फक्त बाबासाहेबांनीच नाही तर त्यांचे वडील रामजींनीही इंग्रज सत्तेवर आपला वट बसवला होता

स्वतंत्र भारताचे शिल्पकार, शेतकऱ्यांचे कैवारी, भारतीय संविधानाचे जनक, दलितांचे नायक असं म्हटलं की नेमकं पुढचा व्यक्ती कुणाबद्दल बोलतोय याची लगेच खात्री होते. ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांच्या जयंतीला, त्यांच्या महापरिनिर्वाण दिवसाला त्यांच्याबद्दल खूप माहिती आपल्याला बघायला, वाचायला मिळते. इतकंच नाही तर या व्यतिरिक्तही असे अनेक क्षण मिळतात जेव्हा बाबासाहेबांची आठवण होते.

आज समाजात कुणाच्याही हक्काची पायमल्ली होताना दिसली की आपण संविधानाचा आधार घेतो. या संविधानाने आपल्याला हक्कासाठी लढण्याची ताकद दिलीये. पण हे संविधान ज्यांनी आपल्याला दिलं त्यांना त्यांच्या हक्कासाठी लढण्याची ताकद आणि चुकीच्या गोष्टीला चूक म्हणायचे संस्कार ज्यांनी दिले ते म्हणजे रामजी सपकाळ.

बाबासाहेबांच्या रक्तातच शौर्य आणि धाडस भरलं ते त्यांचे वडील रामजी सपकाळ यांनी.

रामजी सपकाळ यापेक्षा रामजी आंबेडकर म्हटलं तर लवकर लक्षात येईल. कारण याच नावाने त्यांना आज ओळखलं जातं. मात्र त्यांचं मूळ आडनाव हे सपकाळ होतं.

रामजी यांच्या वडिलांचं नाव मालोजी. त्याकाळात मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. मालोजीरावांना चार अपत्ये होती. त्यातील रामजी हे सर्वात लहान होते. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८४८ चा. रामजी लहानपणापासूनच साहसी होते. लढाई, सैन्य याचं त्यांना खूप अप्रूप वाटायचं. वडिलांना आणि इतर सैनिकांना जेव्हा ते प्रॅक्टिस करताना बघायचे तेव्हापासूनच त्यांना सैन्यात जाण्याची आवड निर्माण झाली.

त्यानुसार त्यांनी आपला निर्णय घेतला आणि मालोजींना सांगितलं की त्यांनाही सैन्यात काम करायचं आहे. मालोजींनी त्यांच्या इच्छेकडे बघत रामजींना सैनिकी शाळेत भरती केलं. रामजी मुळातच जिद्दी होते शिवाय शिक्षणातही हुशार होते. त्यातही आपल्या आवडीचं शिक्षण मिळत असल्याने रामजी लवकरच सैन्यातील नॉर्मलची परीक्षा उत्तीर्ण झाले.

शिक्षण सुरू असतानाच रामजी इ.स. १८६६ च्या सुमारात इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स ॲंड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. तेव्हा ते अवघे १८ वर्षांचे होते.

त्याकाळी लवकर लग्न करण्याची पद्धत होती. रामजींना नोकरी मिळाली आणि आता ते घर चालवू शकतात याची खात्री येताच मालोजींनी १९ व्या वर्षी त्यांचं लग्न लावून दिलं. अशाप्रकारे महानायकाच्या जननी भीमाबाईंचा रामजींच्या आयुष्यात प्रवेश झाला. विवाहाच्या वेळी भीमाबाई फक्त १३ वर्षांच्या होत्या, त्यामुळे रामजींना याची जाणीव होती की हे नातं खूप संवेदनेने त्यांना पुढे न्यावं लागणार आहे. 

रामजी स्वतः शिक्षण घेत तर होतेच मात्र सोबतच भीमाबाईंनाही शिक्षित करत होते. एखादी नवीन माहिती मिळाली किंवा काही नवीन ते शिकले तर त्याबद्दल ते अगदी मोकळेपणाने भीमाबाईंना सांगत असत. ज्यामुळे भीमाबाईंच्याही ज्ञानात भर पडत असे. त्यांनी नेहमीच भीमाबाईंना आदराने आणि समानतेने वागणूक दिली. 

