बग्गीतून आलेली ती काठी पाहून लोकांना समजायचं काही वेळात करिम लाला येणार आहे.

मुंबईचा डॉन म्हणल्यानंतर दोनच नाव आठवतात. एक म्हणजे भिकू म्हात्रे आणि दूसरा डि कंपनीचा दाऊद इब्राहिम. नाही म्हणायला वन्स अपॉन ए टाईम इन मुंबईमध्ये दिसलेला अजय देवगण म्हणजे हाजी मस्तान हा देखील एक डॉन होता हे माहिती असतं पण त्याहून अधिकचे जुने डॉन माहिती असण्याचा काही संबंध नसतो.

झालं अस की मध्यंतरी लोकमतच्या कार्यक्रमात बोलत असताना संपादक संजय राऊत यांनी इंदिरा गांधी आणि करिम लालाच्या भेटीचा संदर्भ दिला.

बरं संजय राऊतांना तुम्ही दूसऱ्या कोणत्याही गोष्टीत हलक्यात घ्या पण त्यांच्या क्राईम नेटवर्कबद्दल तुम्ही त्यांना हलक्यात घेवू शकत नाही. कारण संजय राऊतांची सुरवातच क्राईम रिपोर्टिंगपासून झाली होती. लोकप्रभाला येणारे त्यांचे क्राईमवरचे लेख कधीकाळी मुंबईत हिट असत.

त्यांच्यासोबत काम करणारे जेष्ठ पत्रकार सांगतात की,

संजय राऊत हे असे पत्रकार होते ज्यांच्याकडे परवाना असलेली गन असायची. आत्ता खरं गोष्ट जेष्ठ मंडळींनाच माहित.

तरी मुळ मुद्दा राहतोच. करिम लाला इतका मोठ्ठा डॉन होता का?

तर भिडू लोकांनो करिम लाला फक्त मोठ्ठाच नव्हता तर करिम लाला मुंबईचा पहिला डॉन देखील होता. मुंबईचा पहिला डॉन म्हणून इतिहासात ज्याची नोंद आहे त्याच नाव करिम लाला. थोडक्यात सांगायच झालं तर मुंबईच्या डॉनगिरीचा हा मुळपुरूष.

करिम लाला हा अफगाणी होता. आजच्या सारखं तेव्हा मुंबई नव्हतं. आजचं साऊथ मुंबई म्हणजेच त्या काळचं मुंबई. या मुंबईत अफगाणीस्थानवरून आलेल्या पठाणी लोकांच एक वेगळं साम्राज्य होतं. दारुचे अड्डे, जुगार आणि इतर दोन नंबरचे अड्डे पठाणी लोकांचा हात असल्यामुळेच चालायचे. करिम लाला मुंबईत नेमका कधी आला त्याची माहिती कोणाकडेच नाही. पण अस सांगण्यात येतं की १९३० च्या दरम्यान तो डॉकयार्ड मध्ये कामास लागल. त्याच मुळ नाव अब्दुल करीम शेर खान अस होतं. मुंबईत आल्यानंतर त्याने आपल्या कुटूंबासाठी भेंडी बजार येथे भाड्याने घर घेतलं. तो डॉन कसा झाला तर त्या काळात मुंबईत पठाणी गॅंगची चलती होती. सात फुटाच्या पठाणी लोकांच्या नादाला सहसा लोक लागत असत.

अंगापिंडाने मजबूत असल्याचा फायदा या लोकांनी घेतला आणि ताकदीच्या जीवावर चालणारी कामे आपल्या ताब्यात घेतली होती. अशाच पठाणी लोकांच्या गॅंगमध्ये करिम लालाचा समावेश झाला. त्यानंतर भेंडी बाजारच्या परिसरातच त्याने दारूचा अड्डा काढला. दारू प्लस जुगार असा तो धंदा करत. जुगारात हरणाऱ्या लोकांसाठी तो उधारीने पैसे देत. उधारी वसुल करण्यासाठी करिम लालाने पठाणी पोरांची ताकद जमवली. त्यातूनच घर, जमीन खाली करण्यासाठी त्याला सुपाऱ्या येवू लागल्या. हळुहळु प्रस्थ वाढत गेलं आणि करिम लाला डॉन होतं गेला. 

उंचपुरा असणाऱ्या करिम लालाचा नेमका वट सांगायचा झाला तर त्याच्या हातातल्या काठीच उदाहरण देता येईल. 

करिम लाला उंच असल्याने तो चालण्यासाठी काठी वापरायचा. त्यांची काठी पण साधीसुधी नव्हती तर विशेष डिझाईन केलेली असायची. तो एखाद्या व्यक्तीला दम टाकायला जाणार असला तर त्याच्या अगोदर त्याची काठी तिथे पोहचायची. बग्गीतून आलेली ती काठी पाहून लोकांना समजायचं की काही वेळातच इथे करिम लाला येणार आहे. काही वेळातच संपुर्ण परिसरात शांतता पसरायची आणि करिम लाला यायचा. 

