बीसीसीआय आणि ललित मोदी एकत्र आले, त्यांनी ICL चा बाजार उठवला..
सध्या आयपीएल जोरात सुरु आहे. भारताच्या लोकांना एकवेळ स्वतःच्या करिअरचं काहीच पडलेलं नसतं पण आयपीएल मात्र व्यक्तिगत आयुष्याचा एक महत्वाचा भाग असल्यागत गंभीरतेने बघायचं असत.
चेन्नई मुंबई समर्थकांचे मॅच संपल्यावर स्टेट्स वॉरचे भांडणं आले, एकदाही आयपीएल जिंकलं नाही म्हणून चिकूशेठला ट्रोल करणं आलं, धोनीने संन्यास घायला हवा, मॅक्सवेलने इतक्या पैसा घेऊन टीमला चुना लावला , हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे अशा सगळ्या चर्चा आयपीएलचे कट्टर समर्थक उत्साहाने करत असतात.
आपल्याला इतकं तर माहितीच आहे कि ट्वेन्टी ट्वेन्टी फॉरमॅट असलेल्या या लीगची सुरवात २००८ साली ललित मोदींनी केली. पण हि लीग सुरु होण्याआधी भयानक राडे झाले होते, पार कोर्टात हे प्रकरण गेलं होत तेव्हा कुठं आयपीएल खेळवलं गेलं. इतक्या लोकप्रिय लीगचा म्हणजे आयपीएलचा जन्म कसा झाला याबद्दलचा आजचा किस्सा.
आयपीएलची सुरवात हि खरंतर १९९५ सालापासूनच झाली होती. ललित मोदी यांनी सप्टेंबर १९९५ साली इंडियन टी-ट्वेन्टी लीग या फॉर्मॅटनुसार एक लीग रजिस्टर करून ठेवली होती. हि लीग सुरु करण्यामागे खरा उद्देश हा होता कि मोदी एंटरटेनमेंट नेटवर्कचं प्रमोशन करणे. त्यावेळी हि कंपनी ईएसपीएन नेटवर्क सोबत काम करत होती. पण त्यावेळी ललित मोदींचा हा प्रयत्न चालला नाही.
त्यानंतर काही वर्षांनी भारतात ट्वेन्टी ट्वेन्टी लीगचं वारं आलं आणि या क्रिकेटच्या आगळ्यावेगळ्या फॉरमॅटने सगळ्यांनाच वेड लावलं. या फॉरमॅटने भारतातले नवीन खेळाडू शोधायला मदत केली. ट्वेन्टी ट्वेन्टी या खेळाचा फॉरमॅट यासाठी महत्वाचा होता कि भारतीय संघात फक्त पंधरा खेळाडू निवडले जातात, त्यातही एखाद्या क्रिकेटरने संन्यास घेतला अथवा जखमी झाला तर त्याला नंतर खेळण्यासाठी दुसरा फॉरमॅट उपलब्ध नसे. निवड समितीसमोर खेळाडूंचे पर्याय नसे त्यामुळे तेच तेच खेळाडू संघात खेळवले जायचे. या प्रकारच्या क्रिकेटने वेगळीच क्रेझ लोकांमध्ये निर्माण केली.
याच काळात एसेस ग्रुपचे सिईओ डॉ. सुभाष चंद्रा भारतीय क्रिकेटचे हितचिंतक म्हणून काम करू लागले कारण त्यांना क्रिकेटची प्रचंड आवड होती. त्यांनी २००६ साली झी टेलिफिल्मच्याद्वारे झी स्पोर्ट्स चॅनल लॉन्च केले आणि टेन स्पोर्ट्सचे जवळपास सगळे अधिकृत शेअर्स आणि हक्क मोठ्या किमतीत विकत घेतले. यामागे त्यांचा हेतू होता कि आपल्या चॅनलची मार्केटिंग जगभरात व्हावी. बऱ्याच अडचणींना तोंड देऊन त्यांना पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडिज या देशात सामन्यांची ब्रॉडकास्टिंग संधी मिळाली.
