयार होईल, असे संकेत पथकाने दिल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडे तिच्या सुटकेसाठी परवानगी साताऱ्याचे उपवनसंरक्षक माधव मोहिते यांनी  मागितली.

बायोडायव्हर्सिटी रिसर्च इन्स्टिट्यूट (आय.एम.आय.बी.) स्पेनचे सी.एस.आय.सी.चे वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ डॉ. होसे व्हाइसेंट लोपेझ-बाओ यांनी जीपीएस ट्रॅकिंग कॉलर पाठवून आरईएसक्यूला तिच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यास मदत केली. तिला सोडण्यापूर्वी, आम्ही संपूर्ण वैद्यकीय आरोग्य तपासणी केली.

अखेर तो क्षण आला..

आरईएसक्यू आणि सातारा वनविभागाच्या सदस्यांनी तिला सोडायचं त्या भागाचे आधी सर्वेक्षण केले आणि कॅमेरा ट्रॅप लावले. पुरेशी शिकार आणि पाणीपुरवठा लक्षात घेऊन एक धोरणात्मक सोडण्याचे स्थान निश्चित केले गेले. शिवाय या स्थानामुळे सुरक्षित अंतर ठेवून तरसाचे निरीक्षण करण्याची परवानगी देखील मिळाली.

तिला मोठ्या पिंजऱ्यात तिथे नेण्यात आलं आणि सोडण्यात आलं. स्वातंत्र्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले, तेव्हा सगळ्यांना चिंता वाटू लागली. ती या नवीन जागेत स्वतःला सांभाळू शकेल का? एक दिवसही जिवंत राहील का? असे प्रश्न पडून संपूर्ण टीमला पालक झाल्यासारखं वाटलं.

WhatsApp Image 2022 04 27 at 4.20.38 PM

मात्र सर्वांना तिने अचंबित केलं.

मुक्तीच्या तब्बल ६ दिवसांनी मादी तरस आणि टीम चुकून जवळ आले तेव्हा ती दुरूनच पळून गेली. मला परत पकडता की काय, असं तिला वाटलं. सुरुवातीला ती तिच्या रिलीज लोकेशनच्या ६०० मीटरमध्ये राहिली. पण दुसरा दिवस उजाडताच तिने अजून मोठ्या जागेचा शोध घ्यायला सुरुवात केली. पुढच्या काही दिवसांत टीमने जिथे कॅमेरा लावला होता त्या पाण्याच्या स्रोताजवळ ती अनेक वेळा दिसली. सोबत अनेक वन्य प्राणी देखील होते, जसं की, कोल्हे, रानडुक्कर.

काही आठवडे टीमने तिच्यावर लक्ष ठेवलं आणि त्यांना खात्री पटली की, ती जगू शकतेय तेव्हा टीम माघारी फिरली. 

आरईएसक्यू टीमने भारतातील पहिल्या कैदेत वाढलेल्या पट्टीदार तरसाची सुटका केली होती. पूर्वी जंगली अनाथ प्राणी एकतर जिवंत राहत नसत किंवा त्यांना केवळ बचाव केंद्रे किंवा प्राणिसंग्रहालयात पाठवले जात असे. मात्र आता त्यांना जंगलात परत आणण्याचा आणखी एका पर्याय या मिशनमुळे उदयास आला आहे. हे शक्य झालं ते आरईएसक्यू ट्रस्टच्या रिस्कमुळे, त्यांच्या कष्टामुळे, स्ट्रॅटेजीमुळे. 

सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे मादी तरसाची आतापर्यंत खरोखरच चांगली भरभराट होत आहे. स्थानिक वन अधिकारी आणि आरईएसक्यू टीम तिच्यावर आणि परिसरावर सक्रियपणे लक्ष ठेवून आहेत. 

सतत वाढणारा शहरी विकास, हवामानातील बदल आणि मानवीबहुल भूप्रदेशातील शेतीच्या पद्धतींमध्ये होत असलेल्या बदलांमुळे वन्यजीवांचे भवितव्य आधीच धोक्यात आले आहे. अशात स्वातंत्र्य हा एक पर्याय असला पाहिजे. 

प्रत्येकजण दुसऱ्या संधीस पात्र आहे, असं आरईएसक्यू टीमचं म्हणणं आहे..!

या संबंधित RFSQ टिमने व्हिडीओ पब्लिश केला आहे तो तुम्ही पाहू शकता..

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.