बहुजन समाजाला खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या प्रवाहामध्ये आणलं ते केशवराव जेधे यांनी..

खरा देशभक्त म्हणलं कि, डोळ्यासमोर अनेक नावं येतील. पण त्यातली काही नावं इतिहासात अजरामर होतात.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेनंतर, स्वराज्य मिळवण्यासाठी अमूल्य असे योगदान दिलेले आणि आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने जी घराणी नावारूपास आली. त्यामध्ये पुण्यातील कान्होजी जेधे हे घराणे इतिहासात कुणीही विसरणार नाही. त्याच घराण्यातील आणखी एक हिरा आपल्या पूर्वजांचे नाव आणखी मोठे करत होता.

तो महाराष्ट्रातला हिरा म्हणजे केशवराव जेधे होय !

स्वातंत्र्यानंतर सत्ता ही प्रामुख्याने शेतकरी- कष्टकरी वर्गाच्या हाती यावी, हेच त्यांच्या कार्याचं ध्येय होतं!

केशवराव जेधे यांनी त्यांचं आयुष्यच सत्यशोधक आणि सामाजिक चळवळीसाठी वाहून घेतले. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहास व्यापून टाकणारं असं त्यांचं चरित्र आहे. अगदी कमी वयात ते या क्षेत्रात उतरले. पुण्यात महात्मा फुले यांचा पुतळा प्रथमच त्यांच्या प्रयत्न उभा राहिला. बाबासाहेब आंबेडकरांच्या चवदार तळ्याच्या मोहिमेतही ते सहभागी होते. 1930 नंतर ते देशाच्या राजकीय चळवळीचा मुख्य प्रवाहात आले. त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान तर आपण जाणतोच.

महाराष्ट्रात काँग्रेस ला खऱ्या अर्थाने संजीवनी देणारे केशवराव जेधे च होते.

काँग्रेसमध्ये सक्रिय असतानाच पुण्यामध्ये काँग्रेस भवन ची स्थापना झाली होती तरीदेखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये केंद्रबिंदू हा ‘जेधे मॅन्शन’ च असायचा.

1918 मध्ये महर्षी शिंदे यांनी मुंबई येथे भरवलेल्या अस्पृश्यता निवारण परिषदेत केशवराव स्वयंसेवक म्हणून हजर होते. त्याचदरम्यान विठ्ठलभाई पटेल यांनी मुंबई असेंब्लीत आंतरजातीय विवाह बिल मांडले, तेव्हा केशवराव जेधे यांनी पाठिंबा दिला होता. नंतर त्यांनी छत्रपती मेळे सुरू केले आणि येथूनच सत्यशोधक चळवळ गतिमान झाली. याच काळात महात्मा गांधींनी ‘जेधे मॅन्शन’ला भेट दिली होती

काँग्रेसी विचारसरणीचे बीजे रोवत ते सर्व महाराष्ट्रात दौरा करण्याचे निमित्त त्यांना फैजपूर अधिवेशनामुळे मिळाले.

शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या समस्या सोडवणे म्हणजेच काँग्रेसचे काम असा त्यांचा मानस होता. शेतकर्‍यांशी थेट संवाद साधण्यासाठी त्यांनी 1936 ला संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांच्या या दौऱ्याचा परिणाम फैजपूर अधिवेशनात दिसलाच…

डिसेंबर महिन्यात भरलेल्या अधिवेशनामध्ये पंडित नेहरूंच्या समोर अवघा ग्रामीण महाराष्ट्र दाटला होता.

फैजपूर काँग्रेस अधिवेशन यशस्वी करण्यात त्यांचे मोलाचे योगदान सगळ्यांच्या कौतुकाचा विषय बनला.

केवळ जेधे यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळेच काँग्रेस ही ग्रामीण भागातल्या जनमानसात पोहोचली. त्यांच्या सोबतीला होते काकासाहेब गाडगीळ. त्यांच्या विचारांनी, भूमिकेमुळे आणि शेतकऱ्यांसोबत राहण्याच्या दिलेल्या विश्वासामुळे महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातील प्रत्येक शेतकरी काँग्रेसशी जोडला गेला तो आजतागायत.

राष्ट्राचा खरा पाया जो आहे, तो खेड्यात राहतो आणि तोच माझा समाज आहे ! असं ठामपणे मांडणारे केशवराव जेधे होते म्हणूनच बहुजन काँग्रेसकडे खेचली गेली हे कुणीही नाकारू शकत नाही.

