कोरोना काळातल्या तीन महिन्यात ३.५कोटीची उलाढाल करणारी किसान कनेक्ट कंपनी.

मार्च २०२० मध्ये वाढत्या करोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन भारत सरकारने देशभरात टाळेबंदी जाहीर केली. अचानक झालेल्या टाळेबंदीमुळे बऱ्याच समस्यांचा सामना सगळ्यांनाच करावा लागला, कैक लोकांचे कामधंदे ठप्प झाले आणि त्याचा व्यापार क्षेत्रावरही वाईट परिणाम झाला.

महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचीसुद्धा कोंडी झाली. इतके दिवस मुंबई, पुण्यात आणि बाकी मोठ्या शहरांमध्ये जाणारा भाजीपाल्याचा साठा या शेतकऱ्यांकडे वाढला आणि तो माल विकण्यासाठी दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नव्हता. मग अशा वेळी तिथल्या काही शेतकऱ्यांनी मिळून सुरु केली किसान कनेक्ट नावाची कंपनी.

अहमदनगरमधल्या काही सुशिक्षित शेतकऱ्यांनी या प्रकरणावर तोडगा काढला आणि या संकटावर मात केली. सुरवातीला अकरा शेतकरी व्हाट्सएपच्या माध्यमातून एकत्र आले. पुढे त्यांनी एक वेबसाईट सुरु करून त्यावरून थेट ग्राहकाशी संपर्क करून माल विपरीत करायचा असं धोरण आखलं. यामुळे व्यापारी लोकं करणारी लूट थांबली, दलाल , अडत्यांचे प्रश्न मिटले.

एका वर्षानंतर त्यांच्या अकरा शेतकऱ्यांचे ४८० लोकांची एक भक्कम टीम तयार झाली आणि त्यांनी किसान कनेक्ट नावाची संस्था स्थापन केली. यातून थेट ग्राहक जी ऑर्डर देईल ती भाजी त्यांना पोहचवता येऊ लागली.

मनीष मोरे या सुशिक्षित शेतकऱ्याने हि संकल्पना सर्वप्रथम मंडळी आणि ती स्वतः या कंपनीचा संस्थापक होऊन ती अस्तित्वात आणली. ते म्हणतात कि, सुरवातीला जवळपासचे अकरा शेतकरी माझ्या ओळखीतले होते त्यांना मी माझी आयडिया ऐकवली आणि या ताळेबंदीच्या संकटावर आपण अशा प्रकारे मात करू शकतो असं त्यांना पटवून सांगितलं आणि त्या सगळ्यांना हि आयडिया आवडली.

मनीष मोरे यांनी बिग बाजार आणि रिलायन्स कंपनी यांच्यासोबत काम केलेलं होत आणि त्यांना चांगल्या प्रकारे माहिती होतं कि या कंपन्या शेतकऱ्यांना फायदा होऊ देत नाही. ठराविक व्यापाऱ्यांनाच शेतकरी त्याचा भाजीपाला विकत असतो तेही बऱ्याचदा नुकसानकारकच असतं. म्हणून शेतकऱ्यांना मी एकत्र केलं आणि त्याच त्याच व्यापाऱ्यांना माल विकून नका म्हणून सांगितलं.

एप्रिलमध्ये त्यांनी हा प्रवास सुरु केला. मुंबई, पुण्यातल्या लोकांना भाजीपाला पुरवण्याची सुरवात सुरु केली. या मोठ्या शहरांमधल्या जवळपास १०० सोसायट्या किसान कनेक्ट कंपनीकडून भाजीपाला विकत घेतात. यामध्ये कुठलाही दलाल, अडते यांचा संपर्क न येता भाज्यांचे बास्केट ग्राहकांपर्यंत पोहचवण्यात येतात. चार किलोपासून ते बारा किलोंपर्यंतच्या वस्तू घरपोच पाठवल्या. वेगवेगळ्या आकारांच्या पेट्या आणि त्यानुसार भाज्या असं वर्गीकरण करून हा माल पाठवण्यात येतो.

व्हेजिटेबल बास्केट, फ्रुट बास्केट आणि इम्युनिटी बास्केट अशा प्रकारचे बास्केट आम्ही सध्या वितरित करत आहोत. इम्युनिटी बास्केट मध्ये आम्ही इम्यूनिटी वाढवणारी फळं आणि भाज्या समाविष्ट केल्या आहेत. ज्या आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि आपल्याला तंदुरुस्त ठेवतात अशा प्रकारच्या बास्केट तयार केल्या आहेत.

२४ तासांच्या आत हा सगळं भाजीपाला ग्राहकांपर्यंत पोहचवला जातो. सगळं हायजेनिक आणि स्वच्छ पॅक करूनच आम्ही माल वितरित करतो. ग्राहकांचा यावर चांगला प्रतिसाद आहे. ग्राहक सांगतात कि,

किसान कनेक्ट हि सध्याची सगळ्यात चांगली कंपनी आहे. करोना काळात थेट ग्राहकापर्यंत कंपनी भाजीपाला पोहचवते हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे, तेही एकदम व्यवस्थित पॅकिंग करून. करोना रोगाचा प्रसार आणि सुरक्षा यावरून या कंपनीने योग्य प्रकारची पॅकिंग करून सुरक्षितता जपली आहे.

पहिल्या महिन्यातच किसान कनेक्ट कंपनीने ४० लाखांचा गल्ला जमवला त्यामुळे शेतकऱ्यांचा हुरूप वाढला. यामुळे हळूहळू अनेक शेतकरी या संस्थेशी जोडल्या जाऊ लागले. सुरवातीला ज्यावेळी व्हाट्सअप ग्रुपवरून ऑर्डर घेतल्या जात होत्या तेव्हा या शेतकऱ्यांनी त्यांच्या आयटी मित्रांकडून एक वेबसाईट बनवून घेतली आणि वेबसाईटवर व्यापार सुरु केला.

ज्यावेळी व्यापार वाढीस लागला तेव्हा या शेतकऱ्यांनी समाज माध्यमांचा चांगला वापर करून विक्री वाढवली, तक्रारीसाठी आणि संपर्क करण्यासाठी कस्टमर केअर सुद्धा उपलब्ध करून दिला. महाराष्ट्रात मराठीबरोबरच इंग्रजी भाषा हि अजून दुसऱ्या शहराशी संपर्क करण्यासाठी वेबसाईटवर ऍड करण्यात आली.

संकटकाळात या शेतकऱ्यांच्या एकीची आणि त्यांच्या किसान कनेक्टची लोकांनी चांगलीच वाहवा केली. यातून शेतकरी आणि ग्राहक यांचे चांगले संबंध टिकून राहतील आणि लोकांना शेतातील ताजी भाजी खाऊन काही अपाय होणार नाही. अजूनही मोठ्या प्रमाणात या ४८० जणांच्या किसान कनेक्ट संस्थेकडून लोकं भाजी मागवत आहेत.

सुरवातीच्या करोनाच्या महाभयंकर काळात संधी शोधून या शेतकऱ्यांनी सगळ्यांनाच एक आदर्श घालून दिला आहे. तीन महिन्याच्या कालावधीत त्यांनी ३.५ कोटींची उलाढाल केली आणि यशस्वी वाटचाल सुरु केली आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.