असा आहे भारतातल्या सोन्याच्या खाणीचा इतिहास, कोल्लार गोल्ड फिल्ड अर्थात KGF

जगात श्रीमंत देशांची एकेकाळची व्याख्या होती म्हणजे त्यांच्याकडं असणारा सोन्याचा साठा. अमेरिकेच्या इतिहासात एक मोठं प्रकरण आहे, गोल्डरश म्हणून. ते नसतं तर अमेरिका घडली नसती असं म्हणतात.

त्या सोन्याच्या मोहात पडून अमेरिकन माणसांनी मोठमोठे रस्ते आणि नव्या वसाहती उभारल्या. त्यामुळंच अमेरिका आजवर महासत्ता राहू शकली असं म्हणतात.

मग भारत जर एकेकाळी सोने की चिडिया होता तर आपलं सोनं यायचं कुठून? आफ्रिका आणि अमेरिकेपेक्षा कितीतरी कमी पटींनी कमी सोनं भारतात सापडतं.

मग आपल्याकडच्या सोन्याच्या धुराचं इंजिन काय होतं?

ते होतं ऐतिहासिक कोल्लार गोल्ड फिल्ड.

१९०२ साली भारतात तयार झालेल्या ९५% सोन्याचा वाटा हा कोल्लार गोल्ड फिल्डमधून येत होता. कोल्लार गोल्ड फिल्डच्या आजूबाजूला एक शहरच वसलं होतं. भारतील अन्य शहरांना पूर्णवेळ वीजपुरवठा मिळण्याआधी कोल्लार गोल्ड फिल्डला विजेचं २४ तास कनेक्शन मिळालं होतं.

कोल्लारमधली सोन्याची खाण जगातली दुसरी सगळ्यात खोल खाण आहे. पिच्चरमध्ये दाखवलेल्या गोष्टी या अर्थातच खऱ्यावर साऊथ इंडियन तडका चढवून दाखवल्या आहेत पण खरोखरच ही खाण भारताची सोने कि चिडिया होती.

गोष्ट सुरु होते १८७१ मध्ये.

मायकल लावेल हा आयर्लंडमधला सैनिक. ब्रिटिशांच्या फौजेत कामाला होता. माओरी या न्यूझीलँडमधल्या आदिवासींचा सफाया करून निवृत्ती घेतल्यानंतर बंगलोर शहराजवळ सेटल व्हायचं त्यानं ठरवलं.

युद्धात त्याने माओरी आदिवासी आणि त्यांच्या सोन्याविषयी भरपूर काही ऐकलेलं होतं. त्यामुळं आल्यानंतर त्यानं देशात कुठं सोन्याविषयी माहिती मिळतेय का याचा शोध घ्यायला सुरुवात केली.

१८०४ मधल्या एका जुन्या एशियाटिक जर्नलच्या पेपरात त्यानं याविषयी वाचलं आणि आपली सेकंड इनिंग याच कार्यात गुंतवायची असं त्यानं ठरवलं.

कोल्लार भागात सोन्याच्या खाणी असू शकतील अशी महिती त्यात होती.

१७९९ मध्ये टिपू सुलतान श्रीरंगपट्टणच्या लढाईत मारला गेला. तेव्हा विरोधी ब्रिटिश सैन्यात लेफ्टनंट जॉन वॉरन याला तेथील सोन्याच्या खाणींची माहिती मिळाली. या लढाईत मिळालेला सर्व भूभाग हा श्रीरंगपट्टणच्या संस्थानकडे विलीन करण्याची ब्रिटिशांची योजना होती.

पण या प्रचंड विभागाचा आधी सर्व्हे खात्याकडून सर्वेक्षण अहवाल घेऊन नोंद केली जाणार होती. लेफ्टनंट जॉन वॉरनयाला या कामासाठी कोल्लरला पाठवण्यात आलं.

चोळ राजाची सत्ता असताना लोक हाताने उकरून सोने काढत असल्याची अफवा लेफ्टनंट जॉन वॉरन ऐकून होता.

या सोन्याविषयीच्या अनेक दंतकथा त्याला ठाऊक होत्या. या सगळ्यात काही तथ्य आहे कि नाही हे जाणून घेण्यासाठी त्याने गावकऱ्यांना आवाहन केले आणि जो कुणी त्याला सोन्याचा साठा कुठं आहे हे सांगेल त्याला इनाम जाहीर केला.

