खलिस्तान मुव्हमेंटची स्थापना RPI च्या आमदाराने केली होती

१९ मार्चपासून देशभरात खलिस्तानी समर्थकांची धरपकड सुरू आहे. खलिस्तानी कारवायांनी डोकं वर काढल्यावर अमृतपालच्या चार समर्थकांना अटक केली, अनेक दिवस अमृतपालचा शोध चालु होता, अखेर अमृतपालाला अटक झाली. अटक पंजाबमध्ये होऊनही अमृतपालला आसामच्या दिब्रुगड जेलमध्ये नेण्यात आलं. अमृतपालच्या कारवायांमुळे पुन्हा एकदा खलिस्तानी मुव्हमेंटने डोकं वर काढलं. आता हे खलिस्तानी संघटना काय आहेत ?

खलिस्तानी संघटना म्हणजे शिखांसाठी एक वेगळा देश खलिस्तान असावा अशी मागणी करणाऱ्या संघटना.

१९८४चं ऑपरेशन ब्लु स्टार आणि त्यानंतरच्या पोलीस कारवायांमुळे खलिस्तानी चळवळीचं कंबरडं मोडलं होतं. त्यानंतर ही मोहीम भारताबाहेरून विशेषतः ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडा इथल्या काही शीख निर्वासितांकडून या चळवळीचं पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न चालू असतात.

विशेष म्हणजे सुरवातीपासूनच स्वतंत्र खलिस्तानसाठी पंजाब एवढेच प्रयत्न देशाबाहेरुनही  करण्यात येत होते. १९७०च्या काळात तर वेगळ्या खलिस्तानची मुव्हमेंट टोकाला पोहचली होती.

याचाच एक भाग म्हणून १२ ऑक्टोबर १९७० ला अमेरिकेत न्यू यॉर्क टाइम्समध्ये एक ऍडव्हर्टाइझ छापण्यात आली होती.

“We are a nation in our own right”

असं त्या जाहिरातीचं शीर्षक होतं. ‘आम्ही आता एक वेगळा देश आहोत’ असं म्हणत वेगळ्या खलिस्तानची स्थापन झाली आहे असं या जाहिरातीमध्ये म्हणण्यात आलं होतं.

ही वेगळ्या खलिस्तानची घोषणा करणारी जाहिरात दिली होती खलिस्तान चळवळीचा संस्थापक डॉ.जगजित सिंग चौहान याने.

जगजीत सिंग चौहान हा तेव्हा भारताबाहेरून चळवळीची सूत्र हालवत होता. त्याआधी तो पंजाबच्या राजकारणातलं एक मोठं प्रस्थ होतं.

जगजीत सिंग चंदीगडपासून १८० किमी अंतरावर असलेल्या पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातील तांडा येथे लहानाचा मोठा झाला. उच्चशिक्षित असलेला जगजीत सिंग डेंटिस्ट होता.त्यानंतर त्याने राजकरणात उडी घेतली. सुरवातीला त्यानं कम्युनिस्ट पार्टीमध्ये काम केलं. 

मग १९६७ मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा उमेदवार म्हणून पहिल्यांदा विधानसभेवर पोहचला होता.

आज ज्या अनेक रिपब्लिकन पार्टी देशभरात आणि महाराष्ट्रात आहेत त्यांचीच ही पॅरेंट पार्टी होती.आता जगजीत सिंग रिपब्लीकन पार्टीचा आमदार कसा झाला यासाठी आपल्याला इतिहासात अजून थोडं मागं जावं लागेल. 

१९४२ मध्ये,डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाचं काम पंजाबमध्ये देखील चालू झालं होतं परंतु पक्षाला निवडणुकीत यश मिळालं नव्हतं.

त्यानंतर डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनने ३० सप्टेंबर १९५६ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. आरपीआयने मग पंजाबमध्ये १९६७ ला विधानसभेची  निवडणूक लढवली आणि त्यांचे चार आमदार निवडून आले. त्यात डॉ. जगजित सिंग चोहान याचा समावेश होता.

 पंजाबमध्ये अकाली दलाच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने कार्यभार स्वीकारला तेव्हा तो  उपसभापती झाला. 

