राजकारण सोडून या पाच जणांच कौतुक मोठ्या मनानं करायला हवं….

पाणी वाढत होतं तरी महापूर येईल असा अंदाज कोणालाच नव्हता. पाण्याची पातळी अचानक वाढू लागली आणि घरंच्याघरं पाण्याखाली गेली. लोकांसोबतच प्रशासनाचे देखील धाबे दणाणले. आत्ता काय हा प्रश्न सर्वांच्या समोर होता. लोकं प्रचंड भिली होती. वरुन कोसळणारा पाऊस आणि वाढणारी पाण्याची पातळी अशा अवस्थेत मिळेल त्यातून राहतं घर सोडायला लागलं. जिथे सोय करण्यात आली तिथे जेवणापासून अंथरून पांघरून, कपडे असे प्रश्न होते. अशा वेळी ठिकठिकाणी सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनी मदत केली.

पण या मदतीत सर्वाधिक नावं चर्चेला आली ती हि प्रमुख पाच नाव. यांनी मदत तर केलीच पण पहिल्या दिवसापासून हे लोकांसोबत थांबून राहिले.

इस्लामपूरच्या शैलजा पाटील, भिलवडी वांगीचे विश्वजीत कदम, हातकणंगलेचे नवनियुक्त खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आणि खासदार संभाजीराजे या माणसांनी चांगलीच कामे केली. निस्वार्थी मनाने हि माणसं पुरात झटताना लोकांना दिसली. 

यांना सोडून बाकीच्यांची नाव घ्यायची झाली तर जयंत पाटील, सदाभाऊ खोत, सुधीर गाडगीळ, राजू शेट्टी, प्रकाश आवाडे, मुन्ना महाडिक, संभाजी भिडे, चंद्रदिप नरके, उल्हास पाटील, गोपीचंद पडळकर अशी अनेक नावं निघतील. राजू शेट्टी यांनी जनावरांच्या चाऱ्याची सोय केली. आजही त्यांच्याकडून काम चालू आहे. स्वत:च्या घरासमोर छावणी उभा करुन शेतकऱ्यांच्या जनावरांना त्यांनी आसरा दिला. प्रत्येकाने काम केलं.

पण पुराच्या काळात या पाच जणांनी जे केलं त्याची दखल घेणं महत्वाच आहे. लोकांना भेटून त्यांच्या प्रतिक्रिया घेवून आम्ही पहिली पाच नाव आपणासमोर मांडत आहोत. 

पहिलं नाव, शैलजा जयंत पाटील. 

शैलजा पाटील यांचे पती जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष. त्यांचा मात्र कुठल्याही राजकिय पक्षासोबत थेट संबध नाही. वाळवा तालुक्यात पुराचा जोर वाढला. त्यानंतर प्रशासकिय पातळीवर यंत्रणा कामाला लावून जयंत पाटलांनी पुरातून लोकांना बाहेर काढण्याच काम केलं. लोकांना तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करुन देण्यात आली. मात्र त्या एक दोन दिवसात जेवणाचा प्रश्न महत्वाचा होता. 

अशा वेळी कंबर कसली ती शैलजा पाटील यांनी. आजवर शैलजा पाटील यांचा राजकिय किंवा सामाजिक व्यासपीठांवर कमी वावर. जयंत पाटीलांशी संबधित असणाऱ्या कोणत्याच संस्थेत त्या हस्तक्षेप करत नसल्याच स्थानिक सांगतात. मात्र या पुरावेळी त्यांनी संबधित संस्था, राजारामबापू इंजनियरिंग कॉलेजचे विद्यार्थी, जयंत पाटलांचे कार्यकर्ते यांना हाताशी धरून टिम बांधली. 

आपल्या राहत्या घरी जेवणाची करण्याची सोय करण्यात आली. परिचयातील महिलांना हाताला धरून सकाळ संध्याकाळ स्वयपाक होवू लागला. हा स्वयपाक किती जणांचा असायचा तर चार ते पाच हजार लोकांचा. स्वयपांक करायचा. युज अॅण्ड थ्रो मधून त्याचे पॅकेट तयार करायचे आणि कार्यकर्ते ते प्रत्येक पुरग्रस्त व्यक्तिपर्यन्त पोहचवायचे.

