तिरकी टोपी घालणाऱ्या नेत्याने महाराष्ट्रात पहिल्यांदाच काँग्रेस विरोधाचा झंझावात सुरु केला.

स्वातंत्र्य लढ्यानंतरचा काळ. इंग्रज भारत सोडून जाणार हे आता पक्कं झालं होतं. आपल्या देशाची सत्ता आपण चालवणार या भावनेने प्रत्येक नागरिक प्रेरित झाला होता. गांधींच्या सत्याग्रहात काँग्रेसच्या झेंड्याखाली अबालवृद्ध गोळा झाले होते. काँग्रेसची लोकप्रियता शिखरावर पोहचली होती. पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभ भाई पटेल, राजेंद्रप्रसाद, अबुल कलाम आझाद असे दिग्गज नेते देशावर राज्य करत होते.

गांधीजींनी देशाच्या पंतप्रधानपदासाठी नेहरूंची निवड केली होती.

काँग्रेसचा मुख्य विरोधक समजला जाणारे मुस्लिम लीग पाकिस्तान घेऊन वेगळे झाले होते. देशात असा एकही पक्ष नव्हता जो काँग्रेसला आव्हान निर्माण करू शकेल. सावरकरांचे हिंदुमहासभा सारखे पक्ष होते मात्र त्यांचं अस्तित्व नगण्य होतं.

त्याकाळी महाराष्ट्र आणि गुजरात यांचा मिळून मुंबई प्रांत होता. इथे तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे काँग्रेसची संघटना बलाढ्य होती. तेव्हाचे मुख्यमंत्री होते बाळासाहेब खेर. हे पटेलांच्या गटाचे होते. त्यांच्यामुळेच महाराष्ट्राच्या काँग्रेस संघटनेत शंकरराव देव, भाऊसाहेब हिरे या उजव्या विचारसरणीच्या नेत्यांचं वर्चस्व होतं. त्यांचा आणि डाव्या विचारांच्या नेत्यांचा पक्षांतर्गत सुप्त संघर्ष सुरु होता.

महाराष्ट्रात जोतिबा फुलेंच्या विचारांवर चालणारे सत्यशोधक व बहुजनांचे प्रश्न मांडणारे काही नेतेमंडळी होती. स्वातंत्र्य लढ्यासोबतच शेतकरी आंदोलने कामगारांचा संघर्ष यात त्यांनी काम केलेलं. १९४२ च्या चले जाव आंदोलनावेळी भूमिगत होऊन त्यांनी क्रांतिकार्य देखील केलेलं. सातारा भागात प्रतिसरकार स्थापन करण्यात नाना पाटील यांच्यासारख्या डाव्या विचारांच्या नेत्यांचा सिंहाचा वाटा होता.

१९४६ साली जेव्हा प्रांतीय सरकारे स्थापन झाली तेव्हा बाळासाहेब खेर यांच्या कारभारामुळे समाजवादी भूमिका असलेल्या नेत्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता.

त्याच वर्षी भाऊसाहेब राऊत, केशवराव जेधे, तुळशीदास जाधव, दत्ता देशमुख, रामभाऊ नलावडे या आमदारांनी  काँग्रेस अंतर्गतच ‘शेतकरी-कामकरी संघ’ स्थापन केला. त्यात आघाडीवर होते शंकरराव मोरे.

महाराष्ट्राच्या राजकारणात तिरकी टोपी ताठ मान या वाक्प्रचाराने ज्यांना ओळखले जाते असे नेते म्हणजे शंकरराव मोरे.

त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १८९९ रोजी एका गरीब कुटुंबात झाला. लहानपणीच माता-पित्याच्या प्रेमास ते पारखे झाले. तीव्र बुद्धिमत्ता, जिद्द आणि कष्ट यामुळे त्यांनी शिक्षणात चांगली प्रगती केली. सन १९२३ मध्ये ते बी.ए.ला प्रथम क्रमाने पास झाले. नंतर दोन वर्षांनी एलएल.बी झाल्यावर वकिली व्यवसायाला त्यांनी प्रारंभ केला.

शाळेत असताना एकदा एका ब्राम्हण मित्राने त्यांना व त्यांच्या मराठा मित्रांना बहिणीच्या लग्नानिमित्त घरी जेवायला बोलावले होते पण जेव्हा पंगत बसली तेव्हा या मुलांना वेगळीकडे बसवण्यात आले व त्यांना फुटके लाडू,तुटक्या जिलेब्या दिल्या. मोरे व त्यांचे मित्र या अपमानामुळे तिथून निघून आले. पुढे जेधे मॅन्शन येथे वास्तुशांती प्रसंगी केशवराव जेधेंनी पुरोहितशाहीला दिलेले कणखर जवाब यामुळे ते प्रभावित झाले.