गावातील लोकांनी सरकारी माणूस इनाम देईल म्हणून बैलगाड्या जुंपून त्यातून चिखल भरभरून आणला. लेफ्टनंट जॉन वॉरनच्या समोर या गाड्या खाली केल्या जात आणि धुतल्या जात. त्यात सोन्याचे लहानलहान कण आणि भुकटी मिळत असे.

५६ किलो चिखल धुतल्यानंतर सोन्याचा एक कण मिळवणं या पद्धतीने शक्य होते.

जर का तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर यातून मोठ्या प्रमाणावर सोन्याचे साठे मिळण्याची शक्यता होती. त्यानं या भागात खोदकाम करण्यात यावं यासाठी काही पत्रव्यवहारही केला होता.

१८०४ ते १८६० दरम्यान या ठिकाणी अनेक वेळा कित्येक माणसांनी नव्या उमेदीने सोने शोधायला सुरुवात केली होती. मात्र हे सगळे प्रयत्न अपयशी ठरले.

१८७१ मध्ये मात्र मायकल लावेल यांनी ६७ वर्षे जुन्या लेखावर भरवसा ठेवुन या मोहिमेला नव्याने सुरवात केली.

मायकल सायेब स्वतः बैलगाडी घेऊन कोल्लरला गेले. अनेक जागी त्यांना खोदकाम करण्याजोगी जागा सापडली. पहिल्यांदाच त्याने सोने काढता येईल असे साठे शोधून काढले.

दोन वर्षे अदबुन या माणसाने १८७३ साली महाराजाला पत्र लिहिलं. या विभागात खोदकामासाठी त्याने परवानगी मागितली. ब्रिटिश सरकारला इथं सोने नाही यावर ठाम विश्वास होता. त्यामुळं त्याला कोळसा खोदकामासाठी परवानगी देण्यात आली. पण मायकल सायेब हार मानणारे नव्हते.

“जर मी सोन्याचा शोध लावण्यात यशस्वी ठरलो तर ती माझ्या सरकारसाठी अभिमानाची बाब असेल. आणि जर का मी अपयशी ठरलो तरी सरकारचा काहीच तोटा नाही!”

अशा आशयाचे पत्र त्याने म्हैसूर आणि कूर्ग येथील चीफ कमिशनर साहेबांना लिहिलं.

२ फेब्रुवारी १८७५ ला खोदकामाला सुरुवात झाली.

मायकल सायेब सरकारकडून २० वर्षांचं खोदकामाचं लायसन घेण्यात यशस्वी ठरले. पण मायकल सायेब यांच्याकडे इच्छाशक्ती होती. नव्हती ती पैशांची पॉवर. त्यामुळं त्यांच्या खोदकामावर मोठी बंधनं होती.

पण ते कोल्लरच्या सुवर्णसाठ्याचे पोस्टर बॉय बनून गेले. त्यांच्या या जबरदस्त कामगिरीवर लिव्हिंग डेंजरसली ही कादंबरी लिहिली गेली. मायकल सायेब या कादंबरीमुळं इंग्लंडमध्ये फेमस झाले पण त्यांची आयुष्यभराची कमाई मात्र खोदकामावर उडवली जात होती.

१८७७ मध्ये या खाणीमध्ये एका युवा उद्योजकाने पाय ठेवला.

मद्रासचे  मेजर जनरल बेरेस्फोर्ड यांनी आपला तळ बंगलोरला नेला होता. कोल्लरच्या वाढत्या लोकप्रियतेमुळं आर्मीच्या काही अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन “कोलार कमिशनरीज कंपनी लिमिटेड” या कंपनीची स्थापना केली. यात मेजर जनरल बेरेस्फोर्ड यांच्याबरोबर मॅकेन्झी, सर विल्यम, कर्नल अर्बटनॉट यांचाही समावेश होता.

जगभरातील खाणकाम क्षेत्रातील तज्ञ माणसांना तेथे बोलावण्यात आलं. या गटाने जेव्हा जॉन टेलर यांना भारतात बोलावलं तेव्हा या खाणकामाचा चेरामोहराच बदलून गेला. त्यामुळं इंग्लंडमधून अनेक कंपन्या कोल्लार गोल्ड फिल्डमध्ये उतरल्या.

कोल्लरला अक्षरशः सोन्याचे दिवस आले.

कोल्लार गोल्ड फिल्डमध्ये जसजसं सोनं सापडू लागलं, ब्रिटिशांचं कोल्लारवरचं प्रेम वाढायला लागलं.

