शेन वॉर्नपेक्षाही अधिक विकेट्स घेणारा बॉलर जो जगातला सर्वात स्फोटक बॅट्समन बनला.
आजकाल एक फॅशन आली आहे, जगभरातले क्रिकेटर्स, क्रिकेट पंडित, समालोचक हे आज वरची बेस्ट वर्ल्ड इलेव्हन निवडत आहेत. यात काही नावे कॉमन असतात.
उदाहरणार्थ सचिन, लारा, रिकी पॉंटिंग,वसीम आक्रम, शेन वॉर्न वगैरे.
पण या लिस्ट मध्ये एक खेळाडू लोक विसरतात जो की फक्त बॅटिंगच नाही तर बॉलिंगचे स्टॅटिस्टिक्स काढले तरी ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईमच्या यादीत येऊन बसतो.
सनथ जयसुर्या.
दक्षिण श्रीलंकेत जन्मलेला हा क्रिकेटर अगदी लहानपणापासूनच जिनियस समजला गेला. त्याच्या शाळेत खेळाच्या शिक्षकांपासून ते अगदी मुख्याध्यापकांच्या पर्यंत प्रत्येकजण त्याच्यातील टॅलेंट ओळखून होते. त्याच्या क्रिकेटची विशेष काळजी घेतली गेली.
शालेय पातळीवरील सर्वोत्कृष्ट ऑलराउंडर म्हणून त्याला बक्षिसे मिळाली.
तो कॉलेजमध्ये गेला तोवर देशभरात श्रीलंकन क्रिकेटच उज्वल भविष्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. पहिल्या आंतरराष्ट्रीय अंडर 19 विश्वकपमध्ये त्याने देशाच प्रतिनिधित्व केलं. तिथे चांगली कामगिरी केल्यावर श्रीलंकेच्या B टीमकडून अवघड अशा पाकिस्तान दौऱ्यावर गेला आणि तिथे दोन शतके ठोकली.
याचाच परिणाम जयसूर्याची निवड १९८९ सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर झाली. साधारण याच काळात भारतात सचिन तेंडुलकरचा उदय झाला होता.
पहिल्या मॅचपासून जयसूर्या ७ नंबरला खेळायचा. त्याची ओळख स्फोटक फलंदाजी करू शकणारा ऑल राउंडर बॉलर अशी होती. शेवटच्या काही षटकात येऊन आडवे तिडवे फटके मारून मॅच फिनिश करायची जबाबदारी त्याच्या कडे असायची.
खालच्या नंबरवर खेळताना संधी मिळेल तेव्हा चांगली कामगिरी करत शिवाय बॉलिंगच्या जोरावर सनथ जयसूर्याने आपलं टीम मधलं स्थान पक्कं केलं.
१९९३ला इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये तर भाऊने फक्त २९ धावा देऊन तब्बल ६ विकेट्स घेतल्या.
लंकेचा सर्वात भरवश्याचा स्पिन बॉलर म्हणून त्याने ख्याती मिळवली.
श्रीलंका क्रिकेटला मिळालेलं सर्वात मोठं गिफ्ट म्हणजे त्यांचा कप्तान अर्जुन रणतुंगा.
जगातील सर्वात हुशार व धूर्त कप्तान समजल्या जाणाऱ्या अर्जुन रणतुंगाने १९९४ सालच्या पाकिस्तानविरुद्धच्या पेप्सी कपमध्ये जयसुर्याला ओपन करायला लावलं.
तो पर्यंतच्या इतिहासात सलामीवीर हे तंत्रशुद्ध फलंदाज असायचे. त्यांची जबाबदारी सुरवातीच्या फास्टर बॉलर्सना खेळून काढायचं आणि बॉल जुना करायचा. तीन चार नंबर पासून येणाऱ्या मधल्या फळीतले फलंदाज मोठे शॉट मारून स्कोर वाढवणार.
भारताचा के. श्रीकांत यांनी आपल्या बंडखोर बॅटिंगमुळे हे नियम धुडकावून लावले होते.
ते बघून रणतुंगाला आयडिया सुचली. साधारण ९२ च्या वर्ल्डकप पासून पहिल्या १५ ओव्हर मध्ये दोन च खेळाडू सर्कलच्या बाहेर उभे राहू शकत होते. याचा फायदा उठवण्यासाठी सुरवातच तुफानी करायची आणि १५ ओव्हर मध्ये कमीतकमी १०० धावा बनवायच्या ही स्ट्रॅटेजी रणतुंगाने पुढच्या म्हणजे ९६ च्या वर्ल्डकप वेळी वापरली.
त्याकाळी बॉलर म्हणून समजल्या जाणाऱ्या जयसूर्याला ७ व्या नंबर वरून उचलून ओपन करायला लावले. जयसूर्याने कालूवितरणाच्या सोबतीने कॅप्टनचा विश्वास सार्थ करून दाखवला.
१९९६ चा वर्ल्डकप श्रीलंकेना जिंकला यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या जयसूर्याला मॅन ऑफ द सिरीजचे पारितोषिक देण्यात आले.
नव्याने जन्म झालेल्या या खुंखार बॅट्समनने फक्त श्रीलंकाच नाही जगभरातलं क्रिकेट कायमचं बदलून टाकलं.
