२०११ च्या वर्ल्ड कपमध्ये धोनीने खरोखर युवराज आणि गंभीरचं क्रेडीट मारलेलं काय?

२ एप्रिल २०११, वानखेडे स्टेडियम मुंबई

भारत आणि श्रीलंका मध्ये क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल सुरु होती. श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग निवडली आणि भारतापुढे २७५ धावांचे आव्हान ठेवले. अख्खा देश तेव्हा टीव्हीसमोर होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये हजारो प्रेक्षक आणि स्टेडियमच्या बाहेर लाखोंची गर्दी उभी होती. देशभरात सगळे रस्ते सुनसान पडले होते. टीव्हीच्या दुकानाबाहेर गर्दी होती. अख्ख्या देशाला ब्रेक लागला होता.

भारताच्या इनिंगला सुरवात झाली. सचिन आणि सेहवाग मैदानात उतरले. वानखेडेचं छप्पर उडून जातय की काय एवढा आवाज झाला. बरोबर आठ वर्षापूर्वी असाच भारत फायनलला पोहचला होता आणि सचिन सेहवाग त्यावेळी देखील ओपनिंगला उतरले होते, तेव्हा पहिल्याच ओव्हरला सचिन आउट झाला आणि शंभर कोटी भारतीयांचं वर्ल्ड कपचं स्वप्न अधूर राहिलं.

यावेळी तसं होऊ नये म्हणून लोक देव पाण्यात घालून बसले होते. पण इनिंगच्या दुसऱ्याच बॉलला सेहवागला मलिंगाने एलबीडब्लू आउट केले. मलिंगाच्या नावाने पूर्ण देशाने बोटे मोडली. त्यानंतर गंभीर आला. सचिन आणि गंभीरने गंभीर सुरवात केली. कोणतीही रिस्क न घेता रनरेट मेंटेन केलं तर २७४ हे टार्गेट काय खूप अवघड नाही हे त्यांना माहित होत. सचिनने त्यातून कुलसेकराला दोन बाउन्ड्री मारल्या.

सातवी ओव्हर सुरु झाली. मलिंगा बॉलिंगसाठी रनअप घेत होता. स्कोरबोर्डवर ३१ रना झळकल्या होत्या. सगळ काही उत्तम चालल होत . सचिन मागच्या वेळ सारखी चूक करणार नाही, यावेळी शंभरावी सेंच्युरी मारून देशाला वर्ल्ड कप जिंकून देणारं याची सगळ्यांना खात्री होती.

तेवढ्यात मलिंगाच्या एका ऑफ साईडला स्विंग होणाऱ्या बॉलच्या मोहाला सचिन बळी पडला. त्याच्या बॅटच्या कडेला बॉल लागला आणि संगकाराच्या हातात जाऊन विसावला. एखाद्या वर्गात दंगा सुरु असताना अचानक हेडमास्तर आल्यावर जशी सुन्न शांतता निर्माण होते तसा अनुभव पूर्ण देशभर आला.

सचिनने नेहमीप्रमाणे ऐनवेळी कच खाल्ली होती. मलिंगाने आयुष्यात कधी खाल्ल्या नसतील तेवढ्या शिव्या खाल्ल्या.

SachinTendulkarLasithMalingaIndiavSriadzcn25PJJHl

सचिन आउट झाला की टीव्ही बंद असे दिवस आता उरले नव्हते. त्याच्या पाठोपाठ कोहली, युवराज, धोनी अशी मोठी फळी बाकी होती. लोक निराश झाले पण यावेळी टीव्ही बंद झाले नाहीत.गंभीरने जिद्द सोडली नव्हती. त्याने कोहलीला सोबत घेऊन लढा चालू ठेवला. हीच पार्टनरशिप मॅचला स्थैर्य देऊन गेली. पण धावफलकावर ११४ रना झाल्यावर कोहली आउट झाला.

सगळ्यांना वाटले आता युवराज येणार. पूर्ण सिरीजमध्ये युवराज जबरदस्त खेळला होता. त्याच्या बॅटीग आणि बॉलीगच्या जादूमुळेचं भारत फायनल पर्यंत पोहचला होता. पण तेवढ्यात अचानक दिसले युवराजच्या जागेवर धोनी मैदानात उतरतोय. कॉमेंट्री करणाऱ्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं.

पूर्ण सिरीजमध्ये धोनी विशेष फॉर्ममध्ये नव्हता. सगळे म्हटले,

” धोनी कॅप्टन हाय म्हणून युवराजला माग टाकून स्वतः आलाय. एरव्ही रिस्क असताना धोनी कधी वर खेळायला आलेलं पाहिलंय काय?”