हेच गुण पुढे बाबासाहेबांमध्ये गेल्याने ‘समता’ हे बाबासाहेबांचं मूल्य जगला मिळालं. 

रामजींना धार्मिक गोष्टींची फार आवड होती. कबीराचे दोहे, ज्ञानेश्वर, नामदेव, चोखोबा, एकनाथ, तुकाराम अशा संतांचे अभंग त्यांनी पाठ केले होते आणि ते भीमाबाईंकडूनही पाठ करून घ्यायचे. शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे, हे त्यांचं म्हणणं होतं. हेच ध्येय पुढे ठेवून भीमरावांनी आयुष्यभर कार्य केलं. 

सैन्यात शिपाई असताना सैनिकी शाळेत त्यांना इंग्रजी भाषेचं शिक्षण मिळालं. त्यांनी इंग्रजी उत्तमरित्या आत्मसात केली, ज्यामुळे ते मॅट्रिक परीक्षा उतीर्ण झाले आणि शिपाई पदावरून सैनिकी शाळेत म्हणजेच ‘नॉर्मल स्कूल’मध्ये शिक्षक पदावर त्यांची बढती झाली. त्यांच्या कामाकडे बघून लवकरच पुढे ते मुख्याध्यापक बनले आणि या पदावर ते चौदा वर्ष राहिले. 

शिपाई असताना आणि पुढे शिक्षक म्हणून कार्य करताना त्यांनी कधीही त्यांच्या सहकाऱ्यांसोबत भेदभाव केला नाही. माणसाला माणूस म्हणून वागणूक देणं, हा त्यांचा स्वभाव होता. जरी ते उच्च पदावर असले तरी नेहमी प्रत्येकाशी बंधुभावाने वागायचे. याचमुळे त्यांचे साथीदार त्यांना भरभरून प्रेम द्यायचे. 

त्यांच्या याच स्वभावगुणातून ‘बंधुता’ हे मूल्य आबेडकरांनी आत्मसाद केलं.

मुख्याध्यापक पदाच्या अखेरच्या टप्प्यात रामजींना ‘सुभेदार’ पद मिळालं. याच काळात रामजी ज्या पलटणीत होते ती पलटन इ.स. १८८८ मध्ये मध्य प्रदेशातील ‘महू’ इथल्या लष्करी तळावर आली होती. इथेच त्यांना त्यांचे सर्वात लहान चौदावे अपत्य झाले ते म्हणजे भीमराव. रामजींनी आपल्या सर्व अपत्यांना हवं ते शिक्षण घेण्याचा आणि हवं तसं जीवन जगण्याचं स्वातंत्र्य दिलं होतं. मुलांच्या निर्णयात त्यांनी कधीही अडथळा आणला नाही, रोकटोक केली नाही. दिली ती फक्त साथ आणि खंबीर आधार.

इथूनच बाबासाहेबांना ‘स्वातंत्र्य’ या मूल्याची ओळख झाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी मूल्य जगाला दिली, ज्या मूल्यासाठी त्यांनी आयुष्य खर्ची केलं आणि आजही बाबासाहेबांच्या ज्या मूल्यांचा प्रसार करण्याचा प्रयत्न त्यांचे अनुयायी करताना दिसतात त्यांची प्रेरणा खरंतर बाबासाहेबांना त्यांच्या वडिलांकडून मिळली होती. बाबासाहेबांच्या स्वभावाचे आणि त्यांच्या गुणाचे खरे शिल्पकार त्यांचे वडील रामजी सपकाळ होते. 

रामजींकडून वारशाने मिळालेल्या ‘स्वातंत्र्य’, ‘समता’ आणि ‘बंधुता’ या मूल्यांमुळेच ‘भारतरत्न’ घडले आणि हीच मूल्ये आज भारत घडवतायेत.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.