शेवटच्या ओव्हरमध्ये वर्ल्डकप जिंकून दिला, आता रस्त्यावर उतरून कोरोनाशी लढा देतोय

पहिल्या 20-20 वर्ल्ड कपचा फायनल. आपले भाऊबंद आणि जन्माचे वैरी असलेले पाकिस्तान समोर होते. मॅच नेहमी प्रमाणे अटीतटीची सुरू होती. शेवटची एकच ओव्हर उरली होती, पाकिस्तानला जिंकायला 13 धावा हव्या होत्या आणि 1 विकेट हातात होती. मिसबाह उल हक स्ट्राईकवर होता.

निम्मं जग टीव्हीसमोर आलं होतं. प्रत्येकाचे हार्ट बिट वाढले होते.

धोनीने बॉल सोपवला जोगिंदर शर्मा कडे.

एवढ्या महत्वाच्या क्षणी अनुभवी हरभजन ची ओव्हर शिल्लक असताना नवोदित जोगिंदर शर्मा कडे ओव्हर का दिली असेल हा प्रश्न अनेकांना पडला. भारतात अनेकांनी धोनीच्या नावाने बोटे मोडली पण तो कुल होता.

जोगिंदर शर्मा मूळचा हरियाणाचा मीडियम पेसर. कामचलाऊ बॅटिंग सुद्धा करायचा. हा 20-20 वर्ल्ड कप म्हणजे त्याची पहिलीच इंटरनॅशनल सिरीज होती. फायनलच नाही तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमी फायनल वेळी देखील धोनीने शेवटची ओव्हर जोगिंदर शर्माला दिली होती.

जोगिंदर शर्माने पहिलाच बॉल वाईड टाकला.

सगळ्या जगाला झहीर खानने 2003च्या वर्ल्ड कप वेळी टाकलेली ओव्हर आठवली. छातीत धस्स झालं. त्यातच जोगिंदर शर्माने दुसरा बॉल फुल टॉस टाकला आणि मिसबाहने त्याला सिक्स हाणला. धोनी आणि जोगिंदर शर्माच्या कुळाचा उद्धार अख्ख्या भारताने केला.

आता पाकिस्तानला जिंकायला 4 बॉल मध्ये 6 धावा लागणार होत्या. अगदी सोपे टार्गेट समोर होते. जोगिंदर शर्माने थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकला, मिसबाहने आपला स्पेशल स्कुप शॉट मारला.

आपल्याला वाटलं मॅच गेली पण किपरच्या मागे उभा असलेल्या श्रीशांतने कोणतीही चूक केली नाही आणि स्टाईल मारत कॅच धरला.

कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीने पाकिस्तानला हरवून पहिला 20-20 वर्ल्ड कप उचलला. त्या दिवशी मॅन ऑफ द मॅच इरफान पठाण होता, सिरीज चा हिरो युवराज सिंग होता.

पण जोगिंदर शर्माची शेवटची ओव्हर कधीच कोण विसरू शकणार नाही.

वर्ल्ड कप मध्ये केलेल्या या कामगिरी मुळे हरयाणा सरकारने जोगिंदर शर्माला 21 लाखाचे कॅश प्राईज दिले व सोबतच पोलीस खात्यात नोकरी देखील दिली.

पुढे जोगिंदर शर्मा नव्या फास्टर बॉलरच्या स्पर्धेत मागे पडत गेला. चेन्नई सुपरकिंग मध्ये पण अपेक्षित यश मिळाले नाही.

त्यातच 2011 साली झालेल्या अपघातानंतर त्याची क्रिकेट कारकीर्द जवळ जवळ संपुष्टात आली. त्याने हरियाणा पोलीस खात्यातल्या नोकरीत मन रमवले.

आज कोरोना व्हायरसने जगभरात उच्छाद मांडला आहे. डॉक्टर नर्स पासून ते पोलिसांपर्यंत प्रत्येक जण युद्धपातळीवर आपली जबाबदारी पार पाडत आहेत. हरयाणा पोलीस मध्ये डेप्युटी सुप्रीटेंडन्ट असलेला जोगिंदर शर्मा सुद्धा यात मागे नाही.

गेल्या वर्षी आलेल्या कोरोनाच्या लाटेत आयसीसी ने आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोत दिसले की जोगिंदर शर्मा रस्त्यावर उतरून लोकांना कर्फ्यु पाळण्याचे आवाहन करत आहे.

जस शेवटच्या ओव्हर मध्ये आपण वर्ल्ड कप जिंकला तसच कोरोना ला देखील हरवु अशी प्रेरणा तो प्रत्येक नागरिकाला देताना दिसत आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.