साताऱ्यात दाभोलकरांची कबड्डीवाली ‘हनुमान उडी’ सुपरहिट होती.

सातारा मध्ये राहणारं दाभोलकर कुटुंब. फौजदारी वकील म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अच्युतराव दाभोलकरांना दहा मुलं. सात मुले आणि तीन मुली. हे दहाच्या दहा जण आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी जाऊन पोहचलेले. कोणी विद्यापीठाचे कुलगुरू तर कोणी वैज्ञानिक, कोणी एमडी, कोणी डॉक्टरेट आणखी काही.

थोरले देवदत्त दाभोलकर म्हणजे अगदी गांधीवादी देवमाणूस.

पहिलीपासून शाळेतला पहिला नबर कधी सोडला नाही. मॅट्रिकला तर कराचीपासून कारवार पर्यंत पसरलेल्या अख्ख्या मुंबई इलाख्यात प्रथम क्रमांक पटकावलेला. याच्या अगदी उलट म्हणजे सर्वात धाकटे नरेंद्र. त्यांच्या दोघांमध्ये तब्बल सव्वीस वर्षांचे अंतर होते.

हेच अंतर अभ्यासाच्या बाबतीत देखील होते. नरेंद्र दाभोलकर शाळेत अभ्यास सोडून इतर खोडी करण्यात त्यांना जास्त रस असायचा.

ते व त्यांच्याहून थोरले बंधू दत्तप्रसाद जे पुढे जाऊन मोठे संशोधक बनले हे दोघेही शालेय अभ्यासात जेमतेमच होते. तसंही घरच्यांचा अभ्यासासाठी आग्रह नसायचा. त्यामुळे या दोघांचा जास्तीतजास्त वेळ मैदानातच जायचा.

मॅट्रिकला अनुक्रमे ४८ आणि ४७ टक्के मार्क मिळालेले होते.

एका वेळी दहा दहा भाकऱ्या खाण्याची शर्यत लावणारे हे दोन्ही महाभाग कबड्डीमध्ये मात्र चॅॅॅम्पियन होते. मोठा दत्तप्रसाद उर्फ बंड्या तर सातारा जिल्ह्याच्या कबड्डी टीमचा कर्णधार होता. एकदा याच कबड्डीमुळे दोघांची भांडणे गावभर गाजणार अशी लक्षणे दिसत होती.

झालं अस होतं की सातारला तेव्हा दोन बलाढ्य अशी क्रीडामंडळे होती. श्रीकृष्ण आणि शिवाजी.या दोन्ही मंडळाच एकमेकांशी पटायचं नाही.

कबड्डीवरून दोन्ही टीम तुफान भांडायच्या. त्यांचे सामने एखाद्या युद्धाप्रमाणे खेळले जायचे, दत्तप्रसाद दाभोलकर हे श्रीकृष्ण मंडळाचे खेळाडू. तिथे नावाजलेले. शिवाजी मंडळाच्या नाकावर टिच्चून त्यांनी साताऱ्याच कर्णधारपद मिळवल होतं.

पण तरीही त्यांचा लहान भाऊ नरेंद्र शिवाजी उदय मंडळाकडून खेळण्यासाठी गेला. दत्तप्रसादच म्हणण होतं की नरेंद्रने ही श्रीकृष्ण संघाकडूनच खेळल पाहिजे. त्यांचे मित्र त्यांना तुझा भाऊ शत्रू टीमकडून खेळतो म्हणून हिणवायचे. घरच्यांनी समजावून सांगण्याची सोय नव्हती. त्यांनी प्रत्येकाला काहीही करण्याचे स्वातंत्र्य दिलेले होते. दत्तप्रसादनां वाटायचं की आपल्या भावाला शिवाजी संघाचे लोक माझा खबऱ्या समजून त्रास देतील.

पण झालं उलटंच.

प्रचंड कष्ट, जबरदस्त खेळ, प्रामाणिक पारदर्शक स्वभाव, संघटन कौशल्य याच्या जोरावर नरेंद्र फक्त शिवाजी उदय टीमचाच नव्हे तर अख्ख्या साताऱ्याचा कबड्डीचा हिरो बनला.

त्याची हनुमान उडी प्रचंड फेमस बनली. समोरून पकड करण्यास कोणी आल्यास ते पायात स्प्रिंग असल्यासारखी उडी मारत. एका जागेवर उभ्या उभ्या सहा फुटांपर्यंत ती उडी जायची. 

शाळेत वांड म्हणून ओळखला जाणारा नरेंद्र कबड्डीमुळे सुधारला. पुढे जाऊन शिवाजी विद्यापीठाचा, महाराष्ट्र राज्याचा कबड्डी कप्तान बनला. एवढच नव्हे तर भारताची पहिली आंतरराष्ट्रीय कबड्डी टीम बनण्यात आली त्यात त्यांचा समावेश होता. त्यांना शिवछत्रपती युवा क्रीडा पुरस्कार मिळाला.

या दरम्यान शिक्षणाकडे त्यांनी दुर्लक्ष केले नाही. मिरजेच्या शासकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. स्वतःचा दवाखाना सुरु केला. पण त्यानंतरही कबड्डीची साथ सोडली नाही.जवळपास वीस पंचवीस वर्षे ते कबड्डी खेळत होते. मराठीतलं कबड्डीच्या नियमाच पहिलं पुस्तक देखील त्यांनीच लिहीलय.

पुढे काही वर्षांनी नरेंद्र दाभोलकरांनी आपली डॉक्टरकीची प्रॅक्टीस बंद केली आणि पूर्ण वेळ अंधश्रद्धा निर्मुलनाच्या चळवळीला वाहून घेतल.

राज्याचा कानाकोपरा धुंडाळून काढला. महाराष्ट्रात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजावा यासाठी जिद्दीने प्रयत्न केले. धार्मिक बाबतीत ढवळाढवळ करतो म्हणून त्यांच्यावर टीकाही झाली. यानिमित्ताने अनेकांशी वाद झाले. पण नरेंद्र दाभोलकर सर्वाना पुरून उरले.

तस बघायला गेल तर अंधश्रद्धा निर्मुलन आणि कबड्डी यांचा अर्थार्थी काही सबंध नाही. पण दाभोलकर आपल्या विवेकाच्या चळवळीच श्रेय अनेकदा कबड्डीला द्यायचे. ते म्हणायचे,

मला लढण्याची, संघटना उभा करण्याची प्रेरणा ही कबड्डीची देन आहे. सांघिक भावना, जिंकण्याची हरण्याची सवय, मेहनत केल्याशिवाय फळ मिळणार नाही हा मंत्र हे सगळ मला कबड्डीमुळे मिळालं. कबड्डी खेळताना मी सुद्धा इतर खेळाडूंप्रमाणे अंधश्रद्धाळू होतो पण याच खेळाने मला त्यातला फोलपणा दाखवून दिला.

पुढे दुर्दैवाने त्यांचा पुण्यात सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असता काही हल्लेखोरांनी गोळ्या घालून खून केला. तेव्हा साताऱ्यातले लोक म्हणाले,

 ‘नरुभाऊचे (कबड्डीतील लोक त्यांना या नावाने ओळखायचे) मारेकरी मागून आले म्हणून, ते जर समोरून आले असते तर नरुभाऊनी नक्की हनुमान–उडी मारली असती.’

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.