 

या स्वयंपाकाची सुरवात कशी व्हायची तर पाच हजार लोकांचा स्वयंपाक म्हणजे सकाळी ६ पासून सुरवात करायची. तिथून दूपारचं शेवटचं जेवण पोहचवण्यासाठी बारा ते एक व्हायचे. ते झालं की लगेच रात्रीच्या जेवणाची सुरवात करायला लागायची. हे काम रात्री १२ पर्यन्त संपायचं. ते झालं की लगेच सकाळच्या जेवणासाठी तयारी करायला लागायची ते पहाटेपर्यन्त चालायचं. या दरम्यान शैलजा पाटील स्वत: तिथे ठाण मांडून असायच्या. किरकोळ कामांपासून सर्व काही त्याच करत. त्यांना राबताना पाहिल्यामुळे कार्यकर्ते, विद्यार्थी, स्वयपाकासाठी आलेल्या महिला या सर्वांमध्ये उत्साह यायचा आणि कामं दुप्पट वेगाने व्हायची. 

पहिल्या दिवसापासून अहोरात्र स्वयपाक पोहचवण्याचं काम सुरू झालं. यामध्ये कुठेही खंड पडला नाही. मध्येच बातमी आली की हायवे बंद झाला आहे. त्यामुळे पेठ नाका ते कराड दरम्यानच्या ४० किलोमीटरमध्ये हजारो ट्रक ड्रायव्हर अडकून पडले आहे. शैलजा पाटील यांनी ती देखील जबाबदारी घेतली व परिसरातील लोकांसोबत भारताच्या कानाकोपऱ्यातून अडकलेल्या ड्रायव्हर लोकांच्या जेवणाची सोय देखील झाली. 

हे जेवण देत असताना लहान मुलं, म्हातारी माणसं यांच्यासाठी अंडी, केळी यांची देखील सोय करण्यात आली. जयंत पाटलांनी २००५ च्या पुरात आणि या वेळीच्या महापूरात देखील चांगल काम केल्याचे दाखले स्थानिक देत असतात, त्याच सोबत यंदा शैलजा पाटील यांनी हजारों लोकांना जेवण दिल्यामुळे त्यांची एक वेगळीच प्रसिद्धी झालेली दिसून येते. 

दूसरं नाव म्हणजे विश्वजीत कदम. 

विश्वजीत कदम यांच दूसरं नाव बाळासाहेब. पतंगराव कदम यांचा दांडगा लोकसंपर्क. पण विश्वजीत यांचा जनसंपर्क नसल्याच्या टिका वारंवार होतं होत्या. त्यांना लोकांनी जवळून पाहिलं नाही, आजवर कधी बोलणं देखील झालं नाही हा नाराजीचा सूर. त्यामुळेच यंदा बाळासाहेब अडचणीत येणार अशा चर्चा मतदारसंघात झडू लागल्या होत्या. 

महापूर आला आणि अनपेक्षितरित्या विश्वजीत कदम कमालीचे सक्रिय झाले. सर्वात महत्वाच काम होतं ते म्हणजे पाणी वाढत असताना गावागावात जावून लोकांना धीर देणं. लोकं भिल्यामुळे मिळेल त्या साधनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. यातूनच ब्रम्हनाळ सारखी दुर्घटना झाली. पण विश्वजीत कदमांनी इथे बाजी मारली. व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही तर लोकांसाठी पतंगराव कदमांप्रमाणे धावून येणारे बाळासाहेब लोकांनी पहिल्यांदा पाहिले हे सत्य. विश्वजीत कदम प्रत्येकाच्या गावात जात.

शेवटचा माणूस इथून जाणार नाही तोप्रर्यन्त मी हालणार नाही अस सांगत. लोकांना धीर देत. त्यामुळे लोकांचा आत्मविश्वास वाढलां.

