आमचं ठरलय आत्ता फक्त दक्षिण उरलय, कोल्हापूरात नेमकं काय चाललय..?

रामाधिरसिंगची माणसं वासेपुरमधून एका पोरगीचं अपहरण करतात. सरदार खान अर्थात मनोज वाजपेयी. रामाधिरसिंगच्या घरापुढे जीप घेवून जातो. हातात माईक आणि स्पिकर. तीन तासात मुलगीला सोडून द्यायला सांगतो. नाही सोडलं तर काय परिणाम असतील ते देखील सांगतो.

पाठीमागं गाण सुरू असतं…

वो बेरहम

तूने किये, क्या क्या ज़ुल्म

क्या क्या सितम

“तुझको भी न छोड़ेंगे हम”

कसम पैदा करने वाले की

गॅंग ऑफ वासेपूर सिनेमातला हा सीन. एक विरूद्ध दूसरा. गोष्ट तशी फिल्मीच. बदला घेण्याची. हेच राजकारण आज कोल्हापूरात सुरू आहे. एका बाजूला आहे सतेज उर्फ बंटी पाटील आणि दूसऱ्या बाजूला आहेत मुन्ना महाडिक. काल सिनेमाच्या क्लायमॅक्सला सुरवात झाली.

क्लायमॅक्सची पाटी पडली त्यावर लिहलं होतं,

आमचं ठरलय आत्ता फक्त दक्षिण उरलय.

पण पिक्चर सांगण आमचं काम आहे. कोल्हापूरच्या पहिल्या भागात काय होतं. इतिहासात काय झालं हे सांगण आमचं काम. हिरो कोण आणि व्हिलन कोण हे ठरवणं तूमच काम.

कोल्हापूरच्या वासेपूरची गोष्ट सुरू होते ती १९९२ सालापासून. तेव्हा सतेज पाटील शिवाजी विद्यापीठाच्या स्टुडंट कौन्सिलचे चेअरमन होते. पण इतक्या प्लॅशबॅकमध्ये जाण्याची आपणाला गरज नाही. आपण सुरवात करू ती १९९९ पासून. १९९९ साली सतेज पाटील करवीरमधून दिग्विजय पाटील यांच्या विरोधात उभा राहणार होते. पण कमी वयाचा दाखला देत कॉंग्रेसने त्यांची उमेदवारी नाकारली.

अप्पा महाडिकांनी करवीरमधून दिग्विजय खानविलकरांना पाडण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. पण अप्पा महाडिकांना त्यात सातत्याने अपयश येत होतं. दिग्विजय खानविलकरांचा सलग पाच वेळा निवडून येण्याचा विक्रम होता.

अशा माणसाला राजकारणाच्या मैदानात सहजासहजी हरवणं अशक्य कोटीतली गोष्ट होती.

१९९९ साली कॉंग्रेसने बंटी पाटलांना उमेदवारी नाकारली. निकाल लागला. राष्ट्रवादी पक्षाचे दिग्विजय खानविलकर पुन्हा एकदा निवडून आले. दिग्विजय खानविलकरांकडे आरोग्यमंत्री पदाची धूरा आली.

पाच वर्षात शांत बसून रहायचं पुन्हा पुढच्या इलेक्शन आल्यानंतरच तयारी करायची अस एखाद्याचं राजकारण असू शकतं. पण बंटी पाटील काकणभर सरस ठरतात ते इथेच.

बंटी पाटलांचे कार्यकर्ते सांगतात,

“बंटी पाटलांचा विजय होवो किंवा पराभव होवो पण बंटी पाटील निकालाच्या दूसऱ्या दिवशी सर्वांना भेटतात. मिटींग लावतात, चर्चा होते आणि त्याच दिवसापासून कामास सुरवात चालू होते.”

बंटी पाटलांनी या पाच वर्षात काय केलं हे सांगायचं झालं तर कागलच्या विक्रमसिंग घाटगेच्या शब्दात  सांगायला लागतं. ते म्हणाले होते,

“हा माणूस सकाळी एका अंत्ययात्रेत दिसतो. दूपारी लग्नात असतो.सायंकाळी बारश्याच्या कार्यक्रमात असतो तर रात्री कुणाच्यातरी वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी असतो.” 

