इंदिराजी म्हणाल्या,”आमच्या घराण्याची परंपरा आहे, प्रियांकाला सुद्धा जेलची सवय झाली पाहिजे….:

लखीमपूर हिंसाचार प्रकरणानंतर राजकीय वातावरण पेटलं आहे. प्रियांका गांधी या लखीमपूरमधील हिंसाचारादरम्यान मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असताना त्यांना सितापूरमध्ये ताब्यात घेण्यात आलं. आणि कलम १५१ अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

प्रियांका गांधी यांना ज्या डिटेन्शन रूम मध्ये म्हणजेच कोठडीत ठेवण्यात आलं आहे, तिथंच त्यांनी आपल्या हातात झाडू घेऊन साफसफाई केली. याच डिटेन्शन रूममध्ये त्यांनी सत्याग्रह सुरू केला आहे.

मी शेतकऱ्यांना भेटल्याशिवाय इथून माघारी जाणार नाही.

असा निर्धार करणाऱ्या प्रियांका गांधी त्यांच्या आजी इंदिरा गांधींची हुबेहूब कार्बन कॉपी आहेत. आज प्रियांका गांधींसोबत जसा प्रसंग घडलायं अगदी तसाच काहीसा प्रसंग इंदिरा गांधींच्या बाबतीत सुद्धा घडला होता. आणि त्याचवेळी प्रियांका गांधींनी पहिल्यांदा तुरुंगाची पायरी चढली होती ती सुद्धा तिहार जेलची.

त्यावेळी इंदिरा म्हणाल्या होत्या,

आम्ही फार लहानपणापासून आमच्या नातेवाईकांना तुरुंगात भेटायला जात आहोत त्या परंपरेत खंड पडता कामा नये.

आपल्या नातवंडांना पण तुरुंगाची सवय व्हावी असं वाटणाऱ्या आजी आणि नातीचा हा किस्सा.

आणीबाणी लावून इंदिरा गांधींनी स्वतःचं स्वतः साठी मोठे विरोधक तयार करून ठेवले होते. आणीबाणी संपली आणि निवडणुका झाल्या. यात जनता पक्षाच सरकार सत्तेवर आलं. तो १९७८ सालचा डिसेंबर होता. देशात आणीबाणी लावल्याप्रकरणी इंदिरा गांधींना अटक करण्यात आली.

त्यांना अटक झाली त्यावेळेस तिथं त्यांच्या समर्थकांची खूप मोठी निदर्शने चालू होती. इंदिरा गांधी जिंदाबादच्या घोषणा ही त्यांनी दिल्या. त्यावेळेस मला बेड्या घाला असं इंदिराजींनी सांगितलं नाही. ज्या पोलिस व्हॅनमधून त्यांना बसवून नेलं त्यावेळी जीपला खूप मुश्किलीने गर्दीतून वाट काढावी लागली.

इंदिरा गांधींना तिहार तुरुंगात नेलं.

आणीबाणीच्या काळात विरोधी पक्षानेत्यांना ज्या झोपड्यात इंदिरा सरकारनं ठेवलं होतं त्यातल्याच एका झोपडीत इंदिरांनाही ठेवण्यात आलं. त्या तिथं एकट्याच होत्या. दोन पहारेकरी आळीपाळीने त्यांच्यावर पहारा द्यायला होत्या. त्यांनी त्यांच्यासाठी खायला आणलं तर ते चाखून पहायला ही त्यांनी नकार दिला.

माझ्या घरच्यांनी आणून दिलेल्या पदार्थ व्यतिरिक्त मी कुठलाही पदार्थ खाणार नाही, असं त्या म्हटल्या. सोनियान स्वतःच्या हातांनी बनवलेल्या अण्णा खेरीज दुसऱ्या कुठल्याही अन्नावर आपण विश्वास ठेवू शकणार नाही हे त्यांना माहीत होतं. पहारेकरणी मग वरिष्ठांशी बोलायला गेल्या.

