कर्नाटकचा सिरीअल किलर महिलांचे खून करायचा, फक्त त्यांच्या अंतर्वस्त्रांसाठी

दुपारचे एक-दोन वाजलेले. त्यानं पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं जयश्री यांच्या घरात प्रवेश घेतला. त्यांना चाकूचा धाक दाखवत खिडकीच्या ग्रिलला बांधून ठेवलं. त्यांचे कपडे काढून पाशवी बलात्कार केला आणि त्यानंतर गळा दाबून त्यांचा जीव घेतला.

जयश्री यांचा जीव गेल्यानंतरही त्याचे अत्याचार थांबले नाहीत. इतक्यात त्यांचा आठ वर्षांचा मुलगा शाळेतून घरी आला, या विकृतानं त्याला सांगितलं की, ‘तुझ्या आईवर वाईट शक्तींचा प्रभाव पडलाय, त्या काढण्यासाठी तिला बांधून ठेवलंय. तू थांब मी डॉक्टरला बोलावून आणतो.’ हे एवढं म्हणून हा पसार झाला…

वाचून अंगावर काटा आला असेल, पण ही सत्य घटना घडली होती… कर्नाटकात. या विकृताचं नाव उमेश रेड्डी.

उमेशनं फक्त जयश्री यांच्यासोबतच नाही, तर जवळपास १८ महिलांसोबत अशीच क्रूरता दाखवली होती. पण त्यानं हे सगळं केलं कसं? त्याचं पूर्वायुष्य कसं होतं आणि त्याचं पुढं काय झालं? याची माहिती घेऊ…

उमेश रेड्डी, मूळ गाव बसप्पा मलिगे, चित्रदुर्ग, कर्नाटक. उमेश सीआरपीएफचा जवान. त्याचं पोस्टिंग झालेलं जम्मू काश्मीरमध्ये. तिथं कमांडरच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याची हकालपट्टी झाली आणि रेड्डी पुन्हा आपल्या मूळगावी आला.

त्यानं जम्मू काश्मीरमध्ये काय केलं होतं? याचा इथं कुणालाच अंदाज नव्हता. तिथं तो जिल्हा पोलिसांमध्ये भरती झाला. आपलं प्रशिक्षणही पूर्ण केलं. एका रस्ते अपघाताच्या केसमध्ये त्याला अटक झाली, मात्र पोलिसांनी किरकोळ मुद्दा आहे म्हणत त्याला सोडूनही दिलं.

यापुढं मात्र रेड्डीमधल्या विकृतीला आणि कौर्याला सीमा राहिली नाही.

त्यानं १९९६ मध्ये एका मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिनं रेड्डीवर हल्ला करत त्याच्या तावडीतून सुटण्यात यश मिळवलं. पण पुढच्याच महिन्यात त्यानं एका मुलीवर बलात्कार करुन तिचा खून केला. एवढं करुनही तो पोलिसांच्या हाती काही लागला नाही.

पण ज्या मुलीवर त्यानं बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता, तिनं रेड्डीला प्रजासत्ताक दिनाच्या परेडवेळी ओळखलं आणि त्याला अटक झाली. साहजिकच त्याला पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं.

न्यायालयानं जेव्हा रेड्डीला दुसऱ्या तुरुंगात घेऊन जाण्याचा आदेश दिला, तेव्हा त्यानं पोलिसांच्या तावडीतून पलायन केलं. पुढं त्यानं अहमदाबाद आणि कर्नाटकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्त्रियांवर बलात्कार करुन त्यांचे खून केले.

१९९७ मध्ये उमेश रेड्डीला एका अत्यंत विचित्र कारणासाठी अटक झाली…

घराबाहेर वाळत घातलेली महिलांची अंतर्वस्त्र तो चोरुन न्यायचा. या प्रकरणात जेव्हा त्याला अटक झाली, तेव्हा त्याच्याकडे पोतं भरुन अंतर्वस्त्र सापडली. या प्रकरणात रेड्डीला अटक झाली पण तो पुन्हा एकदा निसटला. 

