‘मौका सभी को मिलता है’ शिकवणाऱ्या प्रवीण तांबेची खरी स्टोरी पिक्चर इतकीच भारी आहे…

राम गोपाल वर्माचा पिक्चर आहे, सत्त्या. आता सत्त्या पाहिला नसेल असा माणूस सापडणं अवघड आहे. सत्त्यामध्ये हाणामारी आहे, राजकारण आहे, डान्स आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायलॉग्स आहेत. सत्त्यामधला एक डायलॉग मात्र हातावर गोंदवून घेण्यासारखा आहे. आपल्याला मारायला बघणाऱ्या भिकूच्या गळ्याला सत्त्या वस्तरा लावतो आणि त्याच्या थंड आवाजात बोलतो… ‘मौका सभी को मिलता है.’

मध्यंतरी एक पिक्चर आला ‘कौन प्रवीण तांबे?’ त्यावेळी या डायलॉगची आठवण आली आणि त्याला कारणही तसंच होतं. 

आपण सगळेच आयपीएल बघतो, आपण आयपीएलमुळं प्रवीण तांबेला खेळतानाही पाहिलंय. पण जर २०१२ मध्ये तुम्हाला हाच प्रश्न विचारला असता, तर तुमच्याकडे त्याचं उत्तर नसतं. तुम्हीच पुन्हा एकदा विचारलं असतं, कौन प्रवीण तांबे. पण २०१३ मध्ये हे चित्र बदललं, जे बदलायला जवळपास २५ वर्ष वाट पाहायला लागली होती.

प्रवीण तांबे मुंबईचा. आपल्या मुलुंडमधला. लय पोरांना असतं तसंच क्रिकेटचं येड त्यालाही होतं. पारसी जिमखान्याच्या डी डिव्हिजन टीमपासून सुरू झालेला त्याचा प्रवास, शिवाजी पार्क क्लबचा खेळाडू इथपर्यंत पोहोचला. आझाद मैदान, शिवाजी पार्क या मैदानांवर प्रवीणनं आयुष्यातली अनेक वर्ष घाम गाळला.

२००० साली त्याचं नाव मुंबईच्या रणजी टीमच्या प्रोबॅबल्समध्ये आलं, पण त्याला संधी मिळाली नाही.

प्रवीण तरीही मैदानात उतरायचा, हातात बॉल घ्यायचा. सुरुवातीला प्रवीण मिडीयम पेस टाकायचा, पण त्याच्या टीममेटनं त्याला लेग स्पिन टाकण्याबाबत सुचवलं. तांबेचं करिअर सुस्साट सुटलं. पण तरीही मुंबईच्या टीममध्ये त्याला स्थान मिळत नव्हतं.

ओरीएंटशन शिपिंगमध्ये तांबे जॉब करायचा, दिवसभर काम केल्यानंतर त्याला संध्याकाळी ६ तास सराव करायला मिळायचा. मुंबईच्या डोमेस्टिक लीग्समध्ये तो ओरीएंटशन शिपिंगच्या टीमकडूनही खेळायचा. तांबे ज्या युनिटमध्ये काम करायचा, ते युनिट बंद पडलं आणि त्यानंतर तो डीवाय पाटील टीमकडून खेळू लागला.

दरम्यान आयपीएल सुरू झाली. बऱ्याच टीम्स सरावासाठी डीवाय पाटील स्टेडियमवर यायच्या, तांबे त्यांना सगळ्या सुविधा मिळतायत ना याची काळजी घ्यायचा, या सगळ्यात त्यानं आपलं क्रिकेट थांबवलं नाही. डेक्कन चार्जर्स आणि पुणे वॉरियर्सच्या प्लेअर्ससाठी त्यानं नेट बॉलिंगही केली.

पुढं एका डोमेस्टिक टूर्नामेंटमध्ये तांबेला अचानक खेळण्याची संधी मिळाली आणि याचवेळी त्याच्यावर नजर पडली, राजस्थान रॉयल्सच्या टॅलेंट स्काऊटची. दुसऱ्याच दिवशी त्याला जयपूरला ट्रायल्ससाठी बोलावण्यात आलं आणि तांबे रॉयल्सच्या संघात सिलेक्ट झाला… यावेळी त्याचं वय होतं ४१ वर्ष.