केशवराव जेधे यांचे कर्तृत्व आता पुण्यात आणि मुंबई इलाख्यापुरतंच मर्यादित न राहता, राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात त्यांनी उडी घेतली. 1937 च्या कौन्सिलच्या निवडणुकीत कॉँग्रेसला यशस्वी करण्यात जेधेंचाच वाटा होता. 1937 मध्ये केशवराव जेधेंना महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष करावे म्हणून सेनापती बापट यांनी जाहीर मागणी केली आणि 1938 ला केशवराव काँग्रेसचे अध्यक्ष झाले.

आणि तेंव्हा खर्‍या अर्थाने काँग्रेस बहुजनांचा, शेतकर्‍यांचा, कष्टकर्‍यांचा आवाज बनली. १९३५-३६ मध्ये काँग्रेसचे सभासद २८,२५८ होते, तर जेधेंच्या कार्यकाळात ही सदस्यसंख्या तब्बल १,६३,३८० (१९३७-३८) इतकी झाली.

पुढे १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात ते सहभागी झाले. १९४४ नंतर स्वातंत्र्य चळवळीबरोबरच त्यांनी रचनात्मक कार्य हाती घेतले. आणि मे १९४६ मध्ये केशवराव प्रांतिक काँग्रेसचे पुन्हा अध्यक्ष झाले तसेच त्याचवेळी ते घटना समितीचेही सभासद झाले. त्यांचे वाढते कर्तृत्व आणि नेतृत्व पाहून काँग्रेसचे कार्यकर्ते भारावून जात.

१९४६ च्या सालात काँग्रेसमध्ये वरिष्ठ वर्ग व भांडवलदारांचे वर्चस्व वाढत होते, हे केशवरावांना पटत नव्हते. कारण तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर आणि शंकरराव देव यांचा गट हा शेतकऱ्यांच्या हितसंबंधी निर्णयाला विरोध करू लागला. तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेचे अनुदानही मुख्यमंत्री बाळासाहेब खेर आणि यांनी रोखलं होतं.

काँग्रेसअंतर्गत शेतकरी आणि कामगारांचं एक भक्कम संघटन असावं म्हणून शंकरराव मोरे, तुळशीदास जाधव यांच्या मदतीने शेतकरी संघ निर्माण करण्यालाही परंतू बाळासाहेब खेर सरकारने शेतकरी संघालाही विरोध केला.

याच अडचणींमुळे जेधे व मोरे इतर प्रभुतींनी  १३ मे १९४८ रोजी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली.

चार-पाच वर्षे या पक्षासाठी त्यांनी काम केले पण नि:स्वार्थी स्वभावाच्या या नेत्याचे पक्षातील नेत्यांशी, प्रामुख्याने शंकरराव मोरे यांच्याशी मतभेद झाल्याने २४ एप्रिल १९५४ रोजी शेतकरी कामगार पक्षाचा त्यांनी त्याग केला आणि पुन्हा १५ ऑगस्ट १९५४ रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करून पुन्हा काँग्रेसचे काम सुरु केले.

केशवराव जेधे स्वतः मराठा असलेले जेधे बहुजनांचा आवाज बनले याचं मुख्य कारण म्हणजे, बहुजनांना आपल्यात सामील करून घेणं आणि त्यांना एकसंध ठेवणं हे त्यांना चांगलंच माहीत होतं. परंतु हे सर्व काही ते स्वतःच्या राजकीय स्थान आणि संघटन बळकट करण्यासाठी करत नव्हते, तर शेतकर्‍यांच्या आणि कामगारांच्या आर्थिक, सामाजिक विकासासाठी त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेणं हेच त्यांचं साधं सरळ उद्दिष्ट होतं.

संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. आणि महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांसारखं नेतृत्व मिळालं, आणि बहुजन समाजालाही वजन प्राप्त झालं ते जेधे यांच्यामुळेच!

आज इतक्या वर्षांनंतर इतके पराभव पचवूनही काँग्रेसचे राज्याच्या ग्रामीण भागात अस्तित्व आहे याचे श्रेय जाते केशवराव जेधे यांनी रचलेल्या पायाकडे. ते स्वतः कधी मोठ्या पदावर गेले नाहीत पण महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांनी पाडलेली छाप कोणी पुसू शकणार नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.