पुणेकरांनो लाजू नका , आज आपला दिवस आहे : आंतरराष्ट्रीय निद्रा दिवस

भिडू आमचं ऑफिस आहे पुण्यात. आता जरी आम्ही अधिकृतरित्या रेशनकार्ड धारी पुणेकर नसलो तरी पुण्याच्या काही चांगल्या सवयी आम्हाला एमपीएससी करताना लागल्या. म्हणजे पुणेकर होण्याच्या दिशेने पहिले पाउल पडले. तर तुम्ही विचाराल कोणती सवय बुवा?

दुपारची वामकुक्षी. 

आपल्या गावाकडच्या भाषेत त्याला दुपारच्यापारी टीर्री वर करून पडणे असे म्हणतात. पुणेकर त्याला वामकुक्षी असं म्हणतात. तर हे दुपारी झोपणे म्हणजे  पुणे सोडून इतर ठिकाणी चैनचं. घरी जर कोणाला सुगावा की पोरगं दुपारी झोपलंय तर जायदाद से बेदखल करण्यात येईल एवढा दंगा व्हायचा. आपल्याच माणसाना सुख बघवत नाही हो.

कधी कधी शाळेत एखादा मास्तर एकद्या गवयाच्या सुरात शिकवू लागतो आणि पोरं त्याच्या लयीत रंगून डुलक्या मारायला लागतात .खर तर हे त्या मास्तरच्या टॅलेंट ला दिलेली दाद असते पण ऐकून कोण घेतो हो? लगेच आभाळ कोसळल्यासारखा मास्तर रफीचा रँम्बो व्हायचा.

पण पुण्यात तसं  नाही हो. खऱ्या प्रतिभेची जाणीव असणारं हे शहर आहे. इथे आल्यावर आमच्या या प्रतिभेला खरा रंग चढला. पेठेतली दुकानं, रस्ते दुपारी १ वाजला की सुनसान होतात. चितळे मिठाईवाले वगैरे बंद करून घरी पोचतात. आम्ही सुद्धा लालाजींच्या मेसकडे चढाई करायचो. लालाजीनी प्रेमाने खाऊ घातलेल्या अर्ध्या कच्च्या पोळ्या, बटाटा घातलेली भाजी खाल्ली की निद्रादेवी आपण जवळ आल्याची वर्दी देऊ लागायची.

पेंगुळलेल्या डोळ्यासमोर दोन रस्ते दिसायचे. एक जायचा अभ्यासिकेकडे आणि दुसरा  हॉस्टेलमधल्या रूम कड. पहिला रस्ता कधी सापडलाच नाही. दहा मिनिटाचा झोपेचा क्रॅश कोर्स करायसाठी आम्ही रूमवर यायचो. ढेकणांना उशाशी घेऊन पुण्याच्या शांत थंड वातावरणात मस्त झोप लागायची. क्रॅश कोर्सचा कोम्प्रीहेन्सीव कोर्स होऊन जायचा.

बऱ्यापैकी स्पर्धापरीक्षा अस्पायरंट एक तर हॉस्टेलच्या बेड वर नाही तर अभ्यासिकेतल्या खुर्चीत घोरताना दिसायचे.

त्यात त्यांचीही काही चूक नव्हती म्हणा. पहाटे उठून स्पर्धापरीक्षेच्या पुस्तकात घुसणारा, रात्ररात्रभर  नांगरे पाटलांच्या भाषणाची पारायणे करणारा भिडू पुण्याच्या दुपारच्या निवांतपणाला बळी पडणारच ना! इंजिनियरिंग असो नाही तर सिए असो रात्रभर गेम ऑफ थ्रोन्स , नार्कोस गाजवणारे दुपारी हमखास ब्रम्हानंदी टाळी लावतात.

पण या नव्या पुणेकरांना झोपेमुळे एक प्रकारचा अपराधीपणा असतो. हा अपराधीपणा दूर करण्यासाठी भिडू तुम्हाला एक आनंदाची गोष्ट घेऊन आलाय.  आंतरराष्ट्रीय निद्रा दिन !!