त्याच वर्षी झालेल्या सिंगर कप मध्ये पाकिस्तानच्या वकार युनूस, आकीब जावेद, सकलेन मुश्ताक यांच्या चिंधड्या उडवत अवघ्या १७ चेंडूत ५० धावा ठोकल्या. हा विश्वविक्रम जवळपास १९ वर्षे कोणी तोडू शकला नाही.
पाकिस्तानविरुद्धच त्याने ४८ बॉलमध्ये शतक ठोकण्याचा जागतिक विक्रम केला मात्र पुढे तो शाहिद आफ्रिदीने मोडला.
श्रीलंकेची मॅच असली तर विरोधी टीमचा निम्मा वेळ डावखुऱ्या जयसूर्याला आउट कसे करायचे यात जायचा. कारण जर आकडेवारी काढली तर जयसूर्या चांगलं खेळला तर लंकेचा विजय होण्याची शक्यता ७५% असायची.
फक्त वनडेमध्येच नाही तर कसोटीतही जयसूर्या ओपनिंगला येत होता. भारताविरुद्धच्या मॅचमध्ये त्याने त्रिशतक झळकवून आजवरच्या क्रिकेटच्या संकल्पना मोडीत काढल्या.
हे चालू असताना दुसऱ्या साईडला बॉलिंग मध्ये खोऱ्याने विकेट गोळा करणे सुरूच होतं.
लंकेचा दुसरा महान खेळाडू मुथय्या मुरलीधरन सोबत त्याची स्पिन जोडी जमली.
तुम्हाला विश्वास बसणार नाही पण जयसूर्याच्या नावावर वनडेमध्ये ३२३ विकेट्स आहेत.
भारताचा हायेस्ट विकेट टेकिंग बॉलर अनिल कुंबळे याच्या खात्यावर ३३७ बळी आहेत. तर जगातला आजवरचा सर्वोत्तम स्पिनर समजल्या जाणाऱ्या शेन वोर्नच्या नावावर तर फक्त २९३ बळी आहेत. भले जयसूर्याने जास्त सामने खेळले असोत पण त्याची बॉलिंग या श्रेष्ठ स्पिनर्सच्या तोडीची होती यात शंका नाही.
आणि बॅटिंगच्या बाबतीत बघायचं झालं तर जयसुर्याने वनडे मध्ये १३,४३० धावा बनवल्या, जे की ब्रायन लारा, इंझमाम उल हक, स्टीव्ह वो अशा महान समजल्या जाणाऱ्या बॅट्समनपेक्षाही मोठा आकडा आहे.
त्याची कारकीर्द उतरणीला लागली होती तेव्हा टी20 क्रिकेटचा उदय झाला.
तो फॉर्मात असताना 20-20 मॅचेस झाले असते तर त्याने तिथेही कधी न तुटणारे रेकॉर्ड बनवून ठेवले असते.
तरीही मुंबई इंडियन्सकडून खेळताना चेन्नईविरुद्ध ठोकलेल्या ४८ बॉलमध्ये ११४ धावा या आजही आयपीएलमधील सर्वश्रेष्ठ इनिंग पैकी एक मानले जाते.
२०११ साली जयसूर्या वनडे मधून रिटायर झाला. कसोटी निवृत्ती त्याने खूप आधीच घेतली होती. त्यांनंतर त्याने श्रीलंकन राजकारणात उडी घेतली.
क्रिकेट चालू असतानाच २०१० साली जयसूर्याने घरच्या माटारा जिल्ह्यातून निवडणुकीत विजय मिळवला होता. निवृत्तीनंतर त्याची निवड श्रीलंकन मंत्रिमंडळात पोस्टल खात्याचा राज्यमंत्री पदी झाली.
पुढे आलेल्या सिरीसेना यांच्या मंत्रिमंडळात जयसूर्याने ग्रामविकास व स्थानिक प्रशासन खात्याच मंत्रीपद भूषवले.
पण राजकारण जयसूर्याला मानवले नाही. याच काळात त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक आरोप करण्यात आले. काही व्हिडीओ लिक केले गेले.
त्याने श्रीलंका टीमच्या निवड समितीत काम करताना घेतलेले निर्णय कसे चुकीचे होते याची चर्चा झाली.
एकेकाळी श्रीलंकेतला सर्वात मोठा स्टार असणाऱ्या जयसूर्याची लोकप्रियता रसातळाला पोहचली. पण जेव्हा श्रीलंका आर्थिक संकटात सापडली, तेव्हा रस्त्यावर उतरून लोकांची मदत करणारा, लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवणारा जयसूर्याच होता. लंकेच्या लोकांसाठी तो हिरो ठरला, मैदानावर आणि मैदानाबाहेरही…
हे ही वाच भिडू.
- १९९६च्या वर्ल्डकपचा खरा हिरो गोल गुबगुबीत अर्जुन रणतुंगा होता.
- जयसूर्याने एका ओव्हरमध्ये मनोज प्रभाकरचं क्रिकेटमधलं करीयर संपवल
- एकेकाळी आपल्या कॅरम बॉलने जगाला धडकी भरवणारा मेंडीस रिटायर झालाय.