बहुजन समाजाच्या विकासासाठी राज्यपालपद नाकारणारे जेधे एकमेव नेते असतील

चळवळीच्या राजकारणाचं काय सांगायचं भिडू, चळवळीचं राजकारण रस्त्यांवर सुरू होतं आणि विधानसभेत जाऊन संपत. आपला नेता नेतृत्त्व करतो. चळवळ करतो. सर्वसामान्य दुबळ्यांचा आवाज होतो. आपण भारावून जाऊन त्यांच्या मागे झेंडे धरतो.

एक दिवस येतो आणि आपला नेता एकतर विधानपरिषदेवर जातो नाहीतर विधानसभेवर जातो. नेता आमदार होतो आणि चळवळ संपते. कितीही कटु वाटत असला तरी चळवळीच्या राजकारणाचा हाच शेवट असतो. एकदा का आपला नेता आमदार, खासदार नाहीतर मंत्री झाला तर मग परत विचारत नाही हा सर्वच कार्यकर्त्यांचा सार्वत्रिक अनुभव आहे.

अशा वेळी केशवराव जेधे वेगळे वाटतात. संपूर्ण आयुष्य ब्राह्मणेत्तर चळवळीसाठी घालवलेला हा माणूस. बहुजन समाजाचा विकास हे अंतीम तत्व त्यांनी स्विकारलं होतं. त्यांना याच चळवळीने राज्यपाल पदाची ऑफर मिळाली. पण तितक्याच तीव्रतेने राज्यपालपद नाकारून जनतेसाठी उभा राहिलेला हा नेता.

केशवराव जेधे कोण होते. 

महाराष्ट्रात जी ब्राह्मणेत्तर चळवळ उभारली त्यातील प्रमुख चेहरा म्हणजे केशवराव जेधे. जेधे-जवळकर, जेधे-मोरे, जेधे-गाडगीळ अशा जोड्यांच्या राजकारणात जेधे नाव कायम राहिलं. जोड्यांच राजकारण आणि त्यातून निर्माण झालेला वाद या सर्व गोष्टी तत्कालीन महाराष्ट्राने पाहिल्या.

जेधेंचा जन्म श्रीमंत कुटूंबातला. त्यांचे वडिल मारूतीराव जेधे हे पुण्याचे प्रसिद्ध भांडी व्यापारी होते. पुणे महानगरपालिकेच्या १६ नंबर शाळेत त्यांच शिक्षण झाल. पुढे पूना हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल ते मुंबई विद्यापीठातून मॅट्रिक आणि फर्ग्युसन कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेवून ते सामाजिक चळवळीचा खांदा झाले.

मुळात त्यांचे घरच सामाजिक चळवळींच केंद्र होतं. त्यांचे मोठ्ठे बंधु बाबूराव जेधे हे सामाजिक कार्यात सक्रीय होते. हाच वारसा केशवराव जेधेंना मिळाला. १९२० साली त्यांचा विवाह शितोळे घराण्यातील वेणूताई यांच्याशी झाला. जेधे हे मराठा समाजातील होते. त्या काळात आजच्या सारखीच मराठा समजातील मात्तबरांची लग्न मोठ्या धुमधडाक्यात होत असत. अशा काळात त्यांनी आपलं लग्न सत्यशोधक पद्धतीने कमी खर्चात केलं होतं.

आपल्या व्यक्तिगत संपत्तीचा उपयोग देखील त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी केला. छत्रपती शाहू महाराज व त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. शाहू महाराज पुण्याला येत असत तेव्हा ते जेधे मॅन्शनमध्येच रहायला असत. तेव्हा जेधे मॅन्शन हेच बहुजन समाजाच्या चळवळीचं केंद्र झालं होते.

खालील प्रमुख मुद्यावरून केशवराव जेधे कोण होते हे समजणं सोप्प जाईल.

१) शिवस्मारकासंबधी भूमीका

छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर काही सनातनी ब्राह्मणांनी पेढे वाटल्याचा आरोप होता. तत्पुर्वी शाहू महाराजांच्या हयातीतच म्हणजे १९१७ साली ग्वाल्हेरचे खासेसाहेब पवार आणि बडोद्याे खासेसाहेब जाधव यांनी शिवस्मारक उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता.

६ मे १९२२ रोजी शाहू महाराजांचे निधन झाले आणि २५ मे १९२२ रोजी अलिजाबहादूर शिंदे सरकार यांच्या आलीराज बंगल्यात शिवस्मारकासंबधी सभा आयोजित करण्यात आली. या सभेत शिवस्मारकात ब्राह्मण समाजातील व्यक्तींना घ्यायचे ठरले. सांगलीचे पटवर्धन यांना समितीत घेतले तर भारत सेवक समाजाचे गोवाकराव जाधव यांना चिटणीस करण्यात आले.