दिग्विजय खानविलकर तेव्हा आरोग्यमंत्री असल्याने त्यांचा वावर करवीरहून अधिक मुंबईत वाढला होता. योग्य टायमिंग साधन बंटी पाटलांनी घराघरात संपर्क साधला. गल्ल्यान् गल्ल्या पिंजून काढून आपला स्वत:चा असा गट उभा केला. बावड्याच्या आसपासचा कोल्हापूर शेजारच्या खेडापाड्यातला तरुण एकत्रित बांधायला बंटी पाटलांनी सुरवात केली. इथे बंटी पाटलांच राजकारण पक्क बांधलं गेलं.

२००४ च्या निवडणुकांपुर्वीचा काळ. एका कुस्ती स्पर्धेत बंटी पाटील उपस्थित होते. तिथ त्यांनी सांगितल,

लांग कुठल्याही रंगाची असेल पण कुस्ती करणाच..!!

करवीरमध्ये दिग्विजय खानविलकरांची सरळ लढत बंटी पाटलांसोबत असणार हे स्पष्ट झालं होतं. या दरम्यान अप्पा महाडिक, मुन्ना महाडिक यांचा काय रोल होता तर कोल्हापूरातलं राजकारण पुर्णपणे अप्पा महाडिकांच्या हाती होतं, मुन्ना महाडिक देखील वर्चस्व टिकवून होते. गोकुळ आणि महानगरपालिका त्याचसोबत जिल्हा परिषद अशा सर्व ठिकाणी महाडिकांचा शब्द महत्वाचा होता.

बंटी पाटलांनी २००४ ची निवडणुक लढायचं ठरवलं.

आघाडी असल्याने राष्ट्रवादीच तिकीट दिग्विजय खानविलकरांच्या पारड्यातच पडलं. निवडणुका लागल्या. या निवडणुकीत बंटी पाटील फक्त डी.वाय.पाटील यांचे पुत्र नव्हते. पाच वर्षात जितकं दाबलं तितकं उसळलं या न्यायाने ते तयार झालेले. बंटी पाटलांनी निवडणूक लढली आणि दिग्विजय खानविलकर यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा तब्बल चाळीस हजार मतांच्या फरकाने पराभव केला.

आत्ता खरा पिक्चर सुरू झाला होता. कालपर्यन्त अंडरडॉग वाटणारा मुलगा कोल्हापूरच्या सत्तेत येतो. लोकांच्यातून निवडून येवून आमदार होतो हे गोष्ट सहजासहजी पटणारी नव्हती. एकमेकांचे मित्र असले तरी अतंर्गत राजकारणास पाटील आमदार होताच वाव मिळू लागला.

बंटी पाटील आमदार झाले असले तरी गोकुळवर निर्विवाद महाडिकांची सत्ता होती. मी आमदार आहे, अल्प उत्पन्न गटातून गोकूळ दुधसंघात एक डायरेक्टर आमचा घ्यावा म्हणून बंटी पाटलांनी शब्द टाकला. राजकारणात हातपाय पसरतो म्हणल्यानंतर बंटी पाटलांचे पंख छाटण्याचा हा पहिला प्रयोग होता अस कोल्हापूरचे नागरिक सांगतात. इथे स्पार्क पडत गेला.

आमदरकीच्या पाच वर्षात बंटी पाटलांनी कोल्हापूरवर पकड बसवली. कालचा पोरगा पुढे जातो याचा रागमुळे अंतर्गत राजकारणास सुरवात झाली. पण बंटी पाटील आणि मुन्ना महाडिक यांचे संबध अद्याप विकोपाला गेले नव्हते.

याची सुरवात झाली ती २००९ च्या लोकसभेपासून.

२००९ च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मुन्ना महाडिक इच्छुक होते. राष्ट्रवादी पक्षाचे खासदार म्हणून सदाशिवराव मंडलिक उत्तम काम करत होते. पण राजकारण बदललं आणि अखेरची बाजी मारली ती कोल्हापूरच्या संभाजी महाराजांनी. संभाजी महाराजांना राष्ट्रवादीने तिकीट दिल्याने संभाजी महाराजांना पाडण्याचा डाव रचण्यात आला.