स्वत: आमदार आपल्यासोबत पुराच्या पाण्यात थांबलाय म्हणल्यानंतर विश्वास वाढू लागला. नियोजन करुन कार्यकर्त्यांनी प्रत्येक माणसाला बाहेर काढलं. विश्वजीत कदमांची जमेची बाजू म्हणजे भारती विद्यापीठाचे हजारों कर्मचारी. कार्यकर्त्यांसोबत हे कर्मचारी देखील धावून आले. ठिकठिकाणच्या भारती विद्यापीठाच्या शाळा, कॉलेज रिकामे करण्यात आले. तिथं लोकांची सोय करण्यात आली. अंथरुण, पांघरूणापासून ते जेवणापर्यन्तची सोय तात्काळ झाली आणि त्यामुळे लोकांना धीर आला. 

विश्वजीत कदम देखील आजतागायत थांबून आहेत. ठिकठिकाणी लोकांच झालेल नुकसान. करायचा शासकिय पाठपुरावा याप्रकारची कामे करत आहेत. या दरम्यान विश्वजीत कदमांच्या पायाला जखम झाली. सततच्या पाण्याच्या संपर्कांमुळे सेप्टिक झाल्याच सांगण्यात आलं. तरिही ते पुराच्या पाण्यात थांबून होते याचं लोकांना विशेष कौतुक वाटलं. 

तिसरं नाव सतेज उर्फ बंटी पाटील. 

बंटी पाटील सध्या विधानपरिषदेचे आमदार. मुन्ना महाडिक विरुद्ध बंटी पाटील असा सामना रंगण्याची यंदा चर्चा आहे. असेल ते असेल पण कालपर्यन्त कळंबा तलावाचे पाणी पुजन करणारे बंटी पाटील पाणी वाढू लागलं तस धावून आले. बंटी पाटलांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामध्ये अंधार पडून यायला लागला आहे. आणि पूरातून बाहेर काढणाऱ्या बोटीतून बंटी पाटील जोरजोरात हाका मारत आहेत. शेवटची फेरी आहे कोण राहिलय का? शेवटापर्यन्त बंटी पाटलांनी कडवी झुंज दिली. 

पूर ओसरेल म्हणून लोक आपल्या घरात थांबून होते तेव्हा बंटी पाटील स्वत: जात लोकांना समजावत आणि बोटीत बसवत. उचगाव, चिंचवाड, वळिवळे, गांधीनगर अशा भागातून त्यांनी लोकांना बाहेर काढलच पण त्यांच्या अंथरुण, पांघरूणापासून सर्व गोष्टींची सोय त्यांनी केली. सकाळी सहा ते रात्री साडेअकरा पर्यन्त चालणाऱ्या बचावकार्यात ते स्वत: सहभागी होत होते. पुरपातळीत होणारी वाढ, आवश्यक वाटणारी मदत, गरज कोणत्या भागात आहे, धरणातून होणारा विसर्ग अशा वेगवेगळ्या अपडेट ते फेसबुक पेजवरुन देत होते. 

इतक्यावरच न थांबता त्यांनी पूर ओसरल्यानंतर त्यांनी स्वखर्चाने स्वच्छतेची मोहिम हाती घेतली. डि. वाय. पाटील ग्रुपमार्फत वळिवडे गाव दत्तक घेतले. प्रत्येक गावात जावून लोकांसोबत चर्चा केली आणि त्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडे २४ मागण्या करण्यात आल्या. 

बंटी पाटलांनी या महापूरात विशेष काम केल्याने त्यांची चर्चा संबध कोल्हापूराबरोबर राज्यभरात झाली. 

चौथ नाव म्हणजे खासदार संभाजीराजे. 

खासदार संभाजीराजे हे व्यक्तिगतरित्या पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याच काम करत होते. सत्ताधारी पक्षातील लोकांसोबत असणारे संबध आणि खासदार त्यामुळे ते प्रशासकिय पातळीवर संपर्क करु शकत होते. त्यांच्या प्रयत्नातून कोल्हापूरात लष्कर व नौदल येवू शकले. पुणे विभागाच्या सब कमांडर यांच्यासोबत त्यांनी संपर्क साधून ८० जवानांची गुरखा बटालियन बोलावून घेतली. पश्चिम कमांडर प्रमुख व्हाईस अॅडमिरल अजित कुमार यांच्यासोबत संपर्क करुन लष्कराच्या पाच तुकड्या हेलिकॉप्टर मधून बोलावून घेतल्या.