शिवस्मारक समितीत ब्राह्मणांना घेण्यास जेधेंनी तीव्र आक्षेप घेतला. जेधे, पालकर बंधु, बी.एल, पाटील यांनी शिंदे सरकारविरोधात मंडळ स्थापन केले. कोणत्याही प्रकारे ब्राह्मणांना यात समावून घेवू नये अशी त्यांनी भूमिका घेतली व यामध्ये शिवस्मारकाचे काम थंडावले. पुढे शिवस्मारकाचे काम सुरू व्हावे म्हणून जेधेंनी यातून आपली भूमिका मागे घेतली. पुढे शिवस्मारकाची जबाबदारी कोल्हापूरच्या राजाराम महाराजांवर सोपवण्यात आली व त्यांच्याच पुढाकारातून शिवस्मारकाचे काम पूर्णत्वास गेले.

२) महात्मा फुलेंचा पुतळा प्रकरण

पुणे महानगरपालिकेत न.चि. केळकर अर्थात तात्यासाहेब केळकर गटाचे अस्तित्व होते. त्यांच्या महानगरपालिकेच महात्मा जोतिबा फुले यांचा पुतळा बसवण्यास विरोध होता. अशा वेळी पुणे महानगरपालिकेने महात्मा फुलेंचे स्मारक उभारावे असा ठराव केशवराव जेधेंनी आणला. यास विरोध होताच प्रत्येक जिल्ह्यामध्ये दौरे काढून बहुजन समाजास संघटित करण्याचे काम करण्यात आले.

१९२५ साली हा ठराव आणण्यात आला. मात्र या ठरावास विरोध करुन लोकमान्य टिळक आणि विष्णूशास्त्री चिपळुणकर यांचे पुतळे बसवण्याचा ठराव संमत करण्यात आला. तेव्हा ब्राह्मणेत्तर पक्षाचे केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर यांनी देशाचे दुश्मन नावाचे पुस्तक लिहले. बहुजन समाजाचे पहिले बौद्धिक धाडस म्हणून हे प्रकरण ओळखले जाते.

३) गणेश मेळाव्यांना उत्तर म्हणून छत्रपती मेळावे.

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवांना सार्वजनिक स्वरूप दिले. त्यानंतर ठिकठिकाणी गणेश मेळावे आयोजित करण्यात येऊ लागले. या मेळाव्यातून समाजिक सुधारणांचा वसा घेतलेल्या पुढाऱ्यांची निंदानालस्ती करण्याचे प्रकार होवू लागले. लोकांना संघटित करण्याऐवजी फक्त सामाजिक सुधारणा करणाऱ्या पुढाऱ्यांचा अपमान करण्यासाठी गणेश मेळावे आयोजित करण्यात येवू लागले.

तेव्हा जेधेंनी छत्रपती मेळावे आयोजित करुन यास उत्तर दिले. छ.शिवाजी महाराज, छ.शाहू महाराज यांच्यावर गौरवपर पद म्हटली जावू लागली. टिळक पक्षाचा भांडाफोड करण्याचे काम या छत्रपती मेळाव्यातून केले जाऊ लागले.

४) ब्राह्मणेत्तर लीगची स्थापना

जेधे मॅन्शनमध्ये केशवराव जेधे यांच्या पुढाकारातून डिसेंबर १९२० मध्ये ब्राह्मणेत्तर लीगची स्थापना करण्यात आली. ब्राह्मणेत्तर पक्षाचे प्रमुख म्हणून भास्करराव जाधव काम पाहू लागले. बहुजन समाजाला शिक्षित करुन अन्यायास वाचा फोडण्याचे मुख्य सुत्र या लीगच्या स्थापनेत ठरवण्यात आले.

५) महात्मा गांधींना पानसुपारी

सप्टेंबर १९२४ साली म. गांधी पुण्यात आले होते. तेव्हा ब्राह्मणेत्तर पक्षामार्फत त्यांना पानसुपारी देण्याचा कार्यक्रम जेधे मॅन्शनमध्ये आयोजित करण्यात आला होता. ब्राह्मणेत्तरांनी इंग्रज राज्यकर्त्यांवर अवलंबुन राहू नये असे या सभेत सुचवले होते.

६) केशवराव कॉंग्रेसकडे झुकले

मद्रास प्रातातले ब्राह्मणेत्तर पक्षाचे अधिवेशन कोईमत्तूर येथे झाले. या अधिवेशनात ज्या ब्राह्मणेत्तर कार्यकर्त्यांना कॉंग्रेसमध्ये जायचे आहे त्यांनी जावे असा ठराव करण्यात आला. या घटनेनंतर जेधे-जवळकर यांनी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला मात्र भास्करराव जाधव यांचा त्याला विरोध होता. त्यामुळे जेधे-जवळकर यांच्या कॉंग्रेस प्रवेशाचा निर्णय तेव्हा होवू शकला नाही.

