जे.पी. कॉलेजच्या पोराला मोठ्ठा हो म्हणाले, तो ‘नरेंद्र दाभोळकर’ झाला..

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशी मराठीत म्हण आहे. या म्हणीला काही शास्त्रीय आधार नसला नाही तरीही अनेकदा ही म्हण आपल्या उक्तीनुसार खरी ठरते. ही म्हण अशाच एका व्यक्तीबद्दल खरी ठरली.

ते व्यक्ती म्हणजेच डॉ. नरेंद्र दाभोलकर….

असाच एक प्रसंग नरेंद्र दाभोलकरांच्या आयुष्यात आला होता. ज्या प्रसंगामुळे दाभोलकरांच्या आयुष्यात बदल करणारी ठरली होती. तो प्रसंग म्हणजे जयप्रकाश नारायण यांनी दाभोलकरांना दिलेला आशीर्वाद.

परंतु दाभोलकरांना हा आशीर्वाद मिळण्यामागे त्यांचे बंधू दत्तप्रसाद दाभोळकर यांचा वाट आहे.

नरेंद्र दाभोलकरांचे मोठे बंधू देवदत्त दाभोळकर हे मोठे प्राध्यापक होते. निव्वळ प्राध्यापकच नाही तर मोठे गांधीवादी आणि समाजवादी नेते सुद्धा होते. त्यांना भेटण्यासाठी अनेक समाजवादी नेते येत होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, श्री श भणगे, प्रा. रेगे यांसारखी मोठं मोठी मंडळी सुद्धा अधून मधून घरी येत होती.

डॉ. नरेंद्र दाभोलकर अवघे २४ वर्षांचे होते. त्याच वर्षी नरेंद्र दाभोलकरांनी मिरजेच्या सरकारी मेडिकल कॉलेज मधून एमबीबीएस पूर्ण केलं होतं. 

त्यांचे बंधू दत्तप्रसाद दाभोळकर यांना भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे आणि भावाच्या कामामुळे नरेंद्र दाभोलकरांना सुद्धा समाजासाठी काहीतरी काम करावं असं वाटायचं.

त्याच काळात युवा क्रांती दलाचे नेते कुमार सप्तर्षी यांचं नाव गाजत होतं.

कुमार सप्तर्षी हे  बिहारमधील दुष्काळ, फी वाढ या मुद्यांवर आंदोलनं करत होते. कुमार सप्तर्षी आपल्या मुद्द्यांची मांडणी अगदी मुद्देसूद आणि रोखठोकपणे करायचे त्यांच्यामुळे नरेंद्र दाभोलकर खूप प्रभावित झाले होते. त्याच प्रभावामुळे कुमार सप्तर्षी यांची काही व्याख्याने सांगलीच्या कॉलेजमध्ये आयोजित करण्यासाठी नरेंद्र दाभोलकरांनी पुढाकार घेतला होता.

नरेंद्र दाभोलकर कुमार सप्तर्षींच्या विचारांनी प्रभावित झाले होते मात्र खऱ्या अर्थाने सामाजिक कार्याची प्रेरणा निश्चित झाली ती जयप्रकाश नारायण यांच्यामुळे….

१९६९ मध्ये अखिल भारतीय सर्वोदय संघाचे अधिवेशन सांगलीत होणार होते. सर्वोदय संघाच्या आधिवेशनासाठी समाजवादी नेते आणि सर्वोदय चळवळीचे प्रमुख जयप्रकाश नारायण आणि त्यांच्या पत्नी प्रभादेवी दोघेही येणार होते. १९६९ मध्ये जयप्रकाश नारायण यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी पदार्पण केलं होतं.

जे पींना ६७ वर्ष लागल्यामुळे भेटवस्तू म्हणून ६७ हजार रुपये देण्याचं निश्चित करण्यात आलं. भेट म्हणून ६७ हजार रुपये गोळा करण्यासाठी एक समिती बनवण्यात आली होती. त्या समितीचे कार्याध्यक्ष दत्तप्रसाद दाभोळकर होते.