त्यानंतर त्यानं जयश्रीचा बलात्कार करुन खून केला आणि मृतदेहासोबतही वारंवार बलात्कार केला. अशाच प्रकाराची पुनरावृत्ती करण्यासाठी जेव्हा तो एका महिलेच्या घरी गेला तेव्हा तिनं आरडाओरडा केला आणि पळून जाणाऱ्या रेड्डीला पकडून लोकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं. मात्र पुन्हा रेड्डीनं निसटण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा पोलिसांनी त्याला पकडलं.

२००२ मध्ये रेड्डीला दुसऱ्या जेलमध्ये शिफ्ट करत होते. त्यावेळी त्यानं पुन्हा एकदा पोलिसांच्या हातावर तुरी दिली.

पुण्यातही कुकर्म

पोलिसांकडून निसटल्यावर रेड्डी पुण्यात आला. इथं त्यानं वेटरचं काम करत एका मुलीला आपल्या विकृतीची शिकार बनवलं. दावणगिरी आणि हुबळीमध्येही त्यानं मुलींवर अत्याचार केले.

पण उमेश रेड्डीचा गुन्हे करण्याचा पॅटर्न काय होता..?

तो विधवा किंवा एकट्या राहणाऱ्या महिलांना टार्गेट करायचा. त्यांच्या घरावर पाळत ठेवायचा. पाणी मागणं किंवा पत्ता विचारणं असली कारणं देऊन त्यांच्या घरात जायचा. त्यांना चाकूचा धाक दाखवत, हात पाय बांधून ठेवायचा आणि पाशवी बलात्कार करायचा. चोरी झालीये हे दाखवायला, त्यांच्या घरातलं सामान अस्ताव्यस्त करायचा, कधीकधी दागिनेही घेऊन जायचा. १९९६ ते २००२ या सहा वर्षांच्या कालावधीत जवळपास १८ ते २० स्त्रिया रेड्डीच्या अत्याचारांना बळी पडल्या. त्याला अटक झाल्यानंतर, कित्येक प्रकरणं बदनामीच्या भीतीनं पुढं आलीच नाहीत.

सतत पोलिसांना कल्टी देणारा रेड्डी सापडला तरी कसा?

कर्नाटकात परतल्यानंतर रेड्डी आपलं सामान रेल्वे स्टेशनमध्ये ठेऊन, एका सलूनमध्ये गेला. त्यानं तिथं दाढी मिशा उडवून टाकल्या, ज्यामुळं त्याला कुणी ओळखणार नाही. पण एका चाणाक्ष रिक्षावाल्यानं रेड्डीचा ‘वॉन्टेड’ मध्ये आलेला फोटो बघून त्याला ओळखलं आणि पोलिसांना टीप दिली. पोलिसांनी त्याला पकडण्यात यावेळी कोणतीच कसूर ठेवली नाही.

जेव्हा रेड्डीला अटक झाली तेव्हा दोन धक्कादायक गोष्टी समोर आल्या.

नॉर्मल शर्ट पँटच्या आत स्त्रियांची अंतर्वस्त्रं घातली होती. त्याच्या स्टेशनमध्ये असलेल्या बॅगेतही महिलांची अंतर्वस्त्रं, साड्या, ब्लाउज, गाऊन आणि चुडीदार सापडले.

दरोडा टाकण्यासाठी घरात घुसणाऱ्या उमेश रेड्डीकडे ना दागिने सापडले, ना पैसे. सापडली फक्त महिलांची अंतर्वस्त्र. या विकृत नादासाठी त्यानं कित्येक महिलांचा बळी घेतला, कित्येक जणींची आयुष्य उध्वस्त केली. शेवटी कोर्टानं त्याला फाशीची शिक्षा सुनावली, त्यानं अनेकदा दयेचा अर्ज केला मात्र नामंजूर झाला. आजही उमेश रेड्डी जेलमध्ये खितपत पडलाय, तेही एका विकृत नादापायी.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.