१९५० नंतरच्या काळात पठाणी गॅंगचा सर्वेसर्वा म्हणून करिम लाला उदयास आला.

या काळात मुंबईत तीन डॉन होते. हाजी मस्तान, वरदराजन मुदलीयार आणि करिम लाला. या तिघांनी आपआपसात न भांडता मुंबईचे तीन भाग केले व आपली ताकद वाढवली. दाऊदच्या काळात मुंबई कोणाची म्हणून ज्या प्रमाणे आपआपसात गॅंगवार झालं ते घडवून न आणण्याइतका राजकिय शहाणपणा या तिंघांकडे देखील होता.

हे कुठं पर्यन्त तर १९८० पर्यन्त भाईगिरीच्या चॅप्टरमध्ये दाऊदची एन्ट्री होईपर्यन्त मुंबईचे तीन डॉन होते. पठाणी गॅंगची संपुर्ण ताकद करिम लालाच्या पाठीमागे होते. त्याच्या ताकदीवर दक्षिणेतला हाजी मस्तान देखील आपलं काम सार्थकी लावत होता तर वरदराजन हा दक्षिणेचा डॉन झाला होता.

डोंगरी, नागपाडा, भेंडी बजार च्या बाहेर जावून साम्राज्य वाढीस लागलं होतं. पण करिम लाला असो कि हाजी मस्तान. समाजासाठी हे करत असणाऱ्या कामांमुळे यांची इमेज रॉबिन हूड प्रमाणे झाली होती. करिम लालाचा दरबार भरत असे. इथं एक छोटसं उदाहरण द्यायचं झालं तर गंगुबाईचं देता येईल. मुंबईच्या वेश्यावस्तीत गंगुबाई नावाची एक तरुणी होती. सध्या आलीया भटचा त्यावर सिनेमा देखील येत आहे.

वेश्यावस्तीतल्या अत्याचाराला वैतागून ती थेट करिम लालाजवळ पोहचली आणि करिम लालाच्या नावाने पठाणी लोक तिला देत असलेल्या त्रासाबद्दल तिने कैफियत मांडली. त्या दिवसांनंतर गंगुबाईचे नशिब बदललं आणि ती थेट मुंबईची डॉन झाली. करिम लाला गंगुबाईला आपली बहिण मानत असे. थोडक्यात करिम लाला ज्याच्या डोक्यावर हात टाकत असे त्याचं सोनं होत असे.

त्यामुळे करिम लालाला मानणारा वेगळा वर्ग होता व त्यामध्ये पठाणी लोकांचा मोठ्ठा समुदाय होता. 

करिम लालाने याच पाठिंब्यावर समाजाचा नेता हे बिरूद मिरवलं. अल करिम हॉटेल व न्यू इंडिया हॉटेल ही करिम लालाची दाखवण्याची संपत्ती होती. सोबत न्यू इंडिया टूर ॲण्ड ट्रॅव्हल्स नावाची कंपनी देखील होती. करिम लाला पठाणी लोकांचा लि़डर झाल्यानंतर त्याला राजकिय लोक भेटण्यासाठी गर्दी करत. या वादावर बोलताना करिम लालाचा नातू सांगतो की शरद पवार, इंदिरा गांधी, सरहद गांधी अशा कित्येक नेत्यांसोबत करिम लालांचे फोटो आहेत. ते पठाणी समाजाचे लिडर होते म्हणून प्रत्येक नेत्यांनी त्यांच्या कधीना कधी भेटी घेतल्याच आहे.

पण मुद्दा उरतो तो म्हणजे मुंबईच्या पहिल्या डॉनच्या डॉनगिरीला सुरूंग कधी लागला ? 

तर याच श्रेय देखील पुर्णपणे दाऊदकडे जातं. १९८०-८५ च्या काळात दाऊदची पठाणी गॅंगसोबत तुफान कापाकापी झाली. यात करिम लालाचा प्रभाव कमी होत गेला तर दाऊदची ताकद वाढत गेली. अंगापिंडाची पठाणी ताकद संपत गेली आणि त्याची जागा गन ने घेतली. कालांतराने आपल्या मुळ व्यवसायाकडे करिम लालाने मोर्चा वळवला. तो हॉटेल आणि ट्रान्सपोर्टचा बिझनेस पाहू लागला. १९८६ साली करिम लालाचा भाऊ रहीम खान याची हत्या झाल्यानंतर करिम लालाचा करिष्मा संपत गेला. त्यानंतरच्या काळात करिम लालाच्या नावाने नॉस्टेलजिक होणाऱ्या लोकांची पिढी आली व आजच्या काळात करिम लाला कोण होता अशा आशयाचे लेख येवू लागले.

२००२ साली वयाच्या ९० व्या वर्षी करिम लाला मुंबईत गेला तेव्हाच खऱ्या अर्थाने करिम लालास भिनाऱ्या लोकांचा समाज संपुष्टात आला अस म्हणता येईल.  

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.