इटलीला त्यांचा एकमेव युरो कप ‘ छापा-काटा’ करून मिळालेला आहे.

आजपासून ‘युरो २०२०’ स्पर्धेला सुरुवात होतेय . फुटबॉल वर्ल्डकपनंतर असलेली हि सर्वात मोठी टूर्नामेंट आहे ज्यामध्ये फक्त युरोपियन देश सहभागी होत असतात. आता तुम्ही म्हणाल कि, ‘युरो २०२०’ स्पर्धा २०२१ मध्ये कशी ? तर तुमच्या- आमच्यासारखचं या फुटबॉलवाल्यांचं प्लॅनिंग पण कोरोनामुळे पुढे गेलं. दर चार वर्षांनी होणारी हि स्पर्धा जून २०२० मध्ये होणार होती मात्र मागच्या वर्षी असलेल्या कोरोनामुळे हि स्पर्धा पुढे ढकलली.

आता तुम्ही म्हणाल कि, यावर्षीसुद्धा कोरोना आहेच कि तर त्याबद्दल आम्हाला नाही तर UEFA ला विचारा कारण या स्पर्धा त्यांनी भरवल्या आहेत.

फुटबॉल जरी जगभर खेळला जात असेल तरी त्याला जास्त ग्लॅमर युरोपमध्येच मिळालं, आजही जगभरात सगळीकडे युरोपियन फुटबॉलच जास्त बघितला जातो. जितका फुटबॉल वर्ल्डकप महत्वाचा असतो, तितकाच युरोप मधल्या फुटबॉल खेळणाऱ्या प्रत्येक देशाला वाटत असत कि आपल्या ट्रॉफी कॅबिन मध्ये सुद्धा युरो कप असला पाहिजे. पण सगळ्यांचीच हि इच्छा पूर्ण होईल असं नसत, इटली सारखा देश ज्याने फुटबॉल वर्ल्ड कप ४ वेळा जिंकला आहे त्या इटलीला युरो फक्त एकदाच जिंकता आला आहे.

इटलीच्या या एकमेव युरो जिंकण्याचा किस्सा तेवढाच भारी आहे कारण , त्यांनी हा कप नाणेफेक म्हणजेच आपल्या सोप्या भाषेत ‘छापा-काटा’ करून मिळालेला आहे.

१९६८ चा युरो कप; क्वालिफायिंग राउंड पूर्ण करून इटली, त्याकाळचा सोव्हियत युनियन, इंग्लंड आणि युगोस्लोव्हाकिया हे चार देश सेमीफायनल पर्यंत पोहचले होते.  इटली ✖ सोव्हियत युनियन आणि इंग्लंड ✖ युगोस्लोव्हाकिया यांच्यामध्ये सेमीफायनलच्या मॅचेस होणार होत्या.

सोव्हियत युनियनची टीम इटलीच्या तुलनेत बलाढ्य मानली जात होती , याआधी १९६४ साली झालेल्या युरो कपमधून आणि १९६६ च्या वर्ल्ड कपमधून इटलीला सोव्हियत युनियननेच बाहेर काढलं होत त्यामुळे इटली विरुद्ध सोव्हियत युनियन या सेमीफायनल मध्ये इटली हरणार हे नक्की होत.

इटलीकडे एकच प्लस पॉईंट होता तो म्हणजे मॅच त्यांच्या देशात होती.

जवळपास ७० हजार पब्लिकने स्टेडियम भरलं होतं. घरच्या मैदानामुळे आत्मविश्वास वाढलेल्या इटलीने जोरदार खेळ सुरु केला. सोव्हियत युनियन चा एक प्रमुख स्ट्रायकर आणि एक डिफेंडर दुखापतीमुळे हि मॅच खेळत नव्हते. या गोष्टीचा फायदा इटलीला होईल असं वाटत असतानाच त्यांचा मिडफिल्डर जिआनी रिव्हेरा सुरु सामन्यातच दुखापतग्रस्त झाला, त्याला तो सामना अर्ध्यातच सोडावा लागला. त्याकाळच्या फुटबॉल नियमांनुसार बदली खेळाडू खेळवण्याची परवानगी नव्हती त्यामुळे इटलीला पुढची मॅच १० खेळाडूंसोबतच खेळावी लागली.

‘ One Man Down’ अवस्थेत खेळणारी इटली आता सोव्हियत युनियनला तोंड द्यायला कमी पडू लागली पण डिफेन्सच्या जोरावर त्यांनी सोव्हियत युनियनला गोल करून दिला नाही.

शेवटी मॅच ०-० अशी संपली. सध्या फुटबॉल मध्ये जर मॅच बरोबर या अवस्थेत पोहचली तर पेनल्टी शूटआऊटने त्या मॅचचा निकाल ठरवला जातो. पण १९६८ ला फुटबॉल नियम वेगळे होते,पूर्ण वेळेनंतर जर स्कोर बरोबर राहिला तर नाणेफेक करून त्या मॅचचा निकाल ठरवला जात असे. हा नियम इटलीच्या पथ्यावर पडला. मॅच बरोबरीत सुटल्यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आणि रेफ्री ड्रेसिंग रूम मध्ये गेले.

इटलीचा कॅप्टन जियासिंटो फाशेटी हा अनुभव सांगताना म्हणतो कि ,

“सोव्हियत कॅप्टन सोबत मी ड्रेसिंग रूम मध्ये पोहचलो त्यावेळी मला वाटतं होतं कि आज नशीब आपल्या बाजूने आहे.”

आणि झालंही तसंच, इटलीने ही नाणेफेक जिंकली फशेटी तसाच पळत स्टेडियमवर आला ७०,००० फॅन्स या निकालाची वाट बघत होते त्याने स्टेडियमवर येऊन हात उंचावला आणि इटलीच्या फॅन्स च्या लक्षात आलं कि मॅच आपण जिंकली आहे.

एकच जल्लोष सुरु झाला, ज्या टीममुळे इटलीच वर्ल्ड कप, युरो कप जिंकण्याचा स्वप्न अपूर्ण राहत होत त्या सोव्हियत युनियनला आज त्यांनी हरवलं होत मग त्यासाठी ‘छापा-काटा’ करावा लागला असला तरी.

फायनलला इटलीसमोर युगोस्लाव्हाकिया होती, हि मॅच सुद्धा चुरशीची झाली पण शेवटी इटलीला विजय मिळाला आणि त्यांनी आपला पहिला तसेच एकमेव युरो कप आपल्या घरच्या मैदानावर जिंकला. इटलीने फायनल नक्कीच आपल्या खेळाच्या जोरावर जिंकली होती , पण सोव्हियत युनियन विरुद्धची सेमीफायनल जी त्यांच्यासाठी अशक्य होती ती त्यांनी  नाणेफेकीमुळे जिंकली होती त्यामुळे इटलीच्या युरो कपचं क्रेडिट ‘छापा-काटा’ सिस्टिमलाचं दिलं पाहिजे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.