ज्याला बघून लहान मुले टरकायची तो WWF चा केन सध्या कुठाय?

कोरोनाच्या महामारीमुळे सगळ्या जगावर लॉकडाऊन होण्याची पातळी आली आहे. नेटफ्लिक्स आणि प्राईमचा पण कंटाळा आलाय. दूरदर्शनवर रामायण महाभारत सुरू झालंय आणि शक्तिमान सुरू होईल अशी शक्यता आहे.

परवा असच टीव्हीवर जगभरातल्या कोरोनाच्या बातम्या बघत बसलो होतो तेव्हा अमेरिकेच्या एक महापौर कोरोना संदर्भात आपण काय काळजी घेतोय या बद्दल अभ्यासपूर्ण माहिती देताना दिसत होते. राहून राहून वाटत होतं की हा चेहरा आणि हा आवाज ओळखीचा वाटतोय.

खूप डोकं खाजवल आणि एकदम लाईट पडली. ते मेयर म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून WWF चा केन आहे.

होय WWF. कारण आमच्या वेळी तरी ते फायटींगच होतं. त्याच रूपांतर अजून एंटरटेनमेंट मध्ये झालं नव्हतं. नाईन्टीज मध्ये जन्मलेल्या प्रत्येकाला हे आठवत असेल. घरच्यांच्या शिव्या खात आपण ही हाणामारी बघितली होती.

द रॉक, ट्रिपल एच, शॉन मायकल, स्टोन कोल्ड स्टीव्ह ऑस्टिन सारखे स्टायलिश रेसलरची क्रेझ होती.

पण रिंगणावर राज्य करायचा अंडरटेकर.

अंधारात घंटा वाजवून त्याची एन्ट्री झाली की विरुद्ध साईडला असलेला पहिलवान तर सोडाच पण टीव्ही बघणारी जनता सुद्धा थरथर कापायची.

हा अंडरटेकर सातवेळा मरून परत जिवंत झालेला असं म्हणतात. त्याला कोणीच हरवू शकत नाही अशी चर्चा होती.

या अंडरटेकरचा एक पॉल बेअरर नावाचा मॅनेजर होता. एकदा याच दोघांची भांडणे झाली. वाद खूप वाढले त्यातच पॉलने अंडर टेकर ला धमकी दिली की तुझं एक सिक्रेट बाहेर काढणार.

जगभरात उत्सुकता लागली होती.अखेर ते सिक्रेट बाहेर पडल.

अंडरटेकर ला एक छोटा सावत्र भाऊ होता. अंडर टेकरची आई आणि पॉल बेअरर च अफेअर होत त्यातून हा मुलगा जन्माला आला होता. त्याच नाव केन.

केन सुद्धा पहिलवान होता. अनेक वर्षे अंडर टेकर ला हा आपला सख्खा भाऊ आहे असंच वाटत होतं.

पण जेव्हा त्याला हे सिक्रेट कळाल तेव्हा म्हणे त्याने रागाच्या भरात आपलं घर जाळून टाकलं होतं आणि त्यात त्याचे आईवडील मेले. पण केन वाचला.

या केनचा चेहरा त्या अपघातात जाळला गेला होता.(आठवतंय गेम ऑफ थ्रोन्स मधले क्लिगेन बंधू हाउंड आणि माऊंटन ?)

तेव्हा पासून केन कायम मास्क वापरत होता. तब्बल सात फूट उंच दीडशे किलो वजनाचा, लांब केस आणि डेंजर डोळे असणारा केन हा अंडरटेकर पेक्षाही डेंजर आहे म्हणून पब्लिसिटी झाली.

त्याच मास्क ज्यांनी काढलंय त्या सर्वांची कवटी त्याने फोडलीय अशी वदंता त्याकाळी फेमस होती.

त्याची एन्ट्री सुद्धा अशीच भयानक असायची की अनेक लहान मुले त्याला बघून चड्डी ओली करत होते. जर अंडरटेकर ला कोणी हरवू शकेल तर तो म्हणजे केन अस म्हटलं जायचं

पण अंडर टेकर मी माझ्या भावा सोबत लढणार नाही असं सांगत ही मॅच टाळायचा.

