भिडूंनो, महाराष्ट्रात असंही एक गाव आहे जिथे १३०० च्या शतकापासून कागद बनवला जातो

महाराष्ट्राची एक खासियत आहे. निसर्गाने आणि इतिहासाने महाराष्ट्राला भरभरून दिलं आहे. वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांसहित अनेक ऐतिहासिक वारसे महाराष्ट्राला लाभले आहेत. अशा या महाराष्ट्रात ऐतिहासिक शहर म्हणून औरंगाबादने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अनेक ऐतिहासिक वास्तुंनी औरंगाबाद जिल्हा संपन्न तर आहेच मात्र ऐतिहासिक गावांसाठीही हा जिल्हा ओळखला जातो.

असंच एक ऐतिहासिक गाव म्हणजे ‘कागजीपुरा’. औरंगाबादमधील हे असं गाव आहे जे सर्वात प्राचीन आहे. अगदी शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्याही आधीच्या काळापासून हे गाव अस्तित्वात आहे. ते म्हणजे १३०० च्या शतकापासून. इतकंच नाही तर तेव्हापासून या गावाने त्यांचा व्यवसायही कायम ठेवला आहे. कोणता? कागद बनवण्याचा.

कागद बनवण्याच्या व्यवसायामुळेच या गावाला ‘कागजीपुरा’ असं नाव पडलं आहे.

औरंगाबादची मुख्य ओळख म्हणजे देवगिरी किल्ला, ज्याला दौलताबाद असंही आपण आज ओळखतो. १३०० च्या शतकातही या किल्ल्याने सगळ्याच राजांना भुरळ पडलेली होती. या किल्ल्याची रचना, तटबंदी, आणि वैशिष्ट्ये बघून अनेक राजा नेहमी याला काबीज करण्याच्या तयारीत असायचे. शिवाय या किल्ल्याचं वैभवही मोठं होतं. पण हा किल्ला जिंकणं सहज शक्य नव्हतं.

या गोष्टीची जाणीव असल्याने आक्रमण करण्यासाठी येणारे राजे आपल्यासोबत सर्व साधन-सामग्री घेऊन येत असायचे. कारण किल्ला काबीज करण्याची झुंज अनेक वर्ष चालायची. असंच एकदा देवगिरीवर मोहम्मद तुघलकची नजर पडली. त्याला या किल्ल्याचा मोह आवरला गेला नाही आणि त्याने १३०० मध्ये किल्ल्यावर स्वारी करण्याचं ठरवलं.

किल्ल्याला वेढा मारून बसने आणि किल्ल्यातील लोकांचा बाहेरील जगाशी संपर्क तोडणे हे त्यावेळचं मुख्य हाथियार असायचं. कारण कधी ना कधी किल्ल्यातील लोकांची जीवनावश्यक साधनं संपतील आणि त्यांना समझोता करावा लागेल, हे साधारण गणित असायचं. या रणनीतीनुसार जेव्हा किल्ल्यावरील साधन सामग्री संपायची तेव्हा ‘तह’ केला जायचा.

मोहम्मद तुघलकाने हेच हत्यार वापरून किल्ला ताब्यात घेतला. त्याचं देवगिरीवर इतकं प्रेम जडलं होतं की त्याने १३२७ मध्ये आपली राजधानी दिल्लीहुन देवगिरी इथे आणली. शिवाय आपल्या राज्यातील सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने देवगिरीत स्थायिक होण्याचे आदेश दिले. त्याच काळात कागद निर्मिती करणारे कारागीरदेखील देवगिरी किल्ल्याच्या परिसरात स्थायिक झाले.

या कारागिरांनी सुरुवातीला किल्ल्याच्या पायथ्याशीच आपला कागद निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. हे कारागीर दिवस-रात्र कागद निर्मिती करायचे. मात्र, सर्व काम हाताने करत असल्याने काम करताना खूप आवाज होत असायचा. या प्रक्रियेत मोठमोठे उखळ, कच्चा माल बारीक करण्यासाठी यंत्राचा वापर केला जात होता. जेव्हा या कर्कश्श आवाजाने किल्ल्यात राहणाऱ्या राजकन्येची झोपमोड व्हायला लागली तेव्हा राजाने या कारागिरांना किल्ल्यापासून दूर जायला सांगितलं. 

त्यानुसार राजाने डोंगररांगेच्या पलीकडे जागाही उपलब्ध करून दिली आणि त्याच ठिकाणी कागद निर्मितीचं काम करण्याचे आदेश दिले. हे सर्व कागद बनवणारे कारागीर एकत्र वस्ती करून राहू लागले आणि या वस्तीचं हळूहळू गावात रूपांतर झालं.

 गावातील सर्व लोक एकच काम करत असल्याने गावाचं नाव नंतर ‘कागजीपुरा’ असं ठेवण्यात आलं.

गाव अस्तित्वात आलं, तेव्हा त्यांना पिण्यासाठी तसंच व्यवसायासाठी मुबलक पाणी असावं म्हणून राजाने या ठिकाणी मोठ्या तलावाची निर्मितीही केली. या तलावाचं बांधकाम संपूर्ण दगडाच्या चिऱ्यामध्ये करण्यात आलं. तिन्ही ऋतूमध्ये या तलावातील पाणी आटत नसे पण जर पाण्याचा स्तर कमी झालाच तर  नागरिकांना पाणी भरण्यास सोपं जावं म्हणून पायऱ्यांची निर्मितीही करण्यात आली. 

हा तलाव आजही इथे असून स्थानिक सांगतात की या तलावाची खोली साधारण ५० ते ६० फूट आहे. तसेच यामध्ये एक विहीरदेखील आहे. 

मात्र ज्या गोष्टीसाठी हे गाव ओळखलं जातं त्याची आज दुर्दशा झाली आहे. एकेकाळी या गावात निर्माण होणारा कागद हा राज्यातील अव्वल दर्जाचा कागद मानला जात होता. हा कागद पूर्णपणे हाताने बनवला जायचा. यामध्ये जुने कपडे कापून त्याचे बारीक बारीक तुकडे करून लगदा तयार केला जायचा. शिवाय कापूस आणि काही वनस्पती, रद्दी कागद टाकले जायचे. या सर्वांचं मिश्रण करून पारंपरिक पद्धतीने कागद तयार केला जात होता. 

ही ओळख टिकवून ठेवण्यासाठी गावातील लोकांनी खूप प्रयत्न केले. काही स्थानिक नागरिकांनी एकत्र येत या ठिकाणी कागद निर्मितीचा कारखाना उभारला. मात्र पुरेसं भांडवल नसल्याने तो कारखाना बंद पडला आणि काळाच्या ओघात या गावाची ओळख नामशेष झाली. या ठिकाणी कारखाना, कारागीर आहेत, मात्र कागद निर्मिती बंद आहे. फक्त गावाचं नाव कागजीपुरा उरलं आहे. 

असं असलं तरी अजून आशा जिवंत आहे. या गावात यंत्रसामग्री सुस्थितीत आहे. तेव्हा शासनाने याकडे लक्ष दिलं तर पुन्हा इथे नैसर्गिक पद्धतीने कागद निर्मिती सुरू होऊ शकते आणि याने गावातील अनेक महिला आणि तरुणांना रोजगाराच्या संधीही प्राप्त होऊ शकतात. आपला ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी शासनाने आता पाऊल उचलणं गरजेचं आहे.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.