इंदिराजींच्या झोपडीत एक लाकडी पलंग होता. पण पलंगावर गादी नव्हती, खिडक्यांना गज होते पण त्याला झाकायला काच किंवा पडदे नव्हते. वातावरण खूप थंड होतं. डिसेंबर महिन्यात तर रात्रीच्या वेळेस तापमान शून्य अंश आणि पर्यंत खाली जायचं. इंदिराजींनी खिडकीला कांबळ लावली. जेणेकरून थंडीला अटकाव बसेल, शिवाय थोडा खाजगीपणा ही मिळेल.

त्यादिवशी पहारेकरीन परत आली आणि म्हणाली तुमच्याकडे पाहुणे आलेत. त्या पाहुण्यांच्या खोलीत सोनिया आणि राजीव गांधी, इंदिरा गांधींची वाट पाहत बसले होते. ती खोली मोठी होती भिंतीवरल्या रंगाची चिपाड निघाली होती. खोलीत बरेच पुरुष होते. त्यातले बरेच जण तुरुंगात असलेल्या बायकोला किंवा आईला भेटायला आले होते.

इंदिराजींना अशा जागी राहावं लागतं म्हणून राजीव आणि सोनिया अस्वस्थ झाले. शेवटी इंदिराजींना राजीव आणि सोनियालाच धीर देण्यासाठी बोलावं लागलं की,

मी खरंच अगदी बरी आहे. या मिळालेल्या वेळेचा फायदा घेऊन मी वाचन करणार आहे. त्यांनी मला जास्तीत जास्त सहा पुस्तक घेण्याची परवानगी दिली आहे. म्हणजे मी नशीबवान नाही का ? त्यांनी माझ्यासाठी खास न्हाणीघर उभारलयं. सकाळच्या वेळेस मला त्यात गरम पाण्याने स्नान करता येतं. कोठडी तशी स्वच्छ आहे परंतु हा सगळा प्रकारच किती भयंकर कुरूप आहे हे तुला दिसतच आहे.

पुढं राहुल आणि प्रियंकाच्या काळजीच्या उद्देशानं त्या सोनिया गांधींना म्हंटल्या, 

बरं पण मुलं कशी आहेत ? 

यावर सोनिया गांधी म्हणाल्या,

प्रियंकाला तुम्हाला भेटायला यायचं होतं पण आम्हाला वाटलं..

त्यावेळी इंदिरा गांधींचा चेहरा उजळला. त्या हसून म्हणाल्या,

हो हो अगं.. तुरुंग कसा असतो ते तिने पाहणं केव्हाही चांगलंच. आम्ही नेहरू मंडळी फार लहानपणापासून आमच्या नातेवाईकांना तुरुंगात भेटायला जात आहोत. त्या परंपरेत खंड पडता कामा नये.

असंच तिहार मधले त्यांचे दिवस जात होते. अशाच एके दिवशी विश्रांती घेत असताना इंदिरांना त्यांची चार पाच वर्षांची छोटीशी नात भेटायला आली. तो क्षण आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण आहे असं त्यांना वाटलं. एवढ्या लहानग्या मुलीला तुरुंगात जाऊ देण्यासाठी तुरुंगाधिकाऱ्यांचं मन वळवताना राजीव सोनिया गांधींना खूप कष्ट पडलं पण त्या उदास वातावरणात आजी आणि नातीची भेट झालीच. 

त्यावेळी प्रियांका गांधींच्या सवयी बघून प्रत्येकजण म्हणायचा की प्रियंका अगदी आपल्या आजी सारखी आहे. तिला स्वतःचं व्यक्तिमत्त्व आहे, ती स्वभावाने निग्रही आणि निश्चयी आहे. 

शेवटी इंदिरा गांधींनी म्हण्टल्याप्रमाणं गांधी नेहरू कुटुंबाच्या तुरुंगात जाण्याच्या त्या परंपरेत ना खंड त्यावेळी पडला होता ना तो खंड आज इतक्या वर्षांनंतरही पडलाय. प्रसंगी तुरुंगात जाण्याची परंपरा आज हि आहेच.  

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.