७) जेधे-जवळकर यांची मैत्री व शेवट.

जेधे-जवळकर यांची मैत्री १९२० ते १९२७-२८ पर्यन्त कायम राहिली. १९२७ मध्ये सायमन कमिशनवर बहिष्कार टाकावा की नाही यावरून दोघांच्यात मतभेद झाले. याचवेळी भास्करराव जाधवांचा प्रभाव जवळकर यांच्यावर पडू लागला. जवळकर आणि जाधव यांनी गिरणी कामगारांच्या विरोधात धोरण स्वीकारले.

याचदरम्यान १९२७ च्या सायमन कमिशनबाबत ब्राह्मणेत्तर पक्षाची काय भूमिका आहे हे सांगण्यासाठी लंडनला दोघांचे शिष्टमंडळ पाठवायचे ठरले. ही बैठक जेधे यांच्या अनुपस्थित पार पडली. त्यामध्ये जवळकर व के.एस.गुप्ते यांची नावे निश्चित करण्यात आली. ही गोष्ट जेधे यांना समजताच त्यांनी ज्ञानप्रकाशमध्ये भास्करराव जाधवांना अनावृत्त पत्र लिहून जवळकर यांना इंग्लडला पाठवण्यास विरोध केला त्यामुळेच जेधे-जवळकर मैत्री संपुष्टात आली.

८) मुंबई प्रांतातील शेतकऱ्यांची सर्वात मोठी परिषद भरवली.

२५ जुलै १९२५ साली मुंबई प्रांतातील सर्वात मोठी शेतकरी परिषद भरवण्यात आली होती. सारा विधेयक व जमिन विभागणी बंदीच्या विधेयकाविरोधात या परिषदेत ठराव करण्यात आला. जेधे बंधुंच्या परिश्रमामुळे ही परिषद यशस्वी होऊ शकली.

९) पर्वती मंदीर आंदोलन

पुण्याच्या पर्वती मंदीरात अस्पृश्यांना प्रवेश मिळवण्यासाठी सत्याग्रह समिती गठित करण्यात आली. याचे अध्यक्ष शिवराम कांबळे होते. तर सल्लागार समितीत केशवराव जेधे यांच्यासह काकासाहेब गाडगीळ, वा.वि.साठे, विनायक भुस्कुटे होते.

१३ ऑक्टोंबर १९२९ रोजी ३०० कार्यकर्त्यांसह हे आंदोलन करण्यात आले. निम्या पायऱ्या चढल्यानंतर सनातन्यांनी दगडांचा मारा सुरू केला. यादरम्यान मारामारी झाली. पुढे महर्षी शिंदे, केशवराव जेधे यांच्या उपस्थितीत मुंबईस मोठी सभा आयोजित करण्यात आली.

१०) सविनय कायदेभंग चळवळीत सहभागी

गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकून जेधे यांच्या अध्यक्षतेखाली १२ नोव्हेंबर १९३० रोजी पुण्यात सभा आयोजीत करण्यात आली. या सभेमुळे जेधे यांना ३ महिने सक्तमजूरीची शिक्षा सुनावण्यात आली.

११) कॉंग्रेसमधून निवडून आले.

१९३४ साली झालेल्या मध्यवर्ती कायदेमंडळाच्या निवडणूकीत जेधे आणि गाडगीळ कॉंग्रेस पक्षामार्फत निवडून आले. ब्राह्मणेत्तर पक्षाचा पहिला सदस्य मध्यवर्ती कायदेमंडळाचा सदस्य झाला होता. तेव्हा ब्राह्मणेत्तर पक्षामार्फत १३ जानेवारी १९३५ रोजी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

१२) फैजपूर कॉंग्रेस अधिवेशन ते १९३७ च्या प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणूका.

केशवराव जेधे व काकासाहेब गाडगीळ यांनी कॉंग्रेसचे अधिवेशन मुंबई प्रांतात होणार म्हणून संपूर्ण मुंबई प्रांत फिरून काढला. त्यांच्या प्रयत्नातून विक्रमी असे ६० हजार लोक या अधिवेशनाला उपस्थित होते.

१९३५ च्या सुधारणा कायद्यानुसार १९३७ साली प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका झाल्या. उमेदवारांचा प्रचार करण्याची जबाबदारी शंकरराव देव, जेधे, काकासाहेब गाडगीळ, तुळशीदास जाधव, क्रांतीसिंह नाना पाटील त्यामुळेच कॉंग्रेसला बहुमत प्राप्त झाले.