सांगलीला आल्यांनतर योगायोगाने जे पी आणि प्रभादेवी यांच्या राहण्याची व्यवस्था दाभोलकरांच्या बंगल्याशेजारी असलेल्या कॉलेजच्या गेस्टहाऊस मध्ये करण्यात आली होती. 

नरेंद्र दाभोलकरांचे बंधू समितीचे कार्याध्यक्ष आणि बंगल्याच्या शेजारीच गेस्टहाऊस असल्यामुळे नरेंद्र दाभोलकर स्वयंसेवक म्हणून तीन दिवस जे पीं सोबत होते. 

अधिवेशनाच्या तीनही दिवस सोबत राहिल्यामुळे जे पी आणि नरेंद्र दाभोलकर यांची चांगलीच ओळख झाली होती. एवढा मोठा नेता सांगलीत आल्यामुळे अनेक जण जे पी आणि प्रभादेवी यांच्यासोबत समूहाने फोटो काढत होते.

नरेंद्र दाभोलकर तीन दिवस जे पींबरोबर राहिले होते त्यामुळे जेपींबरोबर एकट्याने सुद्धा फोटो काढता येऊ शकत होता. परंतु दाभोलकरांच्या मनात कायम एकाच विचार घोंगावत होता. तो म्हणजे इतक्या मोठ्या माणसाबरोबर फोटो काढण्याची आपली लायकी आहे का? त्याच्यामुळे दाभोलकरांनी जे पींबरोबर फोटो काढणे टाळले होते.

अधिवेशनाचे तीन दिवस संपले आणि चौथ्या दिवशी जे पी आणि प्रभादेवी यांच्या जाण्याची तयारी सुरु झाली. नरेंद्र दाभोलकर सुद्धा त्या दिवशी घरीच होते. जे पी आणि प्रभादेवी जाण्यासाठी गाडीत बसले होते.

परंतु अचानक जेपींनी गाडीच्या जवळच असलेल्या दत्तप्रसाद दाभोळकरांना आवाज दिला आणि जे पी दत्तप्रसादांना म्हणाले तुमच्या भावाला बोलवा. त्याची भेट घ्यायची राहून गेलीय.

हे ऐकताच दत्तप्रसाद यांनी दाभोलकरांना आवाज दिला. भावाचा आवाज ऐकून दाभोलकर बाहेर आले आणि जे पींच्या गाडीजवळ येऊन उभे झाले. नरेंद्र दाभोलकरांना बघून जेपींनी खिडकीचीची काच उघडली.

खिडकीची काच उघडल्यानंतर जे पींनी दाभोलकरांचा हात आपल्या हातात घेतला आणि तीन दिवसांच्या स्वयंसेवेबद्दल धन्यवाद दिला.

जे पींनी दाभोलकरांना धन्यवाद तर दिलाच परंतु दाभोलकरांकडे बघून आशीर्वाद देत म्हणाले, “कुछ बनो” 

असा आशीर्वाद देऊन जे पी आणि प्रभादेवी आपल्या पुढच्या प्रवासासाठी निघून गेले. जे पी निघून गेले मात्र त्या क्षणापासून पुढचे काही दिवस दाभोलकर अस्वस्थ होते.

याच अस्वस्थतेमधून दाभोलकरांना मोठी प्रेरणा मिळाली. १९७१ मध्ये इंटर्नशिप पूर्ण करून दाभोलकर साताऱ्याला गेले. दाभोलकर कबड्डीपटू असल्यामुळे साताऱ्यात क्रीडासंस्थेत सहभागी झाले. क्रीडासंस्थेवर काँग्रेसचे वर्चस्व होते त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांचा शब्द प्रभावी होता.

पुढे यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनात समाजवादाच्या विचारसरणीतून ‘समाजवादी युवक दलाची’ स्थापन करण्यात आली. त्याच समाजवादी युवक दलामधून दाभोलकरांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात केली. आयुष्यात समाजासाठी काहीतरी करायला हवे या दाभोलकरांच्या मनातील अस्वस्थ भावनेला जेपींच्या दोन शब्दांमुळे मूर्त रूप मिळाले होते.

त्याच कार्याला पुढे नेत डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी आपली नोकरी तयारी आणि स्वतःला कायमसाठी समाजसेवेला वाहून घेतले.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.