एका आयपीएलमुळं सुपरस्टार झालेला पॉल वल्थटी सध्या आहे कुठं?

या स्टोरीचे म्हणायला गेलं तर, दोन आणि म्हणायला गेलं तर तीन पार्ट आहेत. म्हणजे ही स्टोरी नेमकी कुठून सुरू होते, हे तुमचं तुम्ही ठरवा… एक मात्र आहे, ही स्टोरी संपत नाय.

लय कन्फ्युज होऊ नका, डायरेक्ट मुद्द्यावर येऊ.

पॉल वल्थटी आठवतो का? आयपीएलमुळं सुपरस्टार झालेला गडी.

२०११ च्या आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स अशी मॅच होती. पंजाबला जिंकण्यासाठी १८९ रन्स हवे होते. चेन्नई किरकोळमध्ये जिंकेल असं वाटत होतं, पण पंजाबसाठी एक कार्यकर्ता मसीहा बनून आला, हाच तो पॉल वल्थटी. पंजाबमध्ये भारी भारी प्लेअर असूनही त्यांचा एकही कार्यकर्ता चालला नाही.

वल्थटीनं मात्र हवा केली, त्यानं ६३ बॉल्समध्ये १२० रन्स चोपले आणि पंजाबनं मॅच मारली.

बलाढ्य चेन्नईला हरवल्यानं पंजाबची हवा झाली. वल्थटीला तर लोकांनी लय डोक्यावर घेतलं. त्याच्या पुढच्याच मॅचमध्ये त्यानं ४७ बॉल्समध्ये ७५ रन्स केले वर बॉलिंगमध्ये ४ विकेट्स घेतल्या. लोकांना आता वाटायला लागलं हा पुढं जाऊन लय मोठा क्रिकेटर होणार.

त्याच आयपीएलमध्ये ४६ रन्सची आणखी एक चमकदार इनिंगही वल्थटीनं खेळली. पण त्यानंतर काय तो चमक दाखवू शकला नाय. आयपीएलमध्ये दिवसाला एक अशा रेटनं स्टार्स जन्माला येतात त्यामुळं तिथं रहायचं असेल, तर कामगिरीत सातत्य असल्याशिवाय पर्याय नाही.

वल्थटीचा कार्यक्रम इथंच गंडला. त्यात त्याला मनगटाच्या दुखापतीनं सतावलं आणि तो आयपीएलच्या रेसमधून बाहेर पडला. स्टोरीचा एक पार्ट इथं संपला.

आता दुसरा पार्ट आयपीएलच्या आधीचा. पार २००२ मधला. अंडर-१९ वर्ल्डकप सुरू होता. इरफान पठाण, पार्थिव पटेल अशा चेहऱ्यांचा भारतीय संघात समावेश होता. भारताची बांगलादेश विरुद्ध मॅच होती, वल्थटी बॅटिंग करत होता. एक बाऊन्सर त्याच्या चेहऱ्यावर आला आणि हेल्मेटच्या गॅपमधून थेट त्याच्या डोळ्यावर आदळला.

साहजिकच त्याच्या दृष्टीवर परिणाम झाला. अगदी लहान वयात त्याला डोळ्यांच्या ऑपरेशनला सामोरं जावं लागलं. बरं ऑपरेशन पण काय एखादं नव्हतं, तर चार लेझर ऑपरेशन्स झाली. बॅटिंग स्टान्स पासून प्रत्येक गोष्ट बदलावी लागली. 

तरीही भावानं क्रिकेटचा नाद आणि भारतासाठी खेळायचं स्वप्न बघणं सोडलं नाही.

२०११ च्या चॅलेंजर ट्रॉफीमध्ये वल्थटी खेळला, त्याच वर्षी आयपीएलमध्ये चमकलाच. नजरेचा विषय होता, बघताना त्रास व्हायचा, पण तरीही तो खेळला. चेन्नईच्या बॉलर्सना धुतलं. १९० रन्सचा पाठलाग करताना १२० एकट्याच्या जीवावर मारले. फक्त बॅटिंगमध्येच नाही, तर बॉलिंगमध्येही चमक दाखवली.

पण डोळ्याच्या दुखापतीचा सामना करत असतानाच, वल्थटीला मनगटाची दुखापत झाली. ही दुखापत इतकी गंभीर होती, की त्याला हातात बॅटच धरता येईना. आता मात्र या दुखापतीला हाताळणं सोपं नव्हतं. स्टोरीच्या दुसऱ्या पार्टलाही ब्रेक लागला. कित्येकांसाठी स्टोरी इथंच संपली.

स्टोरीच्या तिसऱ्या पार्टमध्ये खरा विषय आहे…

आयपीएलमधनं बाहेर पडल्यानंतर वल्थटी कॉर्पोरेट लीगमध्ये खेळला. पण तिथं मोठा जॅक लागला नाही. मग सध्या वल्थटी काय करतो?

तर तो मुंबईच्या प्रथितयश क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये नव्या मुलांना घडवतो. त्यांचा मार्ग भटकू देत नाही. त्यांना नव्या संधी कशा मिळतील याकडे लक्ष देतो. त्यांना नवी स्वप्न दाखवतो आणि आपलं हुकलं असलं तरी कित्येकांचं भारतासाठी खेळायचं स्वप्न कायम ठेवतो… म्हणूनच स्टोरीचा हा तिसरा पार्ट संपत नाही… स्वप्नांसारखाच!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.