बंटी पाटील आपल्या सोबतच असणार हे गृहित धरून मुन्ना महाडिकांनी विरोध चालू ठेवला. पण बंटी पाटलांनी आघाडीचे उमेदवार म्हणून संभाजी महाराजांच्या पाठीमागे आपली ताकद लावण्याचा संकल्प गेला आणि ठिणगीने आग पकडली.

तिथून मुन्ना महाडिक विरुद्ध बंटी पाटील या राजकारणास सुरवात झाली.

चूक कोणाची होती का? तर बंटी पाटलांचे कार्यकर्ते म्हणतात, “बंटी आघाडीत होते. राष्ट्रवादीने संभाजी महाराजांना तिकीट दिले म्हणून ते त्यांच्या पाठीमागे उभा राहिले. महाडिकांना तिकीट मिळालं असतं तर ते महाडिकांच्या पाठीमागे उभा राहिले असे. आपल्याला तिकीट मिळालं नाही म्हणून दूसऱ्या उमेदवाराला पाडायचं हे राजकारण चूकीचं होतं. बंटी पाटलांनी त्याला खतपाणी घातलं नाही.”

इकडे महाडिकांचे कार्यकर्ते म्हणतात,

“बंटी पाटलांनी संभाजी महाराजांना पाडण्यासाठी महाडिकांच्या बाजूने उभा रहायला हवं होतं. पण एखाद्याला पाडण्यासाठी पाठीमागे उभा रहायचं तात्विक कारण मात्र ते देवू शकत नाहीत.”

२००९ च्या लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला.

सदाशिवराव मंडलिक अपक्ष म्हणून निवडून आले. २००८ साली मतदारसंघ पुर्नरचनेमुळे सतेज ऊर्फ बंटी पाटलांचा हक्काच्या करवीर मतदारसंघतील वीस हजार मते असणारं कसबा बावडा कोल्हापूर उत्तर मतदारसंघाला जोडलं गेलं. अशा वेळी बंटी पाटलांनी कोल्हापूर दक्षिणमधून उभा राहण्याचा निर्णय घेतला.

कधीकाळचा मित्र असणाऱ्या धनंजय महाडिक उर्फ मुन्ना महाडिक यांच्यासोबत इथे त्यांची फाईट लागली.

महाडिक गटासाठी बंटी पाटलांची वाढलेली ताकद अडचणीची ठरतच होती. महाडिक गटाने ठरवल्याप्रमाणे त्यांनी संभाजी महाराजांचा लोकसभेसाठी पराभव करून दाखवला होताच. आत्ता बंटी पाटलांचा पराभव करण्याचा चंग बांधण्यात आला पण,

बंटी पाटील निवडून आले आणि महाडिक गट विरुद्ध बंटी पाटील असा संघर्ष उफाळू लागला.

दरम्यानच्या काळात बंटी पाटलांना कॉंग्रेसपक्षाकडून ताकद देण्याच काम करण्यात आलं. बंटी पाटलांना गृह, ग्रामविकास व अन्न खात्याचा राज्यमंत्री करण्यात आलं. सोबतच लातूरच पालकमंत्रीपद देण्यात आलं. जिरवाजिरवीच्या राजकारणात बंटी पाटलांची जिरवायची एवढं एकमेव ध्येय विरोधी गटाकडे राहिलं.

पुलाखालून पाणी गेलं आणि लोकसभेच्या निवडणुका लागल्या.

मोदी लाट निर्माण झाली. अशा काळात राष्ट्रवादीने कोल्हापूरातून मुन्ना महाडिकांना लोकसभेची उमेदवारी दिली. बंटी पाटील आणि मुन्ना महाडिक हा गट एकमेकांचा कट्टर विरोधक झाला होता. या विरोधाची उदाहरण सांगताना लोक सांगतात की, दोन्ही गटातील बायका देखील एकमेकांच्या घरी हळदीकुंकवाला जात नव्हत्या असा तो विरोध होता. प्रत्येकाचे गट पक्के बांधले गेले होते.

