गुजरातमध्ये ही लोकं साड्या नेसून महिलांप्रमाणे गरबा खेळतात कारण…

नवरात्र हा गुजराती लोकांसाठी सगळ्यात महत्वाचा सण आहे. नवरात्र सुरु झाली की दांडिया आणि गरब्याची धूम सुरु होते. महिला साड्या किंवा गुजराती पद्धतीची चनिया चोली घालतात तर पुरुष केडिया घालतात आणि फेटा बांधतात.

त्यानंतर गरबा मंडपात पारंपारिक दो ताली गरब्यासोबत ४ ताली ते १६ ताली गरबा केला जातो… 

गुजराती असोत की नसोत तरुणांमध्ये गरब्याची जबरदस्त क्रेझ असते. गुजराती भाषिक राहत असलेल्या शहरात आणि भागात नवरात्रीच्या दिवसांमध्ये गरब्याचा कार्यक्रम असतो म्हणजे असतोच. अनेक मंडळ मोठं मोठे पंडाल लावतात आणि गरब्यांचं आयोजन करतात.   

सगळीकडे थोड्या फार फरकाने असंच काहीसं चित्र दिसतं. मात्र अहमदाबादमध्ये एक समाज असा सुद्धा आहे ज्यातले पुरुष साडी नेसून गरबा करतात. 

गुजरातच्या अहमदाबाद शहराच्या जुन्या भागात बडोत समाजाचे लोक राहतात. याच समाजातील पुरुष दरवर्षी दुर्गाअष्टमीच्या दिवशी साडी नेसून मंदिरात गरबा करतात. या गरब्याला शेरी गरबा म्हणून ओळखलं जातं. यात गरबा करणारे पुरुष कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी देवीकडे प्रार्थना करतात आणि त्यांच्या मुलांचं रक्षण करण्याची देवीला विनंती करतात.

पण ही काय विचित्र परंपरा आहे? पुरुष साडी नेसून गरबा करतात आणि मुलांचं रक्षण करण्याची विनंती करतात.

तर यामागे एक आख्यायिका सांगितली जाते, यानुसार अहमदाबादमध्ये ज्या भागात बडोत समाजाची वस्ती आहे; त्या भागात अंदाजे २०० वर्षांपूर्वी सदूबेन म्हणजे सदुबा नावाची बाई राहत होती. एक दिवस तिच्यावर अत्याचार करण्यात येत होते. तेव्हा सदूबेनने जवळपासच्या बडोत समाजाच्या पुरुषांना मदतीसाठी हाक मारल्या. पण कोणताच पुरुष तिच्या मदतीसाठी गेला नाही. 

अत्याचारानंतर सदूबेनने बडोत समाजाच्या पुरुषांना श्राप दिला आणि तिच्या मुलाची हत्या केली. या घटनेमुळे समाजातील पुरुषांमध्ये भीती निर्माण झाली. सदूबेनने ज्याप्रमाणे तिच्या स्वतःच्या मुलाला मारलं त्याचप्रमाणे समाजातील सगळ्यांच्या मुलाला मारेल आणि तिचा बदल घेईल. तसंच तिने दिलेल्या श्रापामुळे समाजातील पुरुषांचं भलं होणार नाही. 

या भीतीपोटी पुरुषांनी सदुबाची माफी मागण्यासाठी शेरी गरीबा सुरु केला.

त्यांच्याकडून झालेल्या चुकीचं प्रायश्चित्त करण्यासाठी बडोत समाजातील लोकांनी सदुबाचे मंदिर बांधले आणि दरवर्षी नवरात्रीत गरबा करण्याची परंपरा सुरु झाली. लोकांना वाटतं की साडी नेसून गरबा केल्याने सदुबाचा राग कमी होईल. 

त्यामुळे नवरात्रीच्या आठव्या दिवशी बडोत समाजाचे पुरुष साड्या नेसतात आणि सदुबाच्या मंदिरात म्हणजेच सदू माताच्या पोळ मध्ये गोळा होतात. त्यानंतर सगळे पुरुष देवीच्या समोर गरबा करतात आणि त्यांच्या चुकीची क्षमा मागतात. तसेच त्यांच्या मुलांना कडेवर घेऊन त्यांचं रक्षण करण्यासाठी देवीला प्रार्थना करतात. 

आता पुरुषांनी साडी नेसून गरबा करणे हे आपल्याला विचित्र वाट असलं तरी या समाजात विचित्र मानलं जात नाही. अनेक पुरुष अगदी साड्या घालण्यासोबतच मेकअप करून दागदागिने सुद्धा घालतात आणि अगदी धुमधडाक्यात हा सण साजरा करतात. या कामात घरातले लोक सुद्धा त्यांना मदत करतात.

अनेक महिला त्यांच्या नवऱ्यांना साड्या नेसवतात, त्यांचा वेगवेगळ्या पद्धतीने शृंगार करतात आणि त्यांच्यासोबत मंदिरात जातात. 

आधी पुरुष देवीचं दर्शन घेतात. त्यानंतर सामान्य गरब्याप्रमाणेच देवीच्या समोर गरबा करतात. त्यांना वाटतं की, हा गरबा केल्यामुळे देवी त्यांच्या समाजातील लोकांनी २०० वर्षांपूर्वी केलेल्या चुकीला माफ करून चूकभूल पोटात घालेल. 

पूर्वी देवीची मान्यता केवळ शेरी गरब्यापुरती मर्यादित होती पण आता देवी नवसाला पावते अशी सुद्धा अनेकांची मान्यता आहे. लोकं देवीला नवस बोलतात आणि ते पूर्ण झाल्यावर नवस फेडण्यासाठी देवीची पूजा करतात. याव्यतिरिक्त अनेक जण वेगवेगळ्या प्रसंगी देवीचं दर्शन घेतात. पण बडोत समाजाची ही आगळीवेगळी परंपरा दरवर्षी अहमदाबादमध्ये चर्चेचा विषय असते.  

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.