खरं वाटणार नाही पण अभिषेक बच्चनचे नाव दोन वेळा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आलंय

मोठ्या वृक्षांच्या खाली छोट्या झाडांची वाढ होत नाही हा निसर्ग नियम आहे. कलावंतांच्या बाबतीतही ही गोष्ट वारंवार सिद्ध होत असते. आपल्या आई वडिलां इतके यश क्वचितच एखाद्या कलावंताला मिळते. बऱ्याचदा पालकांशी तुलना केल्यामुळे त्याच्यात सुरुवाती पासूनच मोठे पणाचे ओझे मनात न्यूनगंड निर्माण करतो आणि ती व्यक्ती यशापासून दूर जाते.

घरातच स्पर्धा असल्यामुळे अनेक कलाकार दुहेरी संघर्षात असतात.

त्यांना कायम स्वतःला सिद्ध करावे लागते. यामुळेच रफी, मुकेश, किशोर, तलत, हेमंत कुमार, आशा भोसले यांच्या मुला मुलींना तितकसं यश मिळालं नाही. क्रिकेटमध्ये सुद्धा सुनील गावस्करच्या मुलाला यश मिळालेच नाही. (करीअर च्या अखेरच्या टप्प्यात त्याला आसामच्या संघाकडून रणजी ट्रॉफी खेळावी लागले असो.)

अभिषेक बच्चन ज्यावेळेला चित्रपटाच्या दुनियेत आला त्यावेळी त्याला याचाच सामना करावा लागला. कायम अमिताभचा मुलगा म्हणून त्याची ओळख होत गेली व त्याच्यावर दडपण वाढत गेले.

त्याच्या यशाकडे अमिताभच्या यशा सोबत तुलनात्मक दृष्टीने रसिक पाहत गेले त्यामुळे अभिषेक सुद्धा व्यावसायिक दृष्ट्या तितका यशस्वी कलाकार होऊ शकला नाही. स्वतंत्र व्यक्तीमत्व म्हणून एखाद्या कलाकाराकडे आपण बघूच शकत नाही कां? असे असले तरी दोन गोष्टींसाठी अभिषेक बच्चन याचे नाव चक्क गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सामील झालेले आहे! हे वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे. 

अभिषेक बच्चन याच्या नावावर दोन विक्रम आहेत.

२००९ साली अभिषेक बच्चन आणि सोनम कपूर यांचा ‘ दिल्ली सिक्स ‘ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या सिनेमाच्या प्रमोशन वर अभिषेकने खूप भर दिला होता. हा सिनेमा राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केला होता. याला ए आर रहमान यांचे संगीत होते. 

‘मसक्कली मसक्कली’ यातील गाणे त्या काळात खूप गाजले होते. या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी अभिषेकने काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत प्रवास केला. २२ फेब्रुवारी २००९ या दिवशी त्याने बारा तासांमध्ये तब्बल बाराशे किलोमीटर चा प्रवास केला.

या वेळात त्याने सात शहरांमध्ये जाऊन प्रमोशन केले. ही आज शहरे होती नॉयडा, दिल्ली, गाझियाबाद, फिरोझाबाद, गुरगाव, चंदिगढ आणि मुंबई ! हा सर्व प्रवास त्याने प्रायव्हेट जेट आणि कार ने केला होता या सफरीतील शेवटचा टप्प्यात मुंबईला त्याने सोनम कपूर सोबत सिनेमाचे प्रमोशन केले होते. 

सकाळी नऊ वाजता सुरू झालेला हा त्याचा प्रवास संध्याकाळी नऊ वाजता थांबला. या काळात त्याने तब्बल बाराशे किलोमीटरचा प्रवास केला होता. आणि हा एक विश्वविक्रम होता. याची नोंद गिनीज बुक ने घेतली. या पूर्वी असा विक्रम अमेरिकन अभिनेता विल स्मिथ याच्या नावावर होता.  २००४ साली त्याने त्याच्या ‘आय रोबो’ या सिनेमाच्या तीन प्रेस तीन विभिन्न शहरात अवघ्या दोन तासात घेतल्या होत्या.

अभिषेक बच्चन यांच्या नावावर आणखी एक विक्रम आहे ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे.

आर बालकी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पा’ या चित्रपटात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संपूर्ण जगातील हा एकमेव चित्रपट आहे ज्यामध्ये प्रत्यक्ष आयुष्यातील वडील आणि मुलगा यांनी परस्पर विरोधी भूमिका केल्या आहेत. 

पा चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी अभिषेक बच्चन यांच्या मुलाची भूमिका केली होती आणि हा रेकॉर्ड आजवर कायम आहे. 

‘पा’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी ‘प्रोजेरीया’ या दुर्धर व्याधीग्रस्त मुलाची भूमिका केली होती. अमिताभच्या मेक अप साठी हॉलीवूड चे प्रख्यात मेक अप मन Christien Tinsley यांना निमंत्रित केले होते. हा मेक अप करण्यासाठी तब्बल सहा तास लागायचे. या सिनेमातील भूमिकेसाठी अमिताभ बच्चन,अरुंधती नाग यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

या सिनेमाला इलिया राजा यांचे संगीत होते. या चित्रपटात अमिताभची शाळकरी मैत्रीणी ची भूमिका करणारी चिमुरडी तरुणी सचदेव चित्रपट प्रदर्शित झाल्यावर काही वर्षात नेपाळ मध्ये एकां भीषण विमान अपघातात मृत्यू पावली.

-भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.