विद्यार्थिदशेपासूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने आणि म.फुले यांच्या विचारांचा खोलवर ठसा झालेला असल्याने त्यांनी सत्यशोधक चळवळीत भाग घेतला.

महात्मा गांधींच्या सत्याग्रहात समाजाच्या प्रत्येक वर्गाला स्थान आहे आणि तिथे कोणावरही अन्याय होत नाही याची खात्री पटल्यावर त्यांनी बहुजन समाजातल्या शेकडो तरुणांसह त्यात उडी घेतली. या लढ्यात भाग घेतला, म्हणून त्यांना एक वर्षाचा कारावास भोगावा लागला.

पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेस पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना, दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला. गोरगरिबांच्या उन्नतीऐवजी निवडणुकीतील डावपेचांना आणि भांडवलदारी विचारांना महत्त्व प्राप्त झाले. भांडवलदार व गरीब शेतकरी-कामगार यांचे हितसंबंध परस्परविरोधी असल्याने काँग्रेस पक्षातही वैचारिक गट तयार झाले.

शेतकरी कामकरी संघाच्या स्थापनेवेळी तर त्यांनी बाळासाहेब खेर यांच्या काँग्रेस सरकारवर थेट आरोप केला की,

भांडवलवादी व जातीयवादी वर्गांना काँग्रेसबाहेर हुसकावून फुले शाहूंच्या समाजवादी वाटने जाण्यात या दोन्ही पातळ्‌यांवरील प्रांतीय सरकारे अयशस्वी झाली आहेत.  आर्थिक विषमतेचे उच्चाटन, कष्टकऱ्यांना निर्णयप्रक्रियेत प्राधान्य, संस्थानिकांच्या सार्वभौमत्वाचे विसर्जन, सामाजिक, आर्थिक न्यायाची हमी, उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयीकरण, कामगारांविषयी  पुरोगामी धोरण या कोणत्याच बाबतीत मध्यवर्ती सरकारचा कारभार समाधानकारक नाही.

त्यांच्या या मुख्य प्रवाहापेक्षा वेगळ्या विचारांबद्दल काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी टीकाही केली मात्र शंकरराव मोरे यांनी नवयुग या साप्ताहिकातून त्यांना चोख उत्तर दिले. खेर-देव या प्रभूतींचा वाढता विरोध आणि काँग्रेसमध्ये बहुजन समाजातील तरुणांना दडपण्याचा सुरु असलेला खेळ यामुळे वैतागून वेगळा पक्ष स्थापन करण्याचा विचार सुरु झाला.

११ जानेवारी १९४७ रोजी मुंबईतील फणसवाडी येथे शंकरराव मोरे यांच्या बंगल्यात एकदा काँग्रेस शेतकरी-कामकरी संघाची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत तत्कालीन तरुण नेते प्रति सरकारच्या क्रांतिकार्यात सहभागी झालेले यशवंतराव चव्हाण यांनी प्रथम शेतकरी-कामकरी पक्ष स्थापनेस प्रखर विरोध केला. उलट आपल्या सहकाऱ्याना त्यांनी स्पष्ट शब्दात सुनावले की,

“मुख्यमंत्री खेर यांच्या कार्यपद्धतीमध्ये बदल घडवायचा तर कॉंग्रेसमध्ये राहूनच तो समर्थपणे घडवून आणता येईल. नव्या पक्षाचे स्वरूप महराष्ट्रापुरते असून त्याला जातीयतेचा वास आहे, उलटपक्षी कॉंग्रेस हा अखिल भारतीय पक्ष असून पंडीत नेहरूंच्या समाजवादी नेतृत्वाखाली तो देशातला मुख्य प्रवाह आहे.या प्रवाहातून फुटून  वेगळा पक्ष काढल्याने बहुजन समाजाबरोबरच पुरोगामी विचारांचे नुकसान होणार आहे.”

या बैठकीत काहीही निर्णय झाला नाही. मात्र पुन्हा पुण्यात भाऊसाहेब शिरोळे यांच्या घरी बैठक भरली. तेव्हा मात्र केशवराव जेधे, औटे, मोहिते, आनंदराव चव्हाण, तुळशीदास जाधव, दत्ता देशमुख, भापकर, भाऊसाहेब शिरोळे यांना एकत्रित करुन शंकररावजी मोरे यांनी ‘शेतकरी-कामकरी’ऐवजी नवा ‘शेतकरी-कामगार पक्ष’ स्थापन करण्याचा मुहूर्त नारळ फोडला.
शेतकरी कामगारांचे राज्य स्थापन होण्याच्या दृष्टीने विचार करण्यासाठी २ व ३ ऑगस्ट १९४७ रोजी देवाची आळंदी येथे शंकरराव मोरे-केशवराव जेधे यांनी निवडक कार्यकर्त्यांची सभा घेतली. या सभेला जी.डी.लाड, के.पा.खडके, कृष्णराव धुडूप, मुळीक, शिरोळे, नाथाजी लाड, बाबूराव जेधे उपस्थित होते.

