खेळातल्या राजकारणाला वैतागली होती, थाळीफेक सोडून क्रिकेटमध्ये करियर करायचं ठरवलेलं.

निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हणतात, पण भारतीय महिला थाळी फेकपटू कमलप्रीत कौरच्या बाबतीत तर निंदकचं घरात असल्याचं जाणवतं. टोकियो ऑलम्पिकमध्ये थाळीफेक या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरताना कमलप्रीतने ६४ मीटर अंतरावर थाळी फेकली.

क्रोएशियाची सॅन्ड्रा पेरकोविक हि गेल्या दोन म्हणजे लंडन व रिओ ऑलिम्पिकची सुवर्णपदक विजेती आहे. तिच्यापेक्षाही तिने थाळी दूरवर फेकली.

कमलप्रीत म्हणते,

पेरकोविकला पात्र ठरताना ६३ पॉईंट ७५ मीटर अंतरावर थाळी फेकता आली, तिने माझे अभिनंदन केले. ती जेवत होती पण तरीही ती उठून माझ्यापर्यंत आली आणि कौतुकाची थाप पाठीवर मारली. अमेरिकेची आलमान हिने ६६.४२ मीटरवर थाळी फेकून सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. ती माझ्या जवळ आली आणि अभिनंदन केले. दोन प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या खेळाडूंनी दाखवलेल्या माणुसकीमुळे मी गहिवरले.

या तुलनेत माझ्या सहकाऱ्यांकडून मिळणारी वागणूक मला उद्विग्न करते. कोणत्याही पुराव्याशिवाय माझी ज्येष्ठ सहकारी जी या स्पर्धेत माझ्यासह उतरली आहे ती माझ्या क्षमतेबाबत शंका व्यक्त करते.

सीमा पुनीया कमलप्रीतला सीनियर. टोकियो ऑलम्पिकच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकली नाही तिने याआधी कमलप्रीतच्या ६६. ५९ मीटर आणि ६५.०६ मीटर्स थ्रो नंतरही वाईट प्रतिक्रिया दिली होती. सोबतचं ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाला तिने कमलप्रीतची हायपरॲन्ड्रॉजेनीसम ही चाचणी द्यावी अशी विनंती केली होती.

एकाबाजूला प्रतिस्पर्धी ॲथलिट कौतुक करीत असताना दुसऱ्या बाजूला एक भारतीय सहकारी खेळाडू मात्र शंका उपस्थित करते, यावर कमलप्रीतने आश्चर्य व्यक्त केले होते.

सहकाऱ्यांच्या अविश्वासाचा प्रमाणेच कोविडमुळे झालेल्या लॉकडाऊन कालावधीत कमलप्रीतची मानसिक स्थिती बिघडली होती. या खेळातील सहकाऱ्यांचा राजकारणाला ती एवढी कंटाळली होती की तिने सरळ सरळ क्रिकेट या खेळात करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. तिला सेहवाग व सचिन तेंडुलकर प्रमाणे फटकेबाजी करायला आवडते. गोलंदाजांच्या ठिकऱ्या उडवणे हेच फलंदाजाचे आद्य कर्तव्य असल्याचे तिचे म्हणणे आहे.

पंजाबचा काबरवाला या एका खेडेगावातील शेतकऱ्याच्या कुटुंबात ती जन्मली. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने तिने खेळू नये असेच तिच्या आईला वाटायचे. आधी कमलप्रीत गोळाफेक स्पर्धेत उतरायची, सहा फूट एक इंच उंचीच्या कमलप्रीतीची ताकद आणि थ्रोची शैली पाहून तिच्या प्रशिक्षकांनी थाळीफेक मध्ये सहभाग घेण्यास सुचवले.

‘साई’च्या बादल येथील शिबिरानंतर पतियाळा एनआयएसला आल्यानंतर तीन वर्षातच ती राष्ट्रीय स्तरावर येऊन पोहोचली.

कोरनामुळे सराव बंद झाल्यावर टोकियो ऑलिम्पिकचे भवितव्य देखील अनिश्चित होते. त्यामुळे तिला निराशेने ग्रासलेले. परंतु या वर्षी टोकियो ऑलम्पिक होणार हे निश्चित झाल्यावर ती पुन्हा उत्साहित झाली. जोमाने सरावाला लागली. टोकियो ऑलम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणे हेच तिच्या आयुष्याचे एकमेव ध्येय आहे. इंडियन रेल्वेने तिला खेळाडू म्हणून सेवेत सामावून घेतले आहे

खरंतर कमलप्रीत ज्या समाजातून आली आहे तिथे त्या मुलांना शिकणे; खेळणे या गोष्टी वर्ज्य आहेत. अभ्यासात कमलप्रीतला गती नव्हती, त्यामुळे तिने खेळावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे शालेय जीवनात ती प्रकाशात राहिली. मुलींची लवकरात लवकर लग्न केले जातात अशा वातावरणात वावरताना तिला पुढे वाटचाल करणे अवघड गेले. मात्र राष्ट्रीय स्तरावर बोलबाला झाल्यानंतर घरच्यांनी खेळात करिअर करण्यास तिला संमती दिली.

मात्र सोबतचं पैसे खर्च होणार नसतील तर खेळ पुढे चालू ठेव असे वडिलांनी सांगितले. दरम्यान क्रिकेट आणि थाळीफेकमध्ये तिचे नाव प्रकर्षाने चमकायला लागले.

बेटी बचाओ – बेटी पढाओ या अभियानातील ती प्रमुख अंग बनली. मुलींच्या – महिलांच्या कल्याण कार्यक्रमासाठी पुढाकार घेत राहिली. टोकियो ऑलिम्पिकपर्यंतच्या प्रवासामुळे या अभियानाला तिच्या गावाकडे बळकटी आली आहे. कमलप्रीतचे ऑलिम्पिक मेडल तिच्या समाजाला नवी दृष्टी – दिशा देणारे ठरेल. १ ऑलिम्पिक पदक यापलीकडे त्या पदकाची किंमत असेल.

  • विनायक दळवी

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.