१३) महाराष्ट्र प्रांतिकचे अध्यक्ष म्हणून जेधेंची निवड

सेनापती बापट यांनी पत्रक काढून प्रांतिक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी जेधे यांची निवड करावी असे मत मांडले. १५ जानेवारी १९३८ साली प्रांतिक कॉंग्रेसची सभा आयोजित करण्यात आली व शंकरराव देव यांनी जेधेंचे नाव सुचवले. त्यांची कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून निवड झाली. या निवडीमुळेच कॉंग्रेसमध्ये बहुजन समाजाला महत्व प्राप्त होऊ शकले.

१४) १९४२ च्या लढ्यात सहभाग

१ डिसेंबर १९४० रोजी जेधे यांनी सासवड येथे सत्याग्रह केला. त्यात त्यांना दिड वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. ४२ च्या चलेजाव चळवळीत त्यांनी सहभाग घेतला. त्यांना पुन्हा नाशिकच्या तुरूंगात हलवण्यात आले. फेब्रुवारी ४४ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली.

१५) शेकाप ची स्थापना

१३ जून १९४८ रोजी निवडणूका होऊन प्रांतिक कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून भाऊसाहेब हिरे तर चिटणीस म्हणून यशवंतराव चव्हाण यांची निवड झाली तेव्हा याच दिवशी केशवराव जेधे आणि मोरे यांनी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली.

शेकापचे पहिले अधिवेशन तुळशीदास जाधव यांच्या पुढाकारातून सोलापूर येथे आयोजित करण्यात आले. क्रांतिसिंह नाना पाटील, काकासाहेब वाघ यांच्या सहकार्यातून शेकाप घराघरात पोहचू लागला.

पुढे शेकाप मध्ये नवजीवन संघटनेला पक्षप्रवेश द्यावा की देवू नये यावरून वाद झाला व दत्ता देशमुख, क्रांतिसह नाना पाटील यांचा गट बाहेर पडला त्यांनी कामगार किसान पक्ष स्थापन केला.

१६) १९५२ च्या सार्वत्रिक निवडणूका

केधवराव जेधे यांनी एकवेळचे आपले सहकारी काकासाहेब गाडगीळ यांच्या विरोधात ही निवडणूक लढली ज्यामध्ये त्यांचा पराभव झाला. नव्याने मिळालेले स्वातंत्र्य व नेहरू युग याचा फटका शेकाप पक्षास बसला.

आपल्या पराभवास केशवराव जेधे यांनी शंकरराव मोरे यांना कारणीभूत मानले. १७ मे १९५२ ला केशवराव जेधे यांनी शेकापचा राजीनामा देणारे पत्र पाठवले मात्र मध्यस्थी झाल्यानंतर हे पत्र मागे घेतले.

१७) जेधे मोरे वाद

१९५४ पर्यन्त जेधे मोरे वाद पेटला १५ ऑगस्ट १९५४ साली केशवरावांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. १९५४ मध्ये त्यांची गोवा विमोचन सहाय्यक समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या समितीने गोवा स्वतंत्र करण्यासाठी गोव्यास ७० सत्याग्रहींच्या तुकड्या पाठवल्या.

१८) संयुक्त महाराष्ट्राबाबत भूमिका

कॉंग्रेसमध्ये राहून मला संयुक्त महाराष्ट्राबाबत भूमिका घेण्याचा अधिकार आहे असे त्यांनी ३ फेब्रुवारी १९५६ रोजी टिळक स्मारक येथे झालेल्या सभेत वक्तव्य केले. संयुक्त महाराष्ट्रासाठी पक्षशिस्त न पाळल्याबद्गल कॉंग्रेसने मला पक्षातून काढले तरी चालेल असे ते म्हणाले होते.

केशवराव जेधेंचा अंत

१० नोव्हेंबर १९५९ साली अफजलखानाचा वध केल्यास ३०० वर्ष पुर्ण झाल्याबद्दल आचार्य अत्रे, जयंतराव टिळक, वा.व गोगटे यांच्या उपस्थितीत व केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली.

पूर्वी अत्रे चीन-भारत संबंधात कम्युनिस्टांची पाठराखण म्हणून हे नकाशाचे मालुली भांडण आहे असे म्हणाले होते. यावर सभेतच त्यांनी टिका केली. बोलता बोलता राग अनावर झाला आणि ग्लानी आली. चक्कर आल्याने त्यांना दवाखान्यात घेवून जाण्यात आले. उपचारादरम्यान १३ नोव्हेंबर १९५९ साली त्यांचे निधन झाले.

  •  संदर्भ : आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास (चिन्मय प्रकाशन) 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.