लायजी पाटलांनी जंजिऱ्याच्या सिद्दीला अरबी समुद्रात गाडण्यासाठी धाडसी योजना आखली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी जनतेमध्ये स्वाभिमानाचं स्फुल्लिंग पेटवून स्वराज्याची स्थापना केली होती.
हे स्वराज्य उत्तरेत मुघल दक्षिणेकडील आदिलशाहा शिवाय पोर्तुगीज, इंग्रज अशा अनेक सत्ताधीशाच्या डोळ्यात खुपत होते.
या बलाढ्य शत्रू सोबतच स्वराज्याचा आणखी शत्रू होता ज्याने पश्चिम किनारपट्टी आपल्या ताब्यात ठेवली होती.
तो म्हणजे मुरुडच्या जंजिऱ्याचा सिद्दी.
आफ्रिकेतुन आलेल्या हबशी जमातीच्या सिद्दीने जंजिऱ्यासारख्या अभेद्य सागरी किल्ल्याच्या जोरावर अरबी समुद्रावर वर्चस्व निर्माण केलं होतं.
या समुद्रावर जर आपलं राज्य स्थापन झाल तर इंग्रजांपासून पोर्तुगीजापर्यंत सर्व जण वठणीवर येतील हे महाराजांना ठाऊक होतं. मुघलांच्या पाठिंब्यावर सिद्दीचा उपद्रव सुद्धा वाढला होता.
यासाठी जंजिऱ्याचा बंदोबस्त करावा लागणार होता.
शिवरायांनी मुरुडजवळ सामराजगड बांधून सिद्धीच्या जमिनीवरील हालचालींवर नियंत्रण आणले. तर सिद्दीच्या समुद्रावरील हालचालींना जरब बसविण्यासाठी महाराजांनी मुरुडजवळ समुद्रात असलेल्या कासा बेटावर किल्ला बांधायचा निर्णय घेतला.
शेकडो पाथरवट, गवंडी, लोहार कासा बेटावर पाठवण्यात आले. युद्ध पातळीवर काम सुरू होतं.
हि बातमी कळल्यावर सिद्दी अस्वस्थ झाला, कारण या किल्यामुळे त्याच्या समुद्रातील हालचालींवर मर्यादा येणार होत्या. त्याने आरमार घेऊन कासा बेटावर चढाईची तयारी केली.
परंतु महाराजांनी सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी दर्यासारंग दौलतखानची आधीच नेमणूक केली होती.
किल्ल्यासाठी लागणारी रसद पुरविण्याचे काम प्रभावळीचे सुभेदार जिवाजी विनायक यांच्यावर सोपवण्यात आलं होत. केळशी बंदरावर दौलतखानाच्या आरमाराला ही रसद पोहचवण्याचे आदेश महाराजांनी जिवाजी सुभेदाराला दिले होते.
पण जिवाजीने वेळेत रसद पुरवलीच नाही. केळशीच्या बंदरावर दौलतखान वाट पाहात राहिला. सिद्दीच्या इशाऱ्यावर सुभेदाराने हा घोटाळा केला होता.
शिवरायांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा ते रागाने लालबुंद झाले. त्यांनी सुभेदाराला खरमरीत पत्र पाठवल, त्यात ते म्हणतात,
“जंजिऱ्याच्या श्यामलांस जबर शह देण्यासाठी आम्ही दांडा राजपुरीसारखी दुसरी दांडाराजपुरी कांसा बेटावर उभी करू पहात आहोत. तुम्ही मात्र बेदरकार दिरंगाईने बेफिकिर वर्तता ?”
महाराजांनी त्या सुभेदाराला बडतर्फ केले.
किल्ल्याच बांधकाम बंद पाडण्याच सिद्दीच स्वप्न अपूर्ण राहीलं. रात्रीचा दिवस करत स्वराज्याच्या मावळ्यांनी विक्रमी वेळेत किल्ला उभारला. शिवाजी महाराज म्हणतात त्या प्रमाणे जंजिऱ्याच्या छाताडावर दुसरा जंजिरा उभा राहिला.
या किल्ल्याला नाव देण्यात आलं पद्मदुर्ग. सुभानजी मोहिते यांना पद्मदुर्गाचे पहिले किल्लेदार बनवण्यात आलं.