आशियातील दुसरा आणि भारतातील पहिला पॉवर प्लांट कोल्लरमध्ये स्थापन झाला.

१९०० साली रॉयल इंजिनियर्स या सरकारी कंपनीचे लोक म्हैसूरच्या राजाकडे डकावेरी नदीच्या धरणावर जलविद्युत प्लांट बांधण्यासाठी प्रस्ताव घेऊन गेले. न्यूयॉर्कची सेंट्रल इलेक्ट्रिक कंपनी आणि स्वित्झर्लंडची अजून एक कंपनी यांना याचं कंत्राट देण्यात आलं.

१४८ किमी लांबीची इलेक्ट्रीक लाईन बसवण्यात आली. ही त्या काळातील जगातील सगळ्यात लांब वीज घेऊन जाणारी लाईन होती. ब्रिटन, अमेरिका आणि जर्मनी येथून मोठमोठ्या मशिनी आणण्यात आल्या. त्यांना कोल्लार गोल्ड फिल्डमध्ये आणण्यासाठी हत्ती-घोडे लावून ओढण्यात आले.

सुरुवातीला मेणबत्त्या, मशाली आणि रॉकेलच्या चिमण्यांनी होणारं उत्खनन आता झगझगत्या बल्ब्सच्या उजेडात होऊ लागले. बंगलोर आणि म्हैसूर शहरात वीज येण्याआधी कोल्लार गोल्ड फिल्ड दिव्यांनी उजळून निघाले होते यावरूनच हा सरकारच्या किती जिव्हाळ्याचा विषय होता हे समजून येते.

या काळात कोल्लार गोल्ड फिल्डला अनेक नवी नावे मिळाली.

या भागाची एवढी भरभराट झाली कि याला छोटा इंग्लंड म्हटले जाऊ लागले. हवामान तिकडल्या हवेशी मिळतेजुळते असल्याने आणि जगभरातील इंजिनियर्स येथे आल्याने ही जागा क्लब्स आणि बंगल्यानी भरून गेली.

मात्र दुसरीकडे काम करणाऱ्या मजुरांची अवस्था अतिशय दयनीय होती. ‘कुली लाईन्स’ म्हणून ओळखला जाणारा हा भाग अस्वच्छतेसाठी प्रसिद्ध होता. यातील बहुसंख्य मजूर हे तामिळनाडूमधून पोट भरण्यासाठीच आलेले मजूर होते. येथील जीवन अतिशय खडतर होतं.

इथं उंदरांचा एवढा सुळसुळाट होता कि एका वर्षात मजुरांनी तब्बल ५०,००० उंदीर मारले होते.

खाणीतही परिस्थिती अत्यंत बिकट होती. ५५ अंश सेल्सियस तापमानात काम करावे लागे. अपघात आणि कामगारांचे मृत्यू ही रोजची गोष्ट होती.

कोल्लार गोल्ड फिल्ड मधील सोन्याचे साठे हळूहळू संपत आले.

लोकांनी तेथून काढता पाय घ्यायला सुरुवात केली. तरीही देश स्वतंत्र होईपर्यंत त्याचा ताबा इंग्रजांकडे राहिला. १९४७ ते १९५६ काळात या खाणींचा ताबा राज्य सरकारकडे होता. १९५६ साली भारत सरकारने जवळपास सर्व खाणींचा ताबा स्वतःकडे घेतला.

अँग्लो इंडियन लोकांनी आपल्या हिस्स्यातील वाट विकून आफ्रिकन देशांमध्ये खाणी घेतल्या. २००१ साली इथून सगळ्या प्रकारच्या खाणकामाला बंदी करण्यात आली. याविरुद्ध लोकांनी मोठ्या प्रमाणात उठाव केले.

आता या सगळ्या खाणी पाण्याने भरल्या आहेत. अनेक लोकांनी याविरुद्ध उठाव केले पण त्याला कुठलेही यश आले नाही.

कोल्लार गोल्ड फिल्ड पुन्हा सुरु होईल का याचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल.

त्यामुळेच कोल्लारच्या खाणींमध्ये अजून सोने असूनही हे सोने उपसता येणार नाही. कारण काढलेल्या सोन्याची किंमत ही खाणकामाच्या खर्चापेक्षाही कमी असेल.

पण दंतकथा आणि KGF सारख्या चित्रपटांतून ही सुवर्णकथा भारतीयांच्या मनात सतत झळाळत राहील.

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. Rutik Raju Akolkar says

    Chan information ahe kolar gold field baddal

Leave A Reply

Your email address will not be published.