औरंगाबादमधल्या जिल्हा परिषदच्या शाळेतली पोरं थेट जपानी भाषेत गप्पा मारतात….

शिक्षण पूर्ण झाल्यावर शहरात आलो तेव्हा गावाकडचं पोरं म्हणून जरा जास्तच डिप्रेशन मध्ये असायचो. कारण पण तसचं होतं, आत्मविश्वास कमी, इंग्रजीची बोंब होती. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो असं सांगितलं की, सोबतची नाकं मुरडायची. त्यांचं इंग्रजी ऐकून गप्प बसायला लागायचं.

पण औरंगाबादमधल्या एका जिल्हा परिषदेच्या शाळेबद्दल काल वाचलं आणि चक्कीत जाळ झाला. कारण इथली पोरं इंग्रजी तर बोलतेतच पण एकेमकांच्यात गप्पा मारताना त्या थेट जपानी भाषेत असतात. मग म्हंटल ते तुमच्या समोर मांडावच.

तर औरंगाबाद पासून २५ किलोमीटरवर असलेलं गडिवत गाव. जेमतेम १००० – १२०० लोकसंख्या. इथं अजून रस्त्यासारख्या बेसिक सुविधा पण अजून नीट नाहीत, पण इंटरनेटमुळं पोरं थेट जपानची भाषा शिकलेत.

या जिल्हा परिषदेच्या शाळेनं सप्टेंबर २०१९ मध्ये एक परदेशी भाषा कार्यक्रम सुरू करण्याच निर्णय घेतला होता. या कार्यक्रमांतर्गत चौथी ते आठवपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आपली कोणतीही आवडती एक भाषा निवडण्यास सांगितलं. त्यामध्ये जास्तीत जास्त पोरांनी रोबोटिक्स आणि टेक्नॉलॉजीचं ज्ञान मिळवण्याच्या इच्छेनं जपानी भाषेची निवड केली.

शाळेत जपानी भाषा शिकवण्यासाठी कोणताही ठरवून दिलेला अभ्यासक्रम किंवा तज्ज्ञाचं मार्गदर्शन नव्हतं, पण तरीही शाळेच्या प्रशासनानं इंटरनेटवर विश्वास ठेवत हे आव्हान स्वीकारलं. त्यांनी व्हिडिओ आणि अनुवादासारख्या प्रयोगांची माहिती एकत्र करत मुलांना शिकवायला सुरुवात केली.

शाळेची विद्यार्थ्यांना जपानी भाषा शिकवण्याची आणि मुलांची शिकण्याची धडपड कळल्यानंतर औरंगाबादचे जपानी भाषा तज्ञ सुनील जोगदेव यांनी शाळेशी संपर्क साधला. त्यांनी या मुलांना फ्री ऑनलाइन वर्ग घेण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यानुसार त्यांनी जुलै महिन्यात २० ते २२ सत्र घेतली देखील.

ते वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले होते,

विद्यार्थ्यांना शिकण्याची ओढ आहे. कमी वेळेत खूप काही शिकले आहेत. त्यांची आकलनशक्ती चांगली आहे.

कोरोना काळात बऱ्या पैकी मुलांकडे ऑनलाइन वर्गांसाठी स्मार्टफोन होते. त्यामुळे शाळेनं ‘विश्वमित्र’ नावाचा उपक्रम सुरू केला. मुलं जे काही ऑनलाइन शिकतात ते त्यांच्या सोबतच्यचा मुलांना शिकवतात.

सहावीत शिकणारी एक अमृता राजेश सांगते, जपान एक टेक्नॉलॉजीने परिपूर्ण देश आहे, मी तिथं जाऊ इच्छिते आणि तिथलं तंत्रज्ञान शिकण्याची इच्छा आहे. पुढे तेच सगळं तंत्रज्ञान भारतात घेऊन येणार आहे.

तर आठवीत शिकणारी सुईक्षा सांगते, आम्हाला जपानी भाषा शिकताना मजा येते, आम्ही सध्या यातील पहिली लेव्हल पार केली आहे, सध्या आम्ही जपानी भाषेत बोलू शकतोय, मी जपानला जाऊन रोबोटिक्स शिकू इच्छिते.

सध्या शाळेत ३५० हून अधिक विद्यार्थी आहे. यापैकी ७० जण जपानी भाषा शिकत आहेत. 

राष्ट्रीय जपानी भाषा आणि भाषा विज्ञान संस्थेचे प्राध्यापक प्रशांत परदेशी यांना जेव्हा या उपक्रमाबद्दल समजलं तेव्हा त्यांनी फोन वरून या प्रकल्पाबद्दल माहिती घेतली, आणि या भाषेला अजून व्यवस्थित शिकता यावं यासाठी मदत करण्याचं ठरवलं.

परदेशी जवळपास २५ वर्षांपासून जपानमध्ये राहत आहेत. त्यांनी या मुलांसाठी मराठी आणि जपानी भाषेतील पुस्तकांचे ६ सेट गडिवत शाळेपर्यंत पोहचवले.  यात एक जपानी – मराठी भाषेतील शब्दकोश, अनुवादित गोष्टींची पुस्तक, आणि व्याकरण या अन्य विषयांवरच्या पुस्तकांचा समावेश आहे.

जिल्हा परिषेदेच्या शाळेतील पोरं फाडफाड जपानी भाषेत बोलत आहेत, हे नक्कीच राज्यभरातील जिल्हापरिषदेच्या शाळांसाठी आदर्श निर्माण करणार चित्र आहे.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.