तसही मॅच आता टप्प्यात आली होती. दोघांनीही चांगला खेळ केला. गंभीर शतक तोंडावर आलेलं असताना आउट झाला. त्याच्या नंतर युवराज आला. अठ्ठेचाळीसवी ओव्हर सुरु असताना जिंकायला ४ रना कमी होत्या. त्यावेळी धोनीने स्टाईलमध्ये सिक्सर मारला. पूर्ण देश वेडा झाला.

धोनीने सिक्स मारून वर्ल्ड कप जिंकून दिला. मॅन ऑफ दी मॅचं आणि वर्ल्ड कप अशा दोन ट्रॉफी धोनीला मिळाल्या. मॅन ऑफ दी सिरीज युवी होता.

48694 jiqclejfwp 1483584066

सचिनला डोक्यावर बसवून टीम मेम्बरनी मैदानाला फेरी मारली. ऐनवेळी मॅच वाचवणारा गौतम गंभीर गर्दीमध्ये सगळ्यांच्या बरोबर फिरत होता. युवराज सगळ्यांच्या गळ्यात पडून पडून रडत होता.  भारतात दुसरी दिवाळी साजरी झाली. रात्रभर लोक चौकाचौकात सेलिब्रेशन करत होते.

काही दिवस फक्त आणि फक्त वर्ल्ड कपच्याच चर्चा सुरु होत्या. त्यातच युवराजला कॅन्सर आहे हे कळाल. अख्ख्या देशभरात तो बरा व्हावा म्हणून प्रार्थना म्हटल्या गेल्या.

सगळ्यांच एक मत मात्र फिक्स होतं. धोनीने युवराज आणि गंभीरचं क्रेडीट मारला. धोनी ला माहित होते की हिरो कसे व्हायचे. त्याने बॅटिंग ऑर्डर मुद्दामहून चेंज केली. कित्येक वर्ष आपल्या डोक्यात हेच मत फिक्स होतं. धोनी आपल्याला कधीचं आवडला नव्हता. त्याच्या त्या फायनल वेळच्या स्वार्थो वागण्याने मनातून पार उतरला.

काही दिवसापूर्वी सहज युट्युबवर व्हिडीओ पाहायला मिळाला आणि मनातल्या सगळ्या शंका दूर झाल्या. या व्हिडीओमध्ये  सचिन आणि सेहवाग पाहुणे म्हणून आले होते. तसं बघितल तर हे दोघेही धोनी गटातले समजले जात नाहीत. विशेषतः सेहवाग. पण तरी बोलता बोलता सेहवागने एक किस्सा सांगितला.

त्यावेळी फायनलला सचिन आणि सेहवाग लवकर आउट झाले. दोघेही ड्रेसिंग रूम मध्ये येऊन बसले. सचिन थोडासा अंधश्रद्धाळू आहे. गंभीर आणि कोहलीची जबरदस्त पार्टनरशिप सुरु झाली. सचिनने ठरवलं आता पूर्ण मॅच होईपर्यंत आपण आपली जागा सोडायची नाही. त्याने सेहवागला सुद्धा जागच हलू दिल नाही. दोघेही त्याच जागेवर बसून राहिले.

बाहेरून स्कोर काय चालू आहे हे कळत होतं. तेव्हड्यात धोनी वाॅशरूमला जायचं म्हणून आत ड्रेसिंग रूम मध्ये आला. तिथे बसलेला सचिन धोनीला म्हणाला,

” जर डावखुरा गंभीर आउट झाला तर पुढे युवराजला पाठवा आणि जर कोहली आउट झाला तर तू बॅटिंगला जा.”

सचिन हा टीममधला सर्वात अनुभवी आणि वरिष्ठ खेळाडू होता. त्याचं बोलण ऐकण धोनीला भाग होतं. शिवाय बॅट्समनची डावी उजवी कॉम्बिनेशन श्रीलंकन बॉलर्सना जड जातीय हे दिसत होतं. यामुळेच पड्त्या फळाची आज्ञा मानून धोनी कोहली आउट झाल्यावर वरच्या नंबरवर खेळायला गेला आणि इतिहास घडवला.

sachin sudhir 759

त्या दिवशी कळालं गटबाजी, गॉसिप हे मिडीयाने पसरवलेल होत. पूर्ण भारतीय टीम एक दिलाने खेळली आणि म्हणून आपण वर्ल्डकप जिंकू शकलो.

हे ही वाच भिडू.

3 Comments
  1. Tanmay Khedekar says

    ह्या माहितीचा स्रोत कळेल का? कारण सेहवाग तो किस्सा सांगितलेला शो मी सुद्धा पाहिलाय आणि त्यात त्याने असे काहीही सांगितलेलं नाहीये. Youtube व्हिडिओ ची लिंक दिल्यास उत्तम.

  2. टिम बोलभिडू says
  3. Tanmay Khedekar says

    धन्यवाद. माझ्या मनात देखील ही शंका होती, पण आता नाही. 🙂

Leave A Reply

Your email address will not be published.