याच बैठकीत आजचा ‘शेतकरी कामगार पक्ष’ महाराष्ट्रात जन्मास आला.

या पक्षाने महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेला तिथल्या नेतृत्वाला आत्मभान निर्माण करून दिले. इतकी वर्षे झालेल्या जातीय, आर्थिक अन्यायातुन शेतकरी कामगारांना मुक्त करण्यासाठी एक मोठा झंझावात निर्माण केला गेला.

१९५२ साली स्वतंत्र भारतात पहिल्यांदा निवडणूक लढवण्यात आल्या. काँग्रेस विरोधात शड्डू ठोकलेल्या शेकापने या निवडणुकांमध्ये चांगले यश मिळवले. मुंबई विधानसभेत त्यांच्या १४ जागा निवडून आल्या. ज्या काळात काँग्रेस विरोध  स्वप्नात देखील कोणी विचार केला नसेल त्या काळात शेकापने जबरदस्त कामगिरी केली. विशेषतः कोल्हापुरात त्यांचे ४ आमदार निवडून आले. स्वतः शंकरराव मोरे सोलापूर मधून  खासदार म्हणून निवडून आले.

फक्त मुंबईच नाही तर मध्यप्रदेश येथे २ आमदार आणि हैद्राबाद येथे १० आमदार निवडून आले. 

राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून शेकापने मोरारजी देसाई यांच्या सरकारला विधानसभेत धारेवर धरण्याच काम तर केलंच शिवाय स्वतः शंकरराव मोरे लोकसभेत थेट पंडित जवाहरलाल नेहरू यांना अवघड प्रश्न विचारून बेजार करत होते. संसदेतील एक अभ्यासू खासदार म्हणून त्यांना ओळखलं जात होतं.

ते प्रभावी वक्ते होते. प्रचारासाठी त्यांनी केलेल्या भाषणांना प्रचंड प्रतिसाद मिळत असे. ते आपला विचार अतिशय सोप्या भाषेत आणि मार्मिक उदाहरणे घेऊन प्रभावीपणे श्रोत्यांना पटवून देत असत.

त्यांच्या पक्षाला देखील फुटीचा शाप लागला. जेधे मोरे जवळकर या मोठ्या नेत्यांच्या नावांनी पक्ष ओळखला जात होता मात्र दाभाडी प्रबंध मांडल्यापासून पक्ष कट्टर कम्युनिजमकडे झुकतो आहे कि काय असं बोललं जात होतं. केशवराव जेधे आणि शंकरराव मोरे या मुख्य नेत्यांमध्ये वाद वाढत गेले. पुढे जेधेंनी काँग्रेसची वाट धरली.

१९५५ साली स्वतः शंकरराव मोरे यांनी पक्ष सोडला. पक्षात  मार्क्सवाद रुजवू शकलो नाही ही आपली चूक होती असं त्यांना काही काळ वाटत होतं. राजकारणातील मित्रांच्या कडवट अनुभवाने राजकारणाचा विट आला आहे, संयुक्त महाराष्ट्राबद्दल संसदेत जेवढे करता येईल तेवढेच करावे. राजकारणासाठी लागणारे गुण आपल्याजवळ नाहीत. सरळ निवृत्त होऊन सामाजिक,आर्थिक प्रश्नावर चिंतन लेखन करण्याकडे ओढा वाढतो आहे अशी मनोगते मोरेंनी व्यक्त केली.

त्यांच्या नंतर पक्षाचा धुरा भाऊसाहेब राऊत यांच्याकडे आला. १९५७ च्या निवडणुकांमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर शेकापने २५ आमदार निवडून आणले. हा या पक्षाचा सुवर्णकाळ. तिथून पडूनच सर्व मोठे नेते यशवंतरावांच्या बेरजेच्या राजकारणामुळे काँग्रेस मध्ये परतले.

शंकरराव मोरे १९६२ साली पुन्हा लोकसभेवर निवडून आले. पण त्यांच्या झंझावताची धार आता वृद्धापकाळाने कमी झाली होती. ५ मार्च १९६६ रोजी महाराष्ट्राच्या या महान नेत्याचे निधन झाले. काँग्रेस विरोधाचे वादळ शांत झाले होते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.