१४ वर्षांनी राजस्थान रॉयल्स आयपीएल फायनलमध्ये आहे, ‘शेन वॉर्न पॅटर्न’ शिवाय हे शक्य नव्हतं…

१५ व्या आयपीएलची आज फायनल. समोरासमोर कोण? तर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स. २०१६ नंतर पहिल्यांदाच अशी फायनल होतीये, ज्यात ना मुंबई इंडियन्स आहे आणि ना चेन्नई सुपर किंग्स. नेहमीच्या टीम्स नसल्या, तरी नॉस्टॅलजिया मात्र भरपूर आहे.

 गुजरातच्या कोचिंग टीममध्ये आशिष नेहरा आणि गॅरी कर्स्टन आहे, तर राजस्थानच्या कोचिंग टीममध्ये कुमार संगकारा आणि लसिथ मलिंगा आहेत.

सेम २०११ च्या वर्ल्डकप फायनलची व्हाईब.

गुजरात टायटन्सनं पहिल्याच सिझनला थेट फायनलपर्यंत धडक मारलीये, दुसऱ्या बाजूला राजस्थान रॉयल्स २००८ ला पहिल्याच सिझनला आयपीएल जिंकल्यानंतर १४ वर्षांनी फायनलला पोहोचलीये.

 पहिल्या सिझनच्या फायनलला धोनी विरुद्ध वॉर्न असा कडक सामना रंगला होता.

धोनीनं २००७ चा टी२० वर्ल्डकप जिंकलेला, त्याच्या चेन्नईच्या टीममध्ये तगडे प्लेअर्सही होते. दुसऱ्या बाजूला राजस्थानकडे, स्वतः वॉर्न, ग्रॅमी स्मिथ आणि बाकी सगळी तरणी जनता होती. राजस्थानचा कॅप्टनही शेन वॉर्न होता आणि कोचही.

सुरूवातीला शेन वॉर्न आयपीएल खेळायला तयार नव्हता, पण तो खेळला आणि त्यानं नेतृत्व केलं ते एका मराठी माणसामुळं. आता ती स्टोरी बोल भिडूनं आधीच लिहून ठेवलेली आहे…

आयपीएल खेळायला तयार नसलेल्या शेन वॉर्नला धुळ्याच्या मनोज बदाळेंनी स्कीम टाकली होती…

वॉर्ननं राजस्थान रॉयल्सचं नुसतंच नेतृत्व केलं नाही, तर नव्या पोरांना घडवलंही. सध्या भारताचा सगळ्यात बाप ऑलराऊंडर असलेला रवींद्र जडेजा वॉर्नच्याच मार्गदर्शनाखाली तयार झाला. पण वॉर्न पोरं घडवायचा कशी, याची स्टोरी मात्र वेगळी आहे.

थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊन इंटरनॅशनल क्रिकेटमधला शेन वॉर्न आठवा. त्यानं माईक गॅटींगला टाकलेला ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ आठवेल, त्याला तेंडल्यानं हाणलेले छकडे आठवतील आणि मैदानात आणि मैदानाबाहेर वॉर्ननं घातलेले राडेही.

वॉर्नच्या जिंदगीत जितके मैदानाबाहेरचे भारी क्षण होते, तितकेच मैदानाबाहेर गाजलेले राडेही. पण हाच वॉर्न जेव्हा राजस्थानचा कोच आणि कॅप्टन झाला, तेव्हा त्यानं दोन गोष्टींना प्राधान्य दिलं, त्या म्हणजे शिस्त आणि तत्व.

या तत्त्वांची पहिली ठिणगी, आयपीएल सुरू व्हायच्या आधीच पडलेली.

इतर संघांप्रमाणे राजस्थानच्या ट्रायल्स पार पडल्या. त्यानंतर संघ निवडीची वेळ आली. राजस्थानच्या मॅनेजमेन्टनं वॉर्नकडं आग्रह केला, की ‘एक प्लेअर आहे ज्याला खेळण्याची संधी नाही मिळाली तरी चालेल, पण टीममध्ये घे. त्याची आकडेवारीपण चांगलीये.’