पुढे 1676 मध्ये पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांनी थेट जंजिऱ्यावर हल्ला करण्याची मोहीम आखली.
त्यांनी आसपासच्या सोनकोळ्याची मदत घ्यायचं ठरवलं. त्यांचे प्रमुख होते लायजी पाटील.
जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. एकेकाळी सोनकोळी पाटील या किल्ल्यावर राज्य करायचे. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र,
याशिवाय तटावर असलेल्या ५७२ तोफा यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता.
मोरोपंतांनी मचव्यावरील तोफांवरून या तटबंदीवर गोळाफेक करायचं ठरवलं. पण हा प्रयत्न सपशेल फसला. जंजिऱ्याच्या बलाढ्य तटबंदीला भेदता आले नाही.
आता काय करायचे हा प्रश्न मोरोपंतांपुढे पडला. अशावेळी एक धाडसी कल्पना पुढे आली, जंजिऱ्याच्या तटाला शिड्या लावायची. आणि
या जीवघेण्या धाडसासाठी पुढे आले ते लायजी पाटील.
त्यांनी मोरोपंत पिंगळे याना सांगितलं की,
“आम्ही होड्यांतून जंजिऱ्याचे तटापाशी जाऊन होड्यांत शिड्या , तटास उभ्या करतो. तुम्ही वेगीवेगी मागोमाग होड्यांतून आपले लष्कर घेऊन येणे. शिडीयांवर चढून , एल्गार करून आपण जंजिरा फत्ते करू. “
ठरल्याप्रमाणे मध्यरात्री लायजींंच्या काही होड्या मध्यरात्रीच्या गडद अंधारात जंजिऱ्याच्या तटा जवळ पोहोचल्या. त्यांंच्या सोनकोळी साथीदारांनी शिड्या होडीत उभ्या करून तटाला लावल्या.
राक्षसाप्रमाणे धिप्पाड हबशी रखवालदार तटावरती गस्त घालत होते. खाली मराठ्यांची चाललेली हालचाल त्यांच्या गावी देखील नव्हती
लायजी पाटील शिडी चढून तटावर लपले. दूर समुद्राकडे त्यांचं लक्ष होत. अंधारात प्रत्येक श्वासागणिक मोरोपंतांच्या येऊ घातलेल्या कुमकेची ते वाट बघत होते.
पण मोरोपंत आणि त्यांचे सैन्य अजिबात आले नाही.
पहाट होत आली. सकाळच्या उजेडामुळे मराठ्यांचा डाव हबश्यांच्या नजरेस पडण्याची शक्यता होती. अन् मग घातच! पुन्हा ही वाट कायमची बंद होणार होती.
काळजावर दगड ठेवून लायजी पाटलांनी तटबंदीवरच्या शिड्या काढून घेतल्या आणि निराश मनाने त्या अंधारात परत पद्मदुर्गाला आले.
एक मोठा आरमारी डाव फुका गेला होता. नाही तर त्याच दिवशी मराठयांनी सिद्दीला अरबी समुद्रात दफन केलं असत.
लायजी पाटलांचे हे धाडस पाहून शिवाजी महाराजांनी त्यांना रायगडावर बोलवून घेतले. त्यांना पालखीचा मान दिला.
पण दर्यात फिरणार्या सोनकोळ्यांना पालखीचा काय उपयोग म्हणून लाय पाटलाने नम्रपणे पालखी नाकारली.
यावरून महाराज काय ते समजले. त्यांनी मोरोपंताना एक नावे गलबत बांधून त्याचे नाव “पालखी” ठेवून लाय पाटलांच्या स्वाधीन करण्यास सांगितले. याशिवाय राजांनी लाय पाटलास छत्री, वस्त्रे, निशाण, व दर्या किनारीची “सरपाटीलकी” दिली.
हे ही वाच भिडू.
- आणि म्हणून महाराजांनी ठरवलं भारतातलं पहिलं सुसज्ज आरमार उभा करायचं !!
- मुंबईचा हा पाटील बाबा घराच्या दारात सोन्याचा ढीग वाळत घालायचा.
- मराठा आरमाराच्या दहशतीच्या कथा आजही ब्रिटीश रॉयल नेव्ही मध्ये चर्चिल्या जातात.