१७ वर्षांनंतर स्टीव्ह बकनरने चुकीच्या निर्णयाबद्दल सचिन तेंडुलकरची माफी मागितली होती…

क्रिकेटमध्ये सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे अंपायर. गावाकडच्या टूर्नामेन्टमध्ये असा एक नियम असतोच ज्यात सांगितलेलं असतं कि पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी वाद घालायचा प्रयत्न केल्यास संघ बाद करण्यात येईल. यामुळं पंच किती महत्वाचा आहे हे लक्षात येतं.

क्रिकेटमध्ये अनेक जणांचे आवडते दोनच अंपायर आहेत ते म्हणजे बिली बौडेन आणि सायमन टफेल. या दोन अंपायर लोकांचे चाहतेसुद्धा होते. पण अजून एक अंपायर होते ज्यांच्या मुळे अनेक खेळाडूंचं करियर पणाला लागलं होतं. म्हणजे ते मॅचमध्ये अंपायर असल्यावर भल्या भल्या खेळाडूंच्या मनात धास्ती भरायची. तर ते अंपायर होते स्टीव्ह बकनर.

क्रिकेट इतिहासातला सगळ्यात बेईमान अंपायर म्हणून स्टीव्ह यांची ख्याती आहे.

अनेक देशांनी स्टीव्ह बकनर यांची अंपायर पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी सुद्धा केली होती. स्टीव्ह बकनरच्या अम्पायरिंगमुळे अनेक देशांना तगडी किंमत चुकवावी लागली होती. तर स्टीव्ह बकनर यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया.

जमैकामधे स्टीव्ह बकनर यांचा जन्म झाला. लहानपणापासून फुटबॉल खेळण्याची बकनर यांना गोडी होती. पण आपलं करियर फ़ुटबॉल मध्ये न बनवता आल्याने बकनर क्रिकेट अम्पायरिंगकडे वळले. आपल्या अम्पायरिंग करियरमध्ये स्टीव्ह बकनरने १२८ टेस्ट मॅच, १८१ वनडे मॅचमध्ये अम्पायरिंग केलेली आहे. 

इतका सारा अनुभव होता पण स्टीव्ह बकनर चर्चेत राहिले ते म्हणजे चुकीच्या निर्णयांमुळे. यातले काही निर्णय तर इतके सोपे असतानाही बेईमानीकरून बकनर यांनी मॅच फिरवल्या होत्या. बकनरच्या खराब पंचगिरीचा फटका अनेक दिग्गज खेळाडूंना बसला.

त्यामध्ये पहिली घटना म्हणजे २००३ मध्ये सचिन तेंडुलकरला ब्रिस्बेन टेस्टमध्ये बकनरकरवी चुकीच्या पद्धतीने lbw आउट देण्यात आलं होतं. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जेसन गिलेस्पीच्या बॉलिंगवर सचिनने बाउन्सचा बॉल सोडण्याचा प्रयत्न केला पॅडच्या एकदम वर लागून बॉल किपरकडे गेला. जेव्हा ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी अपील केली तेव्हा बकनरने थेट आउट देऊन टाकलं. सचिनसुद्धा या निर्णयावर नाराज झाला होता.

फक्त सचिनचं नाही तर पुढे नासिर हुसेनला सुद्धा बकनरच्या खराब पंचगिरीमुळे विकेट गमवावी लागली होती. याचा कळस गाठला गेला तो २००८ साली ऍडिलेड टेस्टमध्ये. जेव्हा बॅटला कट लागलेला नसतानाही स्टीव्ह बकनरने राहुल द्रविडला आऊट दिलं होतं.

मंकी गेट प्रकरण झालं त्या मॅचमध्ये इशांत शर्माच्या बॉलिंगवर अँड्रू सायमंडच्या बॅटची कड घेत बॉल धोनीच्या ग्लव्जमध्ये जाऊन विसावला. पण यावेळी बकनरने आउट देण्याऐवजी नॉट आउटचा निर्णय दिला. रिप्लेमध्ये जेव्हा दाखवण्यात आलं तेव्हा सायमंडच्या बॅटला कट लागण्याचं स्पष्ट दिसत होतं. 

पाकिस्तानविरुद्धच्या कोलकाता टेस्टमध्ये अब्दुल रझाकच्या बॉलिंगवर कट लागलेला नसतानाही बकनरने सचिनला आउट दिलं होतं. यावर पाकिस्तानचा विकेटकिपर कामरान अकमलने अपीलच केली नव्हती. सचिनसोबतच कामरान अकमललासुद्धा ठाऊक होतं कि कट लागलेला नाही.

स्टीव्ह बकनर यांच्या अशा चुकीच्या अम्पायरिंगमुळे DRS पद्धत अंमलात आणावी लागली.

अशा अनेक चुकीच्या निर्णयामुळे खराब पंचचा शिक्का स्टीव्ह बकनरच्या माथी लागला गेला. नंतर तब्बल १७ वर्षांनंतर बकनरने खुलासा केला मी बऱ्याचदा सचिनला चुकीच्या पद्धतीने आउट दिलं होतं. याबद्दल बकनरने माफीसुद्धा मागितली होती. पण खराब पंच म्हणून बकनर क्रिकेट विश्वात ओळखले गेले. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.