तेव्हा जावेद अख्तर यांना वाचवायला फक्त शिवसेनाच धावून आली होती
सध्या आपल्या देशात उठ-सुठ कोणीही कोणाला तालिबानी म्हणत सुटलं आहे. ज्येष्ठ कवी लेखक जावेद अख्तर यांनी अलीकडेच केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली आहे. जे वक्तव्य फार चुकीचं असल्याचं मत सगळीकडेच व्यक्त केलं जातंय.
सगळेच पक्ष आणि नेते जावेद अख्तर यांना तुम्ही चुकलात म्हणून ऐकवत आहेत. यात आता शिवसेनाच कशी मागे राहणार ? आता सेनेने देखील या प्रकरणामध्ये उडी घेतली आहे.
‘हिंदू राष्ट्र’ संकल्पनेस पाठिंबा देणारे तालिबानी विकृतीचे आहेत, असे कसे म्हणता येईल? असा प्रश्न उपस्थित करतानाच मागच्या काळात ‘बीफ’ प्रकरणावरून जो धार्मिक उन्माद घडला व त्या सर्व प्रकरणात जे अनेक लोकांचा जीव गेला, त्याचे समर्थन शिवसेनाच काय तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही केले नव्हते असं मत ‘सामना’मधून व्यक्त केलं आहे.
अशी तुलना करणाऱ्यांनी ‘आत्मपरीक्षण’ केले पाहिजे, असे पक्षाने आपल्या मुखपत्र सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटलंय.
आरएसएसची तुलना तालिबानशी करणे हिंदु संस्कृतीचा अनादर आहे असं सेनेचं म्हणण आहे.
सेना आता जावेद अख्तर यांना तर सुनावलं आहेच पण एकदा अशीही घटना घडली जेंव्हा जावेद अख्तर यांच्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता तेंव्हा याच सेनेने त्यांना समर्थन दिलं होतं.
काय घडलं होतं तेंव्हा ?
२०१० च्या सालात खासदार जावेद अख्तर यांनी एका इस्लामिक संस्थेने महिलांसाठी काढलेल्या फतव्यावर टीका केली होती.
मुस्लीम कट्टरपंथी असणाऱ्या एका दारुल उलूम नावाच्या इस्लामिक संस्थेने, मुस्लिम कामगार महिलांच्या विरोधात एक फतवा जारी केला होता ज्यात मुस्लीम महिलांना असा आदेश दिला होता कि, त्यांनी पुरुषांसोबत काम करायचं नाही. थोडक्यात पुरुषांसोबत काम करण्यावर बंदी घालणाऱ्या या फतव्याविरोधात जावेद अख्तर यांनी टीका केली होती.
या टिकेनंतर त्यांना मुस्लीम कट्टरपंथी नेत्यांकडून आणि संघटनांकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या.
एका धमकीच्या ईमेलमध्ये तर त्यांना असंही म्हणलं होतं कि, “जावेद तुझा शेवटचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे,जर शक्य असेल तर स्वतःला वाचव”. त्यावेळेसचं वातावरण च इतकं पेटलं होतं कि, जावेद यांचा कोणत्याही क्षणी घातपात होऊ शकतो. शेवटी अख्तर यांनी हिंमत दाखवली आणि शक्य होईल तितकं स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला .
एका मेलमध्ये अख्तरला असंही म्हणलं गेलं कि, तू केवळ नावाने मुस्लिम आहेस, पण प्रत्यक्षात तू ज्यू एजंट आहेस.
जावेद यांनी स्वतःच्या जीवाला धोका असल्याची तक्रार देखील मुंबई पोलिसांकडे केली होती.
पण तेंव्हा त्यांना वाचवण्यासाठी एकच नेता समोर आला !
ते नेते म्हणजे खुद्द शिवसेना प्रमुख बाळसाहेब ठाकरे होते, जे जावेद अख्तर यांच्या समर्थनार्थ पुढे आले होते.
बाळसाहेब ठाकरे यांनी सामनामध्ये जावेद अख्तर यांचे कौतुक केले होते. या संपादकीयात म्हटले होते की, जावेदने समाजातील मूलतत्त्ववाद्यांना चोख उत्तर दिले आहे.
“जावेद यांनी नेहमीच मुस्लिमांमध्ये धर्मांधतेविरोधात आवाज उठवला आहे … फतव्यावर भाष्य केल्यानंतर आणि तो जारी करणाऱ्यांना मूर्ख आणि ‘वेडा’ म्हटल्यानंतर जावेदला धमक्या आल्या आहेत, परंतु अशा धमक्यांमुळे घाबरून जाणाऱ्यातला तो नाही. मुस्लिम महिलांनी शिक्षण घ्यायचे नसेल, नोकरी करायची नसेल तर त्यांनी दुसरं काय करावे? जावेद सारखे पुरोगामी लोकच मुसलमानांना अंधाराकडून प्रकाशाकडे, जिहाद पासून देशभक्तीकडे नेत आहेत. अशा लोकांचं कौतुक केलं पाहिजे. असं सामाना मध्ये म्हणलं गेलं होतं.
सामनाची हि भूमिका तेंव्हा हा वाद थांबवण्यासाठी खूप मोलाची ठरली होती. जावेद यांच्या जीवाला धोका होता तेंव्हा बाळासाहेबच होते ज्यांनी अख्तर यांना ‘अभय’ दिले होते. त्यांच्या समर्थनामुळे जावेद यांचा जीव वाचला होता.
हे हि वाच भिडू :
- जावेद अख्तर म्हणत होते यात फ्लॉप होण्याचे सगळे गुण आहेत पण लगान सुपरहिट झाला.
- जावेद अख्तरने रागाच्या भरात निम्मं सोडलेलं गाणं समीरने पूर्ण केलं आणि इतिहास घडला.
- टोक्यो ऑलिम्पिकमध्ये खरंच मॅच फिक्सिंग झालंय का ?