कोल्हापूरात फुटबॉलचा विकास कोणामुळे झाला असेल तर तो शाहू महाराजांच्या प्रयत्नांमुळेच!
शनिवारी रात्री रियाल माद्रिदनं चॅम्पियन्स लीगची फायनल मारली. जसं लिव्हरपूल हरलं, तसं माद्रिदच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. फेसबुकवर कल्ला, व्हाट्सअपवर कल्ला… पण सोशल मीडियावर सगळी दुनिया नाचती, खरे बादशहा ते असतात, जे रिअल लाईफमध्ये राडा करतात. हा राडा महाराष्ट्रात कुठं झाला असेल, तर कोल्हापूर.
कोल्हापूरमध्ये कुस्तीवर जितकं प्रेम केलं जातं, तितकंच फुटबॉलवर. इथं ‘आज मॅच आहे का?’ हा प्रश्न फक्त फुटबॉलसाठी विचारला जातो, कारण प्रॅक्टिस असो किंवा पीटीएम इथली लोकं आपल्या क्लबवर नटीपेक्षा जास्त प्रेम करतात.
सध्या जसं फुटबॉल चर्चेत आलंय, अगदी तसंच कोल्हापूरही.
आधी विधानसभेची पोटनिवडणूक आणि आता राज्यसभेची निवडणूक. कोल्हापूर सतत राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहतंय. सध्याच्या चर्चांमध्ये आणि राजकीय गाठीभेटींमध्ये राजकारणात फारसं चर्चेत नसलेलं आणि प्रसिद्धीपासून काहीसं लांब असलेलं नाव आलंय, ते म्हणजे शाहू छत्रपती.
सध्याचे कोल्हापूर गादीचे वंशज असणारे शाहू महाराज, फार कधी बातम्यांमध्ये नसतात. सध्या राजकारणाचा केंद्रबिंदू झाले असले, तरी शाहू छत्रपती कोल्हापूरकरांचे लाडके असण्यामागं एक कारण आहे, ते म्हणजे त्यांचं फुटबॉल प्रेम.
नागपूरच्या भोसले घराण्यातून ते दत्तक आले आहेत. याआधीचे महाराज शहाजीराजे छत्रपती यांच्या मुलीचे ते चिरंजीव. पूर्वीचे नाव दिलीपसिंह. त्यांचा जन्म मुंबईत ७ ऑगस्ट १९४८ ला झाला. नागपूर आणि बंगळूर इथं बिशप कॉटन हायस्कूलमध्ये शिक्षण घेतल्यावर इंदौरच्या ख्रिश्चन कॉलेजमधून अर्थशास्त्र, इतिहास व इंग्रजी साहित्य या विषयांतून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली.
पदवी घेतल्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे ९ मार्च १९७० मध्ये मंगसुळी (अथणी) येथील पवार परिवारातील याज्ञसेनीराजे यांच्याशी शाहू महाराजांचा विवाह झाला.
शाहू महाराजांना खेळाची विशेषतः फुटबॉल आणि कुस्ती यांची विशेष आवड. फुटबॉलवर तर त्यांचं निस्सीम प्रेम आहे.
या प्रेमाखातर त्यांनी एकदा जर्मनी गाठली होती, वर्ल्डकप मॅचेस पाहण्यासाठी.
छत्रपती शाहू महाराजांचे वैशिष्टय़ म्हणजे राजघराण्याची कोणतीही झूल त्यांच्या अंगावर किंवा वागण्यात आढळत नाही. साधेपणा, ऋजुता आणि सृजनत्व हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष. विषेश म्हणजे ते उदारमतवादी आहेत. कोल्हापूरच्या सार्वजनिक जीवनात त्यांचा सभा-समारंभांतून वावर असतो. समाजातील व राजकारणातील व्यक्तींशी त्यांचे मैत्रीचे संबंधही आहेत.
महाराजांना राजकारणाची आवड आहे. त्यांनी राजकारणात सक्रिय होता येईल का, हे आजमावून पाहिलं खरं, पण प्रत्यक्ष राजकारणात सक्रीय सहभाग घेतला नाही. त्याबद्दल ते म्हणतात, ‘माझं मन नेहमी राजकारणाच्या सीमारेषेवर राहिलं. हवं तर आपण त्याला ‘पेरीफेरी’ म्हणूयात.’
संजय राऊत यांनी शाहू महाराजांची भेट घेतली तेव्हा त्यांच्यात राजकीय चर्चा झाली असेल किंवा नसेलही, यावर चर्चाही घडतील. पण कोल्हापुरात फुटबॉलची चर्चा शाहू छत्रपतींमुळेच होऊ लागली.
कोल्हापूरमधल्या फुटबॉलचा खऱ्या अर्थानं विकास कोणामुळे झाला असेल तर तो शाहू महाराज यांच्या प्रयत्नांमुळे! कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनचे ‘पेट्रन इन चिफ’ म्हणून काम करणाऱ्या शाहू महाराज यांनी भव्य अशा शाहू स्टेडियमची उभारणी केली.
त्यांनी फुटबॉल वाढीसाठी नुसतेच प्रयत्न केले नाहीत, तर खेळाचा दर्जा सुधारण्यावर, खेळाडूंना सुविधा उपलब्ध करून देण्यावर अधिक जोर दिला.
कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच आयलीग सेकंड डिव्हिजन फुटबॉल स्पर्धा त्यांच्याच प्रेरणेतून आणि प्रयत्नांतून यशस्वीपणे पार पडली. त्यानंतर भारत विरुद्ध हॉलंड हा महिलांचा आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना कोल्हापुरात आयोजित करण्यात शाहू महाराजांनी पुढाकार घेतला.
आजच्या घडीला युरोपमध्ये ज्या धर्तीवर लीग फुटबॉल चालतं, त्याच धर्तीवर कोल्हापुरात फुटबॉल खेळलं जातं. स्थानिक मंडळ, क्लब यांच्या माध्यमातून कित्येक खेळाडू पुढे आले. कित्येक तरुण खेळाडूंनी कोल्हापुरात ‘प्रोफेशनल फुटबॉल प्लेअर’ म्हणून नाव कमावलंय. खेळाडूंच्या अडीअडचणीलाही कोल्हापूर उभं राहतंय. परदेशी खेळाडूही इथल्या लीगमध्ये खेळतात… इतक्या उंचीवर कोल्हापूरचं फुटबॉल गेलंय.
एक मात्र आहे कोल्हापुरात कोणत्याही राजकीय नेत्याची फुटबॉल लीग असो, उद्घाटनाला शाहू महाराज असतातच.
हे ही वाच भिडू:
- कोल्हापूरची वैशिष्ट्ये वाचली तर एशियन पेंन्टचे पण कान गच्च हुतील
- इंग्लिश क्लब फुटबॉल बघणाऱ्यांनां त्याने भारतात पण फुटबॉल असते हे शिकवलं.
- ‘छत्रपती उदयनराजे’ अन् ‘संभाजीराजे छत्रपती’: नावाच्या अगोदर आणि नावानंतर छत्रपती असं का ?