वॉर्ननं त्याचा खेळ पाहिला होता, त्याला काय गडी मापात वाटला नाही आणि त्यानं स्पष्ट सांगितलं की, ‘याला टीममध्ये जागा मिळणार नाही.’ मॅनेजमेंटनं आग्रह सोडला नाही, ते म्हणले, ‘बाबा टीममध्ये नाही तर नाही, पण टीशर्ट घालून डगआऊटमध्ये तरी बसू देत.’

वॉर्न म्हणला, ‘नसतंय जमत. तुम्हाला इतका तो हवाच असेल, तर मी मला मिळालेले पैसे परत देतो आणि जातो.’

त्याची स्कीम सोप्पी होती, जर एखादा प्लेअर टीममध्ये येणं डिझर्व्ह करत नाही आणि तरीही आपण त्याला घेतलं, तर तो इतर प्लेअर्सवर अन्याय ठरेल. त्यांच्या मनातली आपली इज्जत जाईल, ती कायमचीच.

पुढचा किस्सा होता शिस्तीचा.

वॉर्ननं टीम प्रॅक्टिसला जाताना होणारी एक चूक डोक्यात ठेवली होती. ती म्हणजे रवींद्र जडेजाला कायमच उशीर होतोय. एक दिवस टीम बस, लेट झालेल्या जडेजाला न घेताच प्रॅक्टिसला निघून गेली. प्रॅक्टिस झाल्यावर टीम परत निघाली आता जड्डू बसमध्ये होता.

वॉर्न म्हणला, ‘तू आज प्रॅक्टिसला लेट आला होतास, त्यामुळं हॉटेलवर चालत ये.’ जड्डू उतरायच्या आधीच टीममधला एक भिडू हसला आणि वॉर्ननं त्यालाही चालत यायला लावलं.

त्यानंतर प्रॅक्टिस असो किंवा मॅच… कधीच कुणी लेट झालं नाही.

वॉर्ननं फक्त शिस्तच लावली का? तर नाही. त्यानं कुणी गिणतही नसलेल्या टीमला चॅम्पियन बनवलं. युसूफ पठाण असेल, रवींद्र जडेजा असेल किंवा नवखा स्वप्नील अस्नोडकर यांच्यावर विश्वास दाखवला. मोठे प्लेअर्स नसले, तरी तुम्ही जिंकू शकता हे दाखवून दिलं. फक्त बोलबच्चन टाकण्यावर थांबला नाही, तर सगळ्यात जास्त विकेट्स घेण्याच्या यादीत १९ विकेट्स घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

फायनल शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली. तेव्हाही वॉर्न क्रीझवर होता. त्यानं बॉल तटवले, स्ट्राईक रोटेट केली आणि रॉयल्स चॅम्पियन झाले. २०११ मध्ये त्यानं आयपीएलमधून रिटायरमेन्ट घेतली आणि रॉयल्सचा मेंटॉर झाला.

मेगा ऑक्शनमुळं राजस्थाननं यावेळी चांगली टीम बांधली. हुकमी एक्के घेतले, स्वतःवर विश्वास ठेवत फायनल गाठली, पण या टीमला शिस्त लावणारा, त्यांच्यातली जिद्द जागी ठेवणारा वॉर्न मात्र हे बघण्यासाठी नाहीये.

जॉस बटलरचा चिवटपणा असेल, आर अश्विनचं कुणालाही नडणं, युझवेंद्र चहलची जादुई फिरकी असेल किंवा संजू सॅमसनचं प्रभावी नेतृत्व… याच्या जोरावर राजस्थाननं यंदाच्या आयपीएलला फायनलचा टप्पा तरी अगदी पद्धतशीर गाठलाय. नेमकं हे सगळं बघायला वॉर्न तेवढा नाहीये.

संजू सॅमसन आणि बटलर दोघांनीही सांगितलंय, ‘आज जिंकलो तर ते वॉर्नसाठीच असेल. तो आम्हाला आभाळातून बघत असेल, तर त्याला अभिमान वाटत असेल.’

राजस्थान रॉयल्सनं आज आयपीएलची ट्रॉफी उंचावली, तर ती खऱ्या अर्थानं १४ वर्षांपूर्वी त्यांना जिंकायला शिकवणाऱ्या, एक नवी पिढी घडवणाऱ्या शेन वॉर्नला श्रद्धांजली असेल कारण त्याचा चिवटपणाचा आणि शिस्तीचा पॅटर्न त्यांनी आजही जपून ठेवलाय…

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.