अशा वेळी बंटी पाटलांनी सर्वांना आश्चर्यात टाकणारा निर्णय घेतला,

तो म्हणजे मुन्ना महाडिकांना लोकसभेसाठी मदत करण्याचा.

मुन्ना महाडिकांना मदत करण्याच पहिलं कारण होतं ते म्हणजे ज्या न्यायाने आघाडीचा उमेदवार म्हणून मागच्या निवडणुकीत संभाजी महाराजांना मदत केली होती त्याचप्रमाणे आघाडीचा उमेदवार म्हणून महाडिकांच काम करायचं. पण यामागे सर्वात मोठ्ठ राजकारण होतं ते म्हणजे,

महाडिकांनी खासदार व्हायचं आणि आपल्याला आमदारकीला मदत करायची.

इतक्या वर्षात एकमेकांच्या विरोधात कट्टर उभा राहिलेल्या कार्यकर्त्यांना विरोधात जावून असा निर्णय घेणं हा बंटी पाटलांसाठी आत्मघातकी निर्णय होता. पण बंटी पाटलांनी तयारी केली. बंटी पाटलांनी महाडिकांना पाठिंबा जाहिर केला.

मुन्ना महाडिक म्हणाले,

बंटी पाटलांनी पाठिंबा दिल्यामुळे माझ्या अंगात दहा हत्तीच बळ आलं आहे.

देशात मोदी लाट होती. देशभरातून कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या फडशा उडाला. राष्ट्रवादी पक्षाचे फक्त चारच खासदार निवडून येवू शकले. सुप्रिया सुळे आणि उदयनराजे आणि विजयसिंह मोहिते पाटील हे आपआपल्या बालेकिल्यामुळे निवडून आले. राज्यभरात करिष्मा म्हणतात तो झाला फक्त कोल्हापूरातच.

कोल्हापूरातून मुन्ना महाडिक खासदार झाले.

आत्ता विधानसभेच्या निवडणुकांसाठी महाडिक पाटलांच्या उपकाराची परतफेड करणार, त्यांना आमदार म्हणून निवडून यायला मदत करणार हे जगजाहिर होतं.

घात होणं काय असतं हे उभ्या कोल्हापूरकरांनी बघितलं ते २०१४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये.

महाडिक गटाने बंटी पाटलांना दगा देत अमल महाडिकांना भाजपकडून मैदानात उतरवले. निवडणुकीला फक्त १४ दिवस शिल्लक असताना अमल महाडिकांना मैदानात आणण्यात आले. भाजपचे वारे होते त्यात नवखा उमेदवार. बंटी पाटलांनी लोकसभेला महाडिकांना पाठिंबा देण्याच्या नादात आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना दूखावलं होतं. मुन्ना महाडिकांनी दगाफटका सहन करत बंटी निवडणुकीच्या मैदानात उतरले.

या निवडणुकीत भाजपचे अमल महाडिक विजयी झाले. बंटी पाटलांचा ठरवून गेम करण्यात आला. महाडिक गटाला सत्तेत स्थान मिळालं पाहीजे, कोल्हापूरचा विकास झाला पाहीजे म्हणून बंटी पाटलांनी केलेल्या तडजोडीचं राजकारण त्यांचाच बळी घेवून शांत बसलं…

बंटी पाटील संपले…

कोल्हापूरात चर्चा सुरू झाली. आत्ता जे काही सत्तेत स्थान असेल ते महाडिक घराण्याचे. जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद. जोडीला दोन आमदारकी आणि एक खासदारकी घेवून महाडिक घराणे कोल्हापूरच्या राजकारणात प्रस्थापित झाले.

मांजराला जितकं कोपऱ्यात दाबलं जातं तितकं ते उसळी घेवून वर येत हा साधा नियम महाडिक गटाला समजला नाही.