लछमनसिंग गिल मुख्यमंत्री झाल्यावर चौहान त्यांच्या सरकारमध्ये पंजाबच्या अर्थमंत्रीपदी बसला होता. 

त्यातच १९६६ मध्ये पंजाब राज्याचं विभाजन होऊन हरियाणा आणि पंजाब अशी दोन राज्ये निर्माण झाली होती. याचवेळी पंजाबवर अन्याय झाल्याची भावना निर्माण केली गेली. वेगळ्या खलिस्तानच्या मागणीला यातूनच पुन्हा हवा दिली जात होती.

त्यातच १९६९च्या निवडणुकीत जगजीत सिंग याचा पराभव झाला. 

मग यानं पुन्हा आपली भूमिका बदलत वेगळ्या खलिस्तानच्या मागणीकडे मोर्चा वळवला. काही वर्षातच चौहान लंडनमधून निर्वासित खलिस्तानी सरकार चालवायला लागला. अमेरिका आणि कॅनडामध्येही त्याने संगठना चालवायला सुरवात केली. 

आपल्या या मुव्हमेंटला पाठिंबा मिळवण्यासाठी त्याने  पाकिस्तानचे दौरे देखील केले.

आधी सांगितल्याप्रमाणे  १९७१ मध्ये त्याने न्यूयॉर्क टाइम्समध्ये खलिस्तानच्या वेगळ्या शीख राज्याची घोषणा करणारी जाहिरात दिली होती. 

१९८० च्या सुरुवातीस खलिस्तानच्या मोहिमेला हिंसक वळण लागले. भिंद्रानवालेने आता वेगळ्या खलिस्तानसाठी सूत्र हातात घेतली होती. पंजाबमध्ये बॉम्बस्फोट आणि गोळीबाराच्या घटना नित्याच्या  झाल्या होत्या.

याच शेवट ऑपरेशन ब्लूस्टारमध्ये झाला जेव्हा जून १९८४ मध्ये भारतीय सैन्याने अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात प्रवेश करून लष्करी कारवाईत भिंद्रानवालेचा खात्मा केला.

त्यानंतर पंजाबमधील वातवरण अधिकच स्फोटक बनलं होतं. तेव्हा जगजीत सिंग याने BBC ला एक मुलाखत दिली होती. 

BBCच्या याच मुलाखतीत त्याने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा “शिरच्छेदन” होईल असा दावा केला होता. 

त्यावेळच्या ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्या सरकारने त्याला ब्रिटनमधून अशी  विधाने करणे टाळण्यास सांगितलं होतं.

पुढे इंदिरा गांधी यांची त्यांच्या दोन शीख अंगरक्षकांनी  ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी हत्या केली होती.

त्यानंतर हळूहळू खलिस्तान चळवळीला लोकांचा पाठिंबा कमी झाला.  पुढे १९८९ मध्ये जगजीत सिंग पंजाबला परतला आणि त्याने एका शीख गुरुद्वारावर खलिस्तानचा ध्वज फडकावला. भारत सरकारने त्यावेळी त्याचा पासपोर्ट रद्द केला आणि तरीही पासपोर्टचा वापर करून त्यानं अमेरिकेत प्रवेश मिळवला होता. 

१९९० च्या दशकाच्या सुरुवातीला शीखांची फुटीरतावादी मोहीम जवळपास पूर्णपणे संपुष्ठात आली होती.

पुढे बऱ्याच वेळ दीर्घ न्यायालयीन लढाई लढल्यानंतर २१ वर्षांनंतर २००१ मध्ये त्याला भारतात परतण्याची परवानगी मिळाली. तरीही त्याने आपली मोहीम सुरूच ठेवली.

त्यासाठी त्याने खालसा राज पक्षाची स्थापना केली. 

परंतु शिखांच्या नवीन पिढीचा त्याला पाठिंबा मिळवता आला नाही. २००७ मध्ये स्वतंत्र खलिस्तान प्रत्यक्षात येईल अशी भविष्यवाणी त्याने केली होती. पुढे ४ एप्रिल २००७ रोजी पंजाबमध्येच त्याचे हार्ट ऍटॅकने निधन झाले.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.