पुढं २०१३ मध्ये त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची मिळाली, त्यानं हॅटट्रिक मिळवली, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बाप कामगिरी केली, त्याला २०१३-१४ मध्ये फर्स्ट क्लास क्रिकेट खेळण्याची संधीही मिळाली आणि वयाच्या ४९ व्या वर्षी तो सीपीएल मध्येही खेळला.

एक साधी नोकरी, छोटासा क्रिकेट क्लब आणि लोकल टुर्नामेंट्समधून असे कितीसे पैसे मिळत असणार? पण तरी प्रवीणनं क्रिकेटची वाट सोडली नाही. त्याला माहीत होतं अपना टाइम आयेगा.

तो रोज मैदानात जायचा, रोज सराव करायचा, दिवसाच्या शेवटी पदरी यश पडायचंच असं नाही. पण प्रवीण दुसऱ्या दिवशी पुन्हा ग्राऊंडवरच दिसायचा…

त्याची बायको एकदा चिडून म्हणली होती, ‘कधीपर्यंत तू हे स्वप्न बघणार आहेस?’ पण प्रवीणचा स्वतःवर विश्वास होता. त्यानं फक्त राजस्थान रॉयल्समध्येच नाही, तर मुंबईच्या रणजी टीममध्येही स्थान मिळवून दाखवलं.

राहुल द्रविड प्रवीण तांबेबद्दल एक फार भारी किस्सा सांगतो, ‘आम्ही जेव्हा प्रवीणला संघात घेतलं तेव्हा त्याचं वय ४१ वर्ष होतं. तो ट्रायल्सला आला तेव्हा एक नवीन मुलगा म्हणाला होता, ‘कौन है ये अंकल’ पण त्या छोट्याशा स्टेडियमवरही प्रवीणनं सिक्स खाल्ला नाही. त्याच्या लेग स्पिनमध्ये जादू होतीच, पण त्याच्यात एक भारी स्पार्क आम्हाला दिसला.’

पहिल्या वर्षी प्रवीणला आयपीएल खेळण्याची संधी मिळाली नाही, पण तो प्रत्येक प्रॅक्टिस सेशनला पहिला यायचा आणि सगळ्यात शेवटी जायचा. आपल्या बॉलिंगमध्ये, आपल्या खेळात काय बदल करता येतील हे सतत विचारत राहायचा. फिटनेस टेस्टमध्येही आवर्जून सहभागी व्हायचा.

अखेर त्याला आयपीएलमध्ये खेळायची संधी मिळाली आणि त्यानं वयाच्या ४२ व्या वर्षी आयपीएल गाजवली. 

जेव्हा त्याला पहिल्यांदा मॅन ऑफ द मॅच मिळालं तेव्हा ड्रेसिंग रुममध्ये येऊन तो अक्षरश: रडत होता. त्यानं उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं एक स्वप्न त्यादिवशी पूर्ण झालं होतं…

त्याचा लय भारी फ्लिपर, बॉलिंगमध्ये व्हेरिएशन्स आणि फटके पडतील याचा विचार न करता बिनधास्त बॉलिंग टाकायची स्टाईल, यामुळं तो यशस्वी ठरला. वजनदार असूनही फिल्डिंगमध्ये त्यानं काही कडक कॅचेस काढले, कुठल्याच मॅचमध्ये तो निरुत्साही किंवा खांदे पडलेला दिसला नाही…

तो प्रत्येकवेळी मैदानात उतरताना एकच गोष्ट डोक्यात ठेवून उतरायचा की ही आपली शेवटची मॅच असू शकते.

जवळपास २५ वर्ष फक्त कष्ट, मुंबईची जर्सी घालण्याचं उराशी बाळगलेलं स्वप्न आणि जेव्हा लोकं क्रिकेट फक्त बघायचा विषय आहे या मतावर ठाम असतात, त्या वयात स्पर्धात्मक क्रिकेट खेळणं… प्रवीण तांबेची स्टोरी पिक्चरपेक्षा मोठी आहे…

जी आपल्याला शिकवते, की नापास झालो तरी पुन्हा परीक्षा देता येऊ शकते. जी आपल्याला शिकवते, की कितीही बेक्कार आपटलो तरी उभं राहता येतं. आणि जी आपल्याला शिकवते की, “मौका सभी को मिलता है.”

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.