मराठ्यांच्या पुरोगामित्वाच्या खुणा आजही अहमदाबादच्या भिंतीवर पाहायला मिळतात.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्याला येत आहेत.  या दौऱ्यात त्यांनी अहमदाबादला भेट द्यायचं देखील ठरवल आहे. आता विदेशी पाहुणा येणार म्हटल्यावर लगीनघाई उडणे साहजिक आहे. असाच गोंधळ आपल्या सरकारचा उडाला आणि त्याची बातमी जगभरात फेमस झाली.

झाल काय तर पाहुणे येणार असले की घरचा पसारा कपाटात कोंबून लपवून ठेवतो तसच गुजरात सरकारने अहमदाबादची झोपडपट्टी भिंती बांधून लपवून ठेवायचं ठरवल. आता अहमदाबाद म्हणजे भारतातील सर्वात आधुनिक शहर, तिथला विकास म्हणजे अमेरिकेशी तुलना करावी इतका भारी आहे हे आपण ऐकल होतं पण अहमदाबादची दुसरी बाजू ही आहे हे लपवायचा सरकारचा प्रयत्न मिडीयाने उघड केला.

भिंती अहमदाबादला नवीन नाहीत.

१४११ साली पहिला अहमदशहाने अहमदाबाद या शहराची स्थापना केली अस म्हणतात. पूर्वी या भागाला अश्वथ किंवा अश्वपल्ली अस ओळखल जायचं. तिथल्या कोळी शासकांचा पराभव करून अहमदशाहने गुजरातच्या सुलतानाची ही राजधानी बनवली. सगळ्यात महत्वाचे या शहराला परकीय आक्रमणापासून रक्षण व्हाव यासाठी भल्या मोठ्या भिंतीची तटबंदी बांधून भद्रा किल्ल्याची निर्मिती करण्यात आली.

या भद्रा किल्ल्याला आठ दरवाजे होते. यापैकी सर्वात महत्वाचा दरवाजा म्हणजे तीन दरवाजा.

तीन दरवाजाचा इतिहास खूप मोठा आहे. याच दरवाजातून घुसून मुघलांनी गुजरातच्या सुलतानाचं राज्य संपुष्टात आणलं. मुघल साम्राज्याचे शहजादे शाहजहान, औरंगजेब हे गुजरातचा सुभेदार म्हणून याच किल्ल्यात राहून राज्यकारभार पाहत होते. मुघलांचा कारभार बरेच वर्ष चालला. पण औरंगजेबानंतर मुघलांच संपूर्ण भारतातल राज्य खिळखिळ झाल होतं.

गुजरातमधील मुघल सरदारांच्यातील बंडाळी वाढली होती. ही मोडून काढण्यासाठी मुघल बादशहाने मराठ्यांना मदत मागितली. दामाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी अहमदाबादमधील बंड मोडून काढल पण त्या बदल्यात करार करून निम्म शहर आपल्या नवे करून घेतल. पुढे अहमदाबादवर मराठा आणि मुघलांच संयुक्त राज्य सुरु राहिलं.

१८५८मध्ये रघुनाथराव पेशव्यांनी मुघलांना हुसकावून लावलं आणि दामाजी गायकवाडांच्या मदतीने अहमदाबादवर भगवा जरीपटका फडकवला. 

आता गुजरातच्या महसुलाची वाटणी पेशवे आणि गायकवाड यांच्यात होऊ लागली. या दोघांच्यात बऱ्याचदा कुरबुरी व्हायच्या मात्र पुढील जवळपास पन्नास वर्षे मराठ्यांनी अहमदाबाद शहरावर राज्य केलं.

रघुनाथ रावाने अनेक कपटकारस्थाने केली मात्र त्याला पेशवाईची वस्त्रे सांभाळता आली नाहीत.

रघुनाथरावाला दोन मुले होती. त्याने आपल्या पराक्रमी वडिलांच्या व काकाच्या नावावरून त्यांची नावे दुसरा बाजीराव आणि दुसरा चिमाजी अशी ठेवली होती. याच दुसऱ्या बाजीरावाने पेशवा बनण्याच आपल्या वडीलांचं स्वप्न पूर्ण केल.

दुसऱ्या बाजीरावाने आपल्या पेशवाईत अनेक बरे वाईट निर्णय घेतले. मात्र त्याच्या पेक्षा त्याचा धाकटा भाऊ दुसरा चिमाजी हा जास्त हुशार व कर्तुत्वान होता. राज्यकारभाराची त्याला जास्त समज होती. नाना फडणवीस यांनी देखील बाजीरावाच्या ऐवजी चिमाजीला पेशवा बनवण्याचे प्रयत्न केले होते. पण ते काही यशस्वी ठरले नव्हते.

दुसऱ्या बाजीरावाने त्यांची नेमणूक दूर गुजरातचा सुभेदार म्हणून केली होती.

अहमदाबादमध्ये दुसऱ्या चिमाजीने बरीच वर्ष राज्यकारभार पाहिला. ते काळाच्या पुढचा विचार करायचे. याचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे तीन दरवाजावरचा शीलालेख.

गुजरातचा सुभेदार या नात्याने त्यांनी १० ऑक्टोबर १८१२ साली काढलेलं देवनागरी भाषेत लिहिलेलं फर्मान तिथे कोरण्यात आल आहे. त्यात ते म्हणतात,

“प्रत्येक मुलीला कोणत्याही अडचणीशिवाय वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळू द्या. भगवान विश्वनाथ यांची ही आज्ञा आहे. जर तुम्ही विरोध केला तर हिंदूला महादेवाला आणि मुसलमानला अल्लाह किंवा रसूल यांना उत्तर द्यावे लागेल. “

महिलांना मालमत्तेत समानअधिकार देणारा हा भारतातला पहिलाच पुरोगामी आदेश असेल. 

पुढच्या तीन चार वर्षात ब्रिटीशांनी पुण्यात दुसऱ्या बाजीरावाचा पराभव केला आणि संपूर्ण भारतातून मराठा साम्राज्याचा अंत झाला. जवळपास ८० वर्ष ताब्यात असलेलं अहमदाबादही मराठ्यांनी गमावलं.

चिमाजी आपल्या भावासोबत बिठूरला गेले. त्यांच्या पदरी मोरोपंत तांबे नावाचे कारकुन होते. त्यांची चुणचुणीत मुलगी मनिकर्णिका हीला पेशवे घराण्यातील मुलांच्या प्रमाणे युद्धकलेचं शिक्षण देण्यात आलं होत. यसाठी देखील दुसरा चिमाजी अप्पा हे कारणीभूत ठरले.

हीच मनिकर्णिका पुढे जाऊन इतिहासात झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिद्ध झाली.

आज स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष झाली पण आजही मुलीना आपल्या हक्कासाठी लढावे लागत आहे. विशेषतः गुजरात, राजस्थानमध्ये मुलींवर अजूनही अन्याय होतो. चिमाजी यांचा आदेश, त्यांचं आदर्श म्हणाव लागेल.

हे ही वाच भिडू.