जय भीम सिनेमातल्या सीनवर वाद घालण्याआधी त्यामागचा इतिहास समजून घ्या


लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता सूर्या आणि अभिनेते प्रकाश राज यांची मुख्य भूमिका असलेला जय भीम हा चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालाय. चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्यानं चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळतोयच. पण दुसरीकड चित्रपटातील एका सीनवरून वाद निर्माण झालाय.

चित्रपटात प्रकाश राज एका व्यक्तीसोबत बोलत असतात मात्र समोरचा व्यक्ती त्यांच्याशी तमिळ ऐवजी हिंदी भाषेत बोलतो. ते ऐकून प्रकाश त्या व्यक्तीच्या कानशिलात लगावतात आणि त्या व्यक्तीला हिंदी ऐवजी तमिळ भाषेत बोलायला सांगतात.

आता याच दृश्यावरून नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. लोकांचं म्हणणं आहे चित्रपट खूप उत्तम आहे पण, चित्रपटात या दृश्याची काहीच गरज नव्हती. 

पण खरं सांगायला गेलं ना तर काही लोकांना हा सीनच समजलेला नाही. यात प्रकाश यांना हिंदी येत नसत आणि समोरचा व्यक्ती प्रकाश यांना समजू नये म्हणूनच हिंदीत बोलतो. आणि कानफाटात बसल्यावर तर तो एकदम पोपटासारखा तमिळ बोलू लागतो. आता यानिमित्तानं पुन्हा एकदा पुढं आला तो भाषिक वाद. आणि या वादाला प्रचंड मोठी पार्श्वभूमी, तीच आज समजून घेऊ.

तर ही गोष्ट जवळपास दोन शतकं जुनी आहे. 

१८३३ सालात ईस्ट इंडिया कंपनीमुळ अनेक ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी मिशनरी भारतात आले. त्यांचं लक्ष्य दक्षिण भारत होत. भारतात ख्रिश्चन धर्माचा आक्रमक प्रसार केवळ येशूच्या शिकवणीच्या प्रचारापुरता मर्यादित नव्हता तर हिंदू देवी-देवता आणि त्यांची श्रद्धा याची बदनामी करून धर्मांतरणाला असणारा हिंदूंचा विरोध दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता या मिशनऱ्यांना प्रतिकार तर केला पाहिजे. मग यासाठी वेद, पुराण आणि शंकराच्या अद्वैत तत्त्वज्ञानात पारंगत असणारी त्याचसोबतिला अस्खलित इंग्रजी येणारी आणि युरोपीय आणि ब्रिटिश विचारांचा पगडा असणारी ब्राह्मण विचारवंतांची फौज उभी राहिली.

आता हे ब्राम्हण विचारवंत बऱ्याचदा त्यांचे विचार आर्यांच्या भाषेत म्हणजे संस्कृतमधून मांडायचे. अशाप्रकारे अस्सलपणाच्या नावाखाली ते स्वतःचं पारंपरिक जातीय वर्चस्वही उपभोगायला लागले.

शतक संपता संपता या ब्राह्मणवादाविरोधी क्रांती उभी राहिली. १९१६ साली टी. एम. नायर आणि पित्ती तियागाराया चेट्टी काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी त्यांचा स्वतंत्र ‘बिगर-ब्राह्मण’ जाहीरनामा प्रसिद्ध केला. तसंच १९१६ मध्येच ख्यातनाम आध्यात्मिक तत्त्ववेत्ते मरईमलई अडिगल यांनी Tamil Purity Movement म्हणजेच तमिळ शुद्धता चळवळ सुरू केली.

तमिळ लोकांचा हिंदी विरोध या काळात किती टिपेला गेला होता, याच उदाहरण म्हणून मरईमलई अडिगल यांच्याकडं बघता येईल. अडिगल कट्टर शैवपंथीय होते आणि तमिळ भाषेचे विद्वानही होते. तमिळमधून संस्कृत भाषेची हकालपट्टी करण्याचा त्यांनी सातत्यान आग्रह धरला. त्यासाठी उदाहरण म्हणून त्यांनीच स्वतःच संस्कृत नाव ज्ञानसागरमच अरिवुक्कडल आणि स्वामी वेदाचलम या उपाधीच मरईमलई अडिगल अस नामांतर केल. थोडक्यात तामिळमधून संस्कृत आणि इतर भाषांमध्ये तयार झालेले शब्द काढून भाषा शुद्ध करण्याची मोहीम त्यांनी सुरू केली.