त्या परिस्थितीत लष्कराची लवकरात लवकर मदत मिळणं गरजेच होतं आणि ते काम संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली पार पडलं. लष्कर, NDRF टिमला संपर्क करणं. शासकिय पातळीवर पाठपुरावा करून मदत मागण्याच काम संभाजी राजे यांच्याच नेतृत्वात पार पडलं. NDRF टिम आल्यानंतर त्यांनी स्वत: पूरग्रस्त भागात जावून परिस्थितीचा अंदाज घेतला. त्यावरून अतिरिक्त कुमक पाठवण्याची विनंती राजनाथसिंह यांच्याकडे केली. कोल्हापूरच्या वरच्या भागासोबत शिरोल आणि सांगलीसाठी देखील त्यांनी मदत पाठवली. 

स्वत: पाण्यात उतरून लोकांना धीर देत असल्याचा त्यांचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला. इतक्यावर न थांबता खासदार फंडातून पाच कोटी रुपये त्यांनी पुरग्रस्त भागात तातडीने पोहचवण्यासाठी मदत केली. पूर ओसरल्यानंतर शासकिय पातळीवर पाठपुरावा करताना सांगली कोल्हापूर पुरग्रस्त प्राधिकरणाची स्थापना करण्याची विनंती त्यांनी केली आहे. पुर ओसरल्यानंतर तहसिलदारांसोबत मिटींग घेवून पंचनामे करण्याविषयी ते पाठपुरावा करत आहेत त्यामुळेच संभाजीराजेंच नाव देखील कोल्हापूरात मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं. 

पाचवं नाव म्हणजे धैर्यशील माने. 

धैर्यशील माने हे सेनेचे खासदार. पूरग्रस्त भागात लवकर मदत न पोहचल्याने लोकांचा रोष सत्ताधाऱ्यांवर वाढत होता. गिरीष महाजन, सुभाष देशमुख आणि चंद्रकांत पाटील यांना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वातावरण असताना धैर्यशील मानेंना लोकांनी उचलून घेतलं ते त्यांच्या भूमिकेमुळे आणि लोकांसाठी झटताना दिसलेल्या वृत्तीमुळे. 

 

प्रशासनाच्या दिरंगाईला जबाबदार कुणाला धऱायचं? असा प्रश्न त्यांना मिडीयाकडून विचारण्यात आला. तेव्हा धैर्यशील माने म्हणाले लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळेच जबाबदार आहोत. धैर्यशील मानेंचा सडेतोड बोलणारा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. बोटीत बसून त्यांनी अनेक ठिकाणी मदत केल्याच सांगितलं गेलं. इतक्यावरच न थांबता सामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे स्वत: धान्याची पोती त्यांनी उचलली.

एक खासदार आपल्या सोबत उभा आहे हे पाहून लोकांना धीर वाटला. सत्तेत असून सत्ताधाऱ्यांना प्रश्न केल्याने ते चर्चेत आले. शिवाय पाणी ओसरल्यानंतर ठिकठिकाणी भेटी देवून प्रशासकिय अधिकाऱ्यांना पंचनामे करायला भाग पाडलं. 

शैलजा पाटील, विश्वजीत कदम, सतेज पाटील, संभाजी राजे आणि धैर्यशील माने यांच काम मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं. याच्यासोबतच अनेक नेत्यांनी देखील कामे केलीच. शक्य ते प्रयत्न प्रत्येकाकडून करण्यात आले. पण मोठ्या प्रमाणात चर्चा झाली ती या प्रमुख पाच नावांचीच. 

हे हि वाच भिडू. 

4 Comments
 1. Hanmant Hadave Bahe Islampur says

  ????

  1. Rajendra Baburao Mandlik says

   Really great persons..

 2. Sandeep Chavare says

  how can you forget Hon Raju shetti…???He worked so hard during these days to help people…n still working with his team.He is genuine leader. works without expecting any spotlight to share..hats off to him..bol bhidu dnt forget him.

 3. हणमंत गणेश पवार says

  राजु शेट्टी साहेब च नाव नाही
  !
  धिक्कार

Leave A Reply

Your email address will not be published.