तर विषय हा आहे की जगभरातल्या ब्राईट माईडसचा जर अभ्यास केला तर तुम्हाला ध्यानात येईल की ते दुपारी झोपतात. हे आम्ही म्हणत नाही तर जागतिक कीर्तीच्या संस्था म्हणतात. अशाच एका संस्थेने वर्षातला एक अख्खा  दिवस आंतरराष्ट्रीय निद्रा दिन म्हणून साजरा करायचं जाहीर केलं. तो दिवस आजचा आहे.

काय आहे आंतरराष्ट्रीय निद्रा दिवस??

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात, पुढ पळण्याच्या स्पर्धेत माणूस पुरेशी झोप घेण्याचे विसरतोय. अमेरिकेतल्या मॅनेजमेंट गुरुनी एका अमेरिकेचं नागरिकांनी व्यवस्थित झोप न घेतल्यामुळे ४०० बिलियन डॉलरचं नुकसान झालेलं नोंदवलंय. जपानसारख्या देशात तिथले लोक पुरेशी विश्रांती न मिळाल्यामुळे नैराश्य , स्मृतीभ्रंश, हाय बिपी या रोगांनी ग्रस्त होत आहेत. यामुळेचं तिथले सरकारसुद्धा आपल्या नागरिकांनी झोपावं असं आवाहन करतंय.

अमेरिकेतल्या वर्ल्ड असोशिएशन ऑफ स्लिपिंग मेडिसिन नावाची एक संस्था आहे.  त्यांनी यावर ठोस उपाय शोधण्याचा प्रयत्न केला.  शरीररुपी मशीनला काही तासाचा ब्रेक देणे हे गरजेचे आहे याचं प्रमोशन करायचं त्यांनी ठरवलं. यातूनच पुढे आली आंतरराष्ट्रीय निद्रा दिवसाची कन्सेप्ट.

१४ मार्च २००८ साली पहिल्यांदा ‘Sleep well, live fully awake’ हे स्लोगन घेऊन त्यांनी जागतिक झोपेचा दिवस साजरा केला. देशोदेशीचे मानसोपचारतज्ञ, डॉक्टर्स या चळवळीशी जोडले गेले. ट्विटर सारख्या सोशल मिडियाच्या माध्यमातून जगभर ही चळवळ पसरली गेली. काही ठिकाणी झोपण्याची स्पर्धा घेतल्या जात आहेत. मोठमोठ्या कोर्पोरेट कंपन्या या चळवळीला फंड देत आहेत.

काही वर्षापूर्वी भारतीय फिल्मइंडस्ट्रीचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी सुद्धा आपल्या या निद्रादिवसाबद्दल एक ट्विट केलं आणि ते भारतभर गाजलं. तेव्हा पासून भारतात सुद्धा या झोपेच्या चळवळीने हातपाय पसरायला सुरवात केली.

त्यामुळे पुणेकर भिडूनो तुम्ही दुपारी झोपणार आहे तर बिनधास्त झोपा. लाजायचं काही कारण नाही. (खरा पुणेकर लाजत नाही. पुणेकर  होण्याचे अस्पायरंट असलेला लाजतो.) दुपारी दुकानं बंद करून झोपा, रात्री झोपा, वेळ मिळेल तेव्हा डुलकी मारा. अहो पतंजलीने सुद्धा योगा मध्ये  व्यायामानंतर शवासन सांगितलं आहे. आपली पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे हो. 
 
ता.क. : नुकताच हाती आलेल्या वृत्तानुसार हा नियम दुपारी नोकरी करणाऱ्यांना नाही असं आमच्या संपादक मंडळाने सांगत आमची झोप मोड केली आणि हा लेख शेअर करायला लावला. जे कोणी या दुपारच्या टळटळीत उन्हात जागे आहेत त्यांनी नक्की वाचा आमचे कष्ट वाया जाणार नाहीत. 

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.