अमेरिकेचं २ टक्के महागाईदराचं टार्गेट सगळ्या जगाच्या अर्थव्यवस्थेला घाम फोडू शकतं…

अमेरिकेमध्ये सध्या ऐतिहासिक महागाई आहे. महागाई असेल तर मार्केटमधील मागणी घटते आणि त्यामुळे बेरोजगारीची नवीन समस्या निर्माण होऊ शकते. अमेरिकेत बेरोजगारीचा दर ऐतिहासिक नीचांक पातळीवर आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिजर्वच्या धोरणांमुळे जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारी अमेरिका मंदीकडे ढकलली जाण्याचा धोका आहे.

मध्यवर्ती बँक (Central Bank) ही अमेरिकेची सर्वोच्च वित्तीय संस्था आहे. देशाचे आर्थिक धोरण या संस्थेमार्फत राबवले जाते. देशातील बँक व्यवस्थेला, चलन व्यवस्थेला व अर्थव्यवस्थेला स्थिरता (प्राप्त करून देण्याचे कार्य मध्यवर्ती बँक करत असते. 

आता यांच्यातील स्थिरता हा शब्द महत्वाचा आहे. पण स्थिरता आणायच्या प्रयत्नात फेडरल रिझर्व्हच्या धोरणांमुळे गुंतागुंत निर्माण झालेली दिसत आहे. गेल्या आठवड्यात फेडने अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठी व्याजदर पुन्हा वाढवले आहेत. 2022 च्या सुरुवातीपासून फेडरल रिजर्व बँक आक्रमकपणे व्याजदर वाढवत आहे. इतका की आता अमेरिकेची अर्थव्यवस्था 2023 किंवा 2024 मध्ये मंदीत जाईल असे निश्चितपणे सांगितले जात आहे.

तांत्रिकदृष्ट्या, मंदीमध्ये अर्थव्यवस्थेतील एकूण उत्पादनात सलग दोन तिमाहीत घसरण समाविष्ट असते परंतु सविस्तरपणे सांगायचे तर इकॉनॉमिक कॉन्ट्रॅक्शन आणि मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांत घट, घटलेले उत्पन्न आणि सरकारी खर्च कमी होणे हि दीर्घकालिन परिणाम दिसतात.

आता प्रश्न असा पडतो की फेड असे निर्णय का घेत आहे ज्यामुळे त्यांच्या स्वतःच्या लोकांवर आर्थिक त्रास होईल? आणि अजून किती काळ दर वाढवणार आहेत?

एक महत्वाची फॅक्ट 2022 च्या सुरुवातीपासून फेडने 3.75 टक्के गुणांनी व्याजदर वाढवला आहे.

व्याजदर वाढवल्यामुळे पैसा महाग होतो, कर्ज महाग होते आणि मोठमोठे उद्योगधंदे कर्ज घेणे टाळतात किंवा त्यांचे प्लॅन पुढे ढकलतात. यासोबतच आहे ते प्लॅन थांबवले सुद्धा जातात. यामुळे नोकऱ्या जाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो किंवा नोकऱ्या निर्माण होण्याचा सुद्धा.

फेडरल रिजर्व सध्या व्याजदर वाढवून मार्केटमधील हाच पैशाचा पुरवठा नियंत्रित करू इच्छितय. पैशाचा पुरवठा जसजसा कमी होत जाईल तसतसा बँकांचा व्याजाचा दर हा वाढत जाईल.

मध्यवर्ती बँक मार्केटमध्ये तेजी यावी, मागणी वाढावी म्हणून व्याजाचे दर कमी करून मार्केटमध्ये मुक्तहस्ते पैसे फिरू देते. तसेच मार्केटमध्ये महागाई वाढली असता, पैशांचा सुळसुळाट झाला असता व्याजदर वाढवून मार्केटमधील पैसा नियंत्रित करते.

आता सध्या व्याजदर जे वाढवले आहेत त्याला महागाईची पार्श्वभूमी आहे. यासोबतच ठेवींवरील व्याजदरातसुद्धा  वाढ झालेली आहे. मग साहजिकच या महागाईमध्ये गाठीशी असलेला पैसा खर्च न करता हाच पैसे बँकेत ठेवून त्यावर व्याज कमावणे हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे.

सध्या अमेरिकेत दुहेरी आकड्यात महागाई आहे आणि फेडरल रिजर्व्हला ती २% पर्यंत आणायची आहे. टार्गेट खूपच महत्वकांक्षी आहे पण त्यांची वाटचाल त्याच दिशेने जोरदार सुरु आहे.

महागाई नियंत्रित करण्यासाठी जे उपाय ते अवलंबत आहेत त्यामुळे मंदी  येऊ शकते, नोकऱ्या जाऊ शकतात याची पूर्ण जाणीव असूनही फेड याबाबतीत कठोर पावले उचलताना दिसत आहे. कारण हेच उपाय उद्या मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करतील आणि महागाई आटोक्यात आणतील यावर त्यांचा दृढ विश्वास आहे.

अमेरिकेच्या या व्याजदरवाढीच्या धोरणामुळे जगभरातील जवळपास सर्वच महत्वाची चलने डॉलरच्या तुलनेत कमजोर झालेली दिसतात आणि जगभरातून गुंतवणुकीचा ओघ हा अमेरिकेकढे वाढलेला आहे. ज्यामुळे डॉलर अजून मजबूत होताना दिसतोय.

ब्रिटनची मध्यवर्ती बँक फेडरल रिजर्वच्या व्याजदरवाढीच्या वेगाशी स्पर्धा नाही करू शकली किंवा त्यानी दुर्लक्ष केलं असा म्हणूयात पण यामुळे ब्रिटनमध्ये आर्थिक आघाडीवर गोंधळ उडालेला आपल्याला दिसतोय.

भारतात सुद्धा रुपया डॉलरच्या तुलनेत कोसळताना आपल्याला दिसतोय या रुपयाला सावरण्यासाठी रिजर्व बँकेने मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च केल्याने रुपया इतर चलनांच्या तुलनेत कमी घसरलेला आपल्या दिसू शकतो.

२% महागाई दराचं अमेरीकेच्या फेडचं टार्गेट सगळ्या देशांचा आर्थिक आघाडीवर घाम काढणार हे नक्की आहे.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.