1920 ला त्यांनी जस्टिस पक्षाची स्थापना केली. हिंदी भाषेला विरोध करण्यात रामास्वामी पेरियार ही सर्वात पुढे होते.

पुढं 1918 साली महात्मा गांधींच्या सूचनेवरून दक्षिण हिंदी प्रचार सभेची स्थापना करण्यात आली. या सभेच्या स्थापनेचा उलटा परिणाम असा झाला कि, तामिळी अस्मिता जोर धरू लागली. कांग्रेसविरोधी, ब्राह्मणविरोधी, उत्तर भारतीयविरोधी, संस्कृतविरोधी, हिंदीविरोधी असणाऱ्या तमिळ अस्मितेला खतपाणी मिळालं. या स्वतंत्र तमिळ अस्मितेतूनच तामिळ फुटीरतावादाचा उदय झाला आणि त्याची परिणीती स्वतंत्र द्रविडनाडू, म्हणजे द्रविड राष्ट्राची मागणी करण्यात झाली.

यातच १९३७ च्या निवडणुका झाल्या. यात सी. राजगोपालाचारी राजाजी यांना स्पष्ट बहुमत मिळालं. आणि ते मद्रास प्रांताच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.

त्यानंतर एका सरकारी आदेशाने माध्यमिक शाळांमध्ये हिंदी सक्तीची करण्यात आली. या आदेशानंतर तामिळी जनता हिंदीला स्वीकारण्याची सर्वच आशा मालवली. तिथे हिंदीला पहिला विरोध झाला. पुढे तीन वर्षं हे आंदोलन सुरू होत. 1937 ते 40 असं. या सरकारी आदेशाविरोधात जस्टीस पार्टी आणि मुस्लीम लीगने एकत्र येत स्थापन केलेल्या तामिळ पडईने त्रिची ते मद्रास अशी ४२ दिवसांची विरोध यात्रा काढली. २३९ गावं आणि ६० शहरांमधून ही यात्रा गेली. एका अंदाजानुसार या लाँग मार्चममध्ये जवळपास पन्नास हजार लोकांनी भाग घेतला.

‘तामिळी जनता अश्रू ढाळत असताना आर्य मात्र हसत आहेत’ आणि ‘ब्राह्मण समाज तामिळ मातेची हत्या करत आहेत’, अशा घोषणा या यात्रेत देण्यात आल्या.

पण राजाजी आपल्या भूमिकेवर ठाम होते, त्यानंतर ब्रिटीश राजवटीने भारतीयांशी सल्लामसलत न करताच भारताला दुसऱ्या विश्वयुद्धात ओढलं. ब्रिटिशांच्या या कृतीविरोधात राजाजी यांच्यासह काँग्रेसच्या सर्व प्रांतातल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिले. अखेर मद्रासचे गव्हर्नर लॉर्ड एर्स्किन यांनी तो सरकारी आदेश मागे घेतला.

पुढं देशाला स्वातंत्र्य मिळाल. चिनी आक्रमणानंतर देशात राष्ट्रीय भावना वाढीस लागली होती. पण दक्षिणेत हिंदीविरोधी भावना कायमच होती. १९५३ मध्ये द्रमुकने पहिल मोठ आंदोलन हाती घेतल. तिरुचिरापल्ली जिल्ह्यातल्या गावाच नाव बदलण्यासाठी. करुणानिधी या २९ वर्षीय तरुणाच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी दालमियापुरम रेल्वे स्थानकावरील हिंदी नाव पुसून टाकल आणि गावाच नाव कल्लकुडि केल.

पुढं १९६३ मध्ये संसदेत संमत झालेल्या राजभाषा विधेयकामुळ तमिळनाडूतील हिंदी-विरोधी आंदोलनात परत प्राण फुंकले गेले. या विधेयकानुसार २६ जानेवारी १९६५ पासून हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा बनणार होती. २५ जानेवारी १९६४ रोजी, चिन्नास्वामी नावाच्या द्रमुक कार्यकर्त्याने हिंदी भाषा लादण्याच्या विरोधात त्रिची इथं आत्मदहन केलं. द्रमुकच्या हिंदी विरोधी आंदोलनाचा तो पहिला भाषिक-हुतात्मा मानला जातो.