मात्र बीसीसीआयने झी स्पोर्ट्सला काही कारणास्तव ब्रॉडकास्टींगचे हक्क दिलेले नाही. हे प्रकरण कोर्टात गेलं. बीसीसीआय आणि ईएसपीएन मध्ये बरेच दिवस ब्रॉडकास्टिंग प्रकरणावरून कोर्टात वाद चालू राहिला. झी स्पोर्टसने ३०७ मिलियन डॉलर्सची बोली लावूनही बीसीसीआयने त्यांना परवानगी दिली नाही. जगमोहन दालमिया यांनी सुभाष चंद्रांना ब्रॉडकास्टींगचे अधिकार देऊ केले नाही.
२००७साली भारताने ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक जिंकला आणि क्रिकेटच्या या प्रकाराला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. या फॉरमॅटवर आधारित डॉ. सुभाष चंद्रा यांनी एक टी-ट्वेन्टी लीग तयार करण्याचा विचार केला. त्यांनी सगळ्यात आधी परदेशातील मोठ्या खेळाडूंना पैसे देऊन हि लीग खेळायला लावली , त्यात शेण वॉर्न , अब्दुल रझ्झाक सारखी मंडळी होती. त्यांनी या लीगला नाव दिलं आयसीएल म्हणजे इंडियन क्रिकेट लीग.
ललित मोदींना जेव्हा या लीगबद्दल समजलं तेव्हा त्यांनी या लीगवर आक्षेप घेतला. त्यावेळी ललित मोदी गुजरातच्या क्रिकेट समितीत होते. मात्र इतर लोकांनी या लीगला डोक्यावर घेतलं. ललित मोदींनी हि लीग बंद करावी म्हणून अनेक कारणांचा एक प्रस्ताव बीसीसीआयला पाठवला. बीसीसीआयने या लीगला क्रिकेट म्हणून मान्यच केलं नाही. या लीगवर बंदी कशा प्रकारे घालता येईल यावर विचार सुरु केला.
सुभाष चंद्रा यांनी कुणालाही न जुमानता हि लीग सुरु केली. २००७ ते २००९ पर्यंत आयसीएल प्रचंड लोकप्रियेत चालली. या लीगमध्ये एकूण १३ संघ होते आणि सगळ्या देशाचे मोजके खेळाडू होते. शहरांच्या नावावरून संघांची नावे ठरवली गेली, चेन्नई सुपर स्टार, मुंबई चॅम्प वगैरे. १ मिलियन डॉलरचे भव्य बक्षीस ठेवण्यात आले होते.
मात्र बीसीसीआयने आयसीएल हटवण्याचा निर्धारच केलेला होता. बीसीसीआयने भारतीय संघातल्या खेळाडूंचा पगार एकदम दुप्पट केला, घरच्या क्रिकेटची बक्षीस रक्कम वाढवली एव्हढ्यावरही जर समाधान नाही झालं म्हणून त्यांनी आयसीएल खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंवर बंदी आणली. यामुळे यातील भारतीय खेळाडू माघारी फिरले. आणि शेवटी आयसीएल बंद करण्यात बीसीसीआयला यश आले. बीसीसीआयच्या या कृत्याला आयसीसीनेही समर्थन दिले.
या सगळ्या प्रकरणानंतर ललित मोदींनी २००८ साली आयपीएलची घोषणा केली. आयपीएलचा पॅटर्न हा जवळपास आयसीएलसारखाच होता. मात्र भारतातील महत्वाच्या खेळाडूंमुळे हि लोकप्रियता जास्तच वाढली. धोनी, सचिन, गांगुली सारखी मंडळी लिलावात चांगल्या किमतीत विकली गेली आणि संघांचे कर्णधारही बनवली गेली.
आजचं आयपीएल जितकं रंजक ठरलं त्यामागे बीसीसीआयने आणि ललित मोदींनी आयसीएलचा कायमचा बंदोबस्त केला हे मोठं यश आहे.
हे हि वाच भिडू :
- गृहमंत्री म्हणत होते आयपीएल रद्द करा, मोदी म्हणाले संपूर्ण स्पर्धा गुजरातमध्ये घेऊन दाखवतो
- आयपीएल टीमचे मालक पैसा मिळवतात तरी नेमकं कसं?
- झहीर खानच्या त्या एका बॉलने अख्ख्या आयपीएलच गणित बदलून टाकलं.