केनने त्याकाळच्या दिग्गज रेसलरना सहज हरवलं. यात शॉन मायकल, स्टोन कोल्ड स्टीव्ह ऑस्टिन आशा अनेक सुपरस्टार चा समावेश होता.

खुद्द अंडर टेकर ला सुद्धा त्याने हरवलं आणि एका पेटीत घालून जाळून टाकलं होतं. पण तो तिथून सटकला. 

पुढे अंडर टेकर आणि तो एकत्र आले आणि ब्रदर्स ऑफ डिस्ट्रक्शन नावाने टीम बनवली. हे दोघे रिंगणात आले की वाघ आल्यावर माकडे जशी पळून जातात तसे इतर खेळाडू जीव मुठीत धरून पळून जायचे.

केन ने अनेक वर्षे WWFच रिंग गाजवलं. रसेल मॅनिया, raw सगळी कडे त्याचीच हवा होती. अनेक वेळा त्याने वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली.

त्याच्या बद्दल अनेक अफवा फेमस होत्या, त्यातील अनेक किळसवाण्या आणि अंगावर काटा आणणाऱ्या होत्या.

पुढे हळूहळू आपण मोठे झालो. हे WWF चे जग खोटे असते ते उशिरा कळलं.

ही सगळी फायटींग त्या मागची स्टोरी हे सगळं स्क्रिप्टड असते, यात काम करणारे हे अभिनेते असतात हे कळल्यावर जगातील चांगुलपणा वरचा विश्वास उडून गेला.

केनच खर नाव ग्लेन जेकब थॉमस.

घरची परिस्थिती बरी होती. शाळेत फुटबॉल आणि बास्केटबॉल भारी खेळायचा. अभ्यासातही हुशार होता. पुढे कॉलेज मध्ये त्याची उंची आणि पर्सनॅलिटी बघून कोणी तरी कुस्तीत जाण्याचा सल्ला दिला

काही काळ प्रोफेशनल रेसीलिंग केली आणि एक दिवस त्यातूनच त्याची ओळख वर्ल्ड रेसीलिंग फेडरेशन उर्फ WWF शी झाली

आणि पुढचा इतिहास तर सगळ्यांना ठाऊकच आहे.

एकीकडे केनच्या रुपात जेकबच रेसीलिंग चालू होतं, लग्न होऊन दोन गोड मुली देखील झाल्या होत्या. त्याची बायको आणि तो एका इन्श्युरन्स कंपनीची एजन्सी सांभाळत होते.

2008 साली कुठल्या तरी उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्ताने त्याने भाषण केले आणि तेव्हा त्याला कळले की लोकांवर भुरळ घालेल अस वक्तृत्व देखील आपल्या जवळ आहे. तो ग्रॅज्युएट होता, हुशार होता, पॉप्युलर होता राजकारणाची त्याला समज होती.

त्याने राजकारणात प्रवेश घ्यायचा निर्णय घेतला.

2018 साली रिपब्लिकन पक्षातर्फे त्याने टेनेसी राज्यातील नॉक्स कौंटी शहराच्या महापौर पदासाठीची उमेदवारी मिळवली. अर्थात त्यासाठी त्याने निवडणूक जिंकली होती.

पुढे डेमॉक्रॅटिक पक्षाच्या लिंडा हायने हीचा सहज पराभव करून तो नॉक्स कौंटीचा मेयर सुद्धा बनला.

पडद्यावर त्याची इमेज एक खुंखार व्हिलन अशी असूनही लोकांनी त्याला भरघोस मतदान केलंय. खऱ्या आयुष्यात तो प्रचंड प्रेमळ आहे.

गेली दोन वर्षे तो त्या शहरासाठी जेकब खूप काम करतोय.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत कोरोनाने थैमान घातलंय. टेनेसी राज्यातही हा रोग येऊन पोहचलाय. सध्या नॉक्स कौंटी मध्ये 50 जणांचा मृत्यू झालाय. तिथे स्थिती नियंत्रित यावी यासाठी महापौर या नात्याने केन जबरदस्त काम करतोय.

जसा WWF च्या रिंगणात त्याने प्रतिस्पर्ध्याला लोळवले होते तसे कोरोनाचा सुद्धा पराभव करेल हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.