नेहरूंनंतर लालबहादूर शास्त्री, मोरारजी देसाई यांनी हिंदीचे प्रस्थ वाढविण्याचे प्रयत्न केले आणि या प्रयत्नांना समांतर विरोध तमिळनाडूतच वाढत गेला. १९६४ च्या जानेवारीपासून मद्रास प्रांतात हिंदीच्या विरोधात विद्यार्थ्यांच्या मोठ-मोठ्या सभा भरत होत्या. त्याचवेळी केंद्रात माहिती आणि प्रसारण मंत्री असलेल्या इंदिरा गांधी यांनी विरोधकांना खिजविण्यासाठी सर्व परिपत्रक इंग्रजीऐवजी हिंदीत काढण्याची घोषणा केली. हा निर्णय द्रमुक नेत्यांच्या पथ्यावरच पडणारा होता.

१९६५ च्या प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी मदुराई इथं हिंदी विरोधी आंदोलक आणि काँग्रेस कार्यकर्ते यांच्यात जोरदार धुमश्चक्री सुरू झाली. 

या संघर्षाचे लोण हळूहळू राज्याच्या अन्य भागांत पोचल. जमावाला नियंत्रित करण्यासाठी सरकारने निमलष्करी दलांना पाचारण करण्यात आलं. अनेक आंदोलकांनी आत्मदहन आणि विषप्राशनाचा मार्ग पत्करला. दोन आठवड्यांच्या आत सरकारी आकड्यांनुसार ७० जण तर अनधिकृतरित्या ५०० बळी गेले. तमिळनाडूतील हिंदी विरोधी आंदोलनाची ही ओळख बनली.

या आंदोलनामुळे सरकारला माघार घ्यावी लागली आणि अनिश्चित काळापर्यंत हिंदी व इंग्रजी दोन्ही भाषा संपर्क भाषा म्हणून चालू राहतील, अशी तरतूद राजभाषा कायद्यात करण्यात आली. तसेच सनदी परीक्षा इंग्रजीतूनच घेण्याची घोषणा केली. तेव्हा आंदोलकांनी हत्यारे म्यान केली.

त्यानंतर वीस वर्षांनी, १९८६ साली राजीव गांधी सरकारने नवोदय विद्यालयांची योजना मांडली होती. या विद्यालयांत हिंदी माध्यमांतून शिकविले जाणार असल्याचा दावा करत द्रमुकने आंदोलनाची गुढी उभारली. यावेळी २१ लोकांनी आत्मदहन केल. तेव्हा केंद्र सरकारने आंदोलकांपुढे शऱणागती पत्करली आणि तमिळनाडूत नवोदय विद्यालय काढणार नसल्याचे जाहीर केल.

 १९९९ साली करूणानिधी यांच सरकार असताना मंदिरात संस्कृतऐवजी तमिळमधून पूजा करण्याचा आदेश सरकारने काढला होता. तो आदेश पाळला जातो की नाही हे माहित नाही.

चेन्नईमधून तर राजस्थान पत्रिका या हिंदी वृत्तपत्राची आवृत्ती निघते. महात्मा गांधीजींनी स्थापन केलेल्या दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेच्या माध्यमातून हिंदीची परीक्षा देणाऱ्यांची संख्या वाढते आहे. तीन वर्षांपूर्वी २ लाख ९४ हजार असलेला हा आकडा २०१३ मध्ये चार लाख ३६ हजारांपर्यंत गेला होता. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते पोन्नीलन यांच्यासारखे लेखक तमिळ युवकांना हिंदी शिकण्याचा सल्ला देत आहेत. राजकीय कारणांमुळे दूरदर्शनवर हिंदी बातम्या दिसत नाहीत मात्र हिंदी चित्रपट व वृत्तवाहिन्या सर्रास दिसतात.

पण जेव्हा केव्हा हिंदी भाषेचा मुद्दा राजकीय परिप्रेक्ष्यातून येतो तेव्हा मात्र हिंदीविरोधी भावना दक्षिणेत जोर पकडते एवढं ते सोप्पय.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.