इथे बंटी पाटलांचा पिक्चर संपला अस वाटलं पण पिक्चरच्या क्लाईमॅक्सला इथूनच सुरवात झाली…

अप्पा महाडिक म्हणजे महाडिक घराण्याचा कणा. ते विधानपरिषदेवर सलग १८ वर्ष आमदार होते. विधानपरिषदेवर निर्विवादपणे निवडून येण्यात त्यांची ख्याती होती. पुतण्या धनंजय महाडिक राष्ट्रवादीचे खासदार, मुलगा अमल महाडिक भाजपचा आमदार आणि ते स्वत: कॉंग्रेसचे आमदार होते.

एकावेळी घरात तीन पक्ष ठेवणारे महाडिक होते.

बंटी पाटलांनी पहिला घाव घातला तो विधानपरिषदेच्या आमदारकीवर.

काहीही होवो पण अप्पा महाडिक पडत नसतात हे चित्र त्यांनी काही दिवसात पलटवलं. अप्पा महाडिक विरुद्ध बंटी पाटील अशी थेट लढत झाली आणि विधानपरिषदेवर बंटी पाटलांचा विजय झाला. १८ वर्ष निर्विवाद निवडून येणारे अप्पा महाडिक बंटी पाटलांच्या समोर हरले.

कोपऱ्यात दाबलेल्या मांजराने जोरात उसळी घेतली. इथे सरदार खानचा (मनोज वाजपेयी) तो डॉयलॉग आठवतो,

हमारी जिंदगींका एकही मकसद हैं, बदला…

बंटी पाटलांनी अप्पा महाडिकांचा पराभव करून आपल्या कार्यकर्त्यांमध्ये बळ ओतलं. त्यानंतर आल्या लोकसभेच्या निवडणूका.

या वेळी महाडिक घराण्यातून एक आमदारकी गेली होती. घरात एक खासदारकी आणि एक आमदारकी शिल्लक राहिली होती. अशातच बंटी पाटलांनी नारा दिला,

आमचं ठरलय… !!

चांगल्याने वागलं की काय होतं याचा फटका बसलेल्या बंटी पाटलांनी युतीच्या संजय मंडलिकांच काम केलं. आमचं ठरलय चा नारा घुमला आणि महाडिक घरातून अजून एक खासदारकी वजा झाली.

मुन्ना महाडिकांचा पराभव झाला.

हा खेळ सुरू झालेला तो कोल्हापूर दक्षिण मधून. आपल्या हक्काच्या मतदारासंघातून. जिथे फसवण्यात आलं तिथेच जिरवायची ठरवून कालच्या सभेत बंटी पाटिल म्हणाले,

आमचं ठरलय आत्ता फक्त दक्षिण उरलय…!!

इतक्या वर्षाचं हे राजकारण. एक आमदारकी व एक खासदारकी ज्या महाडिकांच्या एका घरात होती त्यांना अजून एका आमदरकीचा मोह आवरता आला नाही. मैत्रीचा हात पुढे करून आलेल्या जून्या साथीदाराला समजून घेण्यात महाडिक चुकले. बंटी पाटलांना संपवण्याच्या नादात बंटी पाटील द्वेषाने अधिकच जोमात उभा राहिले.

कोल्हापूरकरांनी सर्वकाही भरभरून दिलं असताना सर्वकाही आपल्याच घरात ठेवण्याच्या वृत्तीने महाडिकांच राजकारणाला सुरूंग लावला. आत्ता बंटी पाटलांनी नारा दिलाय फक्त दक्षिण उरलय. बंटी पाटील ते पुर्ण करूनच शांत बसतील, कारण कुठेतरी दगा दिल्याची सल बंटी पाटलांना स्वस्थ बसून देत नसावी.

हे ही वाच भिडू.

2 Comments
  1. Pradip says

    Bolbhidu Karyakarte tumhi one side article lihle ahe.
    2009 la Banti patil ne Loksabhechya tikitsatti Mahadikana virodh kela hota, Amal mahadik yana ZP Adhakshyapad nahi dile, mahanagarpaliket mahadik gatane Tararani Aghadi congress madhe visarjit karun sudha mahadik gatachya nagarsevakana tikit dile nahi.

  2. Nikhil says

    geli 2 tass vividh vishyavarchi articles vachtoy, magnetic aahe tumchi website…wahh. Mast re bhidu

